विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वायुचे रोग:- या सदरांत पुष्कळ रोगांचें विवेचन आलें आहे. व शिवाय वायु शरीराच्या निरनिराळया अवयवांत विकृत झाला असतां कोणकोणतीं लक्षणें उत्पन्न होतात. हेंहि सांगितलें आहे.
निदान:- धातुक्षय करणा-या आहारविहारांचें अतिशय सेवन केल्यानें रिकाम्या झालेल्या स्त्रोतांत फिरून त्यांस अतिशय भरून टाकून किंवा दुसर्या दोषांनीं स्त्रोतसें भरलीं असतां त्यांच्या आच्छादनानें वायु बळावून कुपित होतो. पक्काशयांत कुपित झालेला वायु पोटशूळ पोटफुगी आंतडयांत कुजबुजणें (आंत्रकूजन) मलावरोध, मूतखडा, अंतर्गळ, मूळव्याध, माकडहाड, पाठ व कंबर हीं धरणें हे विकार आणि कंबरेच्या खालच्या भागीं नानाप्रकारेच कष्टसाध्य उपद्रव करितो. आमाशयांत कुपित झालेला वायु तहान, वांती, दमा, खोकडा, विषूचिका, घसा दाटणें व ढेंकर हे आणि तसेच बेंबीच्या वरच्या भागीं इतरहि अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करतो. कान वगैरे इंद्रियांत वायु कोपला असतां तो त्या त्या इंद्रियांची शक्ति नष्ट करतो. त्वचेंत वायु कोपल्यास त्वचा फुटते, रुक्ष होते. रक्तांत कोपला असतां तीव्र वेदना, त्वचा बधिर होणें, तापणें, लाल होणें, रंग पालटणें, अन्नाचें अपचन होऊन पोट फुगणें, अरुची, कृशता व भ्रम हे विकार होतात मांस व मेद यांत वायु कुपित झाल्यास फार कठिण व ठणकणा-या अशा गांठी, भ्रम, अंग जड होणें, अतिशय ठणकणें, जखडणें, बुक्क्यांनीं व दांडक्यांनीं ठेचल्याप्रमाणें होणें हे विकार होतात. अस्थिगत वायु कुपित झाला असतां मांडया, सांधे व हाडें यांत शूळ होतो. आणि शक्ति फारच क्षीण होते. मज्जेंतील वायु कोपला असतां हाडें पोकळ होतात, झोंप येत नाहीं, अंग ताठतें, ठणकतें, वीर्यस्थ वायु कोपला असतां वीर्यपात लवकर होतो. त्याचा अवरोध होतो किंवा त्यास विकार होतो. आणि अशा वीर्यापासून उत्पन्न झालेल्या गर्भाचीहि हीच स्थिति होते. शिरांतील वायु कुपित झाला असतां शिरा फुगतात व रिकाम्या होतात. स्नायूंतील कुपित झालेला वायु गृध्रसी अंतरायाम, बहिरायाम व कुबडेपणा हे रोग उत्पन्न करतो. सांध्यांतील वायु कोपला असतां त्याठिकाणीं वा-यानें भरलेल्या पखालीप्रमाणें किंवा भात्याप्रमाणें हातास लागणारी सूज येते. आणि तो भाग पसरतांना व आंखडतांना कळ लागते. सर्वांगांतील वायु कोपला असतां अंगांत टोंचण, फूट, मोडल्यासारखी वेदना, अंग ताठणें, आंचके येणें, मेहरी, सांधे आंखडणें, आणि कांपरें हे विकार होतात.
