विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाघ- पादांगुलचारी वर्गांत वाघाची गणना होते. वैदिक आणि प्राचीन ग्रंथ यांतून वाघाचा उल्लेख अनेक स्थलीं आला आहे. हा सिंहापेक्षां लांब असतो, पण त्याच्याइतका बळकट नसतो. दिसण्यांत मात्र हा भयंकर असतो. हा धिप्पाड व चपळ असून याचें शरीर तुळतुळीत असतें. व रंग सोन्यासारखा पिंवळसर असून अंगावर काळे पट्टे अगर ठिपके असतात. त्याच्या शेंपटीला झुपका नसतो. व त्याच्या पोटाकडील भाग पांढरा असतो. हा दिवसां जाळींत पडून राहतो व रात्रीं भक्ष्याकरितां हिंडतो. नुसतें रक्त पिण्याकरितांहि हा शिकार करतो तथापि तो मोठा आळशी असतो. सिंहापेक्षां तो जास्त माणसाळतो. बिब्या म्हणून वाघाची एक जात असून व ती आफ्रिका, हिंदुस्थान इत्यादि उष्ण प्रदेशांत आढळते. बिब्या वाघाचा रंग पिंवळा असून त्यावर काळे ठिपके असतात. याची उंची दोन फूट असते. हा झाडावर उडया मारतो म्हणून त्यास ''झाडावरील वाघ'' म्हणतात. चित्ता व ओन्स वगैरे प्राणी वाघाच्या जातींत येतात. आशियाखंडामध्येंच विशेषतः आढळणारा वाघ हा प्राणी आहे. हिंदुस्थान, सैबेरिया, इराण, सुमात्रा व जावा इत्यादि ठिकाणीं बहुधां वाघ आढळतात. हिंदुस्थानांतील वाघांचें मुख्य भक्ष्य म्हणजे माणसें, जनावरें, हरीण, डुकरें, वगैरे प्राणी होत. विशेषतः वयस्क वाघ माणसाची शिकार करतात. वाघास चांगलें पोहतां येतें. जंगलानजीक असलेल्या खेडयांत जाऊन वाघ गुरेंढोरें पळवून नेतो.