विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वांकानेर संस्थान– मुंबई, काठेवाड पोलि. एजन्सीमधील एक संस्थान. क्षेत्रफळ ४२५ चौ. मैल. यांतील सर्व प्रदेश पहाडी आहे. हवा उष्ण परंतु निरोगी असते. दरसाल पाऊस २२ इंच पडतो. या संस्थानचा मूळ पुरुष पृथ्वीराजाचा मुलगा सरतानजी म्हणून होता. पृथ्वीराज ध्रांगध्राचा राजा जो चंद्रसिंग त्याचा वडील मुलगा होय. येथील संस्थानिकांनां ११ तोफांची सलामी देण्यांत येते. संस्थानची लोकसंख्या १९०१ सालीं २७३८३ असून १९२१ सालीं ३६८२४ होती. संस्थानांत वांकानेर मुख्य शहर असून खेडयांची संख्या १०१ आहे. मुख्य पिकें धान्यें, कापूस व ऊंस हीं होत. येथें घोडयांची पैदास चांगली होते. काठेवाडमध्यें वांकानेर २ नंबरचें संस्थान असून त्याचें उत्पन्न ३ लक्ष आहे; पैकीं १८८७९ रुपये खंडणी (इंग्रज व जुनागडच्या नबाबांनां) द्यावी लागते. वांकानेर हें संस्थानचें मुख्य ठिकाण असून तें वढवाण-राजकोट रेल्वेवर आहे. दोन नद्यांच्या संगमावर हें वसलें असल्याकारणानें या शहरचा देखावा फारच मनोहर दिसतो. शहरां कापसाचें कापड चांगलें तयार होतें.