प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
 
वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:-  महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील 'वारकरी' शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य दैवत जें श्रीपांडुरंग याच्या दर्शनास नियमानें जाणारा असा आहे. वारकरी या पदाचा विग्रह वार-करी असा नसून वारी करी असा आहे. मराठी भाषेंत वारकरी हा शब्द तीन अर्थानें रुढ आहे. आठवडयांतील निरनिराळया वारीं-दिवशीं-निरनिराळया घरीं नियमितपणें जेवावयास जाणारा विद्यार्थी हा एक 'वारकरी' शब्दाचा अर्थ आहे. शत्रूंवर वार करणारा या अर्थानें वारकरी शब्द वापरतात. त्याचाच प्रतिशब्द 'धारकरी' असाहि देतां येईल. परंतु या वर दिलेल्या दोनहि अर्थानें 'वारकरी पंथ' या शब्दांतील 'वारकरी' हा शब्द उपयोगांत आणलेला नाहीं. वारकरी या शब्दाचा जो प्रथमतःच 'वारी-करी' असा विग्रह दिलेला आहे तोच यथार्थ आहे. 'वारी' हा शब्द, या पंथाची घडी प्रथमतः सुव्यवस्थित बसवणारे जे श्रीज्ञानदेव यांच्या काळीं, 'येरझारा' या अर्थी वापरीत असत.

''म्हणौनि कामुवैरी । जाला जेथ ठाणौरि । तेथ सरली वारी । क्रोधाची हि ॥ (१८, १०६१ ज्ञानेश्वरी). ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचा धवळारीं । बुध्दि नांदे ॥ (६, ३७७ ज्ञानेश्वरी). आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । नेणिजे.... (ज्ञानेश्वरी १५, ५२१). कायावाचामनें जीवें सर्वस्वें उदार । बापरखुमादेवीवरा विठ्ठलाचा वांरिकर ॥ (ज्ञानदेव, अभंग ९३ आवटे स.सं.गा.).

तात्पर्य वर्षांतून दोनदां (आषाढ शुध्द एकादशी व कार्तिक शुध्द एकादशी) अगर त्याहून जास्त वेळां कोणत्या तरी एकादशीस, गळयातं तुळशीची माळा घालून नियमानें पंढरपुरास जाणारा तो पंढरीचा वारकरी; व त्याचा जो पंथ तो वारकरी पंथ.

माळकरी अथवा भागवत पंथ म्हणण्याचें कारण:-  यास माळकरी पंथ अथवा भागवतधर्म असेंहि म्हणतात. यास माळकरीपंथ हें नांव, वारक-यांचें मुख्य बाह्य चिन्ह जें तुळशीच्या मण्यांची माळ यावरून पडलें आहे. ज्याप्रमाणें यज्ञोपवीतावांचून ब्राह्मण होणार नाहीं, त्याचप्रमाणें वारकरी हा कृष्णभक्त असल्यामुळें, कृष्णास प्रिय जी तुळशीची माळ ती गळयांत घातल्याशिवाय 'वारकरी' होऊंच शकत नाहीं. असलें महत्व तुळशीच्या माळेस या पंथांत आहे, म्हणून यास 'माळकरी पंथ' असें म्हणतात.

आतां यास 'भागवतधर्म' असेंहि म्हणतात असें वर म्हटलें आङे. पण हा भागवतधर्म व श्रीमच्छंकराचार्य यानीं आपल्या शारीरभाष्यातं ज्या भागवतधर्माचें खंडण केलें तो अथवा ज्याचें रामानुजीय मतांत प्रामुख्य आहे तो भागवतधर्म हे दोन अगदीं भिन्नभिन्न पंथ आहेत. आचार्यखंडित भागवतमतांत 'वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, व अनिरुध्द' ही चतुर्व्युहकल्पना प्रमुख आहे व तो बहुतकरुन द्वैताकडेच झुकणारा, किंबहुना जीवेशांचें द्वैत प्रतिपादणारा, असाच आहे. उलटपक्षीं वारकरीपंथ हा जरी भक्तिप्रधान असला तरी निःसंशय अद्वैतमताचा पुरस्कर्ता आहे व त्यांत व्यूहकल्पनेचा किंचितहि संबंध नाहीं. यास भागवतसंप्रदाय म्हणतात याचें मुख्य कारण हा वैष्णवसंप्रदाय आहे. या पंथाचें उपास्य दैवत श्रीपांडुरंग हें श्रीकृष्णाचें बाळरुप आहे. पंढरपुरास दक्षिण द्वारका असें जें म्हणतात तेंहि याचेंच निदर्शक आहे.

'पावन पांडुरंगक्षिती । जे कां दक्षिणद्वारावती । जेथ विराजे श्रीविठ्ठलमूर्ति । नामें गर्जती पंढरी ॥ (श्री एकनाथ भागवत २९, २४३).

तात्पर्य द्वारकाधीश श्रीकृष्णपरमात्म्याचें बालरुप हें उपास्य दैवत असल्यामुळेंहा वैष्णव संप्रदाय आहे. अर्थात श्रीहरीच्या लीला ज्यांत वर्णन केल्या आहेत तो श्रीमद्व्यासकृत द्वादशस्कंदी गवतग्रंथ भगवद्गीतेप्रमाणें व वारकरीपंथास पूज्य आहे.
गीताभागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥
(श्रीतुकाराम स.सं.गा. ३३५७.)

भागवतांतील द्वादशस्कंदांपैकीं एकादशस्कंद संपूर्ण व द्वितीयस्कंद अध्याय ९  यावर पैठणकर श्रीएकनाथमहाराज यांची ओवीबद्ध मराठींत टीका आहे. ती 'नाथभागवत' व 'चतुश्लोकी' या नांवानें प्रसिद्ध आहे. या दोन्हीं ग्रंथांस वारकरी प्रमाणभूत समजतात. शिवाय एकादशस्कंद अध्याय दोन यांत 'भागवता' चें जें वर्णन आहे त्याच मार्गानें वारकरी तात्त्विक दृष्टया आपलें इष्ट साध्य करुन घेत असतो.
दारासुतगृहप्राण । करावें भगवंतासी अर्पण । हें भागवतधर्म पूर्ण । मुख्यत्वें भजन या नांव ॥ (नाथभागवत २.२९१).

या वरील दोन कारणांसत्व यास भागवतधर्म असें म्हणतात. हे भागवतधर्मी वैष्णव व वीरवैष्णव यांत फरक आहे.
एका बोटाची निशाणी । परीपाक नाहीं मनीं ॥ तरि तें संपादिलें सोंग । कारणावांचोनिया व्यंग ॥ वैष्णवांचा धर्म । जगीं विष्णु नेणें वर्म ॥ (श्रीतुकाराम सक.सं.गा. २६६७)

या अभंगांत श्रीतुकारामबुवानीं या दोहोंतील फरक स्पष्ट दाखविला आहे. पुष्कळ वेळां या दोन वैष्णवांचा घोंटाळा होण्याचा संभव असल्यामुळें येथें आरंभींच स्पष्ट खुलासा केला आहे.

काल, आरंभ व वाढ:-  वारकरीपंथ हा वैदिकधर्मांतर्गत एक पंथ आहे हें आरंभीं सांगितलेंच आहे. हा वैदिक धर्माच्या तत्त्वाशीं अतिशय जुळतें घेणारा असा पंथ आहे. या धर्मांत सामान्यतः दोन भाग करतां येतील; एक सामान्य धर्म व दुसरा विशिष्ट धर्म. अत्यंत जुनाट व मूळचे जे धर्म आहेत त्यांच्याशीं जगाच्या वाढीबरोबर अस्तित्वांत येणारे जे नवे धर्म यांची जर तुलना केली तर असें दिसून येईल कीं, जुन्या धर्मांचा पहिल्या वर्गांत व नवीन धर्मांचा दुस-या वर्गांत प्रवेश होईल. वैदिकधर्मासारखे जे जुने धर्म आहेत त्यांचे उत्पादक म्हणून एखादी विशिष्ट व्यक्ति निर्दिष्ट करतां येत नसल्यामुळें ते एखाद्या व्यक्तीच्या नांवावर मोडत नाहींत व म्हणूनच ते सामान्य धर्माच्या सदरांत येतील. उलट ख्रिस्तीधर्म, बौद्धधर्म अथवा महंमदीयधर्म हे दुस-या वर्गांत अथवा व्यक्तिविशिष्ट धर्माच्या वर्गांत येतील. यांचा आपण विचार केला तर आपणांस हे मोठे व्यापक धर्म आहेत असें आढळून येईल व सकृदर्शनी हे सामान्य स्वरुपाचे आहेत असेंहि वाटेल. परंतु जरी ते एक दोन खंडें व्यापण्याइतके विस्तृत असले तरी त्यांच्या नांवावारुनच हे धर्म वैदिकधर्मासारखे सामान्य धर्म होऊं शकत नाहींत तर व्यक्तिविशिष्ट धर्मांतच मोडतील, असें कळून येईल. या विशिष्ट धर्माचें स्वरुप म्हणजे मूळच्या धर्माशीं तंटा करुन, बंड पुकारुन त्यांत सुधारणा करण्याकरां ते निघालेले असावेत अशा स्वरुपाचें दिसतें. व म्हणूनच त्यांस व्यक्तिविशिष्ट धर्म असें योग्य रीतीनें म्हणतां येईल. वारकरी पंथ हा अशाच रीतीनें वैदिक धर्मांतील एक शाखा आहे. वर तिच्या नांवाचा जो खुलासा केला आहे त्यावरुन ती आपल्या उत्पादकाच्या नांवावर मोडत नाहीं ही गोष्ट स्पष्ट होणारी आहे. वारकरीपंथ ही शाखा असूनहि आपल्या उत्पादकाच्या नांवावर मोडत नाहीं. यावरून एक गोष्ट अगदीं स्पष्ट होणारी आहे ती ही कीं, वारकरी पंथानें वैदिक धर्माविरुध्द बंड केव्हांहि पुकारलें नाहीं, व हा पंथ आपल्या मूळच्या स्वरुपांत फारसा फरक न करतां आपली वाढ करणारा असा आहे. जशी एखादी फांदी मूळच्या वृक्षाच्या बुंध्यासून इतक्या सूक्ष्म रीतीनें भिन्न होत जातें कीं, ती फांदी ज्यावेळेस बरीच फोंफावते त्या वेळेसच मालकाचें लक्ष तिजकडे जातें. तोंपर्यंत हिचें मूळ कोठें, व तें कसें निघालें याचा त्यास पत्ताहि नसतो. वारकरी पंथाचीहि तशीच स्थिति झालेली आहे. मूळ वैदिक धर्माशीं मिळतें घेणारा किंबहुना वैदिक धर्मास उजळा देणाराच हा पंथ असल्यानें याचा आरंभ केव्हां झाला हें शोधण्याकडे कोणाचेंच लक्ष वेधलें नाही व आज अशी स्थिति आहे कीं, या पंथाचा आरंभ अमक्या शकापासून झाला असें निश्चित सांगतां येत नाहीं. यावरून येवढेंच सिध्द होतें कीं, हा पंथ बराच पुरातन असला पाहिजे.

वारकरी पंथाच्या  कालाचा-उत्पत्ति व वाढ यांचा निर्णय करण्याकरतां व चर्चेकरतां त्याचे खालील भाग पाडल्यास तत्संबंधीं विचार करण्यास सोपें जाणार आहे - (अ) उत्पत्तीचा अथवा ज्ञानदेव यांच्या पूर्वीचा काळ, (आ) ज्ञानदेव व नामदेव यांचा काळ, (इ) भानुदास, एकनाथ महाराज यांचा काळ व , (ई) तुकाराम महाराज निळोबाराय यांचा काल, (उ) तदनंतरचा आजपावेतों पावणे तीनशें वर्षांचा काळ.

(अ) उत्पत्ति:- वारकरीपंथाच्या उत्पत्तीचा निश्चित शक जरी आज देतां येत नाहीं तरी येवढी गोष्ट मात्र निश्चित आहे कीं, सोलापूर ग्याझिटिअरमध्यें जी माहिती पंढरपूर व वारकरी यासंबंधानें प्रसिध्द केली आहे तींत या पंथास तेराव्या शतकाच्या शेवटीं होऊन गेलेले ज्ञानदेव यानीं आरंभ केला असें जें विधान आहे, तें चुकीचें आहे. कदाचित् हें विधान बहिणाबाईचा म्हणून एक अभंग प्रसिध्द आहे त्यावरुन केलेलें असेल-

* संत कृपा झाली । इमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवें रचिला पाया । रचियेलें देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर । तेणें केला हा विस्तार ॥३॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ॥४॥
भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥५॥

या अभंगांत बहिणाबाईंनें वारकरी मंदिराच्या वाढीचा इतिहास फारच सुंदर रीतीनें वर्णन केला आहे. परंतु त्यांतील 'रचिला पाया' याचा अर्थ त्यांनींच आरंभ केला असा नव्हे. श्रीतुकाराममहाराज यांनीं श्रीज्ञानदेव यांची योग्यता व कार्य हीं ज्या अभंगांत वर्णिलेली आहेत, त्यांत ते म्हणतात:-
'जयानें घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥ (श्रीतुकाराम ३८४१ स.सं.था)

आणि हेंच वस्तुस्थितीस धरुन आहे. श्रीज्ञानदेव यांच्या कालाच्याहि पूर्वी वारकरी भक्त होते. श्रीज्ञानदेवांनीं या विखुरलेल्या वारकरी भक्तांची आपल्या स्वयंसिध्द सामर्थ्यानें संघटना केली, आणि पंथास श्रीज्ञानदेवी लिहून सुव्यवस्थितता आणली. अशा रीतीनें या पंथाची संघटना करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता व म्हणूनच बहिणाबाईनें 'ज्ञानदेवें रचिला पाया' असें म्हटलें असावें. श्रीज्ञानदेवांच्या समकालीन असणारे नामदेवराय यांनींहि 'पूर्वी अनंत भक्त झाले । पुढें ही भविष्य बोलले' वगैरे सांगून आपल्या अभंगांत या पंथाची पुरातनता दाखविली आहे. तात्पर्य हा पंथ श्रीज्ञानदेव यांच्या पूर्वी होता एवढीच गोष्ट आतांपर्यंत ठरली आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.

आतां याच्या उगमाविषयीं विचार करूं. पंथाच्या मूळाचा काळ ठरवणें हें दोन गोष्टींच्या कालनिर्णयावर अवलंबून आहे. एक श्री पंढरीस पांडुरंगमूर्तीचा काल व दुसरें श्रीपुंडलीकाचा काल. वारकरी पंथांतील प्रमुख गोष्ट म्हणजे श्रीपंढरीनाथाची वारी ही होय. अर्थात या मूर्तीचा इतिहास जसा मिळेल त्यावर वारकरीपंथाच्या मूळाचा इतिहास बराचसा अवलंबून आहे. त्याचप्रमाणें पुंडलीकाच्या कालावरहि हा इतिहास अवलंबून आहे. कारण नरसिंह अवतार जसा प्रल्हादाकरतां तसा हा श्रीविठ्ठल अवतार व पितृसेवक जो पुंडलीक त्याजकरतां आहे. श्रीद्वारकाधीश श्रीकृष्ण हे पुंडलीकाच्या सेवेनें संतुष्ट होऊन त्याजकरितां पंढरीस आले व विटेवर उभे राहिले ही गोष्ट सकल संतांस मान्य आहे.

