विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाचाभंग- मेंदूला रोगाची भावना होऊन मेंदूस लिहिलेल्या अथवा बोललेल्या भाषणाचा अर्थ न समजणें हें ह्या व्याधींतील मुख्य लक्षण होय. याचे दोन भेद मानण्यांत येतात. पहिल्या प्रकारामध्यें ज्ञानेंद्रियांत बिघाड झाल्यामुळें श्रवणशक्तीचा लोप होऊन, अगर दृक्शक्तीचा लोप होऊन त्यामुळें बोललेला अथवा वाचलेला मजकूर या दोहोंचाहि बोध रोग्यास होत नाहीं. दुस-या भेदामध्यें कर्मेंद्रियावर हुकमत चालवणारे मेंदूंतील भाग विकृत झाल्यामुळें येणारा पंगूपणा उदाहरणार्थ शब्दोच्चार करतां न येणें, अगर लेखनक्रिया करतां न येणें या नाना प्रकारच्या पंगूपणामध्यें चार प्रकारच्या विकृती पृष्ठभागावर मेंदूच्या विवक्षित जागीं झालेल्या असतात व असें सिद्ध करण्यांत आलें आहे. या चार प्रकारच्या जागांस वाक्स्थान असें नांव दिलें आहे. आणि हें स्थान इतर स्थानांप्रमाणें मेंदूच्या दोन्ही अर्धभागांत नसतें तर फक्त एकाच बाजूस असतें हें विशेष आहे. उदाहरणार्थ हें सर्वांच्या मेंदूमध्यें डाव्या अर्धभागांत असतें. व म्हणून उजव्या बाजूस अर्धांग वायूचा झटका आला अशतांच मात्र या प्रकारचा बोलण्यांत बोबडेपणा आढळून येतो. जीं थोडीं माणसें डावखोरी असतात त्यांच्यांमध्यें मात्र हें वाक्स्थान मेंदूच्या उजव्या अर्धभागांत अशतें. मूल बोलावयास कसें शिकतें याचें मनन केलें असतां हें वाक्स्थान पूर्णत्वास कसें येतें हें ध्यानांत येईल. प्रथम या स्थानांतील श्रवणेंद्रियांशीं संबंध असलेला भाग कार्यक्षम होऊं लागतो व त्यामुळें उपजल्यापासून थोडया महिन्यांतच ऐकलेल्या शब्दांचें ज्ञान व अर्थ त्यास कळूं लागतो. कांहीं महिने लोटल्यावर बोलण्यामध्यें ज्या स्नायूंचें चलनवलन होतें त्यांच्यासीं संबंध असलेला या वाक्स्थानांतील भाग आपलें कार्य करण्यास आरंभ करतो. श्रवणेंद्रियामुळें त्याच्या मेंदूंतील या वाक्स्थानांत स्मृतिसंस्कार अथवा शब्दचित्राचा ठसा उमटलेला असतो, त्याच्या मदतीनें हें कार्य होतें आणि म्हणून उपजतच बहिरीं झालेलीं मुलें मुकींहि पण असतात. यानंतर मूल जेव्हां वाचावयास शिकूं लागतें तेव्हां या वाक्स्थानाचा दृक्स्थानाशीं जो संबंध असतो तो भाग शिक्षणानें पक्व दशेस येऊं लागतो. जेव्हां मूल लिहावयास शिकतें तेव्हां जें अक्षर लिहावयाचें त्याचें दृक्स्थानाच्या मदतीनें या वाक्स्थानांत स्मृतिचित्र कसें असतें याची मूल आठवण करतें आणि मग मेंदूंतील वाक्स्थानांतर्गत हें लेखनस्थानहि पक्व दशेस येतें. या विवेचनावरुन श्रवण व भाषण तसेंच दृक्शक्ति व लेखन या दोन्ही क्रियांचा परस्पर निकट संबंध ध्यानांत येईल. या भेदाचें वर्णन पुढें दिलें आहे.
श्रवणवाचाभंग- मेंदूंतील श्रवणवाक्स्थान कोणतें याचा संशय आतां उरलेला नाहीं व हें डाव्या कानशिलाच्या मागें जो मेंदूचा भाग आहे तेथें एकाच बाजूस असतें. या भागास विकृति झाली असतां श्रवणशक्तींत कांहीं बिघाड होत नाहीं, पण त्या रोग्याशीं जें बोलावें त्याचा अर्थच त्यास समजत नाहीं व जणूं काय बोलणारा एखादी परभाषाच बोलत आहे. किंवा काय असें त्यास वाटतें. या व्याधीमुळें वाणीचा उच्चारहि फारच बिघडतो, कारण बोलावयाच्या भाषेचीं श्रवणचित्रें वाक्स्थानांत सांठविलेलीं असतात त्यांच्या मदतीनेंच बोलतां येतें.
