प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वाद्यें:- गायनशास्त्रांत एकंदर वाद्यांचें ४ प्रकार मानिले आहेत, ते असे:- (१) तारा व ताती लावून वाजणारीं वाद्यें; ह्यांस 'ततवाद्यें' असें शास्त्रकार नांव देतात. (२) कातडयानें मढवून वाजलीं जाणारीं वाद्यें; ह्यांस 'आनद्ध' असें म्हणतात. (३) भोंकांतून वारा भरून वाजणारीं वाद्यें; त्यास 'सुषिर' म्हणतात. व (४) एकावर एक आघात करुन वाजलीं जाणारीं वाद्यें; ह्यांस 'घन' अशी संज्ञा देतात.  तत, आनद्ध, सुषीर आणि घन असे वाद्यांचे चार भेद त्यांच्या बनावटीवरुन झाले आहेत; व गीताई व तालाई असे दोन भेद त्यांच्या उपयुक्ततेवरुन मानितात तत आणि सुषीर हीं वाद्यें गीतोपयोगी व आनद्ध आणि घन हीं वाद्यें तालोपयोगी आहेत.

ह्या चारह प्रकारच्या वाद्यांत कांही तालसुरांत गावयास मदत करणारीं आहेत; कांहीं धार्मिक व मंगल प्रसंगीं वाजविलीं जातात; कांहीं शिकारीच्या वेळीं उपयोगांत येतात; व कांही स्वतंत्र रीतीनें वाजवून वादक गवयाप्रमाणें स्वतःचें व ऐकणाराचें मनरंजन करतो. आतां प्रत्येक वाद्याची रचना, त्याचा उपयोग, तें कसें मिळवावें व कसें वाजवावें ह्याचें सविस्तर वर्णन यापुढें केलें आहे. ततवाद्यें सतरा, आनद्धवाद्यें बारा, सुषिरवाद्यें बारा आणि घनवाद्यें दहा मिळून येथें वर्णिलेल्या वाद्यांची संख्या एकावन्न आहे.

तारांची वाद्यें

तंबोरा:- हें वाद्य लहानमोठया आकाराचें असतें. ह्या वाद्याचे दोन भाग असून ते एकमेकांस जोडलेले असतात. एक भाग वाटोळा असतो तो, प्राय: तीन चतुर्थांश कडुभोपळा घेऊन तयार केलेला असतो. ह्यास लांकडाची निमगोल दांडी बसविलेली असते. ती दांडी सुमारें पांच सहा बोटें रुंद असते व ती कोरून पातळ करुन तिची जाडी सुमारें दोन तीन दोर्‍याइतकी ठेवितात.  भोपळयास दांडी जोडल्यावर, त्यास लांकडीच आच्छादन बसवितात. भोपळयावरील आच्छादनास 'पाटी' म्हणतात व दांडीवरील आच्छादनास दांडीच म्हणतात. आच्छादन बसविल्यावर दांडी बहुतेक अंशीं निमगोल अशीच दिसते. दांडीचें वरचें टोंकही लांकडी गाबडीनें बंद केलेलें असतें. ह्याप्रमाणें दांडी जोडल्यावर एका अंगास गोलाकार अशी मोठी बैठक व दुस-या अंगास दांडीचें अरुंद असें शेवट असा आकार बनतो. दांडीच्या ह्या बारीक शेवटापासून सहा किंवा आठ इंचावर हस्तिदंती दोन अटी एक बोट अंतरावर बसवितात; एकीला तारा ओंवण्याकरितां चार भोंकें असतात व दुसरीला चार खांचा ठेवितात. ह्या अटीच्या वरच्या भागास तारा लावण्याकरितां अंगठयाएवढया जाडीच्या दोन खुंटया बसवितात; ह्यास जोडाच्या खुंटया म्हणतात. दांडीच्या एका अंगास तशाच प्रकारची एक खुंटी बसवितात तिला पंचमाची खुंटी म्हणतात व दुस-या अंगास आणखी एक खुंटी बसवितात तिला खरजाची खुंटी म्हणतात. भोपळयावर बसविलेल्या आच्छादनावर म्हणजे पाटीवर हस्तिदंती अगर रक्तचंदनाची घोडी सुमारें दोन बोटें उंच, तीन बोटें रुंद व चार बोटें लांब अशी मध्यमागीं बसवितात. ह्या घोडीस तारा बसण्याच्या खांचा असतात. भोपळयाच्या बुडाशीं म्हणजे जेथें पाटीची कड भोंपळयाच्या कडेशीं टेकते तेथें मध्यावर सुमारें चार बोटें लांब व बोटभर रुंद अशी हस्तिदंती पट्टी बसवितात; या पट्टीस चार भोकें असतात. ह्या पट्टीस तारदान म्हणतात. त्यांतून मुदणीनें तारा ओवून त्या घोडीवरुन दांडीच्या टोंकाशीं असलेल्या अटींतून ओवून खुंटयांस गुंडाळितात. घोडीच्या दोनहि अंगास दोन बोटावर दाभण जाईल अशीं पांच पांच भोंकें  पाटीस पाडलेली असतात; त्यायोगें आवाज अधिक खुलतो.

तंबो-यास लावावयाच्या तारा चार असतात. दांडीच्या टोंकाशी मध्यावर असणा-या दोन खुंटयांस ज्या दोन तारा लावितात त्या पक्कया पोलादी असून त्यांची जाडी सारखी असावी लागते. त्यांस जोडाच्या तारा म्हणतात. ह्या एका स्वरांत मिळविल्या जातात व तो स्वर षड्ज अशी कल्पना करुन पूर्वी सांगितलेल्या पंचमाच्या खुंटीस कच्ची पंचरसी तार लावितात व ती जोडाच्या तारांपेक्षां थोडी अधिक जाड असून तीवर खरज स्वराच्या पंचमांत ठेवितात. आतां राहिलेल्या खुंटीस जी तार लावितात तीहि पंचरसी किंवा पितळेची कच्ची असून ती खरज स्वरांत मिळवितात. म्हणजे मंद्र सप्तकांतील खरज व पंचम व मध्यसप्तकांतील षड्ज असे तीन स्वर मिळविलेल्या तंबो-यांत बोलतात. तारांचा ध्वनि गोड निघावा म्हणून घोडीवर तारेखालीं थोडा कापूस पिंजून घालतात त्यास 'जव्हारी' म्हणतात. स्वर थोडा कमी जास्त करतां यावा म्हणून तारांत मणी ओविलेले असतात, व ते तारदान व घोडी ह्यांमध्यें जो तारांचा भाग येतो तेथें खेळते ठेवितात.

गायकी तंबो-याचें प्रमाण म्हणजे सामान्यतः तीस इंच घेराच्या भोपळयास तीन फूट लांबीची दांडी असते. ह्याच प्रमाणांत लहान मोठे तंबोरे व तंबु-या तयार करतात. तंबोरा उभा धरून मधल्या बोटानें पंचमाची तार व तर्जनीनें जोडाच्या दोन व खरजाची एक अशा तीन तारा, सारख्या अवकाशानें वाजवितात. गायकाशीं स्वराची साथ देण्यांत ह्याचा उपयोग होतो.

तंबोरी:- ही तंबो-यापेक्षां बरीच लहान असते. हिचा भोपळा सुमारें टीचभर व्यासाचा असतो व दांडी सुमारें दीड हात असते. हिचा स्वर बराच चढा असतो. वारकरी, हरिदास, भजनीलोक हिचा उपयोग करतात. स्वराची साथ देणें हाच हिचाहि उपयोग आहे. बीनकार आपल्या साथीस हिचा उपयोग करतांना दृष्टीस पडतात हिची सर्व बनावट तंबो-यासारखीच असून हिला चारच तारा लावितात; त्या पंचम, षड्ज, आणि खरज ह्या स्वरांत मिळवितात.

सूरसोटा:- हें वाद्य तंबो-यासारखेंच. फरक एवढाच कीं, ह्यास भोपळा नसतो; परंतु दांडीचें लांकूड एका बाजूस दुस-या बाजूपेक्षां थोडें रुंदट ठेवितात. वस्तुतः हें वाद्य म्हणजे सलग कोरलेली दांडीच असते, म्हणूनच त्याला 'सूरसोटा' म्हणतात. त्यावर तारदान, घोडी, अटी व खुंटया ह्या सर्व तंबो-याप्रमाणेंच असून ताराहि चारच असतात व त्या तंबो-याच्या तारांप्रमाणेंच स्वरांत मिळवितात. गायक जसा साथीला तंबोरा घेतो त्याप्रमाणें, जंगम, हरिदास तसेंच दारोदार पदें म्हणत भिक्षा मागणारे ह्या सूरसोटयावर गातांना आढळतात.

एकतारी:- कछव्यास जसा गोल चापटका भोंपळा लाविलेला असतो त्याप्रकारचा भोंपळा घेऊन त्यास इंच सव्वाइंच व्यासाची वेळूची दांडी सुमारें दोन अडीच फूट लांबीची बसवितात; व मग सदर भोंपळा कातडयानें मढवितात. ह्याच्या मध्यभागीं घोडी ठेवितात. वेळूच्या दांडीस एक खुंटी बसविलेली असते. तिला तार गुंडाळून ती घोडीवरुन भोंपळयाच्या बुडाशीं जो दांडीचा भाग आलेला असतो त्यास मारलेल्या बारीक खुंटीस खिळवितात. यास एकच तार असते म्हणून याला 'एकतारी' असें नांव आहे. भजनी लोक, तसेंच जंगम, गोसावी वगैरे भक्तिरसात्मक गीतें रस्त्यावर गातात व दुस-या हातांत घेतलेल्या चिपळयांनीं ताल देतात हें पुष्कळांनीं पाहिलें आहेच.

