विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वांग- ही फळभाजी सर्वांस महशूर आहे. हें झाड २ ते ४ फूट उंच व तितक्याच घेराचें वाढतें. कित्येक जातींत सर्व भागावर पुष्कळ कांटे येतात. कित्येकांस कांटे तुरळक असतात. पानें हिरवीं व काळसर असतात. फुलांचा रंग पांढरा, पिंवळसर व जांभळा असतो. फळांचा रंग खाण्यायोग्य पूर्ण वाढीच्या वेळीं हिरवा, पांढरा, गुलाबी, जांभळा व काळा व ह्याच रंगाच्या पट्टयापट्टयांचा होतो. अगदीं कोवळेंपणीं हिरवा असतो. फळ अगदी पिकल्यावर रंग पिंवळा होतो. फळांचा आकार गोल, लांबट गोल व लांब असतो. फळाची लांबी एक इंचापासून तों ९/१० इंचांपर्यंत असते. कधीं कधीं दीडफूट लांबीहि असते. जाडी एक इंचापासून ८/९ इंचांपर्यंत असते. कित्येक फळें देंठाजवळ निमुळतीं असून पुढें शेंडयापर्यंत जाड होत जातात. कित्येक जातींचीं वांगीं १/२ इंच जाड व ९/१० अगर १५-१७ इंच लांब होतात त्यांस ''बेलवांगीं'' म्हणतात. रंग व आकार यांवरून वांग्यांचे अनेक प्रकार केलें आहेत. वांग्याच्या लागणीचा मुख्य मोसम पावसाळयानंतर आहे. कांहीं जाती पावसाळयाच्या आरंभींहि लावितात व कांहीं उन्हाळयाच्या आरंभीं लावितात. कृष्णानदीच्या कांठीं फार चांगलीं वांगीं होतात. पावसाळयांत पूर आला म्हणजे गाळ सांचलेल्या मळईच्या शेतांत फार रुचकर वांगीं होतात. सांगली जवळ गोटे म्हणून गांव आहे तेथील ''गोटेवांगीं''तिकडे प्रसिध्द आहेत. त्यांची लागण हिंवाळयाच्या आरंभीं होते. पुण्याकडे कांटेवांगी व डोरलीवांगीं प्रसिध्द आहेत. त्यांची लागवड कार्तिक-मार्गशीर्ष महिन्यांत होते. यास सर्व उन्हाळाभर फळें येत असतात. तिकडे लांबट काळीं वांगीं त्याच मोसमांत लावितात, त्यांस ''माडू'' वांगें असेंहि नांव आहे. पांढर्या व हिरव्या रंगाचीं १/२ इंच जाड व ८/१० इंच लांब अशीं वांगीं पावसाळयाच्या शेवटीं पुणें व मुंबईच्या आसपास करतात. तीं दिसण्यांत फार सुरेख असून रुचीसहि चांगलीं असतात. त्यांस मुंबईस चांगला भाव येतो.
मुंबईच्या जवळ, वसईप्रांतांत व अष्टागरांत (अलिबागच्या आसपास) व वसई तालुक्यांत जांभळीं अथवा काळीं वांगीं पावसाळा संपल्यावर लावितात. त्यांस पेंड व मासळीचें खत घालतात. त्या खतावर वांगीं फारच मोठीं पोसतात. कित्येक फळें ८-९ इंच जाड व १०-१२ इंच लांब वाढतात; त्यांत बीं कमी असतें. परंतु तीं रुचीस पाणचट लागतात. तीं वांगीं भरतासाठीं भाजण्याकरितां विस्तवांत घातलीं असतां विस्तव विझून जातो इतकें त्यांत पाणी असतें. परंतु तीं दिसण्यांत फारच तेजस्वी दिसतात. वांग्याचें रोप तयार करुन तें सुमारें टीचभर वाढलें म्हणजे सर्यांत अगर सपाट वाफ्यांत जातीच्या वाढीप्रमाणें १-२ हात औरस चौरस अंतरानें लावितात. रोप वाढीस लागतांच पेंडीचें खत देतात व फुलें येऊन फळें येण्याच्या सुमारास मासळीच्या कुटीचें खोडखत देऊन चाळणी करतात.