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा ॥ चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ (श्रीनामदेव)
पुंडलीकाच्या भावार्था । गोकुळींहुनीं बाला येता ।
निजप्रेम भक्ति भक्तां । घ्या ज्या आतां म्हणतसे ॥
(श्री ज्ञानदेव अभंग १८४ सकल संत गाथा )
पायाळाच्या गुणें पडिलें ठाऊकें । जगा पुंडलीकें दाखविलें ॥
(श्री तुकाराम अभंग ३१२ सकलसंत गाथा)
भक्तामाजी आग्रगणी। पुंडलीक महामुनी ॥१॥ तोचि प्रसाद आम्हासी । विटेवरी हृषीकेशी ॥३॥
(जनाबाई अभंग १६७ सकलसंत गाथा)

शिवाय वारकर्‍यांची, 'शांति'-जिची उदघोषणा कीर्तनाच्या आरंभीं, शेवटीं व प्रसंगोपात मध्येंहि करतात, ती-पुंडलीकाकरतां देव आले हेंच दाखवतें. ती शांति अशी आहे:-

पुंडलीक वरदा  हरिविठ्ठल

सोलापूर ग्याझिटिअरमधील माहिती देणा लेखकानें या घोषणेचा अर्थ 'हे पुंडलीका, वर दे हरि विठ्ठल' असा केला आहे. हा अर्थ कोणांहि वारकर्‍यास कबूल नाहीं. या शांतीचा अर्थ 'विठ्ठल (असा) पुंडलीका हर (शंकर) वर दे' असाहि करतात. वास्तविक हिचा अर्थ 'पुंडलीकाला वर देणार्‍या हे, हरि विठ्ठला' अशा संबोधनस्वरुपाचा आहे. दुसरा अर्थ पुण्डलीकाची जी गोष्ट तीस धरून आहे, पण तिसर्‍याच अर्थानें ही शांति हल्लीं बहुतेक प्रचारांत आहे. असो, या चर्चेवरून येवढें निश्चित ठरलें कीं, पुण्डलीकाकरतां देव पंढरीस आले. अर्थात पुंडलीकाचा कालनिर्णयहि वारकरी पंथाच्या उगमाच्या कालनिर्णायस बराच मदत करणारा आहे. आतां या दोहोंसंबधीं जो उपलब्ध पुरावा आहे त्याचा विचार करूं.

प्रथमतः श्री पांडुरंगमूर्तीसंबंधीं जो उपलब्ध पुरावा आहे, त्याचा विचार करुं. त्याचे चार भाग करतां येतील - (१) पौराणिक, (२) अबंगी (३) शिलालेखीय व (४) इतर.

(१) श्रीपांडुरंगकथा ही पद्मपुराणांत आहे. परंतु तेथें कालदृष्टया विशेष कांहीं मिळण्यासारखें नाहीं. (२) अभंगांत जो पुरावा आहे, तो पुढीलप्रमाणें आहे. (अ) वर दिलेली श्रीनामदेवांनीं केलेली पांडुरंगाची आरती - युगें अठ्ठावीस विटेवरी उभा..... (आ) हें नव्हें आजिकालीचें । युगें अठ्ठासांचें... (श्रीज्ञानदेव ९०, सकल संतगाथा) (इ) युगें झाली अट्ठावीस । अजुनी न म्हणसी बैस ॥ (श्रीतुकाराम ३१६, स.सं.गा.)

या अभंगी पुराव्यावरुन देव विटेवर अठ्ठावीस युगें उभे आहेत असें ठरतें. नामदेवराय यांच्या आरतींत 'युगें अठ्ठावीसच्या' ऐवजीं 'उगे उठ्ठावीस' असाहि पाठ, श्रीपांडुरंगमूर्तीचा काल तर्किक दृष्टीस पटावा म्हणून सुचविण्यांत येतो. पण यांत त्या आरतीचें एकतर सर्व स्वारस्य नाहींसें होतें व दुसरें कोणताहि वारकरी 'उगे उठ्ठावीस' असें म्हणतांना आढळून येणार नाहीं. कोणत्याहि नामदेवाच्या गाथ्यांत हा पाठ दिसून येत नाहीं. अर्थात 'उगे अठ्ठावीस' असा पाठ घेऊन चार वेद, सहा शास्त्रें, अठरा पुराणें ही ज्याच्याविषयीं उगीं आहेत असा अर्थ करणें हें केवळ बुद्धिकौशल्य दर्शविणारेंच ठरणारें आहे. 'युगें अठ्ठावीस' हा शब्द अष्टाविंशतितमे युगे अठ्ठाविसाव्या युगीं अशा अर्थानें वापरलेला असण्याचा संभव आहे. पंचांगाच्या प्रारंभीं जी माहिती दिलेली असते तीवरून आपल्या कालगणनेप्रमाणें हें वैवस्वत मनूचें अठ्ठाविसावें महायुग चालू आहे. अर्थांत 'युगें' ही सप्तमी घेतल्यास वारकरी श्रध्देस योग्य असा या आरतीचाहि अर्थ लागणें हें शक्य कोटींत येणार आहे. तात्पर्य या अबंगी पुराव्यावरुन 'जुनाट युगादीचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें' हें जें श्रीतुकारामबुवांनीं म्हटलें आहे त्यापेक्षां जास्त सिद्ध होत नाहीं.

पण यावरून येवढी गोष्ट मात्र निश्चित होते कीं, ही पांडुरंग मूर्ती श्रीज्ञानदेव, नामदेव यांच्या मतें फार पुरातन, स्वयंभु अशी आहे, अर्थात त्यांच्या काळाच्या बर्‍याच पूर्वीच्या काळीं तिची उपलब्धी  असली पाहिजे. 'नित्य हरिकथा नामसंकीर्तना संतांचें दरुषन सर्वकाळ ॥ पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठ्ठल एकाकी सुखरुप ॥' (नामदेवराय ८९५ सकलसंतगाथा) यांत (श्री ज्ञानदेवांचे वडील बरींच व्रषें वारी करीत असत असें नामदेवराय म्हणतात. अर्थात् या अभंगावरून एक गोष्ट मात्र निश्चित होत आहे ती ही कीं, ज्ञानेश्वरमहाराज व नामदेवराय यांच्या पूर्वीहि पंढरीची वारी चालू होती. आपणांस याहिपेक्षां थोडे मागें निश्चित रीतीनें जातां येईल. आद्य शंकराचार्य यांचें -

महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरकाय दातुं मुनीद्रैः ॥
समागत्य तिष्ठन्तमानंदकंदं परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम् ॥

हा श्लोक ज्याचा आरंभ आहे असें एक पांडुरंगाष्टक प्रसिद्ध आहे. या अष्टकावरुन श्रीमदाचार्य यांच्या कालींहि श्रीपांडुरंग दैवत प्रसिध्द होतें, ही गोष्ट सिद्ध आहे. श्रीमदाचार्य यांचा काल साधारणतः  आठवें शतक असें ठरवितात. तेव्हां तत्पूर्वी म्हणजे शकाच्या सुरुवातीपासूनच या दैवताची चांगलीच प्रसिद्धि असावी असें उघड होणार आहे. (या तर्कास ४ थ्या तर्‍हेच्या पुराव्यावरुन बळकटीहि येणारी आहे). परंतु विचिकित्सक दृष्टि येवढयावर संतुष्ट होणारी नव्हे. वास्तविक हे अष्टक आद्य शंकराचार्य यांचेंच आहे यासंबंधीं द्विधा मत नाहीं. श्रीमत् आद्य शंकराचार्य यांच्या ग्रंथांचें संशधन करुन शृंगेरी मठातर्फें वाणीविलास छापखान्यांत त्यांच्या ग्रंथाची जी प्रत प्रसिद्ध झाली आहे तींत या अष्टकाचा समावेश करण्यांत आलेला आहे. परंतु येवढयावरूनच अधिक बलवत्तर पुराव्याभावीं हें अष्टक आद्यशंकराचार्यांचें आहे असें सिद्ध होऊं शकत नाहीं, व हा पुरावा लंगडा पडतो.

(३) म्हणून आतां तिसर्‍या तर्‍हेच्या पुराव्याकडे वळूं. या बाबतींत तीन पुरावे भरभक्कम आहेत. एक श्रीपांडुरंगाच्या मंदिरांतील चौर्‍यांशीचा शिलालेख शके ११९५ मधील, दुसरा त्यांतीलच सोळखांबीस जातांना वरच्या बाजूस असलेल्या शिळेवरील संस्कृत शिलालेख शके ११५९ मधील व तिसरा श्रीक्षेत्र आळंदी येथील हरिहरेंद्र स्वामीच्या मठांत सांपडलेल्या कोणा कृष्णस्वामीच्या समाधीवरील शके ११३१ चैत्र वद्य १० भौम वासरचा लेख. या तिहींची चर्चा राजवाडे, पांगारकर वगैरेंनीं केलेली आहे. तूर्त आम्हांस येथें शेवटच्या लेखाचा विचार करणें आहे, कारण तो सर्वांत जुना आहे. तत्संबंधीं लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट अशी कीं, ज्या कृष्णस्वामीच्या समाधीवर हा शक सांपडतो तीवर श्रीविठ्ठलरुक्मीणीच्या मूर्ती आहेत. व ही समाधि पंढरपुरांतील नसून श्रीक्षेत्र आळंदी येथील श्रीज्ञानदेव यांच्या जन्माच्या पूर्वी साठ वर्षांपूर्वींची आहे. अर्थात यावरून इतकें निश्चित होतें कीं श्रीविठ्ठलरुक्मिणी हें दैवत श्रीनामदेव यांच्या कालाच्या पूर्वी चारपांचशें वर्षें चांगलेंच प्रसिद्ध असावें. व श्रीमदाचार्यांनीं यावर अष्टक केलें ही गोष्ट याजबरोबर विचारांत घेतल्यास हें दैवत शालिवाहन शकाच्या आरंभींच दोन तीन शतकापासून भरभराटींत असावें असें निश्चित मानण्यास हरकत नाहीं.

(४) आतां राहिला चौथ्या प्रकारचा पुरावा. आतांपर्यंत आम्हीं ज्याचा उल्लेख केला नाहीं, व ज्यास चौथ्या नंबरच्या पुराव्यांत घातलें याचें कारण इतिहासतज्ञांच्या कसोटींत जो अजून तावून सुलाखून उतरला नाहीं, असा 'मालूतारण' नामक ग्रंथाचा पुरावा. याची विश्वसनीयता ठरल्यास श्रीपांडुरंग मूर्तीचा शालीवाहन शके ४१५ पासून इतिहास सांपडतो, असें सिद्ध होईल. मालूतारण ग्रंथांतील उतारा लागूपुरता पुढें देत आहोंत. मालूतारण हा ग्रंथ मालू नांवाच्या इसमानें लिहिला. तो जातीचा सोनार होता. या ग्रंथाचे अध्याय ३२ आहेत.

'विक्रम राजानें शालिवाहनास मारण्याचा विचार केला. व मोठें लष्कर घेऊन त्याच्यावर हल्ला केला. शालिवाहन व त्याचा प्रधान रामचंद्रपंत सोनार हे फिकीरींत पडलें. तोंच अकस्मात् चार कोळी सरदार दहा हजार सैन्यानिशीं त्यास येऊन मिळाले. त्यांचीं नांवें (१) सावजी व॥ दरभाजी आधटराव, (२) कामाजी व॥ दामाजी नेहतराव, (३) देवजी व॥ केरुजी अभंगराव व (४) नाभाजी व॥ सकु परचंडराव. या चार सरदारांनीं मोठा पराक्रम केला व रामचंद्रपंताच जय मिळाला. त्यानें प्रसन्न होऊन त्यांस चार दिशेस चौघांस स्थापन केलें. व त्याबद्दल सनदा करुन दिल्या. नंतर राजा विक्रम यास सर्व देव सांगतात कीं, तुमचा शक संपला आहे. आतां शालिवाहन शक सुरु होणार आहे. विक्रमानें तें कबूल केलें. व सर्व वस्त्रें शालिवाहानाच्या स्वाधीन केलीं. व आपण स्वस्थ बसलें; प्रथमनाम संवत्सरें चैत्र शु॥ १ रोज रविवार. पुढें दिंडीरवनांत वस्ती तीन योजनें केली. दिंडीरवनांतील झाडें तोडून वस्ती केली. मल्लकार्जुनाचें देऊळ, पांडुरंगाचें देऊळ, मध्यभाग वोवरी व चोहोंबाजूस दरवाजे, एक लाख रुपये महाद्वार पुंडलीक राया वस्तीकरुन पांडुरंगनगरी-पंढरपुर स्थापन केली. पांडुरंगप्रसन्न होऊन रामचंद्रपंतास भेट दिली. महाद्वारापासून मारुतीपर्यंत वस्ती अर्पण केली व चार कोळी सरदारांस पांडुरंगाचे भोंवतीं वस्ती करुन दिली. शालिवाहन राजानें सर्व मालकी रामचंद्रपंतास दिली. रामचंद्रपंतानें प्रत्येक कोळी सरदारास एक हजार याप्रमाणें सैन्य, पुंडलीक, विठ्ठल, मल्लकार्जुन, काळभैरव वगैरे देवतांचीं उत्पन्ने वंशपरंपार करुन दिलीं. याप्रमाणें शालिवाहनानें सहीशिक्कयानिशीं बक्षीसपत्रें करुन दिलीं. शके पांच अक्षरी सुंदर नामसंवत्सरे चैत्र शु॥ ७ रविवार. देशमुख देशपांडे पाटील पटवारी ४८ चाहूर जमीन इनाम करुन दिली आहे.'

हा समग्र ग्रंथ शुद्ध नाहीं व त्याची लेखी प्रत आम्हांस पाहण्यास मिळाली नाहीं. त्याच्या छापील प्रतीवरून हा उतारा दिला आहे. ह्या ग्रंथाची विश्वसनीयता ठरल्यास श्रीपांडुरंगासंबंधानें ऐतिहासिक माहिती बरीच जुनी मिळते असें सिद्ध होईल.

याच भागांत श्रीपांडुरंग मूर्तीसंबंधानें असणारीं दोन मतें यांचाहि जातां जातां विचार करणें अवश्य आहे. कित्येकांच्या मतें ही मूषर्त जैनांची आहे; तर कित्येकांच्या मतें ही कानडी आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांनीं छापून प्रसिध्द केलेल्या 'भरतखंडाच्या अर्वाचीन कोशांत' पुंडलीकासंबंधीं माहिती देतांनां ही पाडुंरंगमूर्ती जैन आपली समजतात असें मानण्यास त्यांच्या जवळ असलेले श्लोक पुराव्यादाखल दिले आहेत –

“नेमिनाथस्य या मूर्तिस्त्रिषु लोकेषु विस्तुता । द्वौ हस्तौ कटिपर्याये स्थापयित्वा महात्मनः ॥१॥ मूर्तिस्तिष्ठति या सम्यक् जैनेंद्रेणच पूजित । अहिंसा परमं धर्म स्थापयामास वै सचायुगैस्तु४ मनुजा२क्षीणि विप्र७भुमिश्चवास१के । मेलने धर्मरास्य शकस्यच गतावधिः । आषाढे शुक्लपक्षे तु एकादश्यां महातिथौ । बुधेच स्थापयामास विरोधकृत वंत्सरे ॥“ (जैनग्रंथ)

हे श्लोक देऊन गोडबोले यांनीं लगेच असें म्हटलें आहे कीं, या वरील श्लोकांतील गोष्टी सिद्ध होण्यास बराच सबळ असा पुरावा पाहिजे. तदभावीं यांतून फारसें निष्पन्न होण्यासारखें नाहीं. यावरून फार झालें तर येवढेंच सिद्ध होईल कीं, महाराष्ट्रांत जैन मताचा प्रसार झाला तेव्हां जैनराजानें ही मूर्ति आपल्या ताब्यांत घेऊन अहिंसा धर्म स्थापनेकडे तिचा उपयोग केला. वास्तविक ही मूर्ति जैनांची नव्हे. व ही गोष्ट अंतःपुराव्यावरून म्हणजे मूर्तीच्या आंगीक भावावरुनच सिद्ध होणारी आहे. श्रीपंढरीनाथ हे विटेवर कमरेवर हात ठेवून उभे आहेत. पैकीं एका हातांत शंख आहे व एका हातांत चक्र आहे व कपाळावर, पाठीवर असलेल्या शिंक्याची दोरी आहे. या सर्व,मूर्तीत दिसून येणार्‍या खुणांवरून ही मूर्ति जैनांची नाहीं हें निःसंशय सिद्ध होणारें आहे. या खुणांवरून “पांडुरंग बाळमूर्ति । गाई गोपाळ सांगाती । येऊनिया प्रीति। उभे समचि राहिले ॥”   (श्री तुकाराम, ३०३ सकलसंतगाथा) यांत वर्णन केल्याप्रमाणें ही मूर्ति श्रीकृष्णाचें गोकुळांतील बाळरूप दाखवणारें ध्यान आहे हें सिद्ध होत आहे. ज्याप्रमाणें ही मूर्ति जैनांची आहे म्हणून कित्येकांचा समज आहे त्याचप्रमाणें कित्येकांचा ही मूर्ति कर्नाटकी अथवा कानडी असाहि समज आहे. व त्यास प्रमाण ते श्रीज्ञानदेवांचे पुढील अभंग बहुश: देतात.

“कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । येणें मज लावियलें वेधीं ।
खोळबुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या सादु नेदी ॥२॥ (श्री ज्ञानदेव अभंग ७ सकलसंथगाथा)
कानडिया विठोबा कानडिया । बहु आवडसी जीवापासोनिया ॥ (श्रीज्ञानदेव अभंग).

वास्तविक या अभंगाचा संपूर्ण विचार केला तर यांतील 'कानडा' अथवा 'कर्नाटकु' हे शब्द कानडा मुलुखातील या अर्थानें वापरलेले नाहींत हें स्पष्ट दिसेल. जर या अभंगांत संबंध नसतांनासुद्धां 'कानडा' हा शब्द कानडी मुलखांतील या अर्थानें घ्यावयाचा तर कानडा हा शब्द 'गोवळा' या अर्थानेंहि उपयोगांत आणतात, तेव्हां येथें 'कानडा' हा शब्द 'गोवळा', गाई पालन करणारा' याहि अर्थानें घेण्यास कोणती हरकत आहे? दोन्हीकडेहि संबंधाचा अभाव हें प्रमाण सारखेंच लागू आहे. श्री ज्ञानदेवकालीं कानडा हा शब्द 'न कळणारा' अशा अर्थानें वापरण्यांत येत असे.
आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जें कानडें । काइस याहि सांगडें । नव्हे जें वस्तु ॥ (श्री ज्ञानेश्वरी १२,३१). हें परिसतां जरि कानडें (दुर्बोध) ।.... (ज्ञाने ६,१२१). वेदासी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरिये ॥ नाम बरवें रुप बरवें । दर्शन बरवें कानडियाचें ॥
(श्री नामदेव अभंग ५४२, स.सं.गा.).

तात्पर्य अभंगी पुराव्यावरून हा देव मूळचा कानडा मुलुखांतला अथवा कर्नाटकी लोकांनींच पूजिलेला असा होता हें सिद्ध होत नाहीं.

आतांपर्यंतच्या या लांबलेल्या चर्चेवरून येवढीच गोष्ट सिद्ध होते कीं, गेलीं हजार दीड हजार वर्षें श्री पंढरीनाथ हे पुंडलीकास दिलेली भाक पाळीत विटेवर उभे आहेत, व श्री ज्ञानदेव-नामदेव यांच्याहि पूर्वी आषाढी-कार्तिकी शुध्द एकादशीस पंढरपुरास संतभार जमत होता. या मूर्तीच्या इतिहासांवरून तरी अमक्याच सनापासून या पंथाचा उगम झाला असें मात्र निश्चित सांगतां येत नाहीं.

उगमाच्या कालनिर्णयाच्या बाबतींत दुसरें गमक म्हणजे पुण्डलीकाचा कालनिर्णय. यासंबंधी तर पूर्वीपेक्षांहि अनिश्चितता आहे. पुण्डलीक हा ब्राह्मण होता, तो काशीस जात असतां कुक्कुट स्वामींच्या आश्रमांत त्यास गंगायमुनानदींचें दर्शन झालें व तेथून पश्चात्ताप पावून तो पितृमातृभक्त बनला व या त्याच्या सेवेनें संतुष्ट होऊन देव त्याजकरितां आले, त्यानें वीट मागें भिरकावली व त्यावर देव उभे राहिले ही कथा प्रसिद्ध आहे. पण या बाबतींत सोलापूर ग्याझिटिअरचे लेखक यांनीं एक चमत्कारिक विधान केलें आहे. पुंडलिकाचे वडील व मातुश्री यांचीं अनुक्रमें जानुदेव व मुक्ताबाई अशीं नांवें देऊन लेखक म्हणतो कीं काशीस जात असतां पुंडलीकाचा मुक्काम वैष्णव रोहिदास चांभार यांच्या जवळ होता. आतां भक्त रोहिदास हे कबीराच्या समकालीन व कबीर हे श्री ज्ञानदेवाच्या समकाली. अर्थांत रोहिदास श्री ज्ञानदेवांचा समकालीन होय. व श्रीज्ञानदेव यांच्या किती तरी पूर्वी पुंडलीक होऊन गेला असला पाहिजे हें वर मूर्तीच्या इतिहासाची जी चर्चा केलीं आहे तीवरून सिद्ध होणार आहे. तात्पर्य ग्याझिटिअरमधील ही माहिती अत्यंत शंकनीय किंबहुना  निराधार आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. या पुंडलीकाच्या कालाच्या चर्चेंतहि फारशी नक्की माहिती मिळत नाहीं. तेव्हां वर जें म्हटलें आहे कीं अमूक एका सनापासून या पंथास सुरुवात झाली असें जरी सांगतां येत नाहीं तरी श्री ज्ञानदेव व नामदेव यांच्या कालाच्या म्हणजे तेराव्या शतकाच्या बर्‍याच पूर्वकालापासून श्री पंढरीनाथ हें दैवत भक्तानुग्रहाचें कार्य भक्ताज्ञेवरून करीत होतें  व त्याच वेळेस आषाढ शुद्ध एकादशीस व कर्तिक शुद्ध एकादशीस बरीच यात्रा जमत असे ही गोष्ट  निर्विवाद आहे. आतां आपण या पंथाच्या वाढीच्या दुसर्‍या भागाकडे वळूं.

(आ) श्री ज्ञानदेव व नामदेव यांचा काल:- या भागांत आम्ही केवळ श्री ज्ञानदेव व नामदेव या जोडीच्या कालाचा म्हणजे शके ११४३ ते शके १२७२ पर्यंतचाच विचार करणार आहोंत. हें स्पष्ट  सांगण्याचें कारण डॉ. भांडारकर प्रभृति मंडळीच्या मतें श्री ज्ञानदेव व नामदेव यांच्यामध्यें एका शतकाचें तरी अंतर असावयास पाहिजे. अशा प्रकारचें मत एका काळीं प्रचलित होतें पण तें मत निराधार आहे ही गोष्ट, सर्वमान्य व संशयरहित असा नरसिंह मेहत्याच्या काव्याचा पुरावा आणून पंडित पांडुरंगशमी यांनीं चित्रमयजगतांतील आपल्या लेखांत सिद्ध केली आहे. तेव्हां आम्ही श्री ज्ञानदेव व नामदेव हे समकालीन होते ही गोष्ट सिद्ध धरूनच या विभागास श्री ज्ञानदेव व  नामदेव यांचा काल असें नांव दिलें आहे. जातां जातां आणखी एका गोष्टीचा खुलासा होणें अवश्य आहे. जसा नामदवे व ज्ञानदेव भिन्न कालीं होऊन गेले असा सुशिक्षितांत एकवेळ समज होता तसाच, एक ज्ञानेश्वरी कर्ते ज्ञानदेव होते असाहि समज या समाजांत रुढ होता. या शंकेचें निरसन हरिभक्त पंडित, भिंगारकरबुवा यांनीं लिहलेल्या निबंधांत उत्तम रीतीनें केलें आहे. व आतां तर अभंगांतील भाषा व विचार या अंर्गत पुराव्यावरूनहि तीच गोष्ट निर्विवाद सिद्ध झालेली आहे. तेव्हां अभंगकर्ते ज्ञानदेव व ज्ञानेश्वरीकर्ते ज्ञानदेव एकच होते हें सिद्ध आहे असें समजूनच या  विभागांतील चर्चेची उभारणी केली आहे.

वारकरीपंथ हा जरी श्री ज्ञानदेव व नामदेव या जोडीच्या कालाच्या पूर्वी होता तरी त्याचा, कार्यक्षमता या दृष्टीनें आरंभ या जोडीच्या कालांतच झाला ही गोष्ट निर्विवाद आहे. गुरुचा मोठेपणा पुष्कळ अंशीं शिष्याच्या मोठेपणावर अवलंबून आहे. तसाच किंबहुना त्याहिपेक्षां जास्त, देवाचा त्याच्या भक्ताच्या श्रेष्ठपणावर अवलंबून आहे. श्रीज्ञानराज हे ज्ञान्यांचे चक्रवर्ती राजे, योग्यांतील योगी व अनुभवियांचे शिरोमणी होते. हे जेव्हां ‘बापुरखुमादेवीवर विठ्ठलाचे भजक’ बनले. त्यावेळीं या दैवताच्या भजनास विशेषच जोर चढला.

माझें जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगीं मन रंगलें । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥
(श्री ज्ञानेश्वर अभंग १०२ स.सं.गा.)
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया (श्री ज्ञाने. अ. ३२४)

श्री निवृत्तीनाथ (११९५), श्रीज्ञानदेव (११९७), सोपानदेव (११९९), मुक्ताबाई (१२०१) हीं चार अलौकिक भांवडें होतीं. यांच्य कुळांत यांची आजी नीराबाई इजला गहिनीनाथांचा उपदेश होता.

विठ्ठल आवडी ठेवियलें नाम । निराईस प्रेम गहिनीनाथीं ॥ (श्रीनामदेव अभंग ८८९ स.सं.गा.). व निवृत्तिनाथांच्या अल्प वयांतच गहिनीनाथांचा त्यांस उपदेश मिळून ते कृतार्थ झाले व त्यांनीं आपले बंधू व बहीण यांजला कृथार्थ केलें. यामुळें अत्यंत अल्पवयांत म्हणजे मौंजीबंधनाकरितां शुद्धिपत्र मिळविण्यास प्रतिष्ठान नगरीं गेल्यापासूनच त्यांचें अलौकिक तेज चमकण्यास प्रारंभ झाला. या चारी भावंडांचा विठ्ठलरुक्मिणीचे पोटीं चमत्कारिक परिस्थितींतील झालेला जन्मच त्यांच्या अंगचें अलौकिक सामर्थ्य इतक्या अल्प वयांत लोकांच्या नजरेस आणण्यास कारणीभूत झाला. पैठणाहून शुद्धिपत्र मिळवून अथवा शुद्धीनिरपेक्ष शुद्धस्वरूप आपण कसे आहोंत हें पैठणकर ब्राह्मणांस दाखवून ही मंडळी ज्या वेळीं परत फिरली त्यावेळीं वाटेंत, महाराष्ट्रभूमींत, गोदावरीच्या दक्षिण तीरावर असणारें, श्रीमोहिनीराजाच्या वास्तव्यानें पुनीत झालेलें जें नेवासें क्षेत्र त्या ठिकाणीं, आपले गुरु जे निवृत्तिनाथ त्यांच्या सान्निध्यांत, आपल्या वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी श्रीज्ञानदेव यांनीं भगवद्गीतेवर भावार्थदीपिका उर्फ ज्ञानदेवीरुपी मराठी अलंकार चढविला, किंबहुना वारकरीसंप्रदायाचा पायाच भरभक्कम घातला. श्रीज्ञानदेवी अथवा श्रीज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या भाषासौष्ठवानें आंतली ज्ञानभक्तियोग यांच्या मधुरमिलाफानें, मराठी भाषा जोंपर्यंत हयात आहे तोंपर्यंत अजरामर राहिल यांत शंका नाहीं. ख्रिस्त धर्मांत जसें बायबल, मुसुलमानी धर्मांत कुराण तशी वारकरी पंथांत श्रीज्ञानेश्वरी या ग्रंथाची मान्यता आहे. सर्व वारकरी समाज या ग्रंथास व ग्रंथकर्त्यास 'माउली' या अत्यंत प्रेमळ नांवानें संबोधीत असतो. श्रीज्ञानदेवांनीं अनुभवामृत, चांगदेवपासष्टी, हरिपाठ अभंग वगैरे पुष्कळ ग्रंथरचना मराठींत केली आहे. त्याचप्रमाणें त्यांचे गुरु निवृत्तिनाथ, बंधु सोपानदेव व भगिनी मुक्ताबाई यांनींहि महाराष्ट्रीय भाषेंतच अभंगरचना केली आहे. सोपानदेवानींहि गीतेवरच 'सोपानदेवी' नांवाची मराठी भाषेंत टीका केली आहे असा उल्लेख सांपडतो. प्रस्तुत एक 'सोपानदेवी' त्यांच्या नांवावर प्रसिद्धहि आहे. पण ही त्यांची कितपत आहे याबद्दल संशय घेण्यास बरीच जागा आहे.

श्रीज्ञानदेवांनीं ज्ञानेश्वरीच्या शेवटीं म्हटल्यावरून त्यांच्या काळीं 'स्वराज्य' होतें ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु वैदिक धर्म मात्र महाराष्ट्रापुरता तरी निदान विस्कळित होण्याचा रंग दिसूं लागला होता. श्रीज्ञानदेवांनां, धर्माचें मर्म बाजूला राहून बाह्य गोष्टींवरच लोक जोर कसा देऊं लागले होते ही गोष्ट स्वानुभवानें कळून चुकली होती. त्यांच्या दृष्टीनें

##नकरी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥ध्रुव०॥ (भानुदासमहाराज अभंग स.सं. गाथा ५०)

पुढें अशी करुणा भाकीत असतां शिपायांनीं त्यास सुळापाशीं ओढून नेलें तों चमत्कार असा झाला कीं सुळास पानें फुटलीं. ही बातमी राजाच्या कानीं गेल्यावर राजा स्वतः तेथें आला व भानुदासमहाराजांचा आदरसत्कार करुन मूर्ति परत घेऊन जाण्यास परवानगी दिली. भानुदासमहाराज जाऊन इतक्या गोष्टी होऊन मूर्ति परत येण्यास चार महिने लागले व मूर्तीची मिरवणूक कार्तिक शु॥ ११ स निघून पुनः तिची पूर्वीच्या ठिकाणीं स्थापना झाली. पूर्वी आषाढी व कार्तिकी अशा दोन्ही वार्‍यांस पंढरपुरास समाज जमत असे. पण त्या वेळीं आषाढी एकादशीचा विशेष मान होता. भानुदासमहाराजांनंतरच कार्तिकीच्या वारीस विशेष महत्व चढलें व अद्द्यापहि पुष्कळशी संतमंडळी पंढरपुरांतच या वेळेस संत राहिले म्हणून चार्तुर्मास करतात. जातां जातां एका गोष्टीचा खुलासा येथें करणें अवश्य आहे. सोलापूरच्या ग्याझिटिअरमधील वारकरी पंथाच्या संबंधीं लिहणार्‍या लेखकाच्या मतें कार्तिकी एकादशीस वारी भरण्याचे कारण श्रीकृष्ण हे कार्तिकी एकादशीस निजधामास गेले हें होय. परंतु श्रीमदभागवतांत अशा तर्‍हेचा उल्लेख कोठेंहि आढळून येत नाहीं. मुळांत आषाढी व कर्तिकी ह्या वार्‍या शयनी-प्रबोधिनी यांच्या महत्त्वावरूनच सुरु झाल्या असाव्यात. व कार्तिकीस विशेष महत्त्व येण्याचें कारण तर आतांच दिलें आहे. अर्थात ग्याझिटिअरमधील लेखकाचें मत निराधार आहे असें मानण्यास हरकत नाहीं.