रुद्रवीणा:- हें दक्षिणेकडील वाद्य आहे; व तंबो-याचें जें वर्णन दिलें आहे त्याप्रमाणेंच ह्यास भोंपळा,  दांडी, खुंटया, अटी, घोडी, तारदान इत्यादि सर्व अवयव असतात. पण दांडी शेवटीं सहा बोटें वळवून तिचें शेवट पाठीकडे नेतात. हें शेवट नक्षीदार कामानें शृंगारलेलें असते; ह्यांत सुसरीचें अगर सर्पासारख्या प्राण्याचें मुख कोरलेलें असतें. आणि दांडीवर मेणांत पितळेचे अगर रुप्याचे पडदे बसविलेले असतात. भोंपळयाच्या ऐवजीं लांकूडच कोरुन त्यास दांडी बसवितात. ह्या लांकडी भोंपळयाचें बाहेरचें अंग खरबुजी आकाराचें बनविलेलें असतें. लांकूड फणसाचें अथवा शिसूचें पसंत करतात. अटीपासून दोन तीन बोटांवर एक वाटोळा लहानसा भोपळा दांडीस खालच्या अंगाने काढतां घालतां येईल असा स्क्रूनें बसविलेला असतो. ह्याच्या साहाय्यानें ध्वनि जोरकस निघतो. अटीच्यावर दांडीच्या दोनहि अंगांस दोन दोन खुंटया असून तंबोर्‍याच्या तारांप्रमाणें ह्या चारहि तारा अटींतून गोडीवर चढवून तारदानांत बसविलेल्या असतात; शिवाय आणखी तीन तारा  लावण्याकरितां तीन खुंटया, दांडीच्या ज्या बाजूस हाताचा आंगठा ठेवितात त्या बाजूस बसविलेल्या असतात. वर सांगितलेल्या चार तारा पडद्यावर डाव्या हाताची तर्जनी व मधलें बोट ह्यांनीं दाबून उजव्या हाताच्या तर्जनीनें त्या तारांवर आघात करुन हें वाद्य वाजवितात. उजव्या हाताची तर्जनी, अनामिका व करांगुली ह्या तीन बोटांत तारेची नखी घालून हें वाद्य वाजवितात. पडद्यांची संख्या चोवीस असते. मुख्य बाजाच्या चार तारा सा,प,सा,म ह्या स्वरांत मिळविलेल्या असतात व बाकीच्या तीन तारा प,सा,सा (दुपटीचा) अशा ठेवितात. ह्याप्रमाणें रुद्रवीण्याचें वादन स्वतंत्रपणें असतें.

बीन:- दक्षिणेकडे जसें 'रुद्रवीणा'तसें उत्तरेकडे 'बीन' होय. 'बीन' हा शब्द सुद्धा 'वीणा' या शब्दाचा अपभ्रंश आहे असेंहि म्हणतां येईल. सुमारें तीन चार इंच व्यासाची व तीन ते चार फूट लांबी अशी पोकळ वेळूची सरळ दांडी ह्या वाद्यास पसंत करावी लागते. ज्या ठिकाणीं पेरीं येतात त्या ठिकाणीं असणारे डोळे काढून टाकून सर्व दांडी सारखी नितळ गोल करतात. व आंतून असणारी पोकळी हीहि पण चांगली साफ करुन घेतात. अशा प्रकारें तयार झालेल्या दांडीच्या दोनहि शेंवटांस चार बोटें रुंदीच्या पितळी किंवा रुप्याच्या मायण्या बसवितात. सुमारें पंचवीसपासून तीस इंचांपर्यंत भरेल अशा परीघाचे दोन गोल कडु भोंपळे घेऊन त्यांचे देंठ काढून टाकून तेथें वर सांगितलेली दांडी बसेल अशा खांचा प्रत्येक भोंपळयास घेतात. सुमारें आठ इंच प्रत्येक शेंवट बाहेर राहील अशा बेतानें ती दांडी त्या भोंपळयाच्या जोडीवर बसवितात. ह्याप्रमाणें बीनाचा बाह्य आकार झाला. तंबो-यास जशा अटी असतात तशा दोन हस्तिदंती अटी एका शेंवटापासून सुमारें सहा सात इंच अंतर सोडून बसवितात; दुस-या शेंवटास हस्तिदंती घोडी बसवितात. केव्हां केव्हां ह्या घोडीचा आकार मोरासारखा केलेला दिसतो. घोडीखालीं दिलेल्या लांकडी तुकडयासच तारदान बसविलेलें असतें. दांडीच्या दोन्ही अंगांस अटीच्या वर एक अंगास तीन व दुस-या अंगास दोन तारा लावण्यासाठीं ब-याच मोठया खुंटया बसवितात. वादकाच्या उजव्या हाताचा आंगठा वाद्याच्या ज्या कडेवर बसतो त्याच कडेला वर सांगितलेल्या दोन खुंटया येतात; त्याच कडेस अटीच्या थोडीशी खालीं अशी एक खुंटी कडझिलीच्या तारेकरितां ठेवितात आणि त्याच कडेवर सुमारें दांडीच्या दोनतृतीयांशावर, घोडीकडे आणखी एक खुंटी चिकारीच्या तारेकरितां लावितात. बाजाच्या चार तारा सा,प,सा,म अशा मिळवितात. अटीच्या जवळ, एका अंगास अटीखालीं व दुस-या अंगास अटीच्यावर असणा-या कडझिलीच्या तारा षड्ज स्वरांत मिळवितात; चिकारीची तार दुपटीच्या षड्जांत ठेवितात, खरज व पंचम ह्या स्वरांच्या तारा पितळेच्या कच्च्या असतात. बाकीच्या सर्व तारा पोलादी पक्कया असतात. पुष्कळ वेळां कडझिलीच्या तारांपैकीं डाव्या हाताच्या बोटानें वाजणारी तार पितळेची लावितात. दांडीवर वीस लांकडी पडदे मेणांत बसविलेले असतात. प्रत्येक पडद्यास खांच करुन तींत पोलादाचा पातळ तुकडा पडद्याइतक्या लांबीचा बसवितात. ह्या तुकडयावर वाद्याच्या तारा दाबल्या जातात. ह्या पडद्याची उंची किंचित किंचित कमी होत गेलेली असते आणि घोडीकडे असलेल्या शेंवटच्या पडद्याची उंची सर्वांत कमी असते; अशी उंची कमी होत गेल्यानें एका पडद्यावर तार दाबली असतां ती त्या पडद्याच्या खालच्या पडद्यास लागत नाहीं. ह्या वीस पडद्यांमुळें ह्या वाद्यांत अडीच सप्तकें पुरीं होतात. उजव्या हाताची अनामिका अगर मधलें बोट व तर्जनी ह्यांत नखी घालून घोडीकडे असणारा भोंपळा छातीशीं ठेवून त्याच्या बाहेरुन उजव्या हाताचा आंगठा दांडीवर ठेवून तर्जनीनें तारेवर आघात करतात; दुसरा भोंपळा सहजच डाव्या खांद्यावर बसतो व डाव्या हाताची तर्जनी व मधलें बोट ह्यांनीं तार पडद्याशीं दाबून किंवा ओढून हवा तसा स्वर काढितात. ह्या वाद्यांत 'बाज'ची मध्यमाची तार, वाजविणाराचा आंगठा ज्या कडेवर ठेविलेला असतो त्या कडेशी असते; व बाकीच्या सा,प,सा (खरज) ह्या अनुक्रमें दुस-या बाजूकडे येतात; व डाव्या हाताच्या करांगुळीनें वाजणारी कडझिलीची तार ही ह्या बाजूकडील अखेरची होय. दाबून अगर ओढून ज्या चार तारांवर स्वर काढावयाचे असतात, त्या तारांपैकीं मुख्य 'बाज'ची जी मध्यमाची तार ती बाकीच्या तारांकडे खेंचली जाते हें ध्यानीं येईल.

हें वाद्य सर्व वाद्यांचा राजा आहे असें मानितात. ज्याला प्रचारांत 'जोड' म्हणतात तें रागदारीचें काम ह्या वाद्यांत इतकें उठावदार व मोहक निघतें कीं त्याचें वर्णन शब्दांनीं होणें अशक्य आहे. 'अनिबध्द' गानाचें योग्य प्रकाशन याच्या इतकें दुस-या कोणत्याहि वाद्यांत होऊं शकत नाहीं.

सतार:- तंबो-यास जसा भोपळा व दांडी असते त्याचप्रमाणें सतारीस असते. दांडी दोनपासून तीन सव्वातीन फूट लांबीची ठेवितात व तिची रुंदी साडेतीन इंचापर्यंत असते. ही दांडी वरच्या अंगानें सपाट असते व खालून कांहींशीं निमगोल अशी असते. तंबो-याच्या दांडीवर बसविलेल्या अटीप्रमाणें हिच्याहि दांडीवर दोन अटी बसविलेल्या असतात; आणि भोंपळयावर बसविलेल्या पाटीवर घोडी असते. तिच्या दोनहि अंगास दोन दोन बोटें जागा सोडून बारीक पांच पांच छिद्रें पाटीस पाडिलेलीं असतात. दांडीवर अटीच्या वरच्या अंगास दोन खुंटया व ह्या खुंटयांच्या उजवीकडे अटीपर्यंत तीन, व तेथून पुढें एकतृतीयांश भागावर एक व तेथून पुढें घोडीकडे एकतृतीयांश भागावर एक अशा सात खुंटया बसविलेल्या असतात. ह्या खुंटयांस तारा लावून त्या अटींतून व अटीवरून घोडीवर चढवून तारदानांत बसविलेल्या असतात. कडझिलीच्या तारा खुंटीवरुन दांडीवर ठेविलेल्या हस्तिदंती चुकेवरुन घोडीवर चढवितात व तारदानांत बसवितात. पहिली तार 'बाज'ची. ही पक्की पोलादी असते व हिच्यांत मणी ओंविलेला असून तो घोडीखालीं खेळतां ठेवितात. म्हणजे त्यायोगें ही तार थोडीशी चढवावयाची असल्यास तसें सहज करतां येतें. ही तार कोमल मध्यम स्वरांत ठेवितात. या तारेच्या मागील दोन तारांस जोडाच्या तारा म्हणतात. यांची जाडी पहिल्या म्हणजे मध्यमाच्या तारेच्या जाडीच्या सव्वापट असते. या षड्ज स्वरांत मिळवितात. या पितळेच्या कच्च्या असतात. चवथी तार पक्की पोलादी असते. हिची जाडी पहिल्या तारेइतकीच असते व ती पंचम स्वरांत ठेवितात. पांचवी तार पितळेची कच्ची असते तिची जाडी पहिल्या तारेच्या दिढीनें असते आणि ती खरजपंचम स्वरांत मिळवितात. सहावी तार पक्की पोलादी असते. ती षड्ज स्वरांत ठेवितात.ही पहिल्या तारेपेक्षां बारीक असते. सातवी तार पक्की पोलादी असून ती दुपटीच्या षड्जांत ठेवितात. हिला चिकारीची अथवा कडझिलीची तार म्हणतात. अर्थात सतार जुळल्यानंतर मध्य सप्तकांतील मध्यम, पंचम व षड्ज तसेंच तारसप्तकांतील षड्ज आणि खरजसप्तकांतील पंचम इतके स्वर वाजतात.

