विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाघरी- ही जात गुजराथच्या सर्व भागांत आढळते. यांची लोकसंख्या (१९११) ८२०१६. वाघरी म्हणजे वाघासारखे; पण याच्यापेक्षां जास्त सयुक्तिक अर्थ असा करतां येईल कीं वागद् प्रांतांतून आलेले ते वाघरी. राजपुतान्यांतील ओसाड प्रदेशाच्या टेंकडयांनां वागद् असें म्हणतात. संयुक्तप्रांतांत बागर भागांत राहणारे वागरी नांवाचे रानटी लोक आहेत, तेव्हां त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन वाघरी हें नांव रुढ झालें असावें असे कांहींचें मत आहे. ही एक कोळयांची उपशाखा असावी. स्वतः वाघरी लोक म्हणतात कीं, आमची उत्पत्ति रजपुतांपासून आहे, गुर्जरांचा व आमचा कांहीं एक संबंध नाहीं. तरी वाघरी जात कोळयांपेक्षां कमी दर्जाची ठरते. वाघरी लोक मासे व पक्षी धरतात. व दांतवणाच्या काडया विकतात. चोरी करण्याची संवय त्यांनां आहे. त्यांचे चार भेद आहेत (१) चुनारिये (२) दांतनिये, (३) वेडू व (४) पातानेजिये. यांशिवाय त्यांचे आणखी उपभेद आहेत; यांपैकीं तलवदे व पोरनाले हे कोणाच्याहि हातचें अन्नपाणी घेत नाहींत. बाकींच्या उपभेदांत रोटीव्यवहार आहे, पण बेटीव्यवहार नाहीं. जातीबाहेर लग्न करण्याची पध्दत जरी वाघरी लोकांत नाहीं तरी एकाच गांवांत राहणारे व एकाच देवाची पूजा करणारे अगर दुसरा निकट संबंध असलेल्या लोकांत परस्पर लग्नें होत नाहींत. लग्नें सज्ञानावस्थेंत होतात. पुनर्विवाह संमत आहे. वाघरी जातीपेक्षां उच्च जातींतल्या मनुष्याची इच्छा असली तर त्याला या जातींत घेतात. पण त्यानें वाघरी जातीला भोजन दिलें पाहिजे. हलक्या जातीचा मनुष्य मात्र वाघरी जातींत येऊं शकत नाहीं. वाघरी, लोक हिंदु असून त्यांपैकीं कांहीं बिजपंथी आहेत. व कांहीं देवीचे उपासक असून कांहीं हनुमंताचे भक्त आहेत. आपल्या बायका फार पतिव्रता असतात म्हणून ते गर्व वाहतात व पुष्कळ कालपर्यंत जर एखादी बाई नव-यापासून लांब असली तर ती शुद्ध राहिली कीं बिघडली याची कसोटी अग्निदिव्यानें पाहतात. जातींतलेच लोक त्यांचे उपाध्याय असतात. (से.रि. (मुंबई) १९११)