'श्रीज्ञानदेवानंतर तुकाराममहाराजापर्यंत वारकरीपंथास चालना देऊन तो सुसंघटित करण्याचा प्रयत्न कोणीच केला नाहीं' असलें अविचारित विधान सोलापूर ग्याझिटिअरमध्यें सांपडतें. वास्तविक असा प्रयत्न थोडया प्रमाणांत भानुदासमहाराज पैठणकर यांनींच केला. पण तो विस्तृत प्रमाणावर भानुदासमाहाराजांच्यानंतर दोन पिढयांनीं श्रीतुकाराममहाराज यांच्या अव्यवहित पूर्वकालींच झाला. व तो भानुदासांचे पणतू श्रीएकनाथ महाराज पैठणकर यांनीं केला. यांच्या कामगिरीची रुपरेषा थोडक्यांत लिहावयाची म्हणजे श्रीज्ञानदेव-नामदेव या जोडीच्या कामगिरीसारखीच कामगिरी ग्रंथलेखनद्वारां व कीर्तनभजनद्वारां यांनीं केली. श्रीनाथानां ईशकृपेनें आयुष्य एकावन्न वर्षें (१४७०-१५२१) लाभलें होतें. परमात्मकृपा ही गृहव्यवस्थेचा भार अंगावर पडण्यापूर्वीच श्रीजनार्दनस्वामी यांचेद्वारा लाधली होती. अपूर्व प्रारब्धानें प्रपंचांतहि सहधर्मचारिणीहि गिरजाबाईसारखी मूर्तिमंत शांतीच मिळाली होती.  या दुर्लभ योगामुळें नाथांचा आयुष्यक्रम त्यानीं भागवतांतून व अभंगांतून वगैरे वर्णन केल्याप्रमाणें तंतोतंत शांतिब्रह्मासारखा चालला होता.

आम्ही वर, श्रीनाथांची कामगिरी श्रीज्ञानदेव व नामदेव या जोडीच्या कामगिरीसारखी आहे असें त्यांच्या कामगिरीचें थोडक्यांत वर्णन केलें तें तात्त्विक दृष्टया किती यथार्थ आहे हें पुढें पाहूं. पण तूर्त केवळ त्यांच्या ग्रंथरचनेकडेच दृष्टि दिली तरीहि आमच्या म्हणण्याची सत्यता पटणारी आहे. श्रीनामदेवांनीं अभंगवृत्तांतच सर्व रचना केली. श्रीज्ञानदेवांनीं अभंग केले पण बहुतेक सर्व रचना ओव्यांत केली. नाथांनीं ओवी व अभंग या दोन्हींतहि सारखीच ग्रंथरचना केली आहे.

श्रीनाथांनीं श्रीमद्व्यसकृत भागवतांपैंकीं एकादशस्कंदावर ओंवीबद्ध टीका लिहून श्रीज्ञानेश्वरीस जोड दिली, याशिवाय त्यांचे हस्तामलक, स्वात्मसुख, आनंदलहरी, शुकाष्टक, भागवतस्कंद २ अ.९ यांवर चतुःश्लोकी भागवत, रुक्मिणीस्वयंवर असे ओंवीबद्ध ग्रंथ लहान लहान आहेतच याशिवाय आणखी ओवीबद्ध ग्रंथ-जो त्यांच्याकडून पुरा न झाल्यामुळें त्यांच्य कृपाप्रसादानें गावबानें पुरा केला तो म्हणजे भावार्थ रामायण. इतकी विस्तृत ओवीबध्द ग्रंथरचना श्री नाथानीं केली आहे. याशिवाय नाथानीं अभंगरचनाहि बरीच केली आहे. त्यांचे अभंग चार हजारावर प्रसिद्ध आहेत. नाथांचे अभंग अत्यंत बहारीचे आहेत. विशेषतः त्यांचीं रुपकें, वासुदेव, आंधळे, फुलंवरा, भारुड हीं तर मनाला चटका लावून सोडणारीं आहेत. नाथांनीं वारकरी पंथास कसा उजळा दिला हें त्यांच्या भागवताच्या व अभंगांच्या वाचनावरून उत्तम लक्षांत येणारें आहे. नाथांनीं जरी श्रीमद्भागवतावर टीका केलेली असली तरी सूक्ष्म दृष्टीनें पाहणार्‍यास असें दिसून येईल कीं एकनाथी भागवत हें श्रीज्ञानेश्वरीरुपीं सूत्रावरील भाष्यच आहे. किंबहुना तो श्रीज्ञानेश्वरीचा दुसरा अवतारच असें म्हणावयास हरकत  नाहीं. श्रीज्ञानेश्वरी हि 'अबालवृध्दस' परमार्थ सुबोध व्हावा एवढयाकरितां ज्ञानराजांनीं लिहली ही गोष्ट खरी. तसेंच ज्ञानेश्वरीची भाषा गोड व मार्दवपूर्ण, दृष्टांत चढते, मार्मिक व पटणारे, हें सर्व खरें. परंतु तीनशें वर्षांत भाषेंत अंतर बरेंच पडलें. शिवाय त्यांतील विचार व ग्रंथित केलेले अनुभव इतके उच्च आहेत कीं, सामान्य मनुष्यहि ते वाचीत असतां उंच फेकला जातो व त्या हवेंत त्यास श्वासोच्छवास करणेंहि फारवेळ मुष्कलीचें होतें. लिहिणार्‍याची भूमिकाच अति उच्च असल्यामुळें वाङ्मयहि फार गोड पण अति उच्च दर्जाचें निघालें. यामुळे फारच थोडक्या काळात असा प्रसंग येऊं लागला कीं, साठीच्या माणसांनींहि कर्त्याच्या विशींत लिहिलेला ग्रंथ समजण्यास डोक्यास ताण पडूं लागला.

श्रीनाथांचें याहून अगदीं भिन्न चरित्र. स्वतः गृहस्थाश्रमी व स्वभावहि मूर्तिमंत शांतिब्रह्म यामुळें त्यांची भाषा व अनुभव हीं साहजिकच सर्वसाधारण मनुष्यास पटतील, कोणाच्याहि आटोक्यांत येतील अशींच होतीं. नाथांच्या भागवतांत अद्वैत वेदांत तर प्रतिपाद्यच आहे पण त्यांत हरिभक्ति व 'नामस्मरण यांचीहि कीर्ति अत्यंत विशद करुन सांगितलीच आहे. व तिचा वारकरी समाजावर इतका परिणाम झाला आहे कीं, श्रीनाथांनीं जरी श्रीज्ञानेश्वरीचें संशोधन केलें व तिला उजेडांत आणली तरी कित्येक वर्षें अशी स्थिति होती कीं श्रीज्ञानेश्वरी वाचावयाची व पाठिशी वागवावयाची पण कीर्तन म्हणजे तें श्री तुकोबांचे अभंग व नाथांच्या ओव्या यांच्यावर चालावयाचें. हल्ली मात्र पुनः श्री ज्ञानेश्वरीच विशेष कीर्तनांत येऊं लागली आहे.

श्रीनाथ व श्रीज्ञानदेव यांचा किती जिव्हाळयाचा संबध होता, हें आणखी एका गोष्टीवरून उघड होणारें आहे, व त्यांत ओघानेंच नाथांस श्रीज्ञानदेवानंतर जें आम्हीं इतकें उच्च स्थान दिलें त्याचाहि खुलासा होणार आहे. श्रीनाथांनां श्रीज्ञानदेवांचा असा दृष्टांत झाला कीं, माझ्या गळयाला अजान वृक्षाची मुळी लागली आहे ती येऊन तूं काढ. त्याप्रमाणें नाथ आळंदीस गेले, समाधींत गेले व मुळी काढली.

श्रीज्ञानदेव येऊनि स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥
दिव्य तेजःपुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥ अजान वृक्षांची मुळी कंठासी लागली । येऊनि आळंदी स्थळीं काढ वेगीं ॥३॥ ऐसें स्वप्न होतां आलो अलंकापूरीं । तंव नदीमाझारीं देखिलें द्वार ॥४॥ एका जनार्दनीं पर्व पुण्य फळलें । श्री गुरु भेटलें ज्ञानेश्वर ॥५॥

नाथ आळंदीहून परत आल्यावर त्यांनीं, ज्ञानेश्वरींत जी पाठांतरामुळें क्लिष्टता उत्पन्न झाली होती ती शुद्ध करुन ज्ञानेश्वरी शुद्ध केली. श्रीनाथांनीं त्याकरितां त्या काळांत किती प्रयास केले असतील हें त्यांच्या पूर्वीच्या उपलब्ध असलेल्या पोथ्यांशीं त्यांनीं शुद्ध करुन प्रचलित केलेल्या पोथ्यांची तुलना केली कीं,कळून येणारें आहे. ज्ञानेश्वरीशुद्ध स्वरूपांत आज वाचावयास मिळते हे श्रीनाथांचेच उपकार आहेत. श्रीनाथांनीं ज्ञानेश्वरी व आळंदी फार भरभराटीस आणली. श्री ज्ञानदेवांच्या समाधिकालापासूनच आळंदीस मंडळी जमत असत. आळंदीचें माहात्म्य विशेष वाढविण्याचा जोराचा प्रयत्न म्हणजे श्रीनाथांचाच.

जोडोनियां दोनी हात । जगीं जाणवितो मात ॥१॥
एकदां जारे अळंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥ (श्रीनाथ स.सं. गाथा ३५१२.)
या कारणानेंच 'ज्ञानाचा एका' अशी एक म्हण प्रचारांत आली आहे.

श्रीनाथांच्या वेळेस तर पंढरपूरचें माहात्म्य फारच वाढलें.आपल्या भागवतांत तीन चार ठिकाणीं त्याचा उल्लेख त्यांनीं केला आहे. 'पुढें चंद्रभागा आहे अमृतमय । आषाढी कार्तिकी वैष्णवांची दाटी होय' असें त्यांनीं आपल्या अभंगांत पंढरींचें वर्णन केलें आहे. खंडोबा, भवानी, भैरव, मंजाबा, मुंजबा यांच्या त्या वेळेला यात्रा भरत असत. या बाह्य गोष्टीवर भर देणार्‍या, क्लेशांनीं भरलेल्या, मार्गापासून लोकांस श्रीनाथानीं परावृत्त करुन पंढरपुरास आणले.

श्रीनाथांनीं कीर्तनभक्ति विशेष वाढविली. नाथ स्वतः रोज कीर्तन करीत असत. नाथांनीं कीर्तनाची जी मर्यादा घालून दिली तीच वारकरी कीर्तनाचीहि रुपरेषा होऊन वसली आहे.

सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णावीं ॥ सज्जनवृंदें मनोभावें आधीं वंदावीं ॥१॥ संतसंगें अनंतरंगें नाम बोलावें । किर्तनरंगी देवासन्निध सुखेंचि डोलावें ॥२॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या । प्रेमभरें बा वैराग्याच्या युक्ती विवराव्या ॥३॥ जेणें करूनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरिची । ऐशी कीर्तनमर्यादा आहे संताच्या घरची ॥४॥ अद्वयभजनें अखंड स्मरणें वाजवि करटाळी । एका जनार्दनी मुक्त होय तात्काळीं ॥५॥

श्रीनाथ स्वतः श्रीज्ञानदेव नामदेवांप्रमाणें काशीपर्यंत यात्रा करुन पंढरीचा महिमा थेटपर्यंत पोंचवून आले. श्रीनाथांचें भागवत मनकर्णिकेच्या घाटावर पू्र्ण झालें. नाथांचा वंश अद्यापि हयात आहे.

(ई) श्री तुकाराममहाराज यांचा काल:- नाथांनीं आपला देह ज्या सालीं ठेवला त्यानंतर सुमारें नऊ वर्षांनीं इंद्रायणीच्या काठीं पुण्यापासून १० मैलांच्या अंतरावर असलेल्या देहूं गांवीं श्रीतुकाराममहाराज यांचा जन्म झाला. व याच संतवीरानें या वारकरी मंदिरावर कळस चढवला असें मागें लिहिलेल्या अभंगांत बहिणाबाईनें म्हटलें आहे. स्वतः अत्यंत हालअपेष्टा सोसून, स्वतःच्या संसारावर स्वहस्तें अग्नि ठेवून याच वारकरी शूरानें हा पुण्यधर्म वाढता केला. यांस कळस म्हणण्याचें कारण यांच्यानंतर गेल्या पावणेतीनशें वर्षांत यांच्या अनुभवास पोंचेल असला महात्मा निर्माण झाला नाहीं. यांचे खुद्द शिष्य पिंपळनेरकर निळोबा हे त्यास शोभण्यासारखेच शिष्य होते. पण गुरु ते गुरु व शिष्य ते शिष्य! श्रीज्ञानदेवांच्या समाधीनंतर महाराष्ट्राच्या ऐहिक तेजास जो क्षय लागला होता त्याची तीनशें वर्षांत वाढ होत होत महाराजांच्या वेळेस त्या रोगाच्या उत्तर अवेस्थेच्याहि उत्तरभागास सुरुवात होऊं लागली होती असें म्हणावयास हरकत नाहीं. येथें एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे ती ही कीं, तुकाराममहाराज यांच्या वयाचा तीनचतुर्थांश भाग जाईतोंपर्यंत यादवकुलदीपक, गोब्राह्मणप्रतिपालक व स्वातंत्र्यप्रस्थापक शिवाजीमहाराज यांचा जन्मच झाला नव्हता. व शिवाजी महाराजांच्या बाविसाव्या वर्षीच तुकाराम महाराज हे वैकुंठास गेले. तेव्हां महाराजांच्या कालाचा विचार करतांनां सत्तेचा शेवटचा भाग व स्वराज्यस्थापनेचा पूर्वभाग या संधिकालाचा विचार करणें अवश्य आहे. ही गोष्ट येथें प्रामुख्यानें सांगण्याचें कारण पुष्कळ वेळां ही गोष्ट विसरली जाते, असो. पारतंत्र्य हें सर्व दुःखाचें मूळ आहे. ताप भरला म्हणजे अंगाची आग, हातापायांची जळजळ, डोकें दुखणें, ओकारी येणें वगैरे सुरु होतें. त्याप्रमाणें एक पारतंत्र्य कीं प्राप्त झालें सर्व ऐहिक दुःखास प्रारंभ होतो. पारतंत्र्यांत वरची सत्ता परधर्मीय असेल तर मग पुसावयासच नको. राष्ट्र राष्ट्ररूपानें जगतें कां मरतें अशीच स्थिति होण्याची पाळी येते. तुकाराम महाराजांच्या वेळीं अशीच स्थिति झाली होती. शास्त्रद्वारां धर्मरक्षकाचें काम ज्यांच्याकडे होते ते यवनांचे दास बनून त्यांच्या पदरीं मनसबदार्‍या पतकरुन राहिलेले. 'अध्ययन अध्यापन व आचरण' द्वारां ज्यांच्याकडे धर्माची रक्षा असावयाची ते ब्राह्मणहि कालाबरोबर नीचांचे चाकर बनले, व ऐवढेंच नव्हें तर पोटाकरितां विधर्मी देवतांची उपासना करुं लागले.

