विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वसई, तालुका:- मुंबई इलाख्यांत ठाणें जिल्ह्याचा अगदीं पश्चिमेकडील तालुका. क्षेत्रफळ १२३ चौ.मैल. शहरें दोन, वसई व आगाशी; खेडीं ९०. तालुक्याची लोकसंख्या (१९२१) ८२४४११. सर्व जिल्ह्यामध्यें येथें दाट वस्ती आहे. पूर्वी हा भाग बेटाचा होता, परंतु आतां मधील खाडी बुजवून टाकिली आहे. बेटाकडील भाग सपाट आहे; फक्त दोनच कायत्या २०० फूट उंच टेंकडया आहेत. जमीन सुपीक असून तींत तांदूळ, केळीं, ऊंस व फळें उत्तम पिकतात. मुख्य जमिनीच्या प्रदेशाकडे तुंगार व कामण टेंकडया आहेत; या दुस-या टेंकडीस वसईशिखर अथवा कामणदुर्ग असें म्हणतात. किनार्यावरील हवा बहुधां आरोग्यदायक व चांगली असते. पाऊस सरासरी ७० इंच पडतो.
शहर:- ठाणें जिल्ह्यांत वसई तालुक्यांतील मुख्य ठिकाण. हें मुंबईच्या उत्तरेस २८ मैल, असून बी.बी.सी.आय्. रेल्वेवरील वसईरोड स्टेशनपासून १५ मैलांवर आहे. लोकसंख्या १००००. १८६४ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें एक दवाखाना, सब्-जज्ज कोर्ट, एक इंग्रजी हायस्कूल, व मुलांमुलींच्या शाळा आहेत. वसई हें बेट असून त्याजवळ खाडी असल्यामुळें त्या ठिकाणीं जहाजें ठेवण्यास चांगली व सोईस्कर जागा आहे, म्हणून हें ठिकाण प्रथमतः पोर्तुगीजांनां पसंत पडलें. स. १५३४ मध्यें त्यांस वसई व आसपासचा प्रदेश गुजराथचा राजा बहादुरशहा यानें दिला, व दोन वर्षांनीं पोर्तुगीजांनीं तेथें एक किल्ला बांधिला. वसई पोर्तुगीजांच्या हातांत २०० वर्षें होतें, व तेवढया काळांत त्याची एवढी भरभराट झाली कीं, त्यास उत्तरेकडील दरबार म्हणतात. येथील लोक फार श्रीमंत होते. येथें तेरा ख्रिस्ती देवळें, एक गरीब मुलांकरितां वसतिगृह, एक क्याथेड्रल, पांच कान्व्हेंट व इतर मोठमोठया इमारती असल्यामुळें वसईस मोठी शोभा आली आहे. १७व्या शतकांत जरी पोर्तुगीजांची तेथील सत्ता कमी झाली, तरी स. १७१० पर्यंत वसईचें वैभव कायम होतें. १७२० सालीं वसईची लोकसंख्या ६०४९९ होती, आणि १७२९ सालीं ४॥ लाख रु. उत्पन्न होतें. १७३९ सालीं प्रसिध्द मराठा सेनापति चिमणाजी आप्पा मोठया सैन्यासह वसई येथें आला; व तीन महिनेपर्यंत किल्ल्यास वेढा देऊन शेवटीं तो त्यानें हस्तगत केला; तेव्हा शहर व जिल्हा पेशव्यांच्या ताब्यांत गेला परंतु वसई शहर त्यांच्या हातांत थोडे दिवसच राहिलें. १७८० मध्यें जनरल गाडर्ड यानें इंग्रज सैन्य घेऊन वसईवर १२ दिवस हल्ला चढवला, व शहर ताब्यांत घेतलें पण १७८२ मध्यें सालबाईच्या तहानें पुन्हां मराठयांच्या ताब्यांत आलें; व १८१८ सालीं पेशव्यांचा पराभव झाल्यावर इंग्रजांच्या ताब्यांत पुन्हां आलें व तें ठाणें जिल्ह्यांत घालण्यांत आलें. स. १८०२ मध्यें वसई येथें पेशवे व इंग्रज यांच्यामध्यें तह झाला होता. जुन्या वसई शहराच्या भिंती व कोट अद्याप चांगले आहेत.