विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाकाटक राजे- या राजांविषयीं फार थोडी माहिती उपलब्ध आहे. यांची राजधानी मध्यप्रांतांतील चांद्याजवळील भांदक ही असावी. अजिंठयाच्या लेण्यांतील सोळाव्या शिलालेखांत या वंशांतील सातजणांचीं नांवें आढळतात. या वंशांतील पांचवा राजा दुसरा प्रवरसेन याच्या एका ताम्रपटांतील उल्लेखावरून वाकाटकांचें राज्य वर्हाडवर असावें असें दिसतें. वर्हाडांतील भोजकोटाचें राज्य हें यांचें मांगलिक राज्य होतें. पैठण, अश्मक (खानदेश), सातपुडयाचें पठार व वर्हाड येथेपर्यंत यांचें राज्य पसरलें होतें. यांनीं तिस-या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत राज्य केलें. यांचा मूळ पुरुष विंध्यशक्ति नांवाचा होता. याचें व त्याचा पुत्र पहिला प्रवरसेन याचें नांव अजिंठयाच्या लेण्यांतील शिलालेखांत येतें. हें क्षत्रिय घराणें बौद्धमतानुयायी असून अजिंठयाचीं मूळचीं लेणीं यानेंच कोरलीं असें म्हणतात. (वैद्य-म.भा. १; उमरावती व नागपूर ग्याझे.)