केव्हां केव्हां या वाद्यास तर्फा लाविलेल्या दृष्टीस पडतात. अशा वेळीं, दांडीवरची फळी नीच व्हावी म्हणून तिच्या दोनहि कडा हस्तिदंती अगर लांकडी रेजांनीं उचलून देतात व ज्या बाजूस कडझिलीच्या तारेची खुंटी असते त्या बाजूनें अटीपासून एकाखाली एक अशा अकरा बारीक खुंटया दांडींत बसवितात. दांडीच्या पाटीवर हस्तिदंती बारीक चुका त्या खुंटयांशीं तिरप्या रेषेंत मारुन त्यांवरुन या खुंटयांस गुंडाळलेल्या पक्कया पोलादी बारीक तारा, घोडीखालीं ठेविलेल्या पातळ अशा हस्तिदंती घोडीवरून तारादानांत बसविलेल्या असतात. या तर्फांमुळें वाद्याच्या आवाजास जोराची आंस सांपडते. या अकरा तर्फा मंद्र पंचमापासून तारसप्तकांतील षड्जापर्यंत क्रमानें मिळविलेल्या असतात.

दांडीवर जाड दाभणाएवढया जाडीचे अठरा पितळी पडदे तांतीनें बांधिलेले असतात. उजव्या हाताच्या तर्जनीमध्यें नखी घालून त्यायोगें तारेवर आघात करुन डाव्या हाताची तर्जनी व मधलें बोट यांच्या साहाय्यानें पहिली बाजाची तार पडद्याशीं दाबून हवे ते स्वर काढितां येतात. या वाद्यांत विशेषतः लयकारीचें गतकाम करुन दाखविण्याचा प्रचार फार आहे. हें वाद्य फार गोड व लोकप्रिय आहे.

प्राचीन शास्त्रकारांनीं 'त्रितंत्रीविणा' म्हणून जिचें वर्णन केलें आहे तिचें थोडेसें रुपांतर करुन अमीर खुषरु यानें 'सेः (तीन) तार' प्रचारांत आणिली अशी ऐतिहासिक माहिती मिळते. हल्लीचें स्वरुप सात तारांचें आहे व पूर्वीचें तीन तारांचें होतें हा फरक मात्र विसरतां कामा नये.

कछबा:- हा सतारच आहे. फरक एवढाच कीं, त्याचा भोंपळा डेरेदार नसून कांसवाच्या पाठीसारखा असतो व हा भोंपळा क्वचित् लांकडी वापरतात. ह्यासहि कांहीं लोक तर्फा बसवितात. सतारीप्रमाणें ह्यांतहि बगदारीच्या व लयकारीच्या गती वाजवितात. तारा मिळविण्याची व वाजविण्याची पद्धति सतारीप्रमाणेंच आहे.

ताऊस:- ताऊस शब्द पर्शियन भाषेंतील असून त्याचा अर्थ मोर असा आहे. सतारीच्या बुडाशीं भोंपळा लाविलेला असतो, त्याच्या ऐवजीं यास लांकडी मोर बसवितात. मोराची पाठ, म्हणजे सतारीच्या भोंपळयावरील पाटी म्हणावयाची; पण ह्या मोराच्या पाठीवर एक चौकोनी पेटी असते, ती कातडयानें मढविलेली असते; तिच्या मध्यावर घोडी असते. तिच्या पायांत पातळ, एक दोरीभर जाडीची दुसरी घोडी असते. पेटीवर दांडी सतारीच्या दांडीसारखीच असते. खुंटया, अट, पडदे वगैरे व्यवस्था सर्व सतारींतील व्यवस्थेप्रमाणेंच असते. मात्र ह्याच्या मुख्य तारा चार व सतारींत सात हा दोहोंत फरक आहे. ह्या चार तारा सा,प,सा,म अशा मिळवितात. तर्फांकरितां सतारींत जसा उजव्या बाजूस रेजा देऊन त्यांत अकरा खुंटया बसविलेल्या असतात तशा ह्यांतहि असतात. तारा व तर्फा जुळविण्याची पद्धति सतारीप्रमाणेंच असते; वाजविण्यांत मात्र फरक असतो, तो हा कीं, सतार बोटांत नखी घालून वाजवितात पण हें वाद्य घोडयाचे केंसांनीं ताणलेल्या धनुष्यानें वाजवितात. ह्या धनुष्यास गज म्हणतात. याची लांबी सुमारें १॥। फूट असते. ह्या वाद्यांत २० पडदे असतात. याचें गतकाम चांगलें असून वादन स्वतंत्रच असतें.

दिलरुबा:- ताऊस या वाद्यांतील मोर काढून टाकला म्हणजे दिलरुबाच राहतो. अर्थात मोराच्या  पाठीवर दिलरुबा ठेविला म्हणजे ताऊस झाला. ह्यांतहि २० पडदे असतात. ह्याच्या कोठयाची उंची सुमारें ४ इंच व रुंदी ६ इंच व बुडापासून दांडीच्या जोडापर्यंत उंची सुमारें सात इंच असते. हें वाद्यहि गजानेंच वाजवायाचें असतें. हें स्वतंत्रपणें वाजवितात. ह्याचा व ताऊसाचा बाज सारखाच आहे.

सारंगी:- एक फूट रुंद व एक फूट जाड आणि लांबी सुमारें दोन सव्वादोन फूट असा लांकडाचा ओंडा घेऊन तो आंतून कोरुन काढितात. कोठा एक फूट उंचीचा तयार झाल्यावर त्याची रुंदी सुमारें आठपासून दहा इंचांपर्यंत ठेवितात व जाडीहि रुंदीइतकीच असते. कोठयावर राहिलेला एक फूट ओंडाहि आंतून कोरुन काढितात; मात्र तो कोरण्यापूर्वी त्याची रुंदी कोटयाच्या रुंदीपेक्षां सुमारें एक दोन इंच कमी ठेवितात म्हणजे तयार कोठा व त्यावरील भाग मळून दोन सव्वादोन फूट उंचीचें हें वाद्य असतें. कोठयावरील खोका मागल्या अंगानें मोकळा असतो व वरील बाजू पातळ फळीनें आच्छादिलेली असते. कोठा कांतडयानें मढविलेला असतो. कोठयाच्या बुडाशीं तारदान हस्तिदंती शिंगाचें अगर लांकडांचें सुमारें चारपांच बोटें लांबीचें व अर्धा इंच उंचीचें व पाव इंच जाडीचें असें बसवितात. कोठयाच्या बुडाशीं कांहींनां हुक असतात; तारदानास भोंकें ठेविलेलीं असतात. हीं भोंकें एकावर एक अशा दोन ओळींत असतात. ह्या भोंकांतून तारा व तांती मुदणीनें आणून हुकास अडकवितात. कोठयाच्या मध्यावर हस्तिदंती घोडी असते. तिला कातडयाच्या खालीं पोकळींत धीरा दिलेला असतो. माथ्याच्या दोनहि अंगांस दोन दोन जाड व लांब अशा खुंटया बसवितात. ह्या खुंटया इतक्या जाड ठेवण्याचें कारण, त्या खुंटयांस जाड तांती गुंडाळावयाच्या असून त्या ताणून सामान्यतः मध्यसप्तकांतील स्वरांत मिळवावयाच्या असतात. वाद्याच्या उजव्या बाजूस खोक्यास ओळीनें भोंकें पाडून बारीक खुंटया दोन अगर तीन ओळींत लाविलेल्या असतात. ह्यांनां बारीक पोलादी तारा लाविलेल्या असतात. ह्यांनां तर्फा म्हणतात. ह्यांची संख्या छत्तीसपासून चव्वेचाळीसापर्यंत असते. बाजूच्या तर्फांच्या खुंटया ३६ असल्यास माथ्यावर आठ खुंटया दोन ओळींत बसवितात. घोडीखालीं दिलेल्या पातळ, एक दोरीभर उंचीच्या घोडीवरुन या तारा आणून तारदानांत बसवितात. तर्फांच्या तारा खोक्याच्या पोकळींतून, आच्छादनास ठेविलेल्या भोंकांतून वर आणिलेल्या असतात. शिंपल्यांच्या बारीक गोल गुंडया ह्या भोकांच्या तोंडाशीं असतात. हें वाद्य घोडयाचे केंस लावून तयार केलेल्या गजानें वाजवितात. डाव्या हाताच्या बोटांचीं नखें खालून तांतीशीं टेंकवून निरनिराळया जागेवर बोटें ठेवून निरनिराळे स्वर काढावयाचे असतात. हें वाद्य जितकें मधुर तितकेंच वाजविण्यास कठिण आहे, कारण ह्यांत स्वरांच्या जागा दाखविणा-या सोई नाहींत. सा,प,सा,म या स्वरांत वरील तांती लावितात; व जे राग वाजविण्याचे असतील त्यांस लागणा-या तीव्रकोमल स्वरांच्या अनुरोधानें तर्फा मिळवितात. ह्यांत सर्व प्रकारचे गमक काढतां येतात. ह्याचा उपयोग गायक नायकिणींची साथ करण्यांतच प्राय: झालेला दिसतो. क्वचित स्वतंत्रपणेंही हें वाद्य वाजविलेलें ऐकूं येतें.

