विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाणी:- यांनां वाणी, बनिया, लाडसक्के, महाजन, साहूकार, वगैरे नांवें असून त्यांत खंडेलवाल (पहा), लाड, मोढ, नागर, काठी, अद्वास, मिसरी, कसेर, उमरा, बागरिया, धुसार, आगरवाल (पहा), ओस्वाल (पहा), माहेश्वरी, गहोई, श्रीमाळी, सैतवाल, जैसवाल (पहा), परवार, लिंगायत, मराठे वगैरे पुष्कळ पोटजाती आहेत. यांची एकंदर लोकसंख्या (१९११) ११३६५०० आहे; तींत मुसुलमान जातीचे वाणी ५९७१७ आहेत. वाण्यांची सर्वांत जास्त वस्ती (४७१६०३) संयुक्तप्रांतांत असून त्यांच्या खालोखाल मुंबई, बिहार ओऱ्सिा, मध्यहिंदुस्थान, काश्मीर व राजपुताना इकडे आहे. यांचा मुख्य धंदा व्याजबट्टयाची सावसावकारी, किराण्याचा व धान्याचा व्यापार, कापडाचें दुकान चालविणें वगैरे असतो. हे स्वतःस वैश्य समजतात व कांहींजण जानवेहि घालतात. सामान्यतः हिंदु वाणी मद्यमांसनिवृत्त असून खाण्यापिण्याचे नियम हे फार कडक रीतीनें पाळतात.
मध्यप्रांतांतील हिंदुस्थानी ब्राह्मण यांच्या हातची पक्की रसोई खातात. यांच्य बहुतेक पोटजातींचीं नांवें गांवांवरुन व धंद्यांवरुन पडलीं आहेत; तथापि त्यांतहि कांहीं उच्च व कांहीं कनिष्ट दर्जाच्या मानतात. आगरवाल, ओस्वाल, परवार यांनां उच्च तर कसौंधन, कसरवानी, दोझर यांनां कनिष्ठ समजतात. मात्र या एकमेकांनां परस्परांची पक्की रसोई चालते; व परस्पर विवाहाचींहि उदाहरणें थोडींफार आढळतात. आपलें मूळस्थान राजपुताना असें हे मानतात. तसेंच रजपूत जातीपासून उत्पत्ति झाल्याच्या कथा यांच्यांत अजून प्रचलित आहेत. आगरवाल म्हणतात कीं, क्षत्रिय बाप व नागकन्या आईपासून अग्रोह नांवाचा आपला मूळपुरुष जन्मला, ओस्वालांचा पूर्वज ओसनगरचा राजा असून तो जैनधर्मी होता. नेम लोक म्हणतात कीं, त्यांचे १३ पूर्वज परशुरामाला भिऊन क्षत्रियांचा धंदा सोडून वाणी बनले. राजपुतानाप्रमाणें बुंदेलखंड व गुजराथ या प्रांतातून हे वाणी लोक निरनिराळया प्रांतांत पसरले. खंडेला (जयपूरराज्य) गांवचे खंडेलवाल, कडामाणीकपूर (बुंदेलखंड) चे कसेर, डोंगरपूरचे बागरिया, धुशी डोंगरावरील (अलवारराज्य) धुसार, टिकमगडचे असाटी व महेश्वरचे माहेश्वरी होत. राजपुतान्यांत ब-याच राज्यांत वाणी जातीचे बरेच प्रधान होऊन गेले. याचें कारण यांची व्यवहारचतुरता होय. यांच्यांत जैनधर्मी बरेच (ओस्वाल, परवार, गोलपुरव, सैतबाल, समैया, वगैरे) लोक आहेत. बाकीचे बहुतेक वैष्णवपंथी आहेत. या दोघांत फारसा भेद नाहीं. जैनांचे उपाध्याय ब्राह्मण असून ते हिंदु सणहि पाळतात. कांहीं जणांनीं आपल्यांत श्रेष्ठकनिष्टदर्शक वीसा व दशा असा भेद पाडला आहे. बीसा हे श्रेष्ठ व दशा हे कनिष्ठ दर्जाचे समजतात. दशा जातींत पौनर्भवसंतति, गंधर्वविवाह आणि कडक जातिनियमांपासून पतित झालेले यांचा समावेश