विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वांई, तालुका- मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ३९१ चौरस मैल. तालुक्याचें मुख्य ठिकाण वांई असून तालुक्यांतील खेडयांची संख्या १२५ आहे. लोकसंख्या (१९२१) ५९७१४. तालुका पश्चिम घाटांनीं चोहोंकडून वेढिलेला असून महादेव नांवाच्या डोंगराळ पट्टीनें त्याचे बरोबर २ विभाग झालेले आहेत. एका विभागांतून कृष्णा व दुसर्यातून नीरा या दोन नद्या वाहातात. कृष्णानदी ज्या भागांतून वाहते तो भाग फारच सुपीक आहे. या तालुक्यांत पावसाचें मान सरासरी ३३इंच असतें.
गांव- वांई तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें कृष्णातीरीं सातार्यापासून २० मैलांवर वसलें आहे. येथून महाबळेश्वर १५ मैल दूर आहे. १९०१ सालीं वांईची लोकसंख्या १३९८९ होती पण १९११ सालीं ती बरीच कमी दिसली (५३३३). कृष्णातीरावर वसलेल्या गांवांत वांई हें सर्वांत मोठें गांव असून तें प्रसिद्ध क्षेत्रहि आहे. येथें ब्राह्मणांची वस्ती बरीच आहे. याच्या आसपास पहाडी प्रदेश व पुष्कळशा गुहा असल्यामुळें पूर्वी बौद्धांचें ठाणें या बाजूस असावें असें वाटतें. वाईला प्राचीन काळीं विराटनगर असें म्हणत व या नगरांत पांडवांनीं आपल्या अज्ञातवासाचें एक वर्ष घालविलें असें पुराणांवरुन दिसतें. स. १४५३ पासून १४८० पर्यंत बहामनी घराण्याचें लष्करी ठाणें वांईस असून १६४८ मध्यें विजापूरचे कामदार वांईस रहात. १६४९ त वांई मराठयांकडे आली. १७९१ सालीं सरदार रास्ते यांच्या जहागिरींत वांई आली. कृष्णानदीवर रास्त्यांनीं बरेच घाट व देवालयें बांधलेलीं आहेत. १८५५ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. वांईस देवालयें पुष्कळ असून एक हायस्कूल, प्राज्ञपाठशाळा व इतर मराठी शाळा, कोर्ट व दवाखाना आहे. जवळच लोहारें म्हणून एक खेडें आहे त्या ठिकाणीं बौद्धांची प्रेक्षणीय लेणीं आहेत.