विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वायुपुराण:- या पुराणांत शिवभक्तीचें माहात्म्य असल्यामुळें या पुराणाला शैव अथवा शिव-पुराण असेंहि नांव कांहीं पुराणांच्या याद्यांमध्यें दिलेलें आढळतें. वायुदेवतेनें हें सांगितलेलें आहे म्हणून यास वायुपुराण असें नांव मिळालें. महाभारत व हरिवंश या दोहोंत यांतील उतारे घेतलेले आहेत. हरिवंश पुष्कळ ठिकाणीं वायुपुराणाशीं जुळता आहे. यांत इसवी सनाच्या चवथ्या शतकांतील गुप्त राजांच्या कारकीर्दीचें वर्णन आहे. वायुपुराण नांवाचें एक जुनें पुराण खास होतें, व हल्लींच्या पुराणांत जुन्या पुराणापैकीं पुष्कळ भाग उदधृत केला आहे. जुन्या पुराणांतील ठराविक विषयच याहि पुराणांत आहेत; जसें, जगाची उत्पत्ति, वंशावळी वगैरे विष्णु-पुराणांतल्याप्रमाणें. मात्र यांतील कथा विष्णूबद्दल नसून शिववर्णनपर आहेत. विष्णुपुराणाप्रमाणेंच वायुपुराणाच्या शेवटच्या भागांत जगाच्या नाशाचें वर्णन देऊन योगाच्या सामर्थ्याबद्दल विवेचन आलें आहे; व शेवटीं शिवपुर, तेथें आलेला योगी व त्याची शिव-ध्यानांत निमग्न वृत्ति वगैरेंबद्दल वर्णन आहे. या पुराणांत पितरांचे आत्मे व त्यांची श्राध्दकर्में यांबद्दल विस्तृत वर्णन आहे. आणि या शैवपंथी ग्रंथामध्यें सुद्धां विष्णूबद्दल बरेच उल्लेख आले आहेत व दुसरींहि पुष्कळ माहात्म्यें व अलीकडील ग्रंथ वायुपुराणांतीलच भाग म्हणून म्हणतात. आणि हा नवीन भाग यांत अंतर्भूत झाला असल्यामुळें सर्व वायुपुराणा प्राचीन आहे असें म्हणतां येत नाहीं.