विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वांद्रें:- मुंबई इलाखा, ठाणें जिल्हा, साष्टी तालुका. हें गांव मुंबई व साष्टी हीं बेटें जोडणा-या पुलाच्या टोंकाला, मुंबई शहराच्या उत्तरेस ५३९ मैलांवर असून, बी.बी.सी.आय्. या रेल्वेवरील स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें २५०००. येथील ख्रिस्ती लोक सोळाव्या व सतराव्या शतकांत पोर्तुगीजांनीं बाटविलेल्या ख्रिस्ती लोकांचे वंशज आहेत. येथें बरींच ख्रिस्ती देवालयें आहेत. येथील म्युनिसिपालिटी स. १८७६ त स्थापन झाली. ताडी काढणें व मासे मारणें हे येथील मुख्य धंदे आहेत. मुंबई म्युनिसिपालिटीचा कसाईखाना पुलाच्या उत्तर टोंकाला आहे. वांद्रे येथें एक अनाथ बालसंगोपन गृह व  सेंट जोसेफ्स कॉन्व्हेंट हीं आहेत. येथें दवाखाना, हायस्कूल व मध्यम आणि प्राथमिक शाळा आहेत. वांद्रें व पाली या टेंकडयांवर यूरोपीय व पारशी लोक रहातात.