विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाडाइ:- आफ्रिका, एक फ्रेंच संरक्षित संस्थान. येथें पूर्वी एक स्वंतत्र मुसुलमानी राज्य होतें. १९०९ सालीं फ्रेंचांनीं तें खालसा करुन फ्रेंच कांगोला जोडिलें. या देशाचें क्षेत्रफळ १७०००० चौरस मैल व लोकसंख्या दहा लाख पर्यंत आहे. या देशाचे पूर्व व मध्य हे भाग फार सुपीक आहेत व येथें जंगलहि पुष्कळ आहे. संस्थानांत वाडी राईम, वाथा वगैरे नद्या आहेत. जंगलांत मोठाले हत्तींचे कळप आढळतात. नीग्रॉइड व नीग्रो राष्ट्रजाती, अरब, फ्युला व टिबु इत्यादि जाती येथें राहतात. माबा ही येथील एक मुख्य जात होय. मका, नीळ व कापूस इत्यादि वस्तूंची येथें लागवड करण्यांत येते. हस्तिदंत व शहामृगाचे पंख या निर्गत व्यापाराच्या मुख्य वस्तू होत. फ्रेंचांनीं हा देश काबीज करण्याच्या पूर्वी येथें गुलामांचा फार मोठा व्यापार चालत असे.
इतिहास:- भूमध्यरेषेवरील आफ्रिकेचा अरण्यमयभाग व साहारा वाळवंट यांच्या मधोमध असल्यामुळें ह्या देशांत अरब व नीग्रो संस्कृती लवकरच सुरु झाल्या, आणि देशाचें स्वामित्व नीग्रो जातीकडे गेलें असलें तरी पौरस्त्य व मुसुलमानी धर्माचाच येथें शेवटीं पगडा बसला. अरबी भूगोलज्ञांच्या लेखांवरून यूरोपला या देशाची माहिती लागली. १६४० च्या सुमारास माबा जातीच्या अबदल करीम नामक मुख्यानें हा देश जिंकिला. १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकांत फ्रेंच लोक कांगो व नायगर येथून पुढें सरकत जाऊन वाडाइच्या हद्दीपर्यंत जाऊन थडकले. स. १८९९ च्या आंग्लो-फ्रेंच करारान्वयें हा देश फ्रेंचांच्या सत्तेखालीं देण्यातं आला. १९०० मध्यें सुलतान इब्राहीम याचा खून झाल्यामुळें अहंमद गाझीली हा वाडाईचा सुलतान झाला. डिसेंबर १९०१ मध्यें अहंमदास पदच्युत करण्यांत आलें व दाऊद मूरला सुलतानपद मिळालें. नूतन राजाशीं फ्रेचांनीं बोलणें लावून बागिरमी, कानेम (ह्या देशांवर वाडाईचें साम्राज्य होतें) वगैरे देश त्याच्यापासून आपल्या ताब्यांत घेतले. पण पुढें १९०४-०९ पर्यंत वाडाइचे लोक व फ्रेंच यांच्यामध्यें लढाया चालून शेवटीं हें संस्थान पूर्णपणें फ्रेंचांकडे आलें.