विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वांदिवाश:- मद्रास, उत्र अर्काट जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ४० चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) १७१७१०. यांत २८४ खेडीं आहेत. जमीन हलकी असून वस्ती विरळ आहे. तालुक्याचें मुख्य ठाणें वांदिवाश येथें आहे. वांदिवाशची लोकसंख्या सुमारें ५ हजार असून १८ व्या शतकांत कर्नाटक युद्धाच्या प्रसंगी वांदिवाश येथें ब-याच महत्त्वाच्या चकमकी घडून आल्या. १७५२ सालीं मेजर लॉरेन्सनें वांदिवाशवर हल्ला केला होता. स. १७५७ त कर्नल अंडरसन यानें किल्ल्याखेरीज करुन शहाराच विध्वंस करुन टाकिला होता. १७६० सालीं फ्रेंच सरदार लाली व बुसी यांचा आयरकूट या इंग्रज सरदारानें वांदिवाश येथील लढाईंत पूर्णपणें पराभव करुन बुसीला कैद केलें. सन १७८० त हैदरअल्लीनें वांदिवाश किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला होता.