सारमंडळ- 'स्वरमंडळ' ह्या शब्दाचें हें अपभ्रष्ट रुप आहे. हें वाद्य फार प्राचीन आहे. सुमारें दोन अडीच फूट लांब आणि फूट सव्वाफूट रुंद व सुमारे सहा इंच उंच अशी एक लांकडी पेटी असते व तिला चार पाय असतात. उजव्या अंगास तिरप्या रेषेंत ह्या वाद्यांत छत्तीस खुंटया बसविलेल्या असतात. ह्या खुंटयांस तारा गुंडाळून त्या त्या बाजूच्या समोरील बाजूकडे एक घोडी बसविलेली असते, तिजवरुन खालीं तारदानांत तारा अडकवितात. घोडीची लांबी पेटीच्या रुंदीइतकीच सुमारें असते. तिरप्या रेषेंत खुंटया बसविण्याचें कारण हेंच कीं, ह्या वाद्यांत मंद्र, मध्य व तार अशीं तीन सप्तकें वाजलीं जावींत. अर्थात् ह्या कार्याकरितां तारांची लांबी क्रमानें कमी कमी होत गेली पाहिजे.

वाजविणारा हें वाद्य आपणासमोर असें ठेवितो कीं, त्याच्या डाव्या हाताकडे घोडी येते व उजवीकडे खुंटयांची तिरपी ओळ येते. उजव्या हाताच्या तीन बोटांत नख्या घालून तारांवर आघात करतात. व डाव्या हातांत एक पितळी कडें घेऊन तें तारेवरुन दाबून कंप, मेंड इत्यादि प्रकार काढितात. पूर्वी कडयाच्या ऐवजीं शिंपला घेत असत. हें वाद्य हल्लीच्या पिआनोचें जनक होय असें कांही आंग्ल ग्रंथकार समजतात. ह्यांत रागदारीचें काम फार चांगलें वठतें. हें वाद्य स्वतंत्रपणें वाजवितात व क्वचित् प्रसंगीं साथीसहि ह्याचा उपयोग होतो. 'कात्यायन वीणा' म्हणजे कात्यायन ॠषीनें काढलेली वीणा, म्हणजे हेंच वाद्यच असून त्यास त्यावेळीं शंभर तारा लावीत म्हणून त्याला 'शततंत्री वीणा' म्हणत. रत्नाकरावरील टीकाकार पंडित कल्लीनाथ शार्ङदेव ह्यानें सांगितलेली 'मत्तमयूरी वीणा' म्हणजे हेंच वाद्य होय असें म्हणतात.

रबाब:- हें मुसुलमानी वाद्य आहे. ह्याचें बूड लांकडाचा गोल ओंडा कोरुन केलेलें असतें. तें उथळ असून कातडयानें मढवितात. हें वाद्य म्हणजे कांहींसें कच्छव्याच्या आकाराचें असून यास पाटीच्या ऐवजीं कातडयानें मढविलेला चपटा लांकडी भोंपळा लाविलेला असतो. ह्याला सतारी प्रमाणें पडदे नसतात. ह्याला मुख्य चार तारा असतात. त्यांपैकीं एक पितळेची असते. या चार तारांपैकीं दोन तांती असतात. बाजूस दोन चिका-या लाविलेल्या असतात. केव्हां केव्हां मुख्य तारा सहा लावितात; पैकीं दोन तांती ठेवितात. व केव्हां सहाहि तांतीच लावितात. हें वाद्य गजानें वाजवितात. याच्या चार तारा सा,प,म,सा ह्या स्वरांत मिळवितात; व तारा सहा लाविल्या असल्यास सा,सा,प,प,म, सा अशा मिळवितात. उत्तर हिंदुस्थानांतील रामपूर संस्थानांत हें वाद्य वाजविणारे कांहीं निपुण वादक आहेत. प्रसिध्द मिया तानसेन हा हें वाद्य वाजवीत असें. हें वाद्य मोठें डौलदार असून ह्याचा आवाज मधुर असून सारंगीपेक्षांहि गंभीर आहे. ह्याला पडदे नसल्यानें जी कामगत सतारींत होत नाहीं ती यांत फार झोकांत झालेली दृष्टीस पडते.

सुरसिंघार:- हें वाद्य रबाबाचा भाऊबंद म्हणावें. रबाबाचें वर वर्णन दिलें आहे. त्यावरुन असें  ध्यानी येईल कीं, रबाब म्हणजे कांहीं अंशीं कच्छवा. तेव्हां ह्या कच्छव्यास दांडी न बसवितां तीऐवजीं सरोदाचा जो दांडीवजा भाग तोच जोडून दिलेला असतो. म्हणजे ह्या वाद्यास दोन भोपळें आहेत असें कोणाहि मनुष्यस दिसून येईल. लखनौचे नवाब वाजिदअल्लीशहा ह्यांचे उस्ताद प्यारेखां ह्यानीं हें वाद्य निर्माण केलें. रबाब वाद्यापेक्षां हें लांब असतें. सतारीस जशा घोडीवरुन तारा चढवून तारादानांत पक्कया बसविल्या असतात तशाच ह्यांतहि असतात. तर्फांच्या तारा घोडीखालीं असलेल्या पातळ घोडीवरुन बसविलेल्या असतात. सरोदाचा जो, बोटें तारेवर ठेवून वाजविण्याचा भाग असतो तोच ह्या वाद्यांतील मुख्य वाजता भाग होय. माथ्याशींस सात खुंटया असतात. त्यांस लाविलेल्या तारांपैकीं खरज, पंचम ह्या पितळी असतात. म,सा,सा, प ह्या पक्कया पोलादी असून सातवी दुपटीच्या षड्जांत वाजणारी कडझिलीची तार ही पोलादी पक्की असते. ह्या वाद्यांत तर्फा लाविलेल्या असतात; त्यांची संख्या सामान्यतः सातपासून अकरापर्यंत असते. म,सा,प, ह्या तारांवर कामगत करावयाची असते. सारंगींत ज्याप्रमाणें तांतीशीं बोटाच्या नखाचा भाग खालून लावून स्वर काढितात तद्वतच कांहीं अंशीं तर्जनीं व मधलें बोट ह्यांच्या नखांनीं तार दाबून उजव्या हातांतील बोटांत घातलेल्या नख्यांनीं आघात करुन हें वाद्य वाजवितात. तारांखालीं पोलादी पातळ पत्रा बसविलेला असतो, त्यामुळें बोटें सरकविण्यास सोपें जातें. ह्या वाद्याचा आवाज मधुर व भरदार असतो. हें वाद्य स्वंतत्रपणें वाजवितात.

सरोद:- या वाद्याचे, कोठा आणि खोका असे दोन भाग असतात. कोठा लांकडाचा कोरुन तयार  केलेला असतो. त्याचा आकार बाहेरच्या अंगानें पोट आलेला असा असतो व तो रेघा पाडून खरबुजी केलेला असतो. हा कोठा कातडयानें मढविलेला असतो. याच्या बुडाशीं तारदान असतें. व मध्यभागीं घोडी असते. तिला कातडयाखालीं पोकळींत धिरा दिलेला असतो; व घोडीचे पाय पातळ हस्तिदंती तुकडयावर ठेविलेले असतात व या तुकडयाला तर्फांच्या तारा बसविण्याकरितां खांचे असतात. सारंगीचा खोका मागील बाजूनें उघडा असतो पण या वाद्याचा बंद केलेला असतो. खुंटयांची वगैरे व्यवस्था सारंगीप्रमाणेंच असते. हें वाद्य सारंगीपेक्षां अधिक उंचीचें असतें व कोठयाचा घेरहि सामान्य सारंगीच्या कोठयाच्या घेरापेक्षां अधिक असतो. ज्या ठिकाणीं तारांवर बोटें खेळवावयाचीं असतात तो सर्व भाग पातळ पोलादी पत्र्यानें मढविलेला असतो, त्यामुळें बोटें सरकविण्यास सुलभ जातें. सारंगी उभी ठेवून गजानें वाजवितात; पण हें वाद्य कांहीसें तिरपें धरुन जव्यानें (हस्तिदंती काडीनें) आघात करुन व नखांनीं तारा दाबून व तारांखालीं दिलेल्या धातूच्या पत्र्यावरुन बोटें फिरवून वाजवितात. याच्या तारा सुरसिंघाराच्या तारांप्रमाणेंच मिळवितात. हें वाद्य स्वतंत्रपणें वाजवितात. याचा आवाज मधुर व गंभीर आहे.

