विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वामन पंडित (१६३६ ते १६९५):- एक महाराष्ट्रीय कवि हा ॠग्वेदी वासिष्ठगोत्री ब्राह्मण असून मूळ विजापूरचा राहाणारा. याचें आडनांव 'शेष'. बापाचें नांव नरहरि व आईचें नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून हा विद्याव्यासंगी व बुध्दिमान होता. यानें लहानपणींच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. तो कांहीं दिवस विजापूरच्या दरबारीं होता. पण जेव्हां विजापूरच्या बादशहास त्याला बाटवावें असें वाटलें तेव्हां त्यानें विजापूर सोडलें. उदरनिर्वाहाकरितां कांहीं दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणीं हिंडून पुढें तो काशीक्षेत्रीं गेला. तेथें एका मध्वमतानुयायी गुरुजवळ यानें वेद व शास्त्रें यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर त्यानें ठिकठिकाणीं पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करुन अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रें मिळविलीं. वामन पंडित हा प्रथमतः द्वैतमतवादी होता परंतु त्याच्या मनाचें त्या विचारसरणीनें समाधान होईना. करतां त्यानें निरनिराळया मतांच्या ग्रंथांचें अवलोकन करुन अनेक शास्त्रीपंडितांच्या गांठीहि घेतल्या परंतु त्याच्या मनाचें समाधान झालें नाहीं. निराशेनें कंटाळून शेवटीं जीव देण्याच्या विचारापर्यंत त्याची मजल गेली होती. परंतु तो पुढें मलयाचल पर्वताकडे गेला. तेथें त्याला एका यतीनें गुरुपदेश केला. ही हकीकत त्यानें 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथांत आरंभीं विस्तारानें दिली आहे. निगमसागर ग्रंथ शक १५९५ सालीं लिहिल्याचा त्याच्या ग्रंथांतच उल्लेख केला आहे. वामन पंडिताबद्दल अनिश्चित माहिती मिळते. कोणी वामन पांच आहेत असें समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळें कोणी वामन दोन होते असेंहि मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तुहरीच्या श्लोकांचें भाषांतर करणारा वामन हे दोन भिन्न असेंहि कोणी म्हणतात. याबद्दल वाद चालू आहे.
वामन पंडिताचें काव्य:- याची गणना उच्च दर्जाच्या कवींत होते. यमकें लांब लांब साधण्यांत याचें कौशल्य दिसून येतें. म्हणून यास यमक्या वामन असेंहि म्हणतात. याचें कांहीं भाषांतररुप काव्य आहे व कांहीं स्वतंत्र आहे. भर्तृहरीचीं श्रृंगार, नीति वैराग्य शतकें, गंगालहरी, समश्लोकी गीता हीं भाषांतरित होय. निगमसागर नांवाचा वेदांतपर ग्रंथ त्यानें लिहिला आहे. त्यानंतर, 'यथार्थदीपिका' या नांवाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या सूचनेवरुन त्यानें लिहिली. व तींत आंधळी भक्ति ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग म्हणून प्रतिपादिलें आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठें लांब तर कोठें आंखुड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवधं, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशीं इतर पुराणप्रसंगांवर त्यानें काव्यें केलीं आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असें मोरोपंतांनीं म्हटलें आहे. यावरुन वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांत जशी याची प्रसिध्दि आहे तशीच शृांगर, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्यहि यानें केलें आहे. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रसाद याच्या काव्यांत जागजागीं दिसून येतो. यानें आपल्या बायकोस उपदेश करण्याकरितां लिहिलेलें प्रियसुधा नांवाचें प्रकरण फार उत्तम वठलें आहे. याचा निधनकाल वै.शु. (शक १६१७) मानतात. समाधिस्थान वांईजवळ भोगांव नांवाच्या खेडयांत आहे. (महाराष्ट्र सारस्वत; कविचरित्र; सं.क.का.सू. इत्यादि)