'सांडुनिया रामराम । ब्राह्मण करिती दोमदोम ॥तु.॥।'
आपला पोषाखहि त्यांनीं परकीय लोकांस साजेल असाच केला.
टिळे लपविती तातडी । लेती विजारा कांतडी ॥तु.॥

ही जर या दोन उच्च वर्णांची स्थिति तर ह्यांच्या पावलांवर पाऊल टाकीत जाणें एवढेंच केवळ ज्यांचें काम त्या दोन वर्णांचे व अतिशूद्रांचें तर विचारावयासच नको! धर्माच्या रक्षणास राजसत्ता नसली म्हणजे जितक्या विपन्न स्थितीस धर्म जाईल तितक्या विपन्न स्थितीस हिंदु धर्म त्यावेळीं जाऊन पोंचला होता. व कोणी हातांत दंड घेऊन यांस वठणीवर आणील असा निर्माण होईल तर बरा असें वाटूं लागलेंहोतें.

काय करु देवा ऐसी नाहीं शक्ति । दंडूनी पुढती वाटे लावूं ॥तु.॥

पण जोंपर्यंत असा कोणी  निर्माण झाला नाहीं तोंपर्यंत पाषांड खंडन करुन धर्म जिवंत ठेवण्याचें काम आपणच केलें पाहिजे या जाणिवीनें श्रीतुकोबा यांनीं तें काम आपलेसें केलें व धर्मास उजाळा देण्याचें व रक्षण करण्याचें काम जोरानें केलें व इहलोकची यात्रा संपूर्ण होईपर्यंत तें काम अखंड चालविलें.

श्रीज्ञानदेव व श्रीनाथ यांच्याशीं तुकाराममहाराजांच्या चरित्राची तुलना केल्यास दोघांच्या परिस्थितींत महदंतर होतें असें दिसून येतें. श्रीज्ञानदेव व श्रीएकनाथ द्विज होते व तुकारामबुवा हे शूद्रवंशोत्पन्न. श्रीज्ञानदेवांस व नाथांस गुरुकृपा लहान वयांतच प्राप्त झाली. श्रीतुकोबांचें यांच्या अगदीं उलट. लहानपणींच वडील निवर्तले, थोरला भाऊ विरक्त बनून घर सोडून गेला व सर्व प्रपंचभार अल्पवयांतच महाराजंच्या अंगावर पडला. प्रारब्ध अनुकूल होतें तोपर्यंत सर्व ठीक चाललें. पण काळ उलटला; व्यापारांत तोटा येऊं लागला, मोठा दुष्काळ पडला व एक कुटुंब व पोरें अन्नाशिवाय मृत्युमुखीं पडलीं व बुवांस प्रपंच नश्वर व 'दुःखबांधवडी' आहे हें अनुभवानें पटलें. वैराग्य प्राप्त झाल्यावर मात्र काय करावें या संबंधानें त्यांस फार विचार करण्याचें कारण पडलें नाहीं. कारण तुकोबाराय यांच्या घरीं नाथांच्याप्रमाणेंच सात पिढया पंढरीची वारी चालत आली होती. श्री तुकोबांनीं लगेंच डोंगर गांठला व साधन करण्यास आरंभ केला. व त्यांत त्यांस यश येऊन विठोबाचें दर्शनहि झालें. मग तुकोबाराय यांनीं, स्वतःचा प्रपंच इतःपर करावयाचा नाहीं, तर देवाचा प्रपंच थाटावयाचा असा निश्चय करुन आपल्या वांटणीचे कागदपत्र नदींत बुडविले व लोकांस भगवत्पथाचा उपदेश करण्याचा तडाका लावला. पंढरीची वारी व भगवद्भजन याशिवाय दुसर्‍या कोणत्याहि साधनांचा श्रीतुकोबांनीं अवलंब केला नाहीं. 'कोणी कांहीं तरी केलीं आचरणें । मज या कीर्तनेवीण नाहीं' व याच स्वतःच्या अनुभवानें सिद्ध ठरलेल्या सद्यःफलदेणार्‍या मार्गाचा त्यांनीं जगास उपदेश केला.

हरिभक्तीचा महिमा विशेषें वाढविला । (निळोबाराय)
जपतप यज्ञ लाजविलीं दानें । हरिनाम कीर्तन करुनिया ॥(रामेश्वरभट्ट)

भगवद्भजन हें कसें समर्थ साधन आहे व पंढरपुरांत विटेवर चैतन्याचा गाभा कसा उभा आहे हें तुकारामबुवांनीं पुनश्च स्वतःच्या तपःसिध्दीनें लोकांच्या निदर्शनास आणलें.

घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती । मुक्ता आत्मस्थिति सोडवीन ॥तु०॥

तुकोबाराय यांचें किर्तन अत्यंत रसाळ, हृदयाला जाऊन भिडणारें व स्वयंस्फूर्तीनें तात्काळ केल्या  जाणार्‍या अभंगानें तर अतिशय बहारीचें होई (श्रीतुकोबांनीं अभंग रचना पुष्कळ केली. पैकी सध्यां सुमारें साडेचार हजार अभंग त्यांचेच म्हणून प्रसिद्ध आहेत. कडांवर माळयाची व गंगूकाकांची अशा दोन पाठांच्या गाथा मानल्या जातात व बाकीचे अभंग क्षेपक समजतात). बुवा स्वतः शूद्र, यामुळें त्यांनां किर्तन करुन उपदेश करण्याची पात्रता नाहीं असें मानणारे वाघोलीकर रामेश्वर भट्ट, व ज्यांत क्षात्रतेज मुसमुसत होते, व पुढें ज्यांनीं स्वराज्य स्थापलें ते शिवाजी महाराज यापासून तो तहत गंगाराम मवाळ, संताजी जगमडे, कोंडोपंत लोहोकरे, मंबाजी बुवा, शिवबा कांसार यांजपर्यंत सर्वांची श्रीतुकोबाचें किर्तन ऐकत असतांना एकच वृत्ति होऊन जात असे.

लुब्थली नादीं लागली समाधी । मूढजननरनारी लोका रे॥
पंडित ज्ञानीं योगी महानुभव । एकचि सिद्धसाधकां रे ॥ )तु.अ.स.सं.गा. २०८)

जरी तुकारामबुवांनीं हरिभक्तीचाच महिमा विशेष वाढविला तरी कर्ममार्गाचा अगदींच उच्छेद केला असें बिलकुल नव्हें. त्यांनीं ठिकठिकाणीं एकाच परमेश्वरापासून चार वर्ण झाले पण प्रत्येकाचीं कर्में भिन्न आहेत व तीं प्रत्येकानें अवश्य केलीं पाहिजेत असें सांगितलें आहे.
बोले वर्म जो चाले या विरहित । तो जाणा पतित श्रुति बोले (तु.स.सं. गाथा २६९२)
शिखासूत्र तुझा गुंतला जमान । तंव वरी तूं जाण श्रुति दास ॥तु.॥

पण हे पूर्वमीमांसकाप्रमाणें कर्मवादी नव्हतेच. अर्थात् कर्महि भगवदार्पण बुध्दीनें नामाचें सहाय्य घेऊन करावें अशीच त्यांची शिकवणूक होती.

परकीय राज्यांत संघटना करणें अवश्य व म्हणूनच त्यांनीं 'सकळांसी येथें आहे अधिका' अशा भजनमार्गावर जोर दिला'. तुकाराममहाराजांनां धर्माचें यथार्थ स्वरुप सांगण्याकरितां अतिशय तीक्ष्ण भाषा वापरावी लागली. पारतंत्र्यांतील विनाशक स्वास्थ्यांत धर्मांतहि कीड उत्पन्न होते. धर्माच्या नांवावर पोट भरणारे कानफाटे, मलंग, डोईफोडे, गोसावी, मानभाव आणि शाक्त यांजवर तुकाराममहाराजांनीं अतिशय कोरडे ओढले. स्वतः बुवांसच आपणांस फार तीक्ष्ण बोलावें लागलें असें वाटल्यावांचून राहिलें नाहीं.

तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊन बाण फिरे ॥
निंदावें हें जग । ऐसा आंगा आला भाग ॥

इहलोकीं कीर्ति व परलोकीं हित ज्याच्यांत आहे असा भगवत्प्राप्तीचा पंढरपूरचा संप्रदाय त्यांनीं वाढविला. यांत त्यांस अतिशय कष्ट व दुःख सोसावें लागलें. कीर्तनाची शिस्त अतिशय जबर पाळावी लागली, व वैराग्यहि कडकडीत पाळावें लागलें. उच्च जाती, व महंत यांजकडून त्यांची छळवणूक झाली. प्रपंचाचें तर खोंबरेंच झालें. पण हें सर्व सोसूनहि त्यांनीं हरिभजनानें हें जग प्रकाशित केलें. जातां जातां एवढी गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, रामदासांनीं ज्यांचें 'भाविकें बुडालीं' असें वर्णन केलें त्या सदरांत तुकाराममहाराजांचें भजन अगर मार्ग येत नाहींत. तुकारामबुवा मनुष्याची स्थिति पाहून, अधिकार पाहून, उपदेश करीत व परमार्थहि डोळे उघडून करावयास सांगत -

सुखें करावा संसार । न संडावें दोन्ही वार
दया क्षमा घर । चोजवीत येई ॥ तु.॥
वर परमार्थ करतांना -
शुध्द कसोनिया पाहावें । वरी रंगा न भुलावें
असें निक्षून सांगत.
तुकाराममहाराजांच्यावेळेसहि आषाढी, कार्तिकी ह्या दोन्ही वार्‍या मोठया भरत असत.
आषाढी निकट । आला कर्तिकीचा हाट ॥१॥
पुरे दोन्हीच बाजार । नलगे आणिक व्यापार ॥२॥
दोन्हीच हाट भरलें घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ॥ तु. ॥

तात्पर्य बुवांनीं अशा रीतीनें या कीर्तनभक्तीचा कळस करून लोकांस भजन-कीर्तनाचा संप्रदाय घालून दिला. महाराष्ट्रांत जो वारकरी संप्रदाय इतका पसरला तें बहुतेक तुकारामबुवांच्याच पुण्याईचें फळ होय. वारकरी संप्रदायांत तुकाराममहाराजांचें महत्त्व काय आहे हें कळण्याचीं बरीच गमकेंहि आहेत. बहुतेक सर्व कीर्तनें बुवांच्याच अभंगावर होतात. एखाद्या पदावर कथेकर्‍यानें कीर्तन केल्यास त्याचा शेवट तरी निदान तुकारामबुवांच्या 'हेंचि दान देगा देवा' ह्या प्रसिध्द अभंगानेंच होतो. व जीं संतभजनें होतात तीं 'ज्ञानोबा तुकाराम' अगर 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' अशीं होतात. म्हणजे ज्ञानदेवांच्या जोडीस एकदम श्रीतुकारामच येतात इतकी मोठी चिरकाल टिकणारी कामगिरी आपल्या अभंगद्वारां तुकाराम बुवांनींहि केली. आजहि तुकारामबुवांचे अभंग हजारों लोकांस भवदुःख विसरण्यास लावून भगवत्सुखाचा आस्वाद घेण्यास प्रवृत्त करीत आहेत.

तुकाराममहाराजांचे मुख्य चौदा टाळकरी होते. पण त्यांचा संप्रदाय वाढवणारा असा शिष्य याहून निराळाच होता. तो म्हणजे पिंपळनेरकर निळोबाराय होत हे पुणें जिल्हा व नगर जिल्हा ह्यांच्या हद्दीवर असणारी जी घोडनदी तिच्या कांठी राहणारे. पण पुणें जिल्ह्यांत असणार्‍या शिरूर  गांवीं त्यांचा जन्म झाला. हे जातीचे ब्राह्मण होते. व कांहीं कालपर्यंत कुलकर्णपण चालवीत होते. पण एके दिवशी स्नानसंध्या करीत असतां सरकारदरबारचें आमंत्रण आलें व त्यांस तसेंच जावें लागलें, तेव्हां इतःपर नोकरी करावयाची नाहीं असा निश्चय करुन घरादारावर तुळशीपत्र ठेवून ते जे बाहेर पडले ते यात्रा करीत देहूस आले. तेथें श्रीतुकोबाराय यांचे चिरंजीव नारायणबुवा यांची गांठ पडली. त्यांनीं दोघांनीं बरोबर यात्रा केल्या पण समाधान होईना; सरतेशेवटीं श्रीतुकोबाचा प्रसाद व्हावा एवढयाचकरितां घरणें घेतलें. बेचाळीस दिवस कांही एक न खातां पडून राहिले व मग त्यास तुकारामबुवांनीं दर्शन दिलें व माळ दिली.
निळा म्हणे मज उपदेश दिला । संप्रदाय दिला सकळ जना ॥

यानंतर निळोबानीं अभंग केले व संप्रदायाची किर्तनभजनद्वारां सेवा फारच उत्तम केली. पुष्कळ लोकांचें त्यांच्या अभंगाकडे अजून लक्ष जावयास पाहिजे त्याप्रमाणें गेलें नाहीं. त्यांनीं तीनशें श्लोकांत श्रीतुकारामस्तुति वर्णिली आहे व त्यांचे अभंग एकंदर १६०० आहेत. यांच्या अभंगांची भाषा अगदी अर्वाचीन आहे व वाणींत प्रसाद आहे. विशेषतः त्यांचे गौळणीचे अभंग तर फारच अप्रतिम आहेत. ते वाचले म्हणजे गुरुंस शोभणारा शिष्य आहे असें स्वाभाविकच उद्गार तोंडांतून निघतात.