फिडल:- हें इंग्रजी वाद्य आहे. हें पोर्तुगीजांनीं इकडे आणिलें अशी समजूत आहे. हल्लीं याचा प्रसार बराच झाला आहे. दक्षिणेकडे तो अधिक आहे. या वाद्याच्या कोठयाचा आकार दीर्घवर्तुळाकार असतो. याची लांबी सुमारें दीड फूट व रुंदी दहा इंचांपासून एक फुटाइतकी व जाडी दीड इंच असते. हा कोठा आंतून पोकळ असतो. फळयांची जाडी एक दोरीभर असते. लांबीच्या बरोबर मध्यावर दोनहि अंगांस सुमारें तीन बोटें व्यासाची अर्धकमान असते; त्यामुळें कोठयाची रुंदी कमी झालेली असते. पाटीवर या दोनहि कमानीजवळ ऽ च्या आकाराचीं भोंकें ठेविलेलीं असतात. कोठयाच्या रुंदीच्या मध्यावर, सुमारें तीन बोटें रुंदीची व एक इंच जाडीची अशी पोकळ दांडी कोठयाशीं बसविलेली असते. ही दांडी दुस-या टोंकाकडे निमुळती होत गेलेली असून हिची लांबी सुमारें एक फूट असते. निमुळतें होत गेलेलें टोंक वळवून वाटोळें केलेलें असतें. या वाटोळया शेंवटापासून तीन बोटांवर हस्तिदंती अट बसविलेली असते. या दांडीवर दांडीच्याच रुंदीची व आकाराची, कोठयाच्या लांबीच्या तृतीयांशापर्यंत रुंद भाग घेऊन पोंचेल अशी शिसूची पट्टी बसविलेली असते. वाजविणारा या पट्टीवरुन व घोडीवरुन गेलेल्या तांतीवर आपल्या डाव्या हाताचीं बोटें ठेवून व ती तांत दाबून स्वर काढतो. ह्या पट्टीला इंग्रजींत फिंगर बोर्ड म्हणतात. कोठयाच्या दुस-या कडेच्या रुंदीच्या मध्यावर एक हस्तिदंती खुंटी असते. या खुंटीस फिंगरबोर्डच्या आकाराची पट्टी निमुळत्या भागाकडे तांतीनें बांधलेली असते. हिची लांबी सुमारें चार पांच इंच असते व ती मध्यावर असणा-या घोडीच्या खालीं सुमारें चार बोटांपर्यंत आलेली असते. ह्या पट्टीस चार भोंकें असतात. त्यांचा उपयोग तारदानाप्रमाणें होतो. दांडीवर बसविलेल्या हस्तिदंती अटीच्या पलीकडे दांडीच्या शेंवटाजवळ दोनहि अंगांस दोन दोन अशा चार खुंटया असतात. त्या खुंटयांस तांती लाविलेल्या असतात. कोठयाच्या मध्यावर हस्तिदंती घोडी असते, तिला कोठयाच्या आंतील पोकळ भागांत हस्तिदंती खिळयाचा धिरा दिलेला असतो. लाविलेल्या तांती फिंगरबोर्डवरुन व घोडीवरुन खालीं असलेल्या तारदानपट्टीस बांधिलेल्या असतात. फिंगरबोर्ड व तारदानपट्टी यांचीं घोडीकडे येणारीं टोंकें कोठयास टेंकलेली नसतात. हें वाद्य घोडयाचे केंस लाविलेल्या धनुष्याकृति गजानें वाजवितात. याच्या तांती म,सा,सा,प या स्वरांत मिळवितात. हें वाद्य स्वतंत्रपणें वाजवितात; यांत वादक रागदारी व गतकाम करतो. याचा उपयोग गायकाची साथ करण्याकडेहि करतात. हें वाद्य मूळचें पाश्चात्यांचें असल्यामुळें पाश्चात्य वादक त्याच्या तांती प,रे,ध,ग अशा स्वरांत मिळवितात.

तुणतुणें:- लांकडाचा ओंडा सुमारें दोन विती लांब व सुमारें वीततभर व्यासाचा घेऊन तो कोरून त्याची कड सुमारें पाव इंच जाडीची आहे असें एक पोकळ कडें तयार करतात. त्याची एक बाजू कातडयानें मढवितात. ह्याच्या मध्यभागीं बारीक भोंक पाडतात व बाहेरच्या बाजूनें ह्या भोंकावर एक लांकडाची पातळ चकती बसवितात. ह्या चकतींतून तार ओंवून ती कातडयाच्या भोंकातून बाहरे काढून दुसर्‍या तोंडाशीं आणितात, ह्या तोंडाशीं सुमारें पायाच्या अंगठयाइतक्या जाडीचा सुमारें  दीड वीत लांब असा बांबूचा तुकडा कढयाला बसविलेला असतो व त्यास एक खुंटी, दुस-या टोंकापासून सुमारें दोन तीन बोटांवर बसविलेली असते; तिला ती खालून आणिलेली तार गुंडाळतात. ही तार खुंटीनें ताणून हवा तितका उंच स्वर करतात व मग गाणार्‍याशीं सूर  धरण्याकरितां ती तार एका काडीनें सारखा आघात करुन वाजवितात. गोंधळी, लावण्या व पोवाडे म्हणणारे, भुत्ये वगैरे हलकीं गाणीं गाणारे आपल्या साथीस स्वर धरण्याकरितां ह्याचा उपयोग करतात. काडीच्या आघातानें तारेचा जो 'तुण तुण' असा आवाज होतो त्यावरुन ह्यास 'तुणतुणें' हें नांव पडलें आहे.

 कातडयानें मढविलेली वाद्यें.

पखवाज:- याचें खोड खैर, शिसू चाफा इत्यादि लांकडांचें असतें. ह्याची लांबी सुमारें दीड हात  असते. हें खोड कांतून गोलाकार केलेलें असतें; व आंतून आरपार पोखरुन त्या लांकडाची जाडी अर्धा इंचापर्यंत ठेवितात. दोनही तोंडांचा व्यास सुमारें टीचभर असतो. खोडाच्या मध्याचा व्यास तोंडाच्या व्यासाच्या सव्वापट असतो. पखवाजाचीं दोनहि तोंडें कातडयानें मढवितात व किनारीवर अर्धा इंच दुहेरी चामडें घालतात. पखवाजाच्या दोनहि तोंडांच्या काठाबरोबर कातडयाच्या वादीचा वेठ वळलेला असतो, त्यास 'गजरा' म्हणतात. ह्या गजर्‍यातून चौफेर वादी ओंविलेली असते.  पखवाजाचा स्वर कमी जास्त करतां यावा म्हणून तीन इंच लांब व दीड इंच जाड असे लांकडाचे गोल पांच सहा तुकडे या वादीखालीं दिलेले असतात. ह्या तुकडयांस 'गठ्ठे' म्हणतात एका तोंडाला मध्यभागीं सुमारें दोन इंच व्यासाची वर्तुळाकार शाई घातलेली असते. ही शाई लोहकीट गव्हाच्या चिक्कींत मिसळून तयार करतात. ह्या शाईचा थर सुमारें दोरीभर जाडीचा असतो. दुस-या तोंडारा वाजविण्याच्या वेळीं कणीक पाण्यांत भिजवून लावितात. गायकाच्या किंवा कीर्तनांत हरिदासाच्या साथींत ह्याचा उपयोग होतो. भजनांतहि हें वाद्य वाजवितात. याचें वादन क्वचित स्वंतत्रहि दृष्टिस पडतें. पखवाजास मृदंग असें नांव पडण्याचें कारण पूर्वी हें वाद्य मातीचें केलेलें असे. हल्लींहि दक्षिणेंत पाणी ठेवण्याचा मातीचा माठ पालथा घालून त्याच्या पाठीवर स्वतंत्रपणें पखवाजाचें गतकाम, बोल, परण वगैरे वाजवितांनां दृष्टीस पडतें. ह्यालाच दक्षिणेंत 'घटवाद्य' म्हणतात.

नाल:- सामान्य पखवाजाच्या सव्वापट लांब असलेल्या पखवाजास 'नाल' म्हणतात. हें वाद्य फार प्राचीन असून गायनाच्या साथींत तें अत्यावश्यक आहे.

तबला:- पखवाजाच्या खोडाचे दोन समान भाग करुन ते उभे ठेविले असतां तबल्याचा आकार ध्यानीं येईल. तबल्याच्या खोडास एका अंगास तोंड ठेवितात; व तें कातडयानें मढवितात; ही मढविण्याची व त्यास शाई भरण्याची कृति पखवाजाप्रमाणेंच असते; पण गजर्‍यातून ओंविलेली वादी दुसर्‍या अंगास बसविलेल्या लोखंडी कडयांतून काढून घेतलेली असते; ह्या वादीखालीं  पखवाजांत असलेल्या गठ्ठयाप्रमाणेंच गठ्ठे घालतात. दुसरा भाग क्वचित लांकडी, मातीचा, अगर तांबें किंवा पितळ ह्या धातूंचा करतात. त्यास 'बाह्या' म्हणतात. ह्यास एक तोंड ठेविलेलें असतें. तें कातडयानें मढवितात. केव्हां केव्हां ह्याहि तोंडाशीं गजरा बसवितात व त्यांत ओंविलेली वादी बुडाशीं बसविलेल्या लोखंडी कडयांतून ओंवून पक्की करतात. ह्या बाह्याच्या तोंडाशीं मढविलेल्या कातडयावर मध्यापासून किंचित एका अंगास सुमारें तसूभर व्यासाची वर्तुळाकार शाई घालितात. ह्यायोगें दर वेळीं कणीक लावण्याचे श्रम वांचतात. कणीक लावण्याचा जो हा भाग त्यास 'बाह्या' म्हणावयाचें कारण हें कीं, तो डाव्या हातानें वाजविला जातो. याला प्रचारांत 'डग्गा' असेंहि म्हणतात. तबल्याचा उपयोग गायकाबरोबर साथ करण्यांत होतो.

