विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वरूण -या वैदिक देवतेची माहिती वेदविध्या विभागांत दैवतेतिहासप्रकरणांत (२२वें) दिली आहे. भारतांत याला कल्पारंभीचा पश्र्चिम दिग्पाल म्हटलें आहे. हा जलाधिपति असून याची राहण्याची नगरी मानसोत्तार पर्वतावर निम्लोचिनी किंवा सूषा या नांवानें प्रसिध्द आहे. याच्या स्त्रीचें नांव गौरी असें होतें. हा व्दिदशादित्यांतील एक होता. हा प्रतिवर्षीच्या आषाढमासाचा सूर्य म्हणून वर्णिलेला आहे.
(२) ग्रह (नेपूच्यून). हा सूर्य मालेंतील एक ग्रह आहे.१८२० मध्यें फ्रान्स देशांतील बौवर्ड नामक ज्योतिष्यानें गुरू, शनि आणि प्रजापति यांची गतिस्थिती काढण्याची कोष्टकें तयार केली. सर्व ग्रहांची आकर्षणें हिशेबांत घेऊन गुरू आणि शनि यांची गणितानें केलेली स्थिति वेधास बरोबर मिळे. परंतु इ. स. १७८९ पूर्वी प्रजापतीचा वेध बऱ्याच वेळां झाला होता. तेव्हांची त्याची आणि स्थिति आणि नंतरची स्थिति यांचा मेळ बसेना. तेव्हां प्रजापतीच्या पलीकडे असलेल्या एखाध्या ग्रहाच्या आकर्षणामुळें असें होतें कीं काय, याबद्दल विचार करण्याचें पुढील ज्योतिष्यांवर सोपवून इ.स. १७८१ नंतरच्या वेधास मिळतील अशीं प्रजापतीचीं कोष्टकें बौवर्डनें केलीं. पुढें त्या कोष्टकांवरून गणितानें काढिलेली प्रजापतीची स्थिति आणि प्रत्यक्ष वेध ह्यांत इ.स. १८३० मध्यें २० विकलांचें अंतर पडूं लागलें. स.१८४० त ९० विकलांचें अंतर आणि १८४४ सालीं तर २ कलांचें अंतर पडले. नुसत्या डोळ्यांनीं पाहणारास हें अंतर मुळीच दिसत नाहीं. दोन कलांच्या अंतरावर असलेले दोन ग्रह नुसत्या डोळ्यांनीं पाहिले असतां एकच दिसतात. परंतु दुर्बिणीच्या साहाय्यानें ते दोन्ही पृथक् दिसतात. प्राचीन लोकांस हें २ कलांचें अंतर सहन झालें परंतु पाश्र्चात्य लोकांस दुर्बिणींचें साधन मिळाल्यामुळें त्यांनां तें सहन होईना. त्या बद्दल शोध सुरू झाले. इंग्लंडांतील जॉन काउच अडाम या विव्दान गृहस्थानें गणित करून प्रजापतीला उपाधि करणारा ग्रह सूर्यापासून अमुक अंतरावर आहे, त्याचें द्रव्य अमुक आहे, त्याची कक्षा अशा प्रकारची आहे व तो अमुक ठिकाणीं आहे, असें १८४५ च्या आक्टोबरांत ग्रीन्विच येथील वेधशाळेचा मुख्याधिकारी प्रो. एरी यास कळविलें. परंतु तो फार आळशी असल्यामुळें त्याच्या हातून अडामनें कळविल्याप्रमाणें वेध घेऊन पाहणें झालें नाहीं. फ्रान्स देशांतील ज्योतिषीं लेव्हिरियर ह्यानें गणित करून अज्ञात ग्रहांची मानें १८४६ च्या जूनमध्यें प्रसिध्द केलीं. स.१८४७ च्या आरंभीं त्याचा भोग ३२५ अंश आहे असें काढिलें व मुद्दाम बर्लिन येथील वेधशाळेंतील अधिकाऱ्यास त्याचा वेध घेण्यास लिहिलें. त्याप्रमाणें त्यानें तारीख २३ सप्टेबर १८४६ रोजीं दुर्बिण लावून पाहिली तेव्हां तो ग्रह लिहिल्या ठिकाणीं सांपडला. त्यालाच नेपच्यून (वरूण) हें नांव मिळालें. हा ग्रह शोधून काढण्याचा मान अडाम आणि लेव्हिरियर ह्या दोघांहि ज्योतिष्यांस आहे. वरूण हा सूर्यमालेंतील शेवटचा ग्रह आहे. याच्यापलीकडे अन्य ग्रह असेल असा संभव दिसत नाहीं. सूर्यापासून वरूणाचें अंतर सुमारें २७७ कोटी मैल आहे, म्हणजे पृथ्वीच्या ३० पट अंतरावर आहे. त्याचा व्यास ३४॥ हजार मैल आहे. आकार पृथ्वीच्या ८३ पट आणि द्रव्य पृथ्वीच्या १७ पट आहे. वरूणाची सूर्यासभोंवतीं एक प्रदक्षिणा होण्यास १६५ वर्षे लागतात. ३०० प्रभावाच्या दुर्बिणींतून मात्र ह्याचें बिंब ओळखतां येतें. त्याचा दृश्य व्यास फक्त ३ विकला आहे. ह्याला २ उपग्रह आहेत असें लॅसिल ज्योतिषी ह्यानें पाहिलें, त्यांपैकीं एक पुष्कळ लोकांनीं पाहिला आहे. त्या उपग्रहाचा प्रदक्षिणाकाल ५ दिवस, २१ तास, ७ मिनिटें इतका आहे. त्याची कक्षा व क्रांतिवृत्ता यांच्यामध्यें ३४ अंश, ७ कला एवढा कोन आहे. व वरूणापासून त्याच्या उपग्रहाचें अंतर २४८८५० मैल आहे.
वरूणाच्या उपग्रहाची गति प्रजापतीच्या उपग्रहाप्रमाणेंच वक्र म्हणजे पूर्वेकडून पश्र्चिमेकडे जाण्याची आहे. वरूण हा अति दूर असल्यामुळें त्याचा स्वकीय अक्षाभोंवती फिरण्याचा काल ज्ञात झाला नाहीं. नेपच्यून यास वरूण असे नांव देण्याचें कारण नेपच्यून ही जलाची देवता मानितात व आपल्या ग्रंथामध्ये वरूण ही जलदेवताच आहे. म्हणून नेपच्यून ग्रहास वरूण हें नांव योग्य आहे. झेट्कील व रॅफील हे फलज्योतिषग्रंथकार आहेत. त्यांनीं आपल्या ग्रंथांत युरेनस आणि नेपच्यून यांचीं फलें दिलेलीं आहेत. आपल्याकडील फलज्योतिषीहि वरूणाचें अस्तित्व सध्यां लक्षांत घेऊन त्यावरून फलमान काढूं लागले आहेत.