होतो; तरी पण या दशा व वीसामध्यें लग्नव्यवहार होऊं शकतो. आणि श्रीमंत व मान्य अशा दशास, वीसावर्गांत जातां येतें. असले दशा पौनर्भवसंतीतस बहिष्कार घालतात, त्यामुळें पंचम नांवाचा आणखी एक वर्ग बनत चालला आहे. वाण्यांत बहुतेक १२ गोत्रें आढळतात; त्याचे आणखी पोटभेद आहेत. भातृवंश किंवा पितृवंश यांच्या ५ पिढया तुटल्याशिवाय त्यांत लग्नव्यवहार होत नाहीं. जैनांत अग्नीऐवजीं वराच्याच भोवतीं वधू ७ प्रदक्षिणा घालते. प्रत्येक वेळेस तिच्या डोकीवर वर हा साखर टाकतो. उत्तरहिंदुस्थानांत मुलीबरोबर पाठराखी म्हणून पुष्कळशा बायका वरातीबरोबर वराच्या गांवींहि जातात. विधवाविवाह निषिद्ध आहे, पण केल्यास त्याचा पंचम किंवा दशांत समावेश होतो. व्यभिचारिणीला पंचमांत समाविष्ट करतात. अशौचाचे दिवस विषम असून मषर्तकाच्या वेळीं भाडयानें रडणारे लावतात. मुलगा झाल्यास आनंदप्रदर्शनार्थ थाळा वाजवतात व मुलगी झाल्यास शोकप्रदर्शनार्थ मडकें फोडतात. मध्यप्रातांत हे लोक पुण्याकडील शिराळशेटसारखी एक नाथूरामाची मूर्ति शिमग्यांत मिरवतात. व त्याच्या भोवतीं पुरुष व बायका फेर धरुन परस्परांवर धूळ व गुलाल फेंकतात. ज्या दिवशीं कांहीं पैसा मिळत नाहीं त्या रात्रीं तिकडील कांहीं कांहीं लोक उपाशी निजतात. लहानपणापासून हिशेब येत असल्यानें वाणी मोठमोठे हिशेब तोंडीच करतात (रसेल-हिरालाल). लग्नांत कुंभाराच्या गाढवास वरानें लाथ मारली पाहिजे. नेमाडांत मूल होईपर्यंत बायकोनें ज्वारीच खावी लागते; मूल झाल्यावर दिल्लीजवळील महाऊरच्या देवीचें दर्शन घेऊन मग गहूं खाण्यास परवानगी मिळते. जबलपूर-रायपूरकडील अग्रहारींत कांहीं नानकपंथी आहेत तिकडे औधिये, असाधी, चरणाग्री, भार्गव, दुस्त्रा, गहोई, गोलपूरव, कसरवानी, कसाऊधन वगैरे पोटजाती आहेत. भार्गव हे आपल्यास ब्राह्मण म्हणवितात. गहोईचीं ७२ अल (गोत्रें) आहेत. इकडील माहेश्वरीमध्यें वरास त्याची सासू त्याच्या गळयांत दावें बांधून व नाक धरून मांडवांत नेते व जोडयाची पूजा करावयास लावते. नेमा जातींत १४ गोत्रें व ५२ पोटभेद आहेत. ओसनगर (मारवाड) च्या ओसा देवाच्या सांगण्यानें रतनसूरी नांवाच्या जैनानें सर्पदंशानें मेलेल्या तेथील राजपुत्रास जिवंत केलें म्हणून राजा व सर्व लोक जैन झाले, ते ओस्वाल होत; पण यांचे उपाध्याय मारवाडी ब्राह्मण आहेत. परवार वाण्यांत वैनायकी म्हणून एक गोळकसंतति समाविष्ट करणारा वर्ग आहे; चांगल्या आचरणानें कांहीं पिढयानंतर वैनायकीवर्ग परवारांत मिसळतो (रसेल हिरालाल). परवारांतील वर घोडयावर बसून व वधू पालखींत बसून लग्नस्तंभाला सात प्रदक्षिणा घालते. पंजाबांतील आगरवाल वहीपूजनाऐवजीं शस्त्रपूजा करतात आणि आपल्यास क्षत्रिय म्हणवितात. इकडील खंडेलवालहि स्वतःस क्षत्रियच म्हणवितात. माहेश्वरी हे बहुतेक शैव आहेत.