डफ:- सहा बोटें रुंद व पाव इंच जाडीची फळी सुमारें दोन फूट लांबीची घेऊन ती वर्तुलाकार वांकवून तिचीं दोनहि टोंकें एकमेकांशीं पक्कीं खिळविलेलीं असतात. हें गोल कडें चामडयानें मढवितात. उंच स्वरांत त्याचा आवाज निघावा म्हणून विस्तवावर तें धरून शेकतात. एका हातानें छातीशीं धरुन दुस-या हातानें तें वाजवितात. हें वाजविण्यांत एक प्रकारचें कौशल्य आहे. हाताच्या पंजाचा मनगटाजवळचा भाग दाबून धुमकी काढितात; ह्यांत गतकाम केलेलंहि ऐकूं येतें; दुस-या हातानें वेताची काडी लावून, तबल्याच्या चाटीवर वाजणारे बोल ह्यांवर वाजवितात. ह्याच्या वर्तुळाकार आकारावरुन ह्याला 'कडें' हीहि एक संज्ञा प्राप्त झाली आहे. तमाशांत ह्याची साथ असते. 'लावणी' ह्या गीतास प्राय: ह्याचीच साथ असते. 'डफ' हा शब्द अरबी आहे ह्यावरुन हें वाद्य मुसुलमानांबरोबर हिंदुस्थानांत आलें असावें.

संबळ:- तबल्यास जसे डाव्या व उजव्या हातानें वाजविण्याचे स्वतंत्र भाग असतात तद्वतच ह्याचेहि असतात. तबल्यांतील भाग अलग असतात पण संबळांतील दोनहि भाग एकमेकांशीं  बांधलेले असतात. बुडापेक्षां ह्या भागांच्या तोंडांत अंतर अधिक पडलेले असतें. डाव्या हातानें वाजविण्याच्या भागाचें तोंड उजव्या हातानें वाजविण्याच्या तोंडापेक्षां सुमारें दीडपटीनें रुंद असतें. लहान तोंडाचा व्यास टीचभर असतो. हीं दोनहि तोंडें कातडयानें मढविलेलीं असतात व प्रत्येक तोंडावर वेताचें कडें असतें. त्यांतून सुताची दोरी बुडाशीं घातलेल्या लोखंडी कडयांतून ओढून आवळून टाकतात, म्हणजे तोंडाशीं मढविलेल्या कातडयास ताण देण्याची सोय होते. उजव्या हाताकडील भाग मध्यांतील षड्ज व डाव्या हाताचा भाग खरज बोलतो. हें वाद्य एका टोंकाशीं वळवून लहानशा वाटीएवढीं वर्तुळें बनविलेलीं अशा तरवडाच्या अगर वेताच्या बारीक छडयांनीं वाजवितात. ह्या छडया हातांत नीट रहाव्या म्हणून यांच्या दुसर्‍या टोंकाशीं चिंध्या बांधून जाड  केलेल्या असतात, ह्या छडयांची लांबी दीड वीत असते. डाव्या हातानें वाजविण्याचा भाग लांकडाचा न करतां तांब्याचाहि केलेला आढळतो. ह्या वाद्याचा उपयोग सनईशीं सांथ करतांना होतो. अलगुजाशीं सांथ करतेवेळीं हें हातांनीं वाजवितात. गोंधळ घालतेवेळीं गोंधळी या वाद्याचा उपयोग करतांना दृष्टीस पडतें. ह्या वाद्यांतील खरज स्वर निघणार्‍या भागास 'बंब' किंवा 'धम' म्हणतात व  दुसर्‍या भागास 'झील' म्हणतात.

चौघडा:- ह्या वाद्यांत एकंदर चार भांडीं असतात. तीं तांब्याचीं अथवा लोखंडाचीं असतात. त्यांचा आकार सामान्यतः फुलांच्या कुंडयासारखा कांहींसा असतो. एक मोठें व एक लहान अशी जोडी याप्रमाणें दोन जोडया ह्यांत असतात. मोठया भांडयाचें तोंड व्यासांत एक हातभर भरेल असें वाटोळें असतें; ह्यांची उंची बुडाच्या गर्भापासून सुमारें हातभर असते. धाकटया भांडयाचें तोंडहि गोल असून त्याचा व्यास सुमारें दीड वीत असतो. हीं भांडीं चामडयानें मढवितात व तें चामडें वादीनें तळापर्यंत गुंफून ताठ बसवितात. मोठया भांडयास नगारा म्हणतात व धाकटयास टिमकी म्हणतात. स्वर चढावावा असें वाटल्यास कोळशाच्या निखार्‍यावर हीं शेकतात. हें वाद्य सुमारें दीड  वीत लांब व आंगठयाहून थोडया जाड अशा दोन टिपर्‍या हातांत घेऊन मनुष्य वाजवितो. ह्यावर  सनईशीं सांथ करतात तेव्हां निरनिराळया तालांच्या गती वाजविलेल्या ऐकूं येतात. दोन माणसें एकाच वेळीं वाजवीत असतात; त्यांपैकीं एक साध्या गतीच्या अनुरोधानें लय कायम ठेवून असतो व दुसरा सम, दुगण वगैरे प्रकार दाखवितो. ह्याप्रमाणें ह्या वाद्यांत चार भांडी लागतात म्हणून ह्यास चौघडा म्हणतात. जोड सनई, सूर, कर्णा, मोठी झांज व ही नगार्‍याची जोडी ह्या सर्व मेळास  व्यवहारांत 'चौघडा' असें म्हणतात. देवस्थानांत 'चौघडा' असतो, म्हणजे अर्थांत वर सांगितलेल्या सर्व मेळाची व्यवस्था असते. देवालयांत, लग्नसमारंभात, उत्सवप्रसंगीं, राजेराजवाडयांच्या स्वारींत, मिरवणुकींत वगैरे प्रसंगीं हा वाजतांनां दृष्टीस पडतो.

ताशा:- चौघडयांतील टिमकीएवढेंच व थेट तसेंच हें वाद्य असतें; स्वरांत चढवावयाचें असल्यास  ह्यासहि शेकावें लागतें. हें वेताच्या दोन छडयांनीं वाजवितात. हल्लीं प्रचारांत ताशाचें भांडें तांब्याचें असतें. आकार पाटीप्रमाणेंच असून तोंड कातडयानें मढवितात; पण पितळी स्क्रूच बसवून हें कातडें ताणून बसविलेलें असतें. स्वर उतरला असल्यास किल्लीनें स्क्रू पिळून कातडयास ताण देतात. वेताच्या छडयांनीं वाजवून सनईची सांथ करतात.

ढोल:- ताशाबरोबर 'ढोल' व 'मर्फा' असीं दोन वाद्यें असतात. ढोलचें पखवाजाच्या खोडासारखें लांकडी खोड असून ह्यांचीं दोनहि तोंडें कातडयानें मढविलेलीं असतात. व सुताच्या दोरीनें तीं खोडाशीं आवळलेलीं असतात. ह्यावर नुसता ताल धरलेला असतो. एक तोंड टिपरीनें व दुसरें हातानें असें हें वाद्य वाजवितात.

मर्फा:- लहान टिमकी; ह्यावर टिपरीनें ठोका मारून तालाची लय दाखवीत असतात. ह्या सर्व  मेळास 'ताशा' म्हणण्याचा हल्ली प्रचार आहे. हें खास मुसुलमानांचें वाद्य आहे.

खंजिरी:- सुमारें सहा इंच रुंदीची व अर्धा इंच जाडीची एक फळी घेऊन तिचें टीचभर व्यासाचें एक लाकडी कडें बनवितात. त्याचें तोंड कातडयानें मढविलेलें असतें. जंगम, वाघे, गोसावी इत्यादि लोक तोंडानें पदें वगैरे गाणीं म्हणून खंजिरीनें तालावी साथ करतात.

डौर:- हे संस्कृत 'डमरू' शब्दाचेंच अपभ्रष्ट रुप आहे. 'डमरु' वाद्य वाजवून श्रीशंकरानीं तांडव केलें असें पुराणांतरीं वर्णन आहेच. इकडे भिक्षा मागणारे जे गोंधळी, वाघे वगैरे लोक, त्यापैकींच 'डौरी'  हा एक वर्ग आहे. हे लोक हातानें डौर वाजवून तोंडानें देवादिकांचीं गाणीं गाऊन भिक्षा मागतात. डौराचा आकार मापी अच्छेरासारखा असून त्याची दोनहि तोंडें कातडयानें मढविलेली असतात. सुताच्या दोरीनें हीं कातडी तोंडें ताणतां येतील अशा प्रकारें ती सुतळी ओढून मध्यें गुंडाळलेली असते. हें वाद्य हाताच्या बोटांनीं वाजवितात.

कुडबुडे:- ह्याचा आकार डौरासारखाच हें असुन दोनहि अंगास कातडयानें मढविलेलें असतें. हें  डमरुच्या पावपट असतें. ह्याच्या मध्यभागीं एक दोरीचा तुकडा बांधलेला असतो व त्याच्या टोंकाशीं चिकणमाती किंवा मेणाची गोळी बसविलेली असते. हें हातांत घेऊन हाताचें मनगट असे हालवावयाचें कीं त्यायोगें सदर गोळी वाद्याच्या दोनहि बाजूंच्या कातडी भागावर लागते. हें वाजविण्यांत एक प्रकारचें कौशल्य आहे. 'पांगूळ' ह्या नांवानें सर्वत्रांच्या माहितीची जी एक   भिकार्‍याची जात आहे ते लोक सूर्योदयापूर्वी रस्त्यानें हें वाजवीत जातात व परमेश्वराचें नांव घेऊन भिक्षा मागतात.

