विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वांटप (पार्टिशन)- समाईक कुंटुंबपद्धति ही हिंदुधर्म शास्त्र उर्फ कायद्यांतील विशिष्ट गोष्ट अद्यापहि अमलांत आहे. वडिलोपर्जित स्थावरजंगम मिळकतींत पिता व पुत्र यांस केवळ एकत्र कुंटुंबांत जन्मास आल्यानेंच समान हक्क प्राप्त होतात. पिता व पुत्र यांच्या एकत्र कुंटुबाच्या समाईक मिळकतीची वांटणी पित्याच्या हयातींत पुत्रांत स्वेच्छेनें मागतां येत नाहीं, पित्यानें त्याच्या इच्छेप्रमाणें आपल्या हयातींत वाटेल तर मिळकतीची वांटणी करावी असा नियम पूर्वी होता. परंतु पुढें वडिलार्जित मिळकतींत पुत्र-पौत्रास जन्मतःच समान हक्क प्राप्त होतात या तत्त्वास अनुसरून पुत्रास वाटेल तेव्हां पित्याजवळ वांटणी करुन मागण्याचा हक्क कबूल झाला, व तें एकत्र कुंटुब म्हणजे कोणत्याहि सहभागिदाराच्या इच्छेस वाटेल तेव्हां तोडून टाकतां येईल अशा प्रकारची सहभागीदारी झाली.
वांटणीच्या तत्त्वाचे दोन चार पिढया एकसारखें अवलंबन झालें कीं, वडिलोपार्जित जमीन कितीहि मोठी असो तिचे वंशवृद्धीबरोबर लहान तुकडे होत जातात व त्या तुकडयांवर लहानशा कुंटुबाचा सुद्धा निर्वाह होण्यास अडचण पडते, व मोठी जमीन एकाच मनुष्याच्या हातांत न राहिल्यानें जमिनीचें उत्पन्न कमी कमी होत जातें. अनेक माणसांच्या हातांत लहान लहान जमिनीचे तुकडे राहिल्यानें त्या जमिनीवर पैसा व बुद्धि हीं खर्च करण्यास साधन रहात नाहीं, व अशा प्रकारची शेती व्यापारी दृष्टया फायदेशीर होत नाहीं, असें सिद्ध झालें आहे. शेतीचा धंदा हितावह म्हणजे व्यापारी दृष्टया फायदेशीर होण्यास त्या धंद्यास लागणारें द्रव्य मिळालें पाहिजे. म्हणजे स्वतःजवळ भांडवल व जमीन हीं पुष्कळ विपुल पाहिजेत किंवा ज्यांच्याजवळ भांडवल आहे पण जमीन नाहीं त्यांचें भांडवल या धंद्यांत आकर्षण झालें पाहिजे. असें होण्यास एका ठिकाणीं पुष्कळ भांडवल व बुद्धिवान लोकांची बुद्धि यांचें संमेलन झाले पाहिजे. म्हणजे मोठाले जमीनदार असले पाहिजेत, जमिनीवर भांडवल खर्च केलें तर त्यापासून नफा पुष्कळ मिळाला पाहिजे व बुद्धिवान लोकांस या धंद्यांत येण्यास हा धंदा किफायतशीर होऊन त्यांच्या बुद्धिचें चीज झालें पाहिजे. अशी परिस्थिति उत्पन्न करण्यास प्रथम लोकांच्या हातांत मोठमोठया जमिनी एकसारख्या राहिल्या पाहिजेत व त्यांचे लहान लहान तुकडे होणार नाहींत अशी तजवीज झाली पाहिजे. एकत्र कुटुंबांतील सहभागीदारांचे समाईक, स्थावर, जंगम वगैरे सर्व प्रकारच्या जिनगीची वांटणी करतां येते. जनावरें व इतर सामान किंवा वस्तू-ज्यांचे भाग पाडतां येत नाहींत अशा मिळकतीची किंमत आकारुन किंवा त्या विकून त्यांची रक्कम करुन ती वांटून घ्यावी. कुटुंबाचें समाईक देणें व घेणें या दोहोंचीहि वांटणी होते. वांटणीच्या वेळीं देण्याघेण्याचा हिशेब करुन प्रथम कुटुंबाचें कर्ज देण्याची तजवीज करावी. पोष्य वर्गास अन्नवस्त्राची सोय करावी, अविवाहित मुलींच्या लग्नाची तजवीज