जेव्हां वायु कुपित होऊन शरीरांतील सर्व शिरांतून खेळूं लागतो तेव्हां त्या मनुष्यास वरचेवर झटके येतात. या रोगास आक्षेपक म्हणतात. वायूची गति खालून बंद झाली म्हणजे तो वर चढून हृदयाक्षित नाडयांत शिरून हृदय, डोंकें व आंख यांस पीडा करीत करीत शरीरास चहूंकडून आंचके देतो व धनुष्याप्रमाणें वाकवितो. रोग्यास श्वासोच्छवास करतांना कष्ट होतात. डोळे ताठतात किंवा गळाल्यासारखे होतात व मिटतात. मग रोगी कबुतराप्रमाणें घुमतो आणि बेशुध्द होऊन पडतो. या रोगास अपतंत्रक व अपतानक अशीं दोन नांवें आहेत. यांत हृदयांत दाटलेला वायु तेथून सरला म्हणजे बरें वाटतें आणि पुन्हां तो हृदयांत आला म्हणजे चैन पडेनासें होतें. याप्रमाणें वरचेवर होत असतें. गर्भपातानें, अतिशय रक्तस्त्राव झाल्यामुळें, व अभिघातानें, झालेला अपतंत्रक तर फारच कष्टसाध्य आहे. हा वायु मानेच्या बाजूच्या मन्या नांवाच्या दोन शिरांस जखडून धमन्यांत शिरून ज्यावेळीं सर्व शरीरांत पसरतो त्यावेळीं सरी (खांदा व कांख यांस जोडणारा गळयाखालचा भाग) ताणते आणि वरच्यावर झटके घेऊन शरीर धनुष्याप्रमाणें पाठीकडून आंतल्या बाजूस वांकतें म्हणजे डोकें व पाय वर येतात व पोट आंत जातें, डोळे ताठतात, जांभया येतात, रोगी दांत चावतो, कफाची उलटी होते, बरगडयांत वेदना होतात, वाचा बसते आणि जबडा, पाठव डोकें हीं जखडतात. यास अंतरायाम म्हणतात. याचप्रमाणें शरीर पाठीकडे वांकून डोकें पाठीकडे जातें, छाती वर येते आणि मान चुरते. या रोगास बहिरायाम म्हणतात. यांत दांत व तोंडाचा वर्ण बदलतो, फार घाम येतो. व गात्रें गळल्यासारखीं होतात, यास बाह्यायाम, धनुष्कंभ किंवा मराठींत धनुर्वात असेंहि म्हणतात. दांत व तोंड यांचा रंग बदलणें, घाम फार येणें व अंग गळणें आणि बेशुद्धि असणें हीं लक्षणें धनुर्वातांत झालीं असतां दहा दिवस रोगी जगणें कठिण आहे. दहा दिवसांपुढें जगलाच तर वांचण्याचा संभव असतो. मर्मावर व्रण झाला असतां त्यांत वायूनें प्रेरित झालेले दोष शिरून पायापासून डोक्यापर्यंत सर्वांग व्यापून त्यास ताठवितास. हा व्रणायाम होय.हा झाला असतां रोग्यास जर तहान लागत असेल किंवा त्याचें शरीर पांढुर झालें असेल तर तो असाध्य समजून सोडून द्यावा.
सर्व प्रकारच्या आक्षेपकांत वेग म्हणजे झटके येऊन गेले म्हणजे रोग्यास बरें वाटतें. जीभ फार खरवडल्यानें, कोरडे पदार्थ खाल्यानें किंवा जिभेवर आघात झाल्यानें दोन्ही जबडयांच्या मूळांतील वायु कुपित होऊन जबडयांचा सांधा निखळतो. त्यायोगानें तोंड एकसारखें उघडें किंवा मिटलेलेंच राहतें. या रोगास हनुस्तंभ (दांतखिळी बसणें) म्हणतात. यापासून चावण्यास व बोलण्यास कष्ट पडतात. वाशक्तिवाहक शिरांतील वायु कुपित झाला असतां तो जिभेस स्तब्ध करतो. त्या योगानें खाणें, पिणें, बोलणें, या क्रिया करतां येत नाहींत. या रोगास जिव्हास्तंभ म्हणतात. डोक्यावर ओझें वाहिल्यानें, फार हंसल्यानें, फार बोलण्यानें, भयानें, तोंडांतून शिंक आल्यानें, कठिण धनुष्य वांकविल्यानें, डोक्याखालीं उंचसखल उशी घेतल्यानें, कठिण पदार्थ चावल्यानें व इतर वात वाढविणा-या आहारविहारांनीं वायु वृद्धिंगत होऊन शरीराच्या ऊर्ध्वभागीं राहून एका बाजूनें तोंड वाकडें करितो. त्या योगानें त्या मनुष्याचें बोलणें, हंसणें पहाणें, या क्रियाहि वांकडया होतात पुढें त्याचें डोकें कांपतें, तो बोलतांनां अडखळतो, त्याचे डोळे ताठतात, दांत हालतात, स्वर क्षीण होतो, ऐकूं कमी येतें, शिंका येईनाशा होतात, वास कळेनासा होतो, आठवण कमी होते, त्वचा बधिर होते, निजला असतां तोंडांतून एका बाजूनं लाळ गळते व एकच डोळा मिटतो आणि गळयाच्यावर अर्ध्या भागांत किंवा कंबरेच्याखालीं अर्ध्या भागांत तीव्र वेदना होतात या रोगास अषर्दक व कित्येक ग्रंथकार एकायाम असें म्हणतात. कुपितवायु रक्ताच्या आश्रयानें मस्तकास धारण करणार्या शिरा रुक्ष, वेदनायुक्त व काळया करतो. या विकारास शिराग्रह म्हणतात. हा असाध्य आहे. कुपित वायु शरीराचा अर्धाभाग जंखडून त्यांतील शिरा व स्नायु यांस शुष्क करुन सांध्यांचे जोड निखळवून शरीराच्या उजव्या किंवा डाव्या कोणत्या तरी एका बाजूचा नाश करतो, त्यामुळें तो सगळा अर्धाभाग लुळा होतो व बधिरहि होतो. यास कोणी एकांगरोग व कोणी पक्षवध किंवा अर्धांगवायु म्हणतात. सर्वांगांतील वायु दुष्ट होऊन वरच्याप्रमाणेंच सर्व शरीरांत विकार उत्पन्न करतो त्यास सर्वांगरोग असें म्हणतात.
निव्वळ वायूपासून झालेला पक्षवध अतिशयच कष्टसाध्य असतो, इतर दोषाच्या मिश्रणानें झाला असल्यास कष्टसाध्य असतो आणि क्षयापासून झाला असल्यास असाध्य समजून सोडून द्यावा. आमानें मार्ग बंद झाला असतां वायु कफाशीं मिळून सर्वांग दांडक्याप्रमाणें ताठ व निश्चेष्ट करतो. यास दंडक म्हणतात व हा असाध्य आहे. खांद्याच्या मुळांत (अंसदेशीं) राहणारा वायु कुपित झाला असतां तेथील शिरांस आंखडून बाहूंची हालचाल बंद करतो. यास अवबाहुक म्हणतात. तोच कुपित वायु बाहूंच्या मागल्या बाजूपासून तळहातापर्यंत बोटांचा जो स्नायुसमुदाय जातो त्यास आंखडून हाताची हालचाल बंद करतो. या रोगास विश्वाची म्हणतात. कंबरेंतील कुपित वायूनें एका मांडींतील कंडरा आंखडून धरली असतां मनुष्य लंगडा होतो आणि दोन्ही मांडयांतील कंडरा आंखडल्या असतां तो पांगळा होतो. ज्या रोगांत मनुष्य चालूं लागला असतांना कांपतो व लंगडयासारखें चालतो त्यास कलायखंज म्हणतात. यांत संधि बंधनें निखळतात. वात व रक्त यांपासून गुडघ्यावर कोल्ह्याच्या डोक्यासारखी सूज येते व तींत अतिशय कळा लागतात. या विकारास क्रोष्टुकशीर्ष असें म्हणतात. उंच व सखल अथवा वांकडा - तिकडा पाय पडून मुरगळल्यामुळें किंवा श्रमानें कुपित वायु घोटयांत जाऊन तेथें शूळ उत्पन्न करतो त्यास वातकंटक असें म्हणतात. खोंटेकडे जाणारी पायांच्या बोटांची कंडरा वायूनें पीडित झाली असतां मांडी वर उचलवत नाहीं, या विकारास गृध्रसी म्हणतात. कंबर, पाठ, कुल्ले, मांडया, गुडघे व पाय इतक्या ठिकाणीं या गृध्रसी विकारांत दुखवा उत्पन्न होतो. वरील सर्व ठिकाणें ताठतात व त्यांतून स्पंदन (फुरफुणणें) चालू असतें. शिवाय या विकारांत अरोचक, ताप व झोंप नसणें हे विकारहि असतात.