विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वहाबी- इस्लामी धर्माचा एक पंथ. महंमद इब्न अब्द उल्-वहाब हा या पंथाचा संस्थापक होय. हा बनी तमीम जातीचा असून, यानें हनीफी पंथाच्या वाङ्मयाचा व कायद्याचा सूक्ष्म त-हेने अभ्यास केला होता. तत्कालीन मुसुलमान लोकांची चैनीची रहाणी, व त्यांच्यांत शिरलेल्या भोळसर समजुती पाहुन त्याचें मन उद्विग्न झालें व त्यानें कुराणांत सांगितलेल्या नियमाप्रमणें चालण्याचा उपदेश करण्यास सुरुवात केली. पण खुद्द त्याच्या रहात्या प्रांतांत त्याच्या उपदेशाकडे कोणी लक्ष दिलें नाहीं; तेव्हां तो दराइय्या येथें गेला. तेथें महमद इब्न सय्यद हा प्रसिध्द सरदार त्याचा अनुयायी झाला. नंतर त्या दोघांनीं मिळून आपल्या पंथाचा प्रसार करण्यास सुरुवात केली; व सैन्याच्या जोरावर अरीद, कसीम, हासा, दोवासीर इत्यादि भागांत वहाबी पंथ स्थापन केला. महमद सय्यदच्या मरणानंतर त्याचा मुलगा अब्दल्ला अझीझ हा वहाबी पंथाचा नायक झाला. त्याच्या अमदानींत तुर्की राजसत्ता व वहाबीपंथाचे अनुयायीं यांमध्यें कलह सुरु झाले पण अझीझनें तुर्की सत्तेला तोंड देऊन आपल्या पंथाचा प्रसार जारीनें केला. पुढें अझीझचा मुलगा सौद यानें १८०३-०४ सालीं मक्का, मदीना वगैरे पवित्र स्थळें हस्तगत केलीं व तेथें वहाबी पंथाची स्थापना केली. पण थोडक्याच वर्षांत ईजिप्तच्या महंमदअल्ली बादशहानें हीं सर्व स्थळें परत घेतलीं व सौदचा मुलगा अब्दल्ला याला ठार मारलें. पण अब्दल्लाचा मुलगा तुर्की यानें वहाबीपंथाचे अनुयायी गोळा करुन ईजिप्तच्या बादशहाला तोंड देण्याचा प्रयत्न केला व तो थोडासा साध्य झाला. पण वहाबी पंथाची विशेष भरभराट झाली नाहीं. १८४२-७२ च्या दरम्यान वहाबी पंथाच्या ५ शाखा झाल्या व त्यांमध्यें कलागती सुरु झाल्या. १८९१ सालीं हैएलच्या इब्न रशीदनें या सर्वांचा पूर्ण पराभव करुन, त्यांचे सर्व प्रांत आपल्या ताब्यांत घेतले; व रियाद येथें इब्न सौदच्या एका वंशजाची स्थापना केली. पण पुढें महायुध्दच्या वेळीं या वंशजानें इब्नरशीदची सत्ता झुगारुन देऊन ब्रिटनचें सख्यत्व पत्करलें.
तत्त्वें- इस्लामी धर्मांत ज्या खुळया समजुती बोकाळल्या होत्या, त्यांचें निर्मूलन करुन कुराणामध्यें सांगितलेले साधे आचार प्रचारांत आणणें हें वहाबी पंथाचें मुख्य धोरण होतें. पीरांची पूजा करणें, साधूंच्या थडग्यांनां मान देणें या गोष्टी कुराणबाह्य अतएव त्याज्य होत असें या पंथाचें तत्त्व होतें व त्यामुळें त्यांनीं कित्येक थडगीं नष्ट करुन टाकण्यासहि मागें पुढें पाहिलें नाहीं. कुराणांत जीं वचनें ग्रथित केलेलीं आहेत त्यांचे इस्लामच्या चार प्रमुख संप्रदायांनीं निरनिराळे अर्थ केले होते. या सांप्रदायिक अर्थांनां न जुमानतां कुराणांतील वचनांचा जो साधा अर्थ असेल तोच खरा धरला पाहिजे असें या वहाबी पंथाच्या धुरीणांनीं आग्रहानें प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. देव एक मानणें आणि त्यावर पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवणें; सांधूंवर अगर फकीरांवर विश्वास ठेवणें, चैनीपासून अलिप्त रहाणें, धर्मप्रसारासाठीं जरुर पडल्यास युद्ध करणें हीं बहाबी पंथाचीं मुख्य तत्वें होत.
वहाबीव हिंदुस्थान- हिंदुस्थानांत या पंथाची स्थापना १८२४ त सय्यदं महंमद नांवाच्या इसमानें केली; व थोडक्याच कालांत त्याला बरेच अनुयायी मिळाले. विशेषतः पाटणा येथें या पंथाचे पुष्कळ अनुयायी अद्यापिहि दृष्टीस पडतात. १८५७ सालच्या बंडांत वहाबी लोक सामील असल्याच्या संशयावरुन इंग्लिशांनीं त्यांचा पाडाव केला. या बंडानंतर कांहीं वर्षांनीं वहाबी लोकांनीं पुन्हां बंड करण्याचा प्रयत्न केला पण त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. गुजराथेंत या पंथाचे अनुयायी अद्यापिहि बरेच आहेत.