सुषिर वाद्यें

सनई:- चंदन, शिसू ह्या किंवा ह्यासारख्या एखाद्या लांकडाचा सुमारें एक हातभर लांबीचा तुकडा  घेऊन तो गोल करतात व एका अंगाकडे सुमारें तसूभर व्यासाचें असें तोंड ठेवितात; नंतर कांहीसें नरसाळयाच्या अगर धोतर्‍याच्या फुलाप्रमाणें दुस-या टोंकाकडें सुमारें दीड तसु व्यासाचें तोंड  करितात; नंतर हा लांकडाचा तुकडा आंतून भोंक पाडून पोकळ करतात, म्हणजे वस्तुतः ती एक प्रकारची नळीच होते. ह्या नळीस अरुंद तोंडापासून चार बोटें अंतरावर, भोंकें पाडण्यास आरंभ केलेला असतो. भोंकांचें प्रमाण वाटाण्याएवढें असतें. अशीं आठ भोकें सुमारें बोट दीड बोट अंतरानें पाडलेलीं असतात. पहिल्या भोंकाच्या विरुध्द अंगास दोन भोंकाच्या मध्यावर एक भोंक ठेवितात. रुंद तोंडाशीं पितळेची, पेल्याच्या आकाराची मायणी बसविलेली असते. अरुंद तोंडाभोंवतीं एक पितळेची वाटोळी पट्टी बसविलेली असते, त्यामुळें ती नळी पिंजण्याची भीति नसतें. ह्या अरुंद तोंडांत बुचाप्रमाणें एक देवनळाची कांडी सुमारें चार बोटें लांबीची काढती घालती असते. तिजवर हस्तिदंती अगर शिंपीची रुपयाएवढया आकाराची गोल चकती बसविलेली असते. ह्या देवनळाच्या नळीच्या तोंडांत ताडपत्राची पिपाणी बसविलेली असते. ती तोंडांत धरुन तिच्या योगें लांकडी थोरली नळी फुंकतात आणि भोंकावर बोटें ठेवून सा,रि,ग,म इत्यादि स्वर काढितात; ह्या प्रकारें हवीं तीं गीतें वाजवितात. ह्याच वाद्यास शार्ङदेवानें आपल्या ग्रंथांत 'मधुकरी' हें नांव दिलें आहे.

सुंदरी:- लहान सनईस सुंदरी म्हणतात. तिची लांबी वीतभर असते, ह्यामुळें सनईच्या दुप्पट स्वरांत बहुधां ती वाजते. ह्याहून 'सनई' व 'सुंदरी' ह्यांत फरक नाहीं.

सूर:- हा आकारानें सनईच्या दीडपट मोठा असतो. रचना सर्व सनईसारखीच असते, पण ह्यास चार भोकें असतात. सनईवादकांस हा सूर म्हणजे गायकास जसा तंबोरा तसा साहाय्यकारी आहे. ह्यायोगें अस्खलित षड्ज स्वराचा पुरवठा होतो.

अलगुज:- हें वाद्य म्हणजे लहानशी सनईच होय; हें बांबूचें असतें. बांबूचा एक पेराचा तुकडा सुमारें दीड वीत लांबीचा घेतात, म्हणजे तो आयताच पोकळ सांपडतो. ज्या बाजूस पेराचा कंगोरा असतो ती बाजु सहजच बंद झालेली असते. तिला बारीक भोंक ठेविलेलें असतें; दुस-या टोंकास तिरकस खाप देऊन पायरी करतात. ही पायरी आडवी चिरून त्यांत एक पातळ पायरीच्या आकाराची गावडी बसवितात म्हणजे आयतीच पिपाणी बनते. ह्या पिपाणीपासून चार बोटांवर खापाच्या विरुध्द अंगास एक चौकोनी भोंक करुन त्यांत चतुर्थांश भोंक मोकळें राहील अशी एक गावडी बसवितात; ह्यायोगानें पिपाणीच्या द्वारें फुंकलेला वारा ह्या चौकोनी भोंकावर आपटतो. चौकोनी भोंकापासून चार बोटांच्या अंतरावर लहानशा वाटाण्याच्या आकाराचीं आठ भोकें समान अंतरावर पाडतात; शेवटचें भोंक टोंकापासून दीडदोन बोटांवर येतें. पहिल्या व दुस-या भोंकाच्या मध्यावर विरुध्द अंगास एक भोंक पाडलेलें असतें. सनईप्रमाणें शिंपी तोंडांत धरुन फुंकलें म्हणजे नळी वा-यानें भरते व हाताचीं बोटें निरनिराळया भोकांवर ठेवून इच्छित स्वर काढतां येतात. ह्याप्रमाणें हवें तें गीत ह्यांत वाजवितां येतें.

मुरली, बासरी, पावा:- हीं सर्व वाद्यें अलगुजाच्याच वर्गांतील असून यांची बनावटहि सामान्यतः तशीच असते. अलगुजापेक्षां ही थोडी अधिक लांब असते, व ती आडवी धरुन वाजवितात. गुराख्याचें हें मोठें आवडतें वाद्य आहे. हल्लीं हीं वाद्यें धातूचींहि केलेलीं दृष्टीस पडतात.

पुंगी:- पपईच्या आकाराएवढया व आकाराना देठाकडे निमुळता होत गेलेला असा कडु भोंपळा  घेऊन, देंठाकडील निमुळत्या टोंकाशीं एक भोंक पाडतात; खालच्या बाजूस देवनळाच्या दोन नळया सुमारें वीत दीड वीत लांबीच्या त्यांत बसवितात. ह्या जोडनळयांपैकीं एक नुसता सूर देते व   दुस-या नळीस स्वरांचीं भोंकें पाडलेलीं असतात, त्यांजवर बोटें ठेविल्यानें अलगुजासारखी ही वाजती होते. भोंपळयाच्या वरील अंगास जें भोंक ठेविलेलें असतें त्यास तोंड लावून फुंकल्यानें वारा खालील नळयांत शिरतो व त्यामुळें हें वाद्य वाजूं लागतें. गारोडी लोक नागास मोहून टाकण्याकरितां ही पुंगी वाजवितात; त्यांचें हें मोठें आवडतें वाद्य आहे.

बाजाचीपेटी (हार्मोनियम):- हात सव्वा हात लांबीचा व एक वीत रुंद व एक वीत उंच असा एक लांकडी खोका असतो. त्यांत स्वरांच्या पितळी जिव्हाळया बसविलेल्या असतात. त्यावर दाबून वाजविण्याकरितां पांढ-या रांधाच्या पट्टया बसविलेल्या असतात, त्या दाबल्यानें शुध्द स्वर निघतात आणि विकृत स्वर काढण्याकरितां पांढ-या पट्टया एकमेकींस जेथें मिळतात तेथें काळे लांकडी तुकडे बसविलेले असतात. ह्या खोक्यास, वारा भरण्याचा भाता लाविलेला असतो तो मागें पुढें हातानें हलविल्यानें सुरु होऊन स्वर वाजूं लागतात. ह्या बाजाच्या पेटीचे दोन प्रकार आहेत, एक हातपेटी व दुसरी पायपेटी,. हातपेटींत हातानें भाता चालवावयाचा, व पायपेटींत पायांनी भाता चालवावयाचा असतो. हातपेटींत एकाच हाताचीं बोटें स्वरांच्या पट्टयावर खेळवितां येतात पण पायपेटींत दोनहि हात मोकळे असल्यानें दोन्ही हातांच्या बोटांचा उपयोग होऊं शकतो. प्राय: ह्या पेटयांत तीन सप्तकें असतात. हें इंग्रजी वाद्य हल्लीं आपल्याकडे फारच प्रचारांत आलें आहे. ह्या वाद्याचें वादन स्वतंत्र असतें, व गायकाच्या सांथींतहि हें वाजवितात.

शिंग:- हें वाद्य पितळेचें केलेलें असतें. सुमारें पांच सहा नळकंडीं, प्रत्येक सुमारें फूटभर लांब अशीं एकांत एक बसतीं केलेलीं असतात. ह्यांतील सर्वांत मोठया नळकंडयाचें तोंड सुमारें सहा इंच व्यासाचें ठेवितात. शेवटच्या नळकंडयाचें दुसरें टोंक सुमारें अर्ध्या इंचाच्या व्यासाचें ठेवितात. त्यावर गोल पितळेची चक्ती बसविलेली असून तिच्या वरच्या अंगास नळीचें भोंक काढिलेलें असतें; ह्यामुळें ही नळी तोंडांत धरल्यावर ओंठ त्या चक्तीवर बसतात व फुंकावयास जोर सांपडतो. हें वाद्य लग्नादिसमारंभांत, देवादिकांच्या उत्सवांत, तसेंच राजेरजवाडे ह्यांच्या स्वारीच्या समारंभांत वाजवितात. ह्या वाद्याचा आवाज मैलभर लांबीवर ऐकूं जातो. मद्रास व नेपाळ येथील पितळी शिंगांची फार प्रसिध्दि आहे. ह्या वाद्यांत कोणतेंहि गीत वगैरे वाजत नसून फक्त स्वराचा जोत निघतो. पूर्वी रेडयाचें शिंग वाजविण्यांत येत असे, त्यावरूनच ह्या वाद्याचा आकार निघाला असून, नांवहि तेंच पडलें असावें.

कर्णा:- हें वाद्य पितळेचें असतें; ह्याची लांबी सुमारें चार हात असते व थोरलें तोंड सुमारें वीतभर व्यासाचें असतें; व तोंडांत धरावयाचें टोंक हाताच्या आंगठयाएवढें असतें. ह्याचा नाद गंभीर असतो; तो शिंगाच्या नादाइतका लांब ऐकूं जात नाहीं. देवळांतील नगारखान्यांत चौघडा वाजण्याचा बंद व्हावयाच्या वेळीं कर्णा वाजलेला ऐकूं येतो.

तुतारी:- लहानसा कर्णा म्हणजेच तुतारी होय.