करावी, ज्यांनां वांटणींत हिस्सा मिळतो त्यांच्या मुलामुलींचीं लग्नें करण्याची निराळी तजवीज करावयास नको. वांटणी करणें ती कुटुंबाच्या सर्व स्थावरजंगम मिळकतीची केली पाहिजे. कर्त्यानें कपट केलें नसलें तर मागील व्यवहाराबद्दल त्यास हिशेब विचारण्याचा हक्क इतरांस नाहीं. वांटणीच्या वेळीं समाईक मिळकत ज्या स्थितींत असेल त्याच स्थितींत तिची वांटणी केली पाहिजे. सज्ञान भागीदार समाईक इस्टेट उडवूं लागले. तिची कपटानें अफरातफर करुं लागले. समाईक मिळकतींत आपली स्वतःची मालकी सांगून अज्ञानाच्या हितसंबंधास विरोध करुं लागले, त्याच्या अन्नवस्त्राची व विद्येची हयगय करुं लागले, व अज्ञानाचा हिस्सा इतर भागिदारांच्या हातांत ठेवणें सुरक्षित नाहीं असें दिसूं लागलें म्हणजे त्याच्या हिश्शाचें संरक्षण करण्याकरितां व त्याची योग्य व्यवस्था राहण्याकरितां वांटणी करुन घेणें जरुर आहे असें समजावें. (१९ मुं. ९९; ४ मुं.लाँ. रिपोर्ट ३८३ पान ३८८).
बाप व चुलता यांच्याबरोबर पुत्र एकत्रकुटुंबी रहात असला तर मुलास बापाजवळ वांटणी करुन मागतां येत नाहीं. (१६ मुं. २९) वाटणीच्या वेळीं मुलगा गर्भावस्थेंत असला व तो पुढें जन्मास आला तर तो वांटणीच्या वेळीं अस्तित्वांत होता असें समजून त्यास वांटा मिळतो.
प्रोषितस्य तु यो भागो रक्षेयुः सर्व एवतम् ।
बालपुत्रे मृते रिक्यं रक्षं तत्तु बंधुभि:॥
वांटणीच्या वेळीं गैरहजर असलेल्या सहभागीदाराचे हक्क अज्ञान भागिदाराप्रमाणेंच आहेत. त्याचा हिस्सा मागण्याचा हक्क त्याच्या संततीस प्राप्त होतो. बापाच्या मागें मुलांमध्यें वांटणी झाली तर त्यांच्या आईस पुत्राच्या हिश्शाइतका हिस्सा मिळतो. (१७मुं. २७१; ३१ मुं. ५४; ८ मुंब.लॉ. रिपो. ६३२, ३८, आ ८४) आई या शब्दांत सावत्र आईचा समावेश होतो. सावत्र आईस जनक आईप्रमाणेंच हिस्सा मिळतो. आजीचे हक्क आईप्रमाणेंच आहेत. नव-याकडून किंवा सास-याकडून स्त्रीधन मिळालें असलें तर त्याची किंमत या स्त्रियांच्या हिश्शांतून वजा केली जाते. कोणा सहभागीदाराचा हिस्सा (हक्कसंबंध) एकत्र असतांना विकला असला तर खरेदीदार यास तो हिस्सा वेगळा करुन मागतां येतो. जन्मापासून आंधळा, बहिरा, मुका, वेडा, खुळा, एखादें इंद्रिय नसलेला, महारोगी, असाध्य रोगानें ग्रस्त अशा सहभागीदारास हिस्सा मिळत नाहीं. त्यास अन्नवस्त्राचा हक्क आहे. द्विज जातींत दासीपुत्रास वांटणी मागण्याचा हक्क आहे, त्यास अन्नवस्त्राचा अधिकार आहे. शूद्राच्या दासीपुत्रास त्याचा बाप मयत झाला म्हणजे त्याच्या औऱ्स पुत्रास जें धन वारस म्हणून मिळतें त्याचा निम्मा भाग (दासीपुत्रास) मिळतो (मद्रास हायकोर्ट). एका शूद्रास एक औरस पुत्र व एक दासीपुत्र असला तर तो शूद्र मयत झाल्यावर ते दोघे सहभागीदार होतात. व मयताच्या इस्टेटीची वांटणी करतांना औरस तीनचतुर्थांश मिळकत घेतो व एकचतुर्थांश दासीपुत्र घेतो (इतर हायकोर्टें). दासीपुत्रास हे हक्क मिळण्यास ती दासी बापाजवळ अव्यभिचारी धर्मानें राहिलेली पाहिजे.