द्दकवाचा भंग- द्दकस्थानाशीं वाक्स्थानाचा संबंध असलेला एक भाग असतो हें वर आलें आहेच व हेंहि डाव्या व एका बाजूसच असतें. याचा थेट संबंध द्दक्स्थानाशीं असतो व हीं द्दक्स्थानें मेंदूच्या उजव्या व डाव्या अर्धभागांत मागच्या बाजूस असतात. वाक्स्थानाचा हा भाग विकृत झाला असतां पुढील चमत्कारिक लक्षणें होतात - रोग्यास काढलेलीं अगर छापलेलीं अक्षरें डोळयांनीं दिसत असतात पण त्यास त्यांचा अर्थबोध होत नाहीं व तीं ओळखूंहि येत नाहींत. जणूं काय ती परभाषेंतील लिपीच आहे असें वाटतें. असें होण्याचें कारण या भागांत लहानपणापासून सांठविलेलीं द्दक्स्मृतिचित्रें विकृतीमुळें नष्ट होतात व त्यामुळें लिहितांहि येत नाहीं. अर्धांगवायूच्या झटक्यांत जेव्हां मेंदूंतील या भागांत रक्तस्त्राव सुदैवानें न झाल्यामुळें हा भाग विकृत झालेला नसतो. तेव्हां रोग्यांत हीं लक्षणें मुळींच नसतात.
ध्वनिसंचालक वाचा भंग- ह्याचें स्थानहि प्रयोगानें निश्चित केलें आहे व तें सुमारें डाव्या कानशिलाच्या अंमळ पुढें जो कवटींत मेंदूचा भाग असतो, तेथें असतें. हा भाग रक्तस्त्रावादि विकृती होऊन बिघडला असतां येणेंप्रमाणें स्थिति होते - उच्चार करण्याचीं साधनें जीं आवाज, कंठ व त्याचे स्नायू ह्यांत कांहींहि बिघाड नसतो. अगर ते स्नायू लुळे पडलेले नसतात. पण रोग्यास बिलकुल (भाषा) बोलतां येत नाहीं. क्वचित् प्रसंगीं ''होय'' अगर ''नाहीं'' अथवा मनाची व्याकुळतादर्शक ''आई आई'' इत्यादि उद्गार निघणें शक्य असतें एवढेंच. ज्याचा कांहींच अर्थ नसतो असेहि शब्द अगर आवाज रोगी काढतो. कारण उच्चार करण्याचीं शरीरांतील स्थानें शाबूत असतातच. रोगी आपल्याकडून द्दक्स्मृतिचित्रें व श्रवणस्मृतिचित्रें यांची मदत घेऊन भाषण करण्याचा प्रयत्न करतो व उच्चार करण्याचे जीभ, तालु, कंठ, ओंठ यांचे स्नायूहि शाबूत असतात खरे पण त्यांवर हुकमत करण्याची शक्ति नष्ट झाल्यामुळें त्याचा उच्चारच होत नाहीं. व लेखस्थान मेंदूमध्यें वाक्स्थानाच्या अगदीं शेजारींच असल्यामुळें असल्या बहुतेक रोग्यांस कांहीं लिहूनहि दाखवितां येत नाही. वर निर्दिष्ट केलेलें लेखनस्थान खरोखरी मेंदूंत आहे किंवा नाहीं या गोष्टीवर शास्त्रज्ञ लोकांमध्यें अद्याप वाद चालू आहेत. त्याच्या साधकबाधक प्रमाणांचा विचार येथें कर्तव्य नाहीं. या वर वर्णिलेल्या चार प्रकारांखेरीज आणखीहि कांहीं उपभेद आढळण्यांत येतात; उदाहरणार्थ (अ) रोगी योग्य भाषणांत शब्दांचा उपयोग करण्याच्या ऐवजीं भलतेच शब्द भाषणांत बोलूं लागतो आणि या घोंटाळयामुळें त्याचें बोलणें कोणास समजत नाहीं अगर लिहिण्यांत जे शब्द लिहावयास पाहिजेत ते त्यास लिहितां न येतां, रोगी भलतींच अक्षरें लिहितो. (आ) असेंहि एक लक्षण आढळतें, कीं रोग्यास एखादा पदार्थ डोळयासमोर दिसत आहे, पण त्याचा उपयोग काय अगर तो पूर्वी पाहिला होता किंवा नाहीं हें कांहीं