(उ) यानंतरचा आजपावेतों पावणेतीनशें वर्षांचा काल:- यानंतरचा हा वारकरी पंथाच्या कालाचा शेवटचा भाग. यांत अनुभवी, संप्रदायाची सेवा उत्तमरितीनें करणारे, असे पुष्कळसे संत निर्माण झाले. पण महिपतिबुवा कांबळे ताहराबादकर (शके १६३७-१७१२) यांच्याशिवाय ग्रंथलेखक असा  नांव घेण्यासारखा कोणी झाला नाहीं. यानींच संतलीलामृत, भक्तलीलामृत वगैरे ग्रंथ लिहून साधुचरित्रें सविस्तर लिहून काढलीं. निळोबारायानंतर उपदेश, शंकरस्वामी शिउरकर यांस प्राप्त झाला. व शंकरस्वामी याजपासून तो मल्लाप्पा वासकर (शके १६३१-१७२१) यांस प्राप्त झाला. ह्यांची समाधि आळंदी येथें आहे व यांनींच प्रथम फड काढला. प्रथम फड काढला याचा अर्थ पूर्वी फड बिल्कुल नव्हते असा नव्हे. नाथांच्या अभंगात 'न मांडी स्वतंत्र फड । अंगी अहंता येईल वाड' असे उद्गार आहेत. अर्थात पूर्वी भजनाचे फड असावेत. पण नाथानंतर लुप्त झालेल्यास यानींच प्रथम चालना दिली असावी. वासकरांतून प्रथम देहूकर फुटले व त्यांनीं स्वतंत्र फड काढला. आतां वारकर्‍यांत प्रमुख असे दोनच फड आहेत. पण त्यांत वासकरांस अग्रस्थान आहे. व तें योग्यहि आहे. कारण गोपाळबुवा हे जरी तुकोबाचे पणतू होते तरी ती मांसवंशाची परंपरा होती. 'विद्या' परंपरा मल्लाप्पाकडेच आली होती. यानंतर गेल्या २७५ वर्षांत समाजाच्या दृष्टीनें घडून आलेली मोठी गोष्ट म्हणजे 'पालख्यांचा' सोहळा वाढण्याची. हा सोहळा सुमारें १२५ वर्षापूर्वी होऊन गेलेल्या हैबतरावबाबा आरफळकर (जि. सातारा) यांनीं वाढवला. यांचा जन्म सरदारकुलांत झालेला. हे ग्वाल्हेरहून परत येत असतांनां त्यांनां चोरांनीं गाठलें व एका गुहेंत कोंडलें. हे तेथें राहिले असतां ज्ञानेश्वर महाराज यांचा त्यांनीं धावा केला. श्रीज्ञानदेव त्यांच्या धांव्यास पावले. चोरांच्या टोळीच्या नायकास मुलगा झाला व त्या आनंदाप्रीत्यर्थ बाबांची सुटका झाली. झालें ! बाबांच्या मनानें उलट खाल्ली. व ते जे निघाले ते थेट आळंदीस येऊन राहिले. तेथें मग समाधीसमोर रात्रीं शेजारतीपासून धुपारतीपर्यंत भजनाचा त्यांचा नियम असे. वारकर्‍यांत जी भजनीमालिका आज प्रसिध्द आहे ती यांचीच आहे. यांच्यापूर्वी श्रीज्ञानदेवांच्या पादुका पंढरीस जात असत. पण तो सोहळा, यांनींच गाडयावर पालख्या घालून दिंडया वगैरेंचा भजनाचा सोहळा वाढवून विशेषत्वाला आणला. हल्लीं आषाढीला जो पालखीचा सोहळा दिसून येतो तें यांच्या परिश्रमाचें व कल्पनेचें फळ होय. प्रथम फक्त श्रीज्ञानदेव यांचीच पालखी निघे; बाकींच्या पालख्या तदनंतरच्या आहेत. त्या वेळेस खंडोजीबाबा नांवाच्या महात्म्याची मदत हैबतरावबाबा यांस मिळाली होती. त्यांची समाधि पुण्यास पुलाच्या वाडीजवळ आहे. याशिवाय पुण्डलीक बुवा, जळोजीमलोजी, प्रल्हाद भाऊ बडवे, ठाकोर बुवा, बाबा पाध्ये, मार्तंडमामा पाइटकर, मार्तंडबापू आळंदीकर, वासुदेवबुवा देहूकर, सखारामबुवा अमळनेरकर, बाबा अझरेकर, चार्तुमासे बुवा, गंगू काका, लक्ष्मणबुवा वाखरीकर वगैरे मंडळी होऊन गेली. अगदीं अलीकडची, नांव घेण्यासारखी व ज्यांनीं संप्रदायाची उत्तम सेवा केली अशी मंडळी म्हणजे भाऊसाहेब काटकर, नाना महाराज साखरे व व विष्णुबुवा जोग. या शेवटच्या त्रयीनें श्रीज्ञानेश्वरी विशेष प्रचारांत आणली. या त्रयीचें श्रीज्ञानेश्वरीवर अप्रतिम प्रभुत्व होतें. भाऊसाहेब काटकर राहणार सोलापूर यांस तर संस्कृतचा गंधहि नव्हता. पण यांचीं कीर्तने ऐकण्याकरितां पुण्याहून देहुस कै. रानडे, चिपळूणकर वगैरे मंडळी जात असत. भाऊसाहेबांचें कीर्तन ऐकलेली मंडळी अजूनहि हयात आहेत व अजून त्यांचे शब्द कानांत गुणगुणतात असे ते म्हणतांना ऐकूं येतें. साखरेमहाराजांच्या प्रयत्नानें श्रीज्ञानेश्वरीचा अर्थ प्रथम छापून निघाला. विष्णुबुवा जोग यांचें श्रीज्ञानेश्वरीवर तर प्रभुत्व होतेंच परंतु त्यांनीं श्रीतुकाराम महाराज यांच्या गाथ्याचें मराठी भाषांतर समग्र प्रथम प्रसिध्द केलें. गाथ्याची विषयवार वांटणी करुन तो आवटे छापखान्यांत प्रसिध्द केला व त्याचीच नक्कल पुढें निर्णयसागरच्या गाथ्यानें उचलली आहे. भाऊसाहेब काटकर व विष्णुबुवा जोग यांनीं कीर्तनद्वारा वारकरी संप्रदायाची फारच सेवा केली. हल्ली वारकर्‍यांत वासकर, देहूकर, अझरेकर, गंगुकाका, ठाकूरबुवा वगैरेंचे प्रमुख फड आहेत व आषाढीस तीन लाख व कार्तिकीस एक लाख समुदाय पंढरीत जमत असतो. आळंदीची यात्राहि वाढत आहे व यात्रेस वारकरी कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नगर, पुणें, नाशिक, खानदेश, नागपूर, व-हाड, मोगलाई, बंगलोर, कर्नाटक, त्रिचनापल्ली येथून येत असतात, इतका यात्रेचा प्रसार झाला आहे.

आतांपर्यंत संप्रदायाच्या वाढीचा व उत्पत्तीचा जो विचार केला त्यांत एकंदर ४ संप्रदाय आलेले आहेत.  ''मिळाले वारकरी चतुष्टय'' ते संप्रदाय येणेंप्रमाणें - १) चैतन्य, (२) स्वरुप, (३) आनंद व (४) प्रकाश.

(१) चैतन्य:- या संप्रदायांत दोन भेद आहेत. (अ) षडाक्षरी मंत्र 'रामकृष्णहरि' व (आ) द्वादशाक्षरी मंत्र 'ॐ नमो भगवते वासुदेवाय.' पहिल्याची माहिती देणारा पिंपळनेरकर श्रीनिळोबाराय यांचा पुढील अभंग आहे -

मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । संप्रदाय फळ तेथोनिया ॥१॥ हंसरुपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी । चतुःश्लोकी चारी भागवत ॥२॥ तें गुज विधाता सांगे नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥ राघव चैतन्य केलें अनुष्ठान । त्यासी द्वैपायनें कृपा केली ॥४॥ कृपा करुनियां हस्त ठेविला शिरीं । बोध तो अंतरी ठसावला ॥५॥ राघवा चरणीं केशव शरण । बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥६॥ बाबाजीनें स्वप्नीं येऊनि तुकयाला । अनुग्रह दिला निजप्रीति ॥७॥ जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय दिला सकळ जनां ॥८॥

(कडवीं ६ व ७ यांत उल्लेखित केलेल्या राघवचैतन्य, केशवचैतन्य व बाबाजी, ह्या तीन व्यक्ती होत्या कां दोन होत्या यासंबंधीं बरीच चर्चा चालूं होती. पण निरंजनबुवाकृत केशव चैतन्यकथातरुवरुन व ओतूरकर चैतन्य यांच्या वंशजांचे कागद इतिहाससंशोधक मंडळांत छापलेले आहेत त्यांवरुन ह्या व्यक्ती तीन नसून दोनच आहेत हें निर्विवाद सिद्ध होत आहे. राघवचैतन्य यांची समाधि कल्ल्याणगुलबर्ग्याजवळ आळंदगुंजोटीस आहे. केशवचैतन्य (ज्यांचें पूर्वाश्रमीचें नांव बाबा होतें) यांची समाधि पुणें जिल्ह्यांतील ओतूरगांवीं आहे). दसर्‍याच्या माहितीचा अभंग पुढील आहे:-

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । माच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्या ॥१॥ माच्छिंद्रानें बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वळला गहिनीप्रति ॥२। गहिनीप्रसादें निवृत्तिदातार । चोचविलें सार ज्ञान देवा ॥३॥

हीच परंपरा श्रीज्ञानदेवानें आपल्या ज्ञानेश्वरीचे शेवटींहि दिली आहे. बहुतेक सर्व वारकरी संप्रदाय चैतन्यसंप्रदयांतलाच आहे.

(२) स्वरूपसंप्रदाय:- यांचा 'श्रीरामजयरामजयजयराम' असा त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. यांतहि दोन संप्रदाय आहेत. (अ) रामानुजीय (हे कपाळावर तांबडी रेषा लावतात) यांची अनुक्रमें मल्हेरकर, सखाराम बुवा अंमळनेरकर व भानुदास बुवा बेलापूरकर अशी परंपरा आहे. (आ) रामानंदी (पांढरी रेषा-बैरागी) यांत रामदासी लोकांचा समावेश होतो.

(३) आनंदसंप्रदाय:- या संप्रदायाचा मंत्र त्र्यक्षरी 'श्रीराम' अथवा दोन अक्षरी 'राम' असा आहे. यांत नारद, वाल्मीक, रामानंद, कबीर, सेना न्हावी वगैरे मंडळी येतात.  

(४) प्रकाशसंप्रदाय:- यांचा मंत्र 'ॐ नमो नारायण.'जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबलब्रह्मास ॥ आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वांस आदि गुरु ॥१॥

तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीसी उपदेशीत ॥
अत्रीपाद प्रसादीत । श्रीअवधूत दत्तात्रेय ॥२॥
दत्तात्रेय परंपार । सहस्त्रार्जुन, यदु दुसरा । जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगीं ॥३॥ जनार्दन कृपेस्तव जाण । समूळ निरसलें भवबंधन ॥ एका जनार्दनीं शरण । झाली संपूर्ण परंपरा ॥४॥

येथपर्यंत या पंथाच्या उत्पत्तीचा, वाढीचा व संप्रदायाचा विचार केला.

आतां पंथाच्या तात्त्विक भागाकडे वळूं. पण तत्पूर्वीहि एक दोन गोष्टींचा विचार होणें अवश्य आहे. व तो म्हणजे वारकरी पंथांत मान्य असलेले (१) देव, (२) संत, (३) ग्रंथ व (४) या पंथांतील आचारविचार यांचा. होय

(१) देव:- या पंथास मान्य असलेल्या दैवतांचा विचार करतां या पंथास श्रीपंढरीनाथ हें एकच दैवत मान्य आहे. परंतु श्री पंढरीनाथ हे श्रीकृष्णाचें बालरूप आहे हें आम्हीं मागें सांगितलेंच आहे.

गीता जेणें उपदेशिली । ते हे विटेवरी माउली ॥तु.॥
द्वारकेचें केणें आले याचि ठाया । पुढें भक्त राया चोजवीत ॥तु.॥

यामुळें सर्व वारकरी पंथ कृष्णोपासक आहे. श्रीकृष्णाइतकाच तो श्रीरामाचाहि उपासक आहे -
दुर्जनाचा येणें करुनि संहारापूर्ण अवतार रामकृष्ण ॥तु.॥

वारकर्‍यांत, चैत्रांतील रामनवमी व श्रावणांतील जन्माष्टमी हे उत्सव फार मोठया विस्तृत प्रमाणावर होत असतात. पण याहिपेक्षां विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या पंथांत हरि व हर यांचें ऐक्य प्रतिपादिलेलें आहे. व त्या ऐक्याची मूर्तीच जणूं काय विटेवर उभे असलेले श्रीपांडुरंग हें आहेत.

रुप पाहतां डोळसूं । सुंदर पाहतां गोपवेषु ॥
महिमा वर्णितां महेशू । जेणें मस्तकीं वंदिला ॥१॥ (श्रीज्ञानेश्वर अभंग स.सं. गाथा ८९)

श्रीपांडुरंगांनीं आपल्या मस्तकावर शिवास धारण केलेलं असल्यामुळें या पंथांत शैव व वैष्णव असे तंटे बिलकुल नाहींत.

तुका म्हणे भक्तिसाठीं हरिहर ।... ...
हरिहरा भेद नाहीं । नका करुं वाद ॥
(तु.स.सं. गाथा २९४)
तेथें शंभु का श्रीहरि । पढियंता होय ॥
(श्रीज्ञानेश्वरी अ. १७, ओ, २०१)

जितकी एकादशी वारकर्‍यांस अवश्यक तितकाच सोमवार अथवा महाशिवरात्रहि अवश्यक.
व्रत करा एकादशी सोमवार । ... ... (तु.स.सं. गा. ३६३८)

श्री तुकाराममहाराज यांचे सिंगणापूरच्या महादेवास उद्देशून केलेले चार 'कावडयाचे' अभंग प्रसिद्धच आहेत. या पंथांत शिव व विष्णु सारखेच पूज्य मानतात याचें दुसरें कारण असें आहे कीं, चैतन्य  संप्रदायांतील ज्या नाथपंथाचें वर दिग्दर्शन केलें आहे व ज्यांत श्रीनिवृत्तिनाथ-ज्ञानदेव होऊन गेले त्या पंथाचे आद्यप्रर्वतक श्रीत्रिपुरारी असल्यामुळें वारकर्‍यांच्या देव्हार्‍यांत वैकुंठाधिपति रमेश्वराचा जितका मान तितकाच कैलासाधिपति पार्वतीपतीचा आहे. तात्पर्य श्रीशंकर व श्रीविष्णु व या दोहोंचें ऐक्य दाखविणारे श्रीमंत पंढरीनाथ हें या पंथांतील मुख्य दैवत होत. येथें जातां जातां एक गोष्ट अवश्य सांगितली पाहिजे, ती ही कीं, वारकरी संप्रदायांतील साधूंचे ग्रंथ वाचले असतां तेहि श्रद्धायुक्त असून तर्कप्रधान आहेत असें दिसून येईल. असले साधु पांडुरंगाचे, तो एक भुतें घालवणारा (स्पिरिट स्केअरर ऑर गार्डियन) म्हणून भजक बनतील ही अशक्य गोष्ट आहे. ग्याझिटियर मधील लेखकानें 'नरसोबाच्यावाडीप्रमाणें येथें भुतें निघतात व हा देव भुतें घालविणारा व म्हणून तेथील चालीरीती  निराळया' असलीं विधानें केलीं आहेत. पण तीं निराधार आहेत. देवर्षीपणा हा वारकर्‍यांस कितपत मान्य आहे हें तुकोबांच्या तत्संबंधीं खालील उद्गारावरुन उघड होणार आहे.

'देव्हारा बैसोनि हालविती सुर्वे।तया नराहातीं चोट आहे'
तुका म्हणेज जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥१॥

अंगारे धुपारे करणारे हे देवाचे भक्त नव्हेत असें या संतांनीं अनेक वेळीं स्पष्ट सांगितले आहे.

(२) संत:- यां पंथास मुख्यतः मान्य अशी अर्वाचीन संत मंडळी म्हणजे श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, तुकाराम, निळोबाराय. यांच्या पूर्वी अगर समकाली जे जे होऊन गेले त्यांपैकीं ज्यांचा ज्यांचा यांच्या अभंगांत उल्लेख येतो ते सर्व पूज्यच मानले जातात व त्यांचे अभंगहि त्यांच्या अभंगाप्रमाणेंच प्रमाणभूत म्हणून घेतात.

(३) ग्रंथ:- संस्कृत (वेद, गीता भागवत) वगैरे प्राकृत व नित्यश: ज्यांचें वाचन केलें जातें असे ग्रंथ म्हटले म्हणजे श्रीज्ञानेश्वरी, श्रीनाथभागवत, श्रीतुकारामबुवांची गाथा व श्रीज्ञानदेवकृत व  श्रीनाथकृत हरिपाठ. ब्राह्मणांस जशी संध्या 'अहरह:करणीय,' तद्वतच श्रीज्ञानेश्वरकृत हरिपाठ वारकर्‍यांस म्हणणीय. इतर निर्दिष्ट संतमंडळीचे अभंग व त्यांचे इतर ग्रंथ हेहि पूज्य व प्रमाणभूत समजले जातात.