पितापुत्रांत वांटणी झाली तर हिस्से समान होतात. भावाभावांत वांटणी झाली तर हिस्से सारखे पडतात. भावांपैकीं एक भाऊ वांटणीच्यापूर्वी मयत झाला असला व त्याचा मुलगा असला तर त्या मुलास भावाचा हिस्सा मिळतो. चार भाऊ असले तर प्रत्येकाची एकेक शाखा मानिली जाईल. त्यांपैकीं एक मयत झाला व त्याचा मुलगा असला तर ती शाखा कायम असें समजून (पर स्टर्पिस) त्या शाखेचा हिस्सा त्या मुलास मिळेल. प्रत्येक शाखेच्या प्रतिनिधीस एक हिस्सा मिळेल. त्या शाखेचा खालीं विस्तार वाढला असला तर म्हणजे त्या शाखेच्या पुरुषास संतति असली तर ती त्याच्या पोटांत येईल. एकत्र कुटुंबांत शेषाधिकारानें ज्यांनां समाईक मिळकतींत हक्कसंबंध प्राप्त होत जातात ते सर्वांत वरच्या पुरुषापासून चार पिढया पुढचे नसतात. अशा चार पिढयांस एकत्र कुटुंबाच्या मिळकतींत हक्कसंबंध असतात व ते वांटणीच्या वेळीं हिस्सा मिळण्यास पात्र असतात.
निरनिराळ्या शाखांचे पुरुष वेगळे निघाले तरी प्रत्येक शाखेचा पुरुष व त्याचे पुत्र पुन्हां एकत्र कुटुंब होतें. एकत्र कुटुंबात व समाईक मिळकतींत एकत्रकुटुंबी व समाईक मालकीनें रहावयाचें नाहीं असें सहभागीदारांनीं किंवा त्यांपैकीं कोणीहि वाणीनें, लेखानें, कृतीनें किंवा वर्तनानें स्पष्टपणें दर्शविलें म्हणजे एकत्र कुटुंबाचा एकत्रपणा व समाईक मिळकतीचा समाईकपणा यांचा अंत होतो. व तेव्हापासून सहभागीदार कुटुंबांतून व त्याच्या समाईक मिळकतींतून विभक्त होतात. एकत्र असणें किंवा विभक्त होणें हें सहभागिदारांच्या इराद्यावर अवलंबून आहे. एकत्र कुटुंबी रहावयाचें नाहीं असा कोणाचा इरादा स्पष्ट दिसला कीं तो विभक्त आहे म्हणून समजावें.
विभक्त होण्याचा हेतु निःशंक दिसून आला म्हणजे विभक्तपणा झाला. मिळकत मागून ज्याच्या त्याच्या हिश्शाप्रमाणें पृथक् करुन घेतां येते. एकदां असा विभक्त होण्याचा हेतु स्पष्ट झाला व एकत्रपणा तुटला म्हणजे त्यापुढें सहभागीदारी रहात नाहीं. व त्यानंतर शेषाधिकाराचें तत्व (सर्व्हायव्हर्शिप) लागत नाहीं. यापुढें त्या इसमाच्या हिश्शास वारसाचा कायदा लागू होईल. तथापि वांटणीच्या वेळीं कांहीं मिळकत सर्वांच्या सोईकरितां समाईक ठेवतात. ती मिळकत मागाहून वांटून घेतां येते (१८.मु. ६११; २३ मुं. ५९७). वांटणीच्या वेळीं कांहीं मिळकत चुकून राहिली, किंवा कोणी कपटानें छपवून ठेविली किंवा वांटणी करतांना एकानें दुस-याचा गैरसमज केला व त्यास फसवून हिस्सा कमी दिला. तर ती गोष्ट त्यास कळल्यावर वांटणी बरोबर होण्याकरतां पुन्हां वांटणी करुन मागतां येते. कोणाच्या हिश्शास दिलेली मिळकत कुटुंबाच्या मालकीची आहे असें समजून ती त्यास देण्यांत आली व नंतर ती मिळकत कुटुंबाच्या मालकीची नाहीं (फक्त कबजेगाहाण आहे वगैरे) असें ठरलें व ती त्याच्या कबजांतून गेली म्हणजे तितक्या पुरता हिस्सा नाहींसा झाला तर त्या इसमास योग्य वांटणी मिळण्याकरतां पुन्हां वांटप करुन मागतां येते. किंवा तितक्या मिळकतीबद्दल नुकसानी इतर हिस्सेदारांजवळ मागतां येते. (२१ मुं. ३३३;२३ मुं. ३८५) समाईक मिळकत कबजेगहाण असली तर तिची वांटणी करतां येत नाहीं. (१२. मुं.हा.रि. १४८; ८.मुं.हा.रि. ६४; १ मुं.ला.रिपोर्टर ६२०). कांहीं मिळकत ब्रिटिश इंडियाच्या बाहेर आहे व कांहीं ब्रिटिश इंडियाच्या आंत आहे. त्यावेळीं फक्त ब्रिटिश इंडियांतील मिळकतीबद्दल वांटणी करण्याची फिर्याद आणतां येते (७मुं. २७२; १८ मुं. ३८९). वांटणी कपटाची असली किंवा बरोबरीची योग्य झाली नसली तर ती झाल्यानंतर त्या शाखेच्या पुरुषाच्या संतती (पुत्रावर) वर बंधनकारक नसते (११मुं.लॉ रिपोर्टर ३९६). एकत्र कुटुंबांतून एक सहभागीदार विभक्त निघाला तर बाकीचे एकत्रच राहिले असें अनुमान करतां येत नाहीं. एक विभक्त झाला कीं, तें कुटुंब विभक्त झालें असेंच मानिलें पाहिजे, (५ मु.लॉ. रिपोर्टर ४६२११३, मु.लॉ. ७-२८५) ज्या सहभागीदारांनीं वांटणी करुन घेतली त्यांसच पु्हां आपली मिळकत एक ठिकाणीं करुन पुन्हां एकत्रकुटुंबी होतां येतें. संसृष्ट झालेल्या कुटुंबास वारसाचे नियम लागतात कीं, शेषाधिकाराचें तत्त्व लागतें याविषयीं मतभेद आहे. संसृष्ट झालेल्या इसमास पुत्रपौत्र नसल्यास त्याची विधवा वारस होत नाहीं. संसृष्टापैकीं शेष राहिलेले इसम शेषाधिकारानें त्याचे हितसंबंध घेतात (सर्वाधिकारी-हिंदु लॉ.पा. ९५३). संसृष्ट झालेल्या इसमास शेषाधिकाराचें तत्व लागत नाहीं. (सरकार हिंदु लॉ.पा. ३०१ आ. ४.).
इतर कायदेपद्धति:- मुसुलमानी, फारशी, इंग्रजी वगैरे कायदेपध्दतींत समाईक कुटुंबपद्धति व पुत्रांचे जन्मतः हक्क हीं तत्वें नाहींत. त्यांमध्यें अपत्यांनां किंवा इतर आप्तांनां मयताच्या मृत्युदिनापासून वारसाहक्क प्राप्त होतो; व या वारसाहक्काप्रमाणें मयताच्या इस्टेटींत कायद्यानें ठरलेला हिस्सा वारस इसमांनां ताबडतोब मिळतो. त्यामुळें वारसाहक्काबरोबरच वांटणीचा प्रश्न निकालांत निघतो ('वारसा') पहा. तथापि इतर कित्येक रीतींनीं अनेक इसमांची (नात्याचा संबंध नसतांहि) एकाच मिळकतींत समाईक मालकी उत्पन्न होते; आणि मग अशा समाईक मिळतीची वांटणी करुन घेण्याचा प्रश्न येतो.