विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वरी - ईजिप्त आणि अरबस्तानमधून हें गवती झाड आणलें असावें. याची लागवड बऱ्याच ठिकाणीं होते परंतु ती जास्त प्रमाणांत होत नाहीं. बंगाल्यांत हें पुष्कळ चिक्कण जमिनींत उत्तम पिकतें. संयुक्तप्रांतांत उष्ण हवेंत याची लागवड करतात व याला पाटाचें पाणी देतात. एकरी १० पौंड या प्रमाणानें मार्चमध्यें याची पेरणी करतात. हें मे अखेर तयार होतें. एकरी ६ ते ८ मणापर्येत पीक निघतें. बुंदेलखंडांत याच्या फिकै आणि राळा नांवाच्या दोन जाती आहेत. मुंबई इलाख्यांत याची लागवड कोंकणांत आणि नाशिक, पुणें, वगैरे ठिकाणीं घाटांत होते. या ठिकाणी हें पीक खरिपाचें असतें. हें पावसाच्या पाण्यावरच वाढतें. याला पाटाचें पाणी देत नाहींत. रोपें वाढूं लागलीं म्हणजे पावसाळा सुरू होतांच पहिल्या तीन आठवडयांत शेंत तीन किंवा चार वेळ नांगरतात. एका गुंठयांत १ पौंड याप्रमाणें वाफ्यांत बीं फेकून पेरतात. याला खत घालीत नाहींत. चांगल्या वरकस जमिनींतून दर एकरी ७०० पासून ७५० पौंड धान्य निघतें. गुजराथेंतील पिकाला चेनो म्हणतात व हें कोंकणांतील व घाटांतील पिकाहून वेगळें असतें. बागाईत जमिनींत याची उष्ण हवेंतील व पाटाच्या पाण्याच्या पिकाप्रमाणें लागवड करतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत आल्याचें किंवा इतर पीक काढल्यानंतर जमीन बऱ्याच वेळां नांगरतात. पाटाचें पाणी देण्यासाठी वाफे तयार करतात. एकरी १० पौड या प्रमाणें बी फेंकल्यावर तें थोडी माती घालून दाबतात. नंतर पाणी देऊन तण काढून टाकतात. जानेवारी अखेर पेरणी केल्यास एप्रिल महिन्यांत पीक तयार होतें. चांगलें पीक आलें तर दर एकरी सरासरी २ टन पेंढा आणि १००० ते १२०० पौड धान्य उत्पन्न होतें. उपासाला हें धान्य खातात. हें पचण्यास हलकें आणि पोषक असतें. पुष्कळ ठिकाणीं हें तांदुळाप्रमाणें शिजवून खातात. दूध आणि साखर मिसळून केलेलें पक्कान्न लग्नसमारंभाच्या वेळीं आवडीनें खातात. याच्या चपात्या करूनहि खातात. ओल्या कडब्याची गुरांनां वैरण होते. कांहीं ठिकाणीं याचा वाळलेला पेंढाहि गुरांनां घालतात.