शंख:- समुद्रांत शंख सांपडतात; त्यांपैकीं नारळाएवढया आकाराचे वाद्याच्या उपयोगी असतात. शंखास वेढे पडण्यास जेथून आरंभ होतो त्या टोंकाशीं एक भोंक पाडतात, ह्यामुळें ह्या भोंकाचा शंखाच्या पोकळ भागाशीं संबंध येतो. ह्या भोंकावर पितळेची चौकट बसवितात व त्या चौकटींत शिंगास जसें वाजविण्याचें तोंड असतें तसें तोंड शंखास पाडलेल्या भोंकांस जोडून बसवितात. यामुळें शंख सहज फुकतां येतो. जंगम लोक शंख वाजविण्यांत मोठे पटाईत असतात.

मोरचंग:- ह्याचा बाह्याकार शाळुंकेसारखा असतो. हें वाद्य लोखंडाच्या सळईचें केलेलें असतें.  सामान्यतः ह्या शाळुंकेची लांबी तीनचार बोटें व रुंदी गोल भागाकडे अडीच तीन बोटें व दुस-या टोंकाशीं दीड दोन बोटें असते. ह्या शाळुंकेच्या बरोबर मध्यावर गोल भागावर एक तार खिळविलेली असते व ती शाळुंकेच्या दुसर्‍या टोंकाशीं आल्यावर, काटकोन होईल अशी वळविलेली असते. हें वाद्य एका हातानें दातांत धरुन दुसर्‍या टोंकाशीं आल्यावर, काटकोन होईल अशी वळविलेली असते. हें वाद्य एका हातानें दातांत धरुन हातानें त्या तारेच्या उभ्या टोंकाशीं बोटाचा आघात करुन वाजवितात.

धनवाद्ये.

चिपळ्या:- शिसू, साग किंवा रक्तचंदन ह्या लांकडाचे तीन बोटें रुंदीचे व टीचभर लांबीचे दोन तुकडे घेऊन ते आंतल्या अंगानें साफ व वरल्या बाजूनें गोल केलेले असतात, व त्यास माशासारखा आकार दिलेला असतो. तोंडांत पितळेचे रुपयाएवढया आकाराचे दोन तुकडे एकावर एक खेळते बसविलेले असतात, व शेपटीकडील बाजूस, बारीक अशा तीन तीन घुंगरांचा झुबका बसविलेला असतो. प्रत्येक तुकडयाच्या गोल भागाकडे मध्यावर, बोट जाईल अशी आंगठी बसविलेली असते; ह्यामुळें हाताचा आंगठा एका तुकडयाच्या आंगठींत घालून व मधलें बोट दुस-या तुकडयाच्या आंगठींत ठेवून हे दोनहि तुकडे एकमेकांवर व्यवस्थेनें आपटतां येतात, व त्या तुकडयांच्या तोंडांत दिलेल्या पितळी तुकडयांमुळें व दुसर्‍या टोंकाशीं लाविलेल्या घुंगरांच्या झुबक्यामुळें मधूर असा आवाज निघतो. ह्या चिपळयांचा उपयोग ताल धरण्याकडे होतो. भजन व हरिकीर्तनप्रसंगीं ह्यांचा उपयोग विशेषतः होतो हें सर्वत्रांच्या माहितीचें आहेच.

करताल:- चिपळयांप्रमाणेंच एका बाजूनें निमगोल व आंतील अंगानें सपाट असे काशाचे दोन  तुकडे असतात. प्रत्येक तुकडा टीचभर लांब व तीन बोटें रुंद असतो; ह्याचा आकार मध्यावरुन दोनहि अंगांस निमुळता होत जाऊन शेवटीं हाताच्या बोटाच्या टोंकासारखा असतो. प्रत्येक हातांत दोन, असे दोन्ही हातांत मिळून हे चार तुकडे असतात. हे तुकडे आंगठा व अनामिका आणि मधलें बोट ह्यांच्य पेरांत अटकळीनें खेळते धरावे लागतात, म्हणजे मधुर आवाज निघतो. ह्याचा उपयोग ताल धरण्याकडे होतो; तथापि पखवाजावर गत, पर्ण, आड वगैरे तालाच्या खटपटीची मौज चालू असतां, त्याच्या साथींत ह्याचा उपयोग झालेला दृष्टीस पडते.

झांज:- वयांत आलेल्या माणसाच्या तळहाताएवढे असे कांशाचे दोन तुकडे वर्तुलाकार असतात; प्रत्येक तुकडयास बरोबर मध्यावर सुमारें दोन अंगुळें गर्भ ठेवून फुगवटी चढविलेली असते; तीमुळें आंतल्या बाजूनें सहजच पोकळी होते. पोकळीच्या मध्यावर भोंक पाडून त्यांतून दोरी ओंवून तिला आंतल्या अंगानें गांठ मारून ती बाहरे काढितात व गांठ मारुन पक्की करतात, व त्या गांठीवर एक लांकडाची सुपारीएवढी गोटी बसवितात, म्हणजे हातीं धरण्यास सुलभ जातें; झांजेचाहि उपयोग ताल धरण्याकडेच होतो. प्राय: कथा, भजन व आरती ह्या प्रसंगीं झांजेचा उपयोग होतो.
टाळ:- कांशाचा पोकळ गोळा नारिंगाच्या आकाराचा देऊन त्याचे बरोबर दोन समान भाग केले कीं, टाळाच्या दोनहि वाटया आपणास हव्या तशा मिळतात; ह्याची जाडी सुमारें दीड दोरी असते.  झांजेप्रमाणेंच वरल्या अंगास मध्याभोवतीं फुगवटी ठेवितात; व मध्यावर भोंक पाडून दोरी ओंवून आंतल्या अंगास गांठ देतात व बाहेरील बाजूस पुन्हां गांठ देऊन तेथें सुपारीएवढया आकाराची लांकडी गोटी बसवितात. प्रत्येक हातांत अशी ही एक एक वाटी घेऊन ती एकमेकींवर आपटून त्यायोगें ताल धरतात. भजनांत व कीर्तनांत यांचा उपयोग होतांना सर्वांनीं पाहिलेला आहेच.

मंजरी:- सामान्य टाळाच्या निम्या आकाराच जो टाळ असतो त्याला मंजरी म्हणतात. नाचाच्या वेळीं ताल धरण्यांत हिचा उपयोग केलेला दिसतो.

तास:- टीचभर व्यासाचा सुमारें अर्ध तसु जाडीचा काशाचा गोल तुकडा, ह्यास तास म्हणतात. लांकडाच्या लहान मोगरीनें त्याजवर आघात करुन ध्वनि उत्पन्न करतात. ह्याचा उपयोग देवादिकांच्या आरतीच्या वेळीं केलेला आढळतो.

घंटा:- हा काशांचा ओतीव पेला असून यास वरच्या अंगानें हातांत धरण्यास पितळेची अगर लांकडी मूठ बसविलेली असते. आंतील पोकळ बाजूस नाथ्यावर भोंक पाडून त्यांत दोरीनें अगर तारेनें धातूची अगर शिंगाची लोळी बसवितात. ती लोळी पेल्यावर आपटून ध्वनि निघतो. ह्याचे वाटेल तेवढे लहान मोठे आकार असतात. ह्यांचा उपयोग देवपूजेंच व विशेषतः आरतीधुपारतीच्या वेळीं होत असतो. देवळांत मोठया आकाराच्या घंटा देवासमोर टांगलेल्या असतात.

घुंगरु:- हे पितळेचे पोकळ असून त्यांत खडा खेळता असतो. वरच्या बाजूस कडी बसविलेली असते; यांचा आकार करवंदायेवढा असतो. हे दोरींत ओविलेले असतात. पावलाच्या वरच्या बाजूस घोटयाशीं दुहेरी पुरेल इतकी लांब घुंगरुंची गुफण करुन नाचाच्या वेळीं दोनहि पायांत नाचणारी व्यक्ति हे घुंगरु बांधिते व तालावर मधुर झुणजुण आवाज होईल अशा बेतानें पावलें टाकिते.

टिप-या:- वीत दीड वीत लांबीचे व सुमारें पायाच्या आंगठयाइतक्या आकाराचे दोन लांकडाचे तुकडे पूर्णपणें कांतून गोल केलेले व केव्हां केव्हां एका टोंकाकडे कांहींसे निमुळते केलेले असे असतात; दोन हातांत दोन असे घेऊन एकावर एक तालाच्या अनुरोधानें ते मारितात. टिपर्‍यांचा  खेळ म्हणून जेव्हां खेळतात तेव्हां दहा बारा माणसें वर्तुळाकार उभें राहून, नाचाच्या गतीवर पावलें टाकीत चक्राकार फिरतात व त्यावेळीं प्रत्येक मनुष्य उजव्या हातांतील टिपरी आपल्या उजव्या बाजूस असलेल्या माणसाच्या टिपरीवर व डाव्या हातांतील डाव्या बाजूस असणार्‍या माणसाच्या  टिपरीवर मारितो. सर्व माणसें आपापल्या बाजूशीं असणार्‍या माणसांच्या टिपर्‍यांचे ठोके आपापल्या टिपरीवर घेण्यांत दक्ष असतात. ह्या खेळांत कवायतीप्रमाणें कांहीं विवक्षित गतीच्या अनुरोधानें माणसें फिरत असतात; त्यामुळें गोफहि विणला जातो. ह्या खेळास रासक्रीडाहि म्हणतात.

जलतरंग:- पंधारापासून बावीसपर्यंत एकांत एक बसते असून सबंध चळत होईल असे कांशाचे, पितळेचे किंवा अलीकडे चिनीमातीचे पेले असतात; त्यांत पाणी घालून, त्यांवर अनुक्रमें छडी मारीत गेल्यास सारिगमपधनी, असें सप्तक तयार होईल असे मांडतात; व हातांत दीड वीत लांबीच्या दोन कळकाच्या छडया घेऊन, आपल्या इच्छित रागाच्या स्वरानुरोधानें त्या छडया त्या पेल्यावर मारून त्या रागाची गत अथवा चीज वाजविली जाते. (लेखक पंडित द.के.जोशी)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .