विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाटाणा:- यांचें मूळ स्थान काकेशस पर्वत ते इराण हें असावें. याची लागवड हिंदुस्थानांत फार प्राचीन काळापासून होत आहे. वाटाण्याचें रोप सुमारें फूटभर वाढून पुढें त्याचा वेल पसरतो. त्याचा वेल नाजूक असतो. याला शेंगा येतात. व प्रत्येक शेंगेंत चार ते सहा दाणे असून ते गोल असतात. वाटाणा दोन्हीं हंगामांत पिकतो. त्यांपैकीं रब्बी पीक फार महत्त्वाचें आहे. वाटाणा बागाइतांत व जिराइतांत करतात. बागाईतांत क्षेत्र थोडें असतें. वेल काठयांवर चढवितात. मुंबई इलाख्यातं हें पीक भडोच, बडोदें, खानदेश, नगर, नाशिक, पुणें, सातारा, या ठिकाणीं होतें. मध्यप्रांतांत हें पीक छत्तिसगड भागांत महत्वाचें आहे. या पिकाखालीं मध्यप्रांतांत १९१५-१६ सालीं १६४८१२ एकर जमीन असून व-हाडात ६४९३ एकर होती. वाटाण्याच्या अनेक जाती आहेत; त्यांपैकीं मुख्य पांढरा (मटार) व हिरवा ह्या दोन होत. पुणें जिल्ह्यांत मटार खरीप हंगामांत करतात. छत्तिस गडांत, कोंकणांत व मालाड भागांत पहिलें भाताचें पीक काढल्यावर त्याच्या मागून (जेथे ओल फार दिवस टिकतें तेथें) हें पीक घेतात. वाटाणा हें धान्य हलक्या, मध्यम काळया व मळईच्या जमिनींत चांगलें होतें.
वाटाण्याकरितां एक दोन वेळ जमीन नांगरुन कुळवून ढेंकळें फोडून सारखीं करुन बीं हातानें फेंकून किंवा पाभरीनें पेरतात. बीं नोव्हेंबरांत दर एखरीं ४० ते ५० पौंड पर्यंत पेरतात. या पिकाला एक दोन खुरपण्या देतात. थंडीपासून या पिकाला जास्त फायदा होतो. रब्बीच्या हंगामांत डोंगरपठारावर व उंच प्रदेशावर वाटाणा चांगला होतो महाबळेश्वर येथें विलायती वाटाणा फारच चांगला होतो. पीक सुमारें ४ ते ४॥ महिन्यांत तयार होतें. याच्या शेंगा शेतांत काढून घेतात, किंवा वेल उपटून चार दोन दिवस वाळल्यावर खळयांत आणून काठीनें झोडून बीं तयार करतात.उप्तन्न सरासरी दर एकरीं ४००-५०० पौंड, देश व मावळी भागांत व गुजराथकडे एकरी ४००-८०० पौंड बीं व ४-५शें पौंड भुसा निघतो. वाटाण्याचे हिरवे व वाळलेले दाणें यांची उसळ आमटी वगैरे करतात. याच्या हिरव्या शेंगाहि पुष्कळ खातात. वेल गुरांस चारतात.