त्यास स्मरत नाहीं. अथवा त्याचा उपयोग कदाचित स्मरत असला तरी त्या पदार्थाचें नांव त्यास एकदम सांगतां येत नाहीं. मात्र, दुस-या एखाद्या ज्ञानेंद्रियानें (उदा. जीभ, कान, नाक, स्पर्श इत्यादींनीं) कळण्यासारख्या पदार्थाचें चाखून, ऐकून, हुंगून अगर स्पर्शानें त्यास त्याचें नांव सांगतां येतें. (इ) कधीं असें व्यंग आढळतें कीं रोग्यास केवळ स्पर्शानें एखाद्या पदार्थानें वर्णन मात्र हुबेहुब करतां येतें व त्या केवळ वर्णनावरुन जरी सहज ओळखण्यासारखा तो पदार्थ असला तरी त्याला स्वतःला तो ओळखूं येत नाहीं. गायनकलेस उद्युक्त करणारें अगर गायनाचें मर्म जाणून त्याची स्मृति सांठविणारें एक स्थान मेंदूंत आहे असें मानण्यास सबळ कारण आहे व गायनाभिज्ञ मनुष्याच्या रोगानें या दोन्ही प्रकारच्या शक्ती नष्ट झाल्याचीं उदाहरणें दृष्टीस पडतात.
मेंदूंचीं हीं जीं वर निरनिराळीं स्थानें वषर्णलीं आहेत त्यांस रक्ताचा पुरवठा करणारी मुख्य धमनी म्हणजे मध्य धमनी (मिडल सेरेब्रल) ही होय. व रोगामुळें असें घडतें कीं, तिच्यांत रक्ताची गुठळी अडकून बसते. आणि मग तिच्या सर्व शाखांतील रक्तपुरवठा थांबल्यामुळें रोग्यास एकदम मूकत्व येतें. व वरच्यासारखे बारीक सारीक रोगाचे भेद शोधण्याचें कारणच पडत नाहीं. पण असें क्वचित घडतें. दुसरी मेंदूची धमनी, (पोस्टिरिअर) हिच्यामध्यें गुठळी अडकली असतां एकटया दृक्वावस्थानामुळें बोलण्यांत व्यंग येतें, कारण ही धमनी फक्त त्या भागास रक्तपुरवठा करते. अगर या निरनिराळया स्थानांवर एखादें गळूं अगर आवाळूं, रक्तस्त्राव अथवा मस्तिष्कावरणदाह ह्यांपैकीं कोणती तरी व्याधि होते आणि त्यामुळें वरच्याप्रमाणेंच त्या त्या स्थानमाहात्म्याप्रमाणें बोलण्यांत निरनिराळया प्रकारचें व्यंग येतें. या सर्व प्रकारच्या व्याधींमध्यें रोगी बरा होण्याचा कितपत संभव आहे हें रोग्याचें वय, कोणत्या स्थानीं ती विकृति आहे याचें ज्ञान व तिचा कमी अगर जास्ती विस्तृतपणा याचा विचार करुन सांगतां येतें. डाव्या बाजूस हें स्थान पूर्णपणें बिघडलें असतांहि रोग्यास पुन्हां वाणी व भाषा पूर्ववत येऊं लागल्याचीं उदाहरणें आहेत. याचें कारण तें कार्य मेंदूच्या उजव्या अर्धभागांतील मेंदूचा भाग शिक्षणानें करुं लागतो. व हें असें होण्यास रोगी तरुण असला पाहिजे हें उघड आहे. पण बहुधा हा रोग उतार वयांतच जडत असल्यामुळें असें शिक्षण देऊन वाणीचें पुनरुज्जीवन करण्याचा खटाटोप फुकट जातो. तरी त्यांत सुद्धां रोगी निवडून, तपासून त्याच्या विकृतीचें बरोबर निदान करुन त्या रोग्यास शास्त्रीय पायाशुद्ध असें बोलण्याचें शिक्षण दिल्यास थोडेंफार यश येतेंच असा अनुभव आहे व या कामीं मेंदूच्या पृष्ठभागाचें पूर्ण ज्ञान अवगत असलें पाहिजे कारण त्यावरील वाक्स्थानान्तर्गत इतर बारीकसारीक स्थानें यांचें यथातथ्य ज्ञान असल्याशिवाय शिक्षण नीट देतां येणार नाहीं.