येथेंहि जातां जातां एका गोष्टीचा स्पष्ट खुलासा केला पाहिजे कीं, वारकरी पंथांतील मंडळीस प्राकृत साधूंतील उपरिनिर्दिष्ट साधूंचेच ग्रंथ प्रमाण असें म्हटल्यावर त्यावर एक प्रकारें अनुदारतेचा आरोप येण्याचा संभव आहे. विशेषतः हा आरोप रामदासी संप्रदायांतील मंडळीकडून केलेला पुष्कळ वेळां ऐकूं येतो. त्यांचें म्हणणें वर निर्दिष्ट केलेल्या साधूंप्रमाणेंच इतरहि साधु असतां त्यांचे ग्रंथ तुम्हीं कां मानीत नाहीं? विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीनें बोलावयाचें म्हणजे रामदासांच्या ग्रंथांतील वाक्ये वारकरी कीर्तनांत प्रमाण म्हणून कां घेत नाहीं? असा प्रश्न ते नेहमीं या पंथांतील लोकांस करतात. यांस थोडक्यांत उत्तर असें आहे कीं, यांत थोडा समजुतीच्या घोंटाळयाचा भाग आहे. वारकरी संप्रदाय हा उपरिनिर्दिष्ट साधूखेरीज इतर कोणास साधूच म्हणावयास तयार नाहीं, असला अज्ञ व हट्टी तो समाज आहे असें कोणासहि म्हणतां येणार नाहीं. वारकरी कीर्तनांतून दृष्टांतादाखल सर्व साधूंचीं चरित्रें सांगण्यांत येतात. आतां संप्रदायांतील मंडळी आपल्या संप्रदायाबाहेरचे ग्रंथ प्रमाण म्हणून कीर्तनांत घेत नाहीत याचा अर्थ ती मंडळी ते ग्रंथ कुचकामाचे समजतात असें नव्हे तर ते आपल्या ग्रंथाची व वाङ्मयाची तात्पर्य संप्रदायाची जोपासना फारच उत्तम रीतीनें करूं इच्छितात एवढेंच. चातुवर्ण्य व्यवस्था वाईट किंवा चांगली हा प्रश्न कसाहि सुटो पण छापखाने नव्हते त्याकाळीं एका ब्राह्मण जातीकडेच वेदाध्ययन होतें म्हणून वेद टिकले असें गार्बे साहेबासहि कबूल करावें लागलें आहे. तात्पर्य इंग्रजींतील एका ह्मणीप्रमाणें सर्वांचें काम म्हणजे कोणाचेंच नव्हें या नात्यानें एका विशिष्ट वाङ्मयाची वाढ व जोपासना एका संप्रदायानें घेतली नाहीं तर तें कालानें नाहींसें होत जातें. तसा प्रकार होऊं नये म्हणून या संप्रदायी मंडळींनीं स्वसंरक्षणार्थ आपणांस एक प्रकारचें बंधन घालून घेतलें एवढेंच. वारकरीपंथांत अशी चाल रुढ आहे म्हणूनच इतर संप्रदायांत क्वचितच् आढळून येणारी कीं ज्यांस संपूर्ण गाथा व संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे अशी मंडळी या संप्रदायांत आज कित्येक हयात आहेत. मुद्दा एवढाच कीं हा संप्रदाय दुसर्‍यांचा द्वेष करतो अगर त्यांची कमी किंमत समजतो अशी समजूत कोणी करुन घेऊं नये.

(४) वारकर्‍यांचा आचारविचार:-  वारकर्‍यांचा आचार व विचार हे वर जे आम्हीं त्यांचे प्रमाणभूत म्हणून ग्रंथ दिले आहेत त्यांवरून उघड होणारे आहेत. वैदिक धर्मास ज्या ज्या गोष्टी मान्य त्या त्या सर्व बहुतेक अंशीं या पंथास मान्य. आपण ज्या वर्णांत व आश्रमांत आहोंत त्या वर्णाश्रमाला योग्य अशीं कर्में प्रत्येक व्यक्तीनें अवश्य केली पाहिजेत. परंतु तें घडून, कलियुगांत व विशेषत सांप्रतच्या कालांत सद्यः भगवत्प्राप्ति होणें अवघड होऊन बसलें आहे. येवढयाकरितां या पंथानें त्यास भक्तिमार्गाची व नामस्मरणाची जोड दिली. यांच्या आचारांतील मुख्य गोष्ट म्हणजे श्रीपंढरीनाथाची नियमानें दोन वेळां आषाढ शु॥ व कार्तिक शु॥ एकादशीस वारी करणें हें होय. कित्येक याशिवाय आणखी माघी व चैत्री याहि एकादशीस पंढरपुरास जातात. कित्येक तर पंढरपुरास आषाढीस अगर कार्तिकीस एकदांच नियमानें येतात. पण नामदेवराय यांच्या कालापासून मुख्य वार्‍या म्हटल्या म्हणजे दोनच समजल्या जात असत.

आषाढी कार्तिकी विसरूं नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥१॥ (श्रीनामदेव)
आषाढी निकट । आला कार्तिकीचा हाट ॥ (तुकाराम)

त्यांतल्या त्यांत आषाढ शु॥ एकादशीची वारी महत्वाची समजली जाते, व त्याचवेळेस आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, पैठण, वगैरेकडून पालख्या येतात. (हल्लीं निरनिराळया ठिकाणाहून पंढरपुरी येणार्‍या पालख्यांची नोंद पुढें दिली आहे.) श्रीनामदेवराय यांच्या कालींहि कार्तिकी यात्रा भरत  असे. पण तिचें विशेष महत्त्व श्रीभानुदास महाराज पैठणकर यांनीं अनागोंदीहून रामराजाकडून ही मूर्ति आणल्यावेळेपासून सुरु झालें. वारकरी ज्याप्रमाणें नियमानें पंढपूरला शुद्ध एकादशीस जातात त्याचप्रमाणें श्रीज्ञानदेव यांच्या समाधीकालापासूनच श्रीनामदेव यांच्या कालींच सर्व वारकरी संप्रदाय कार्तिक व॥ एकादशीस पुणें जिल्ह्यांतील इंद्रायणीच्या काठीं असणारें शिवपीठ जें आळंदी त्या ठिकाणी श्रीज्ञानेश्वर माऊलीकरितां जमूं लागला. त्याच वेळेस संवत्सरग्राम अथवा सासवड याठिकाणींहि सोपानकाका यांजकरतां वैशाख शु॥ ११ स यात्रा जमत असे (हल्लीं गेल्या तीन चार सालापासून मार्गशीर्ष व॥ ११ स म्हणजे त्यांच्या समाधीच्या तिथीस सासवड येथें यात्रा जमूं लागली आहे). त्याचप्रमाणें त्र्यंबकेश्वर व एदलाबाद येथेंहि यात्रा जमत होती व असते. आतां या चार ठिकाणांप्रमाणेंच पैठण, देहू, पिंपळनेर, आळबेल्हे वगैरे जीं संतांनीं आपल्या कायमच्या वास्तव्यानें पुनीत केलेलीं ठिकाणें आहेत तेथेंहि यात्रा भरत असतात. यांत लक्षांत ठेवण्यासारखीं गोष्ट ही कीं, देवाची शुध्द पक्षांतील वारी व भक्ताची नेहमी वद्यांतील वारी आहे. कांहीं वारकरी बाराहि महिने पंढरपूर व आळंदीमधील वाट पायानें चालतात, व दर शुद्ध व वद्य एकादशीस अनुक्रमें पंढरपूर व आळंदीस हजर राहतात. यांस महिन्याचे वारकरी असें म्हणतात. तूर्त अशी  मंडळी सुमारें २२५ आहेत. बाकीचा सर्व वारकरी समाज आपआपल्या घरचा सर्व उद्योगधंदा करुन नियम ठरला असेल त्याप्रमाणें घरचें खाऊन पंढरपुरास व आळंदीस एकदां अगर दोनदां नियमानें जात असतो.

पण नुसता अशा नियमानें पंढरपूरास जाणाराच वारकरी होत नाहीं. त्यानें वारकरी होऊनच पंढरपुरास गेलें पाहिजे.

होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥तु.॥

म्हणजे मुख्य गळयांत तुळशाची माळ घातली पाहिजे. शिवाय जसे रुद्राक्ष, गणपतीस जशीं पोंवळीं, त्याप्रमाणें श्री विठ्ठलास तो कृष्णाचें बाळरूप असल्यामुळे तुळशी फार प्रिय आहे. यामुळें वारकरी होण्यास गळयांत तुळशीच्या मण्यांची माळ अवश्य घालावी लागते. आणि ती घालून त्यानें पंढरपूरास गेलें पाहिजे. एकदां घातलेली माळ तुटली तर ती पुनः गुंफून घालावी लागते. व ती घालीतोपर्यंत त्यास अन्नग्रहण करतां येत नाहीं. त्याबरोबरच वारकर्‍यानें गोपीचंदनाचा ऊर्ध्व पुंडू लावून मुद्रा अवश्य लाविल्या पाहिजेत. तसेंच त्यानें द्वादशटिळेहि अवश्य लाविले पाहिजेत.

आम्हां अलंकार मुद्रांचे शृंगार । तुळशीचे हार वाहूं कंठीं ॥१॥ (तु.स.सं. गाथा ११६२)
गोपीचंदन मुद्राधरणें । आम्हां लेणें वैष्णवां ॥१॥
मिरवूं अलंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥२। (तु.स.सं.गा. १२४९)

त्याचप्रमाणें त्यानें पताक. (वेळूच्या काळीस भगवें वस्त्र बांधून तयार करतात ती) अवश्य धारण केली पाहिजे.
कुंचे पताका झळकती । टाळमृंदंग वाजती ।
आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचे ॥१॥ (श्रीज्ञानदेव अभंग, स.सं.गा. २०५)

वारकर्‍यांची थोडक्यांत पण एकच मुख्य खूण म्हणजे गळ्यांत पवित्र तुळशीच्या एकशें आठ मण्यांची माळ धारण करणें व पंढरीरायाच्या दर्शनास नियमानें जाणें ही होय. ही माळ त्यांस कोणत्यातरी फडाच्या मुख्याकडून अगर कोणा वारकरी साधूकडून घालावी लागते. माळ घालणार्‍यास सव्वा रुपया अगर असा कांहीं एक खर्च लागत नाहीं. माळ घालणार्‍यानें ती विकत आणून ज्या संताकडून ती घ्यावयाची असेल त्याकडे जावें. संत ती माळ श्रीज्ञानेश्वरीवर ठेवतो. व त्यास श्री पंढरपूर कीं आळंदीची कोणती वारी करणार म्हणून विचारतो व कोणती तरी एक वारी अवश्य कबूल करावी लागते. त्यावेळेस त्यास यमनियमाचें जें मूळ परस्त्री, परधन, मद्यपान यांचा त्याग तो अवश्य पाळला पाहिजे असें सांगण्यात येतें. त्याचप्रमाणें त्यास एकादशा-शुध्द व वद्य बारा महिन्यांच्या अवश्य केल्या पाहिजेत व रोज हरिपाठ म्हटला पाहिजे. 'रामकृष्णहरि' असें भजन केलें पाहिजे असें सांगितलें जातें. हें सर्व त्यानें कबूल केल्यावर तो श्रीज्ञानेश्वरीवरील माळ उचलून घेतो व 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल' या गजरांत ती तो त्याच्या गळयांत घालतो. तुळशीची माळ घालून पताका घेऊन पंढरीस जाणारा तो वारकरी.वास्तवीक पंढरीस पायीं गेलें पाहिजे,

गात जा गा गात जा गा । प्रेम मागा विठ्ठला ॥तु.॥

पण आतां वाहनाच्या सोयीनें बहुतेक लोक आगगाडीनें येतात. तरी आषाढी एकादशीस पालख्यांच्या बरोबर पायीं येणारांची संख्या ५०/६० हजार असते. असा रीतीनें पालखीबरोबर अगर गाडींतून पंढरपुरास गेल्यावर तेथील मुख्य करणीय विधी म्हणजे -

चंद्रभागे स्नान विधि तो हरिकथा ।
समाधान चित्ता सर्वकाळ ॥ (श्रीतुकोबा)

चंद्रभागेंत दर्शन घ्यावयाचें व गांवप्रदक्षिणा करावयाची व बाकीचा वेळ कीर्तनांत व भजनांत घालवावयाचा, असा पंढरपुरांतील मुख्य कार्यक्रम आहे. इतर क्षेत्रांप्रमाणें येथें तीर्थोंपवास करावा लागत नाहीं. ऐवढेंच नव्हे तर केल्यास पातक सांगितलें आहे. त्याचप्रमाणें येथें श्राध्द मुंडण वगैरे कांहीं एक करीत नाहींत. कांहीं वर्‍हाडांतील व कोंकणांतील लोक हा विधि करतात. परंतु पंथाची ज्यास योग्य माहिती आहे ते कोणी करीत नाहींत. ते फक्त नित्य चंद्रभागास्नान, पांडुरंगदर्शन व एकदां देवास नैवेद्य व ब्राह्मणभोजन या गोष्टी करतात. व बाकी सर्व वेळ वाळवटांत निरनिराळया ठिकाणीं होणारीं किर्तनें व भजनें हीं ऐकण्यांत घालवितात. पंढरपुरास सकाळसंध्याकाळ फडावर कीर्तनेंच होत असतात व रात्रीं भजनाचे जागर होतात. माळकरी बहुतेक आपल्या फडावर कीर्तनास जातो. पण दुसर्‍याचें ऐकूं नये अशी त्यांस बंदी नसते (फड म्हणजे एका महंताच्या शिष्यमंडळीचा मोठा समुदाय. दिंडी हें लहान भजनीसमूहाचें नांव आहे). कीर्तन व भजन हेंच वारकर्‍यांचें भगवंतास अंकित करण्याचें मुख्य साधन होय.

वारकरी कीर्तन हें हरिदासी कथेहून भिन्न असतें. वारकरी कीर्तनास निरूपण असें म्हणतात. मान्य असलेल्या एखाद्या साधूचा वैराग्य-वेदांत-भक्तिपर एखादा अभंग घेऊन त्याचा विचार श्रोतृसमुदायापुढें मांडावयाचा व मधून मधून भजन करावयाचें अशी या कीर्तनाची पध्दत आहे.

भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या ।
प्रेमभरें वैराग्याच्या युक्ती विवराव्या ॥
जेणें करोनि मूर्ति ठसावी अंतरीं श्रीहरिची ॥
ऐसी कीर्तनमर्यादा आहे संताच्या घरीं ॥ (श्रीएकनाथ अभंग)

यांतील विशेष म्हणजे यांत आख्यान असें स्वतंत्र नसतें. दशमीपासून चतुर्दशीपर्यंत असा सोहळा झाल्यावर पौर्णिमेस सकाळीं गोपाळपुरीं (पंढपुराच्या दक्षिणेस १ मैलावर) काल्याचा समारंभ असतो. दिंडया भजन करीत तेथें जातात. व तेथील गोपाळकृष्णास काला देऊन लोक आपआपल्या  घरीं परत जातात. परत गेल्यावर घरीं 'मुरडीव' म्हणजे कानवले करतात. हेतु हा कीं पुनः लवकर देवदर्शनास येऊं. अशा रीतीनें भोजन केल्यावर यात्रा संपली असें समजून वारकरी आपआपल्या गांवीं जातात. या काल्याच्या बाबतींत फार गैरसमज उत्पन्न होण्यासारखीं विधानें निरनिराळया लोकांनीं केलीं आहेत. वास्तविक काल्याच्या वेळीं स्पृश्य जातींतील माणसें एकमेकांच्या तोंडांत भाजलेल्या जोंधळयाच्या लाह्या घालतात. त्याचा अर्थ 'वारकर्‍यांत जातीभेद मानीत नाहीं, सर्व एकमेकांच्या पंक्तीस बसतात' असा करण्यापर्यंत मजल पोंचते. वास्तविक यापैकीं एकहि गोष्ट खरी नव्हें. काल्याच्या वेळेस श्रीकृष्णाच्या गोकुळांतील बाललीलापर अभंग घेऊन कीर्तन करुन, इतर ठिकाणांप्रमाणें दहिहंडी फोडतात. हा सोहळा झाल्यावर बहुतेक वारकरी परत आपल्या गांवास जातात.