पूर्वी सांगितलेली विश्वाची व ही गृध्रसी यांतच तीव्र वेदना होत असल्या म्हणजे त्यांस खल्ली असें म्हणतात. कफवाताच्या कोपानें ज्याविकारांत पाय शिवशिवतात व त्यांस मुंग्या येतात त्यास पादहर्ष म्हणतात. कुपित वायु पित्त व रक्त यांसह मिळून पायांत दाह उत्पन्न करितो व तो विशेषतः फार चालल्यानें होतो यास पाददाह म्हणतात. वरुन व खालून वायूचा अवरोध झाल्यानें पोट अतिशय फुगतें, आंत गुरगुरतें व अत्यंत तीव्र वेदना होतात. या विकारास आनाह किंवा आघ्मान असें म्हणतात. कफानें वायूचा अवरोध केल्यानें आमाशयांत जें आघ्मान (पोट फुगतें) होतें त्यास प्रत्याघ्मान म्हणतात. यांत बरगडयांकडे फुगवटी नसून मध्येंच पोट फुगतें. वायु पक्वाशयांतून गुदाकडे तीव्र वेदना उत्पन्न करीत जातो त्यास तुनी म्हणतात. याच्या उलट गुदशिस्नद्वारांकडून पक्वाशयाकडे तीव्र वेदना उत्पन्न करुन वायु येऊं लागला म्हणजे त्या विकारास प्रतुनी म्हणतात. बेंबीच्या खालीं चल अथवा निश्चल अशी फणसाच्या आठळीसारखी घट्ट जी गांठ उत्पन्न होते तिला अष्ठीला असें म्हणतात. हिच्यामुळें लघवी, शौच व अपानवायु हीं साफ होत नाहींत. हीच गांठ तिरकस असेल तर तिला प्रात्यष्ठीला म्हणतात. हिच्यामुळें लघवी वगैरे साफ होत नाहीं. हनुस्तंभ, अषर्दत, आक्षेपक, अर्धांगवायु, अपतानक हे वायू सर्व सामग्री (चिकित्सेची) असतां पुष्कळ कालानें व प्रत्ययानें बरे होतात किंवा एखाद्या वेळीं इतकें करुनहि बरे होत नाहींत. रोगी अशक्त असेल तर हे बरे होत नाहींतच.
चिकित्सा:- कफ व पित्त यांशीं न मिसळलेल्या केवळ वायूवर प्रथम स्नेहन करावें, तूप, वसा, मज्जा व तेल हीं रोग्यास पाजून तो स्नेहानें अगदीं व्याप्त झाला म्हणजे त्यास दूध पाजून चांगली हुषारी आली म्हणजे ग्राम्य पाण्यांतील व पाणथळ देशांतील प्राण्यांच्या मांसाचे सुर्वे धान्यांचें कट घालून द्यावें. तसेंच खीर, खिचडी, अनुवासन बस्ती, वातघ्न, पौष्टिक, व स्निग्ध अन्ने देऊन त्यास स्निग्ध करावें. नंतर त्याच्या अंगास खूप तेल लावून स्नेहमिश्रित स्वेदांनीं (शेकण्यानें) वरचेवर घाम काढावा. वांकलेलें, ताठलेलें व दुखत असलेलें, अंग तेल लावून शेंकलें असतां वाटेल तसें सहज लववितां येतें. शेकल्यानें शहारे, टोंचण, शूळ, ताठणें, सूज, स्तंभ व जखडणें, हे विकार नाहींसे होऊन अवयव मृदु होतात. स्नेहपानानें शुष्क झालेले धातू त्वरित पुष्ट होऊन त्यांची शक्ति, जठराग्नि, पुष्टी व प्राण यांची वाढ होते. रोग्यास वरच्यावर असे पुष्कळ वेळ स्नेह व स्वेद करावे. स्नेहानें रोग्याचा कोठा नरम झाला म्हणजे सर्व वातरोग नाहींसें होतात. दोष शिल्लक राहिल्यामुळें या उपायांनीं रोग बरा न झाल्यास त्यास स्नेहयुक्त सौम्य रेचक द्यावें. दुधांतून एरंडेल देणें चांगलें. यापासून दोष निघून जाऊन रोग बरा