विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वसिष्ठ- एक प्रसिध्द वैदिक ॠषि. हा ॠग्वेदांतील पुष्कळ सूक्तांचा द्रष्टा आहे. वसिष्ठ कुलाचा इतिहास ज्ञानकोशाच्या ३ -या विभागांत (पृ. ४८९) दिला आहे. मनूनें याची सप्तर्षीमध्यें व दशप्रजापतींमध्यें गणना केली आहे. ब्रह्मदेवाच्या प्राणवायूपासून हा निर्माण झाला असें एका ठिकाणीं म्हटलें आहे. मित्र व वरुण यांनीं एका यज्ञसभारंभाच्या वेळीं उर्वशी नामक अप्सरेला पाहतांच त्यांचें रेत पतन पावलें. त्याचे कांहीं बिंदू एका घटांत, कांहीं पाण्यांत व कांहीं जमिनीवर पडले; व जमिनीवर पडलेल्या रेतापासून वसिष्ठ झाला अशी कथा पुराणांतून आली असून तिला आधार ॠग्वेदांतील एका सूक्तांत (७.३३,) आहे. वसिष्ठ व विश्वामित्र या दोघांचें परस्पराशीं असलेलें वैर प्रसिद्धच आहे. वसिष्ठ हा सुदास राजाचा पुरोहित असून त्या जागेसाठीं विश्वामित्र धडपड करीत होता व त्यामुळें या दोघांमध्यें वैर निर्माण झालें असावें, असें दिसतें. पुढें महाभारत, रामायण व पुराणें यांच्यामध्येंहि वसिष्ठ-विश्वामित्राच्या स्पर्धेसंबंधीं पुष्कळ गोष्टी आलेल्या आहेत. विष्णुपुराणांत दक्षाची कन्या ऊर्जा ही वसिष्ठाची बायको होती असें म्हटलें आहे तर भागवत पुराणांत वसिष्ठाची बायको अरुंधती होय असें सांगितलें आहे. वसिष्ठाजवळ नन्दिनी नामक एक कामधेनु होती; तिच्या प्रसादानें त्याला कोणतीहि गोष्ट केव्हांहि प्राप्त होत असे असें पुराणांतरी आढळतें. विष्णुपुराणांत तो इक्ष्वाकु घराण्याचाहि पुरोहित होता असें म्हटलें आहे. वसिष्ठाच्या नांवावर एक स्मृतीहि प्रसिध्द आहे.