कर्नाटकाकडे यांनां बनजिग म्हणतात. गुराथेंत यांचे ४१ पोटभेद आहेत; तिकडे यांची वस्ती व सामाजिक दर्जा बराच मोठा आहे. बालविवाहाची चाल रुढ आहे. इकडील पुष्कळसे वाणी वल्लभाचार्यपंथी आहेत. जानव्याऐवजीं कांहीं जण तुळशीच्या मण्यांची माळ घालतात. वल्लभाचार्य गुरुचा यांच्यावर फार दाब असतो. अहमदाबादेस देशावल वाणयांची एक कायमची पंचायत आहे. तशीच काठेवाडांतील कपोलवाण्यांतहि आहे. पंचमहालकडे विसाखदायत वाण्यांची अशीच पंचायत आहे. यांच्यांतील कुळींनां एकडे म्हणतात. पंचायतीच्या दंडाची रक्कम ५० पासून १ हजारापर्यंत जाते. महाजनसभेंतून हांकलून देणें ही फार मोठी शिक्षा होय. सवेलूम (लग्न मोडणें) हाहि मोठा अपराध समजून त्याला एक हजार रुपयेपर्यंत दंड होतो, काठेवाडांतील वगासरमंडळ नांवाच्या पंचायतीचा दर्जा सर्व काठेवाडांत श्रेष्ठ समजला जातो.
मराठे वाण्यांत कुडाळे, संगमेश्वरी, कुणबी, पाताणे, बावकुले, नेवे, काथर व खरोट हे ८ प्रकार आहेत. या परस्परांत अन्न-लग्न-व्यवहार नाहीं. पहिले दोन कोंकणांत, पुढले दोन दक्षिण भागांत व बाकीचे खानदेशांत आहेत. कुडाळे आपल्याला आर्यवैश्य म्हणवितात. मागें कांहीं वर्षांपूर्वी यांच्यापैकीं कांहींनीं मराठयांच्या मुलींशीं लग्नें केली होतीं. हे मांसाहारी आहेत पण मद्यपी नाहींत. मूळचे मराठी हे कुणबी असावेत. खानदेशांतील लाडसक्कयांत ०१८ आडनांवें आहेत; हे मूळचे गुजराथचे; यांचा कुलेदव गिरीचा व्यंकोबा आहे. पूर्वी शेरीआज नांवाची यांची एक पंचायत होती. महाराष्ट्रांत कुलवंतवाणी म्हणून एक वर्ग आहे. ह्यांनां मराठयांच्या हातचें पाणी चालतें व उपाध्याय ब्राह्मण असतात, यांचें मूळचें नांव कुलुमवाणी होतें. यांच्यांत पुनर्विवाह होतात. याशिवाय मारवाडी, आगरवाल, ओसवाल, खंडेलवाल इत्यादि वाण्यांतील पोटजातिंवरील लेख पहा. (खानदेश ग्याझे; सेन्सस रिपोर्ट (१९११) भा.७; गेज-ग्लॉसरी; क्रुक्स ट्राइब्ज; रसेल-हिरालाल).