विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वामन:- चालू मन्वंतरांत सातव्या पर्यायांतील त्रेतायुगांत कश्यपापासून अदितीच्या ठायीं झालेला विष्णूचा अवतार. ('अवतार' व 'बलि' पहा).
वामनपुराण:- एक महापुराण. या पुराणांत विष्णूचा बटुमूर्ति अवतार 'वामन' याची कथा सांगितली आहे; वैष्णवपंथाचा हा ग्रंथ आहे. तथापि शैवपंथांतील लिंगपुजेचें वर्णनहि यांत बरेंच आलें आहे. पवित्र तीर्थक्षेत्रांचें वर्णन बर्याच भागांत आढळतें पुराणवाङ्मयांतील अवश्य अशा सृष्टयुत्पत्ति वगैरे गोष्टींचा यांत क्वचितच उल्लेख आहे.
वामन (सुमारें इ.स. ७७५-८२५):- हा काश्मीरांतला असावा असें दिसतें. इ.स. आठव्या शतकांत काश्मीरचा राजा जयापीड याचा वामन नांवाचा मंत्री होता, तोच हा काव्यालंकारसूत्रकार असें कित्येक काश्मीरकांचें मत आहे. पाणिनीच्या व्याकरणसूत्रांवर काशिकावृत्ति नांवाची टीका करणारा वामन हा या काव्यालंकारसूत्रकर्त्या वामनाहून भिन्न असून प्राचीनतर होय. या वामनानें केलेल्या 'काव्यालंकारसूत्रें' या ग्रंथाचे पांच भाग आहेत. शारीर, दोषदर्शन, गुणविवेचन, अलंकारिक व प्रायोगिक हीं तीं पांच अधिकरणें होत. या काव्यालंकारसूत्रांवर स्वतः वामनानेंच वृत्ति म्हणजे टीका लिहिली आहे. सूत्रें व वृत्ति यांच्यावर महेश्वरकृत टीका आहे (वि.वि. पु. २२अं. १-२).