विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
वर्म्स - जर्मनी. हीडेलबर्गच्या वायव्येस २० मैलांवर ऱ्हाइन नदीच्या डाव्या किनाऱ्यावर वसलेलें एक शहर. लोकसंख्या (१९०५) ४३८४१. शहराचें स्वरूप आधुनिक आहे. येथील मुख्य देऊळ व ठळक इमारत म्हटली म्हणजे पॉल अँड पीटरचें कॅथेड्रल होय. उत्तम उत्तम रोमन इमारतींत हिची गणना होते. ही सर्व इमारत स. ११८१ मध्यें बांधून तयार झाली. हिच्या खालोखाल महत्त्वाची दुसरी इमारत म्हणजे सेट पालचें देऊळ होय. येथे हल्ली पुरातनवस्तुसंग्रहालय आहे. या ठिकाणचें ज्यू लोकांचे प्रार्थनामंदिर ही जर्मनींतील फार प्राचीन इमारत गणली जाते. येथें ४८ फुटांच्या चौरस पीठावर उभा असलेला एक लूथरचा भव्य पुतळा आहे. पीठाच्या कोंपऱ्यांवर लूथरच्या समकालीन निरनिराळ्या व्यवसायबंधूंचे पुतळे आहेत. कांहीं दिवसांपूर्वी या शहराजवळच नवपाषाणयुग ते मेरॉहिंजियन युग या काळांतील प्रेतें पुरण्याच्या जागांचा शोध लागलेला आहे. वर्म्सचे पुष्कळ लोक द्राक्षांच्या लागवडीवर आपलें पोट भरतात. येथील कमावलेलें पेटंट कातडें तयार करण्याच्या कारखान्यांत ५००० वर लोक काम करीत असतात. याशिवाय यंत्रें, लोंकर, कापड, पाटया इत्यादि जिन्नसहि येथें तयार होतात.