होतो. स्निग्ध, आंबट, खारट, उष्ण वगैरे आहारांनीं मळ सांचून स्त्रोतांचे मार्ग बंद करुन वायूस कोंडतो. म्हणून त्याचें अनुलोमन करावें. रोगी अशक्त असून त्यास रेच देणें शक्य नसल्यास तें न देतां दीपक, पाचक औषधांचा निरूह बस्ती द्यावा. किंवा दीपक, पाचक औषधें घालून तयार केलेले पदार्त खावयास द्यावे. रेच होऊन अग्नि प्रदीप्त झाला म्हणजे पुन्हां स्नेह व स्वेद करावे. आमाशयांत वाताचा जोर असल्यास वमन करवून हलकें व थोडें अन्न खाऊं घालून दारुहळद, इंद्रजव, कुटकी अतिवीष चित्रक, पहाडमूळयांचें चूर्ण ऊन पाण्याबरोबर द्यावें. यानें अग्नि प्रदीप्त झाला म्हणजे नुसत्या वायूवरचे उपाय करावे. बेंबीच्या खालच्या भागांत वायूचा जोर असल्यास बस्ती द्यावा. आणि मासे खाण्यास देऊन शिवाय जेवणाच्यापूर्वी व तें जिरल्यावर तूप प्यावयास द्यावें. कोटयांतील वायूवर दीपक व पाचक गुणांचे क्षार, चूर्णे वगैरे हितावह आहेत. हृदयांतील कुपित वायूवर सालबणीच्या मुळांनीं सिद्ध केलेलें दूध प्यावें, कोट्यांतील वायूवर शिरोबस्ती, स्निग्धनस्य, धूम्रपान आणि कान, डोळे वगैरेंचें तर्पण म्हणजे तेल, अंजन घालणें वगैरे उपाय करावे. त्वचेंतील वायूवर शेक, तदेल लावणें, व आवडतें अन्न हे उपाय हितावह आहेत.
रक्तांतील वायूवर थंड लेप, रेचक व रक्त काढणें हे उपाय करावे. मांसांतील व मेदांतील वायूवर रेचक, निरूह बस्ती आणि शमन औषधें द्यावीं. हाडांतील व मज्जेंतील वायु स्नेहपान व अभ्यंग यांनीं बसवावा. वीर्यगत वायूवर नेहेमीं आनंदांत असणें आणि शक्तिवर्धक व वीर्यवर्धक अन्न खाणें हे उपाय हितकर आहेत. वीर्याचा मार्ग बंद झाला असतांच रेचक द्यावें. आणि रेच होऊन गेल्यावर हलकें अन्न घालून पूर्वोक्त चिकित्सा करावी. वायूनें गर्भ किंवा मुलें सुकलीं असतां खडीसाखर, शिवणफळें, व जेष्ठमध यांनीं सिद्ध केलेलें दुध प्यावें म्हणजे तीं पुन्हां पुष्ट होतात. स्नायू, सांधे व शिरा यांतील वायूवर, स्नेह, डाग व पोटीस हे उपाय करावे. अंग अखडलें असतां उडीद व सैंधव यांनीं सिद्ध केलेलें तेल चोळावें. वायूनें अंग बधिर झालें असतां तेथील रक्त काढून घेरोसा, सैंधव व तेल हीं एकत्र खलून लावावीं.वायूनें आंग वळूं लागलें किवा पेटके येऊं लागले तर पोटिसांनीं शेकावें अथवा घट्ट बांधून टाकावें. ज्यास अपतानक वायु झाला आहे त्यास डोळे गळल्यासारखे होणें, कंप, शिस्न ताठणें, घाम येणें बहिरायाम होणें, व हातपाय आपटणें, हीं लक्षणें झालीं नसल्यास त्याची ताबडतोब चिकित्सा करावी. त्यास प्रथम स्निग्ध स्विन्न करुन स्त्रोतसें मोकळीं होण्याकरितां त्रिकटू वगैरेंचें तीव्र नस्य द्यावें. नंतर विदार्यादि गणांतील औषधांचा काढा, दहीं, दूध व मांसरस यांनीं सिध्द केलेलें तूप पाजावें. यानें वायु अतिशय किंवा एकाएकीं शरीर व्यापीत नाहीं. चारी प्रकारच्या स्नेहांनीं अभ्यंग, अवगाह करावें खाण्यापिण्यांत व नस्य आणि बस्ती यांच्या द्वारेंहि स्नेह शरीरांत मिसळावें म्हणजे वायूचा नाश होतो.