तत्वज्ञान:- वर जी या पंथाच्या उत्पत्तीची व वाढीची चर्चा केली आहे, त्याचप्रमाणें वर जो या पंथाच्या आचारविचारांचा विचार केला आहे त्यावरून हा पंथ अवैदिक नव्हे अथवा वैदिक धर्माविरुद्ध  बंड करणारा नव्हे ही गोष्ट उघड होणारी आहे. कांहीं पुराणमतवादी व कांहीं समाजसुधारक मंडळी यांच्या मतें हा पंथ म्हणजे वैदिक धर्माविरुद्ध, विशेषतः त्यांत मानलेल्या जातिव्यवस्थेविरुद्ध एक बंड आहे. परंतु या विधानावरुन एवढेंच दिसून येतें कीं, या मंडळींनीं या पंथाचा बाहेरुन विचार केलेला आहे; आंत शिरून प्रत्यक्ष माहिती घेऊन कांहीं हा विचार केलेला नाहीं. या पंथाचा आद्यमुनि पुंडलीक असून त्यानें जी उपासना रुढ केली ती श्री विठ्ठलाची व श्री रुक्मीणीपांडुरंग हें पूर्ण वैदिक दैवत. याची या पंथाला मान्य असलेले संत व त्यांचे ग्रंथ यांत 'वेदाची' जी स्तुति व प्रमाणभूतता धरली आहे त्यावरून तरी या पंथासंबंधीं वर उल्लेखित केलेलीं मतें निराधार आहेत हें उघड दिसून येणार आहे.

अहितापासौनि काढिती । हित देउनि वाढविती ।
नाहीं श्रुतिपरौती । माउली जगा ॥ (ज्ञाने.अ.१६)
जगीं समान सकृप । हिताहित दाविता दीप ।
तो अमान्य केला बाप । वेद जेणें ॥ १६
नास्तिका द्यावया तोंड । वेदांचें गाढें बंड । (ज्ञाने. अ.१३)
जगा वेदीं विश्वास । विश्वासीं पूज्य ईश ॥ (अ.१६)
चावडिये न्यायो अन्यायो निवडी वेद । (अ.१६)
वेदशास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥तु.॥
शिखासूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तुं जाण श्रुतिदास ॥तु.॥
वेदबाह्य लंड बोले तो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्यें ॥तु.॥
मातेची जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥तु.॥
वाचा बोलों वेदनीति । करुं संतीं केलें तें ॥तु.॥

येथें इतकें मात्र सांगितलें पाहिजे कीं, या पंथांतील साधूंनीं एका दृष्टीनं वैदिक धर्मांत सुधारणा केली. पण ती सुधारणा हें वैदिक धर्माविरुद्ध बंड नसून त्याचें उज्ज्वल स्वरुप प्रकट करण्याचा प्रयत्न आहे. या चळवळीस वेदविरुद्ध बंड हा शब्दहि योग्य नव्हे. कारण या मंडळींचा वैदिकधर्मांतून बाहेर पडण्याचा अगर वैदिक धर्माचा उच्छेद करण्याचा केव्हांच प्रयत्न नव्हता. या मंडळीनीं जातीविरुद्ध बंड केलें याचा अर्थ वाटेल त्या जातींतील माणसांनीं वाटेल तें करणें असा नव्हे. असें असतें तर कलियुगांत अनाचार कसा माजेल हें सांगतांना 'पुढें ब्रह्मघोळ होईल, चारी वर्ण एका ठिकाणीं खालील' असे अनाचार निर्दशक उद्गार त्यांनीं काढले नसते. त्यांनीं जातीच्या विरुद्ध लिहिलें म्हणजे 'मुक्तीच्या व भक्तीच्या मार्गांत' जातीची किंमत नाहीं ही गोष्ट स्पष्टपणें त्यांनीं निदर्शनास आणली. 'कर्ममार्गांत,' व्यवहारांत 'जात' टाकलीच पाहिजे, असे उद्गार एकाहि संताचे आपणांस ऐकूं येणार नाहींत. उलट हा कर्ममार्ग कायम राखलाच पाहिजे यावर त्यांनीं जोरहि दिला आहे. एका विशिष्ट जातींतील, विशिष्ट आश्रम धारण करणार्‍यासच मोक्ष मिळतो ही  कल्पना रुढ होत चालली होती. तद्विरुद्ध 'उत्तमापासोनि अत्यंजवरि मुक्तिची सेल मागावी रेरे' अशी 'मुक्तीची' गवादी या संतांनीं घातली. तात्पर्य कालौघाबरोबर फक्त बाह्य गोष्टीवर जोर देऊन मुक्ति ही एका विशिष्ट वर्णास व आश्रमास जी मर्यादित केली होती ती या संतांनीं सर्वांस मोकळी केली. पण यांत ते अवैदिक ठरत नाहींत. कारण, आपल्या शारीरभाष्यांत खुद्द शंकराचार्य यांनींहि विदुर, धर्म, व्याध वगैरे मुक्त होते असें कबूल केलें आहे. तेव्हां हेंच तत्त्व या संतांनीं प्रसृत केलें असें म्हणावयास हरकत नाहीं. हिंदुधर्मांतील लोक-पुरुष व स्त्रिया-मुक्त होतीलच एवढेंच नव्हें तर 'अविंधां' सहि मुक्ति यांनीं मोकळी केली.

सकळांसी येथें आहे अधिकार । कलियुगीं उध्दर हरिच्या नामें ॥३॥

त्याचाच परिणाम  सर्व जातींत - शिंपी, न्हावी, कुंभार, महार संत निर्माण झाले व आज महाराष्ट्र हें संतांनीं वसवलेलें असें स्थान होऊं शकलें.

वारकरी पंथ हा आदिअंतीं भक्तिप्रधान आहे. परंतु वेदांचा जो 'एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेहनानास्ति किंचन' हा मुख्य सिद्धांती तोच वारकरी संतांचाहि सिद्धांत आहे.

हरी व्यापक सर्वगत । हा तंव मुख्यत्वें वेदांत ॥तु.॥
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतीचें सार ॥तु.॥
जनीं जनार्दन । संत बोलती वचन ॥तु.॥
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम  अमंगळ ॥तु.॥

अशा तर्‍हेनें हा पंथ अद्वैतमत प्रतिपादन करुनहि पुनः भक्तिचें तत्त्व प्रतिपादन करतो. वारकरी पंथाचा विशेष भर असेल तर -

पावावयां उपासना । ब्रह्मस्थानीं प्रस्थान ॥
मुक्ती वरील भक्ति जाण । अखंड मुखीं नारायण ॥
नुसतें मुक्त होऊन बसण्यांत विशेष नाहीं तर -
जें पुरुषार्थ सिध्दि चौथी । घेऊनि आपुलिया हाती ॥
रिगाला भक्तिपंथीं । जगा देत ॥१॥ (ज्ञाने.अ.१२)
दासीसी अनुकरणें । हें तो लाजिरवाणें ।
मूर्ख मागती मुक्ति रे रे ॥

आपल्या अद्वैतपणांत किंचितहि बिघाड येऊं न देतां भक्तिसुखाचा आनंद उपभोगतां येतो, किंबहुना खरी भक्ति ही अद्वैतांतच होते असें शिकविणारा हा पंथ आहे. 'शिवो भूत्वा शिवं यजेत्' अथवा ' आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्याचें काम । मग कीजे कां निःसीम । सेवा जयाची ॥' अशा तर्‍हेनें  अद्वैतज्ञान प्राप्त करुन स्वतः भक्तिसुखाचा आनंद भोगून इतरांनांहि त्या आनंदांत 'भक्तिमार्गद्वारें' वांटेकरी करणारा हा पंथ आहे. या पंथाचें ध्येय सिद्धवस्थेनंतरहि 'अक्टिव्हिझम' (कर्मशीलता) आहे. ही गोष्ट या पंथांतील समाधीच्या कल्पनेवरून स्पष्ट होत आहे. या पंथानें या बाबतींत केवढें कार्य केलें आहे हें योगाचें ध्येय व याचें ध्येय यांची तुलना केल्यास आढळून येणार आहे. मुक्तावस्था अथवा तिचा ज्या अवस्थेंत अनुभव येतो ती समाधि यांचा संकोचित अर्थ या पंथांत नाहीं. समाधि म्हणजे ताटस्थ्य नव्हे तर -

व्यापाराचे गाडे । मोडितांहि अपाडे । अक्रियेत्वाचे न मोडे पाऊल कीं । (अमृतानुभव)
अर्जुना देऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायुद्धी । (नाथभागवत)
समाधि हरिची समसुखेविणा । न साधेल जाण द्वैतबुद्धि (ज्ञानदेव हरिपाठ १३)

यांपैकीं कोणीहि संन्यासवृत्तीचा उपदेश करीत नाहीं. उलट स्वतः मुक्त बनून जगास आपण ज्या मार्गानें मुक्त झालों त्याचें ज्ञान करुन देऊन 'अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आवारु' करण्याचा विश्वव्यापक यत्न करण्यास कास घालण्यास शिकविणारा हा पंथ आहे.

पावोनिया ब्रह्मज्ञान । स्वयें तरला आपण ।
न करीच दीनोध्दरण । तें भंडणपण ज्ञात्याचें ॥१॥ (नाथभागवत)

या साध्य भक्तीस साधनहि भक्ति आहे. हा पंथ 'सगुणोपासक'अंतर्बहिः आहे. परमात्मा व्यापक, निर्गुण-निराकार आहे हेंहि त्यास मान्य. पण त्याचप्रमाणें तो सगुणसाकार आहे हेंहि तो   म्हणतो:-

बापरखुमादेवीवरु सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खूण ॥ (ज्ञानदेव अभंगः
दोन्ही टिपरी एकचि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे ॥ (तु.)
सगुण निर्गुणाचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ (तु.) व त्या निर्गुण स्वरुपास पावण्याचा मार्ग म्हणजे सगुणोपासना, नामस्मरण व भजन हें होय:-
निर्गुणीं पावलें सगुणीं भजतां । विकल्प धरतां जिव्हा झडे ॥ (नाथ अभंग)
अवघ्या दशा येंणें साधति । मुख्य उपासना ॥ (सगुणभक्ति)
प्रकटे हृदयींची मूर्ति । भावशुध्दि जाणोनियां ॥
बीज आणि फळ हरिचें नाम. ॥तु.॥ (नाथ अभंग)

या सगुणोपासनेनेंच भगवद्विषयक बरवें ज्ञान प्राप्त होतें. ज्ञानमार्गाचा व भक्तिमार्गाचा वास्तविक तंटा नाहीं, तर भक्ति ही मोक्षसाधन जें ज्ञान त्यास कशी कारण आहे ही गोष्ट श्रीएकनाथ महाराज यांनीं आपल्या अभंगांतून व भागवत अध्याय २ यांमधून सांगितली आहे. आम्हीं येथें फक्त अभंगाचा उतारा देत आहोंत. कारण त्यांत भागवतांतील ओव्यांचाहि भावार्थ आला आहे.

भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीनें ज्ञानासी दिधलें महिमान ॥१॥ भक्ति तें मूळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथींचें फूल ॥२॥ भक्तिविण ज्ञान गिवसि ती वेडे । मूळ नाहीं तेथें फळ केवीं जोडे ॥४॥ भक्तियुक्त ज्ञान तेथें नाहीं पतन । भक्ति माता तया करितसे जतन ॥५॥ एकाजनार्दनी शुद्ध भक्तिक्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पायां ॥८॥

मनुष्यास स्वाभाविक रीत्याच सुलभ गोष्ट पटत असते, व कलियुगांत लोकांच्या रहाणींत फरक होत जाऊन तपश्चर्यादिक कडक साधनें अगर यज्ञयागादिक अत्यंत खर्चाचीं व बोजड साधनें होणें कठिण, हें जाणून या पंथांतील साधूंनीं भगवद्प्राप्तीकरितां हरिभजनावरच जोर दिला.

अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कलीं न घडे साधन ॥
एक गावें आम्हीं विठोबांचें नाम । आणिकांचें काम नाहीं आतां ॥१॥ मोडोनिया वांटा सूक्ष्म  दुस्तर । केला राज्यकारभार चाले ऐसा ॥२॥
लावूनि मृदंग श्रुति (वीणा) टाळघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥३॥ तुका म्हणे महापातकी पतित । ऐसीयांचें हित हेळामात्रें ॥४॥

यांच्यामतें योगादिक साधनांनीं प्राप्त होणारी विकाररहित स्थिति या भजनाच्या साधनानें सुलभ रीतीनें होऊं शकते. कारण अंत:करण व इंद्रियें यांचा केवळ निरोध करणें हें कठिण. हें मानसिक शास्त्रांतील तत्त्व लक्षांत आणून भक्तिमार्ग हा कामक्रोधादिक यांस 'ठार मार', असें सांगत नाहीं तर त्यांनां 'हरीकडे वळवा' असें सांगतो.

'तदषर्पताखिलाचारः सन् कामक्रोधाभिमानादिकं
तस्मिन्नेव करणीयम् ॥' (नारदभक्तिसूत्र).
इंद्रियें कोंडिलीं न कोंडती । विषय सांडितां न संडिती पुढती पुढती बाधों येती । या लागी हरिभक्ति द्योतिली वेदें ॥ (नाथभागवत अ.२).
पण या भजनास सुद्धां नीतीचे नियम पाळणें अवश्य आहे.
साधनें तरी हींच दोन्हीं । जरी कोणी साधील ॥
परद्रव्य परनारी । यांचा धरी विटाळ ॥२॥

थोडक्यांत सांगावयाचें कीं नीतीनें वागून श्रीपंढरीरायाची भजनद्वारां उपासना करणारा जो आहे त्यासच अभ्युदय व निःश्रेयस हीं दोन्हीं प्राप्त होतात असें या पंथाचें मत आहे.

आतांपर्यंत यांच्या  तत्त्वज्ञानाचा व आचारांचा जो विचार केला त्यावरुन 'देश बुडवण्यास' कारण होण्यासारखें त्यांत कांही नाहीं ही गोष्ट स्पष्ट दिसून येणारी आहे. हा पंथ देश बुडविण्यास कारण होतो असें म्हणणार्‍यांस आम्हांस येथें तूर्त एवढेंच सांगावयाचें आहे कीं, देशविघातास कारण होणारे 'दैववादासारखे वाद' या पंथांतील साधू उपदेशीत नाहींत.
हातीं हित आहे करील तयासी । म्हणौनी ॠषी सांगितलें ॥तु.॥

असा स्पष्ट शब्दांत त्यांचा उपदेश आहे. प्रसंगविशेषीं याहि पंथांतील लोक राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरितां धारातीथीं पडलेले आहेत. यांतील राष्ट्रकार्याचा व्याप करणार्‍यांचें ठळक उदाहरण पाहिजे असल्यास 'महादजी' शिंदे यांचें देतां येईल. शूर पाटीलबुवा हे वारकरी होते -कट्टे ज्ञानेश्वर भक्त होते. त्यांनीं 'माधवदासी' नांवाचा एक ग्रंथहि लिहिला आहे. वारकरी असून पाटीलबुवा अलौकिक पराक्रम करुं शकले यावरुन हा पंथ देशविघातक नाहीं ही गोष्ट स्पष्ट होणारी आहे. कालास योग्य असें वर्तन करण्यास शिकवणारें असें याचें तत्त्वज्ञान आहे.

याशिवाय या पंथानें (१) अभंग-ओवीद्वारा मराठी भाषेंत अलौकिक ग्रंथसंपत्ति निर्माण करणें, (२) स्त्रीशूद्र-चांडाळ या सर्वांस ईश्वरविषयक ज्ञान सुलभ करुन देणें, (३) सर्व संग्राहक अशा भागवतधर्माचा पुरस्कार करुन ब्राह्मण-ब्राह्मणेतर, शैव-वैष्णