विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाघ्या- वाघ्या हा शब्द कानडी वग्गे म्हणजे भक्त या शब्दाचा अपभ्रंश आहे. खंडोबास वाहिलेल्या मुलांचा हा एक वर्ग बनला असून निरनिराळया जातींचे लोक यांत शिरले आहेत. व त्यांनीं आपापल्या पूर्व जातीच्या चालीरीती कायम ठेवल्या आहेत. खंडोबास वाहिलेल्या मुरळी व हे वाघे नवराबायकोप्रमाणें एकत्र राहतात (''मुरळी'' पहा). खंडोबास मुलें वाहण्याचा विधि असा आहे कीं, प्रथम चैत्र महिन्यांत गुरवाकडे देवास मूल वाहण्याचा आपला उद्देश कळवावा लागतो. मग ठराविक दिवशीं त्या मुलास मिरवीत खंडोबाच्या मंदिरात नेतात. तेथें गुरव त्या मुलास हळद लावतो. व वाघाच्या कातडयाच्या पिशवींत हळद भरुन तो ती पिशवी त्याच्या गळयांत बांधतो. मग देवावर हळद टाकून मुलगा स्वीकारण्याची त्याला विनंती करतो. वाघे आपल्या आईच्या कुळांतील मुलीशीं लग्न लावीत नाहींत. कारण अशा कुळांतील मुलगी पुढें मुरळी होण्याचा संभव असतो. व वाघे आणि मुरळया तर बहीणभावंडें (?) तेव्हां बहिणीशीं कसें लग्न करावें. वाघ्यांचें लग्नसोहाळे मूळ जातींतील सोहाळयाप्रमाणें होतात.