अपतानकाचे वेग एकदां येऊन गेल्यावर पु्हां ते येईपर्यंत मध्यंतरी जो अवकाश असतो त्यासाठीं वरच्यावर शिरोविरेचन अर्थात नस्य द्यावें. तीक्ष्ण कफनाशक औषधें वाटून त्यांचा रस नाकांत पिळावा. किंवा त्यांचें चूर्ण नाकांत फुंकावें. यानें हृदयाश्रित प्राणनाडया मोकळया होऊन रोगी शुद्धीवर येतो. वायूचा विशेष जोर असल्यास लोहघृत, बाहव्याचें तूप, (वाग्भट वातरोगचिकित्सा) हीं घ्यावीं. ही चिकित्सा केवळ वायूच्या अपतानकावर करावी. दोषांचें मिश्रण असल्यास तदनुसार मिश्र चिकित्सा करावी. कफजन्य अपतंत्रकांत व हृदय व बरगडया यांतील शूळ यांवर कफहृद्रोग व वातहृद्रोग यांवर सांगितलेले उपाय करावे. अंतरायाम व बहिरायाम यांवर अर्दिताप्रमाणें चिकित्सा करावी. आणि तेलाच्या पिपांत निजावें. या दोहोंत अंतरायाम अतिशय कष्टसाध्य आहे. दांत व तोंड यांचा व्रण बिघडणें, किंवा बदलणें, अंग गळणें, बेशुध्दि होणें, व फार घाम येणें हीं लक्षणें ज्या धनुर्वातांत होतात तो रोगी दहा दिवसांच्या आंत मरतो. हीं लक्षणें नसून वेगहि मंद असल्यास रोगी जगतो. परंतु जगला तरी त्याचें शरीर कायमचें वांकतें, त्याची बुध्दि जड होते, तो लंगला, कुबडा, पांगळा, कोणत्यातरी इंद्रियानें लुला असा होतो. किंवा त्यास अर्धांगवायु होतो. हनुस्त्रंसावर हनुवटीस स्नेह व स्वेद करुन ती जागच्या जागीं बसवावी. तोंड उघडें राहिलें असल्यास हनुवटी वर दाबावी आणि मिटलें गेलें असल्यास ती खालीं ओढावी. बाकी सर्व चिकित्सा अर्दिताप्रमाणें करावी.
जीभ ताठली असतां त्या त्या अवस्थेनुसार वातावरची चिकित्सा करावी. तोंड वांकडें (अर्दित) झालें असतां नस्य, डोक्यावर तेल घालणें आणि कान व डोळे यांचें तर्पण हे उपाय करावे. त्यांत सूज असल्यास वांति करवावी आणि लाली व दाह असल्यास शीर तोडावी. अर्धांगवायूवर स्नेहन व स्नेहयुक्त रेचक द्यावें. आणि वातावरील सर्व चिकित्सा करावी. अवबाहुकावर नस्य व जेवल्यावर तूप पिणें हे उपाय गुणावह आहेत. बाकीच्या वातरोगांवर रोगांचें स्थान व दुष्य वगैरेंचा विचार करुन त्याप्रमाणें चिकित्सा करावी.
को-हांटी, तेल्यादेवदार, व सुंठ यांचा काढा तेल मिळवून घेतला असतां वायूनें ज्याचें चालणें बंद झालें असेल तो वाटेल तसा जलद किंवा सावकाश चालतो. शिरोगत वायवर चिकणामूळ, व बेलमूळ हीं औषधें घालून उकळलेल्या दुधांत तुपाची निवळ सिद्ध करुन ती दोन किंवा चार तोळे नाकांत घालावी याचप्रमाणें केलेली सुसर किंवा मासा व कांसव यांची चर्बी विशेषेंकरुन नुसत्या वायूवर नाकांत घालावी. जुनी पेंड व मोठें पंचमूळ यांचे दोन निरनिराळे काढे करुन त्या दोहोंइतकें तेल व त्याच्या आठपट दूध हीं सर्व एकत्र करुन तेल सिद्ध करावें. हें प्याल्यानें सर्व वातरोग व विशेषेंकरुन कफयुक्त वातरोग नाश पावतात. कोर्हांटयाचें तेल व बला तेल (वाग्भट चिकित्सा स्थल) हीं तेलें प्याल्यानें, नाकांत ओढल्यानें, बस्तीनें दिल्यानें व आंगाला लावण्यानें सर्व प्रकारचे दुष्ट वातरोग नाश पावतात. स्नेह व स्वेद यांनीं कफ किंवा पित्त पातळ होऊन पक्वाशयांत राहून आपलीं लक्षणें दाखवूं लागल्यास बस्ती देऊन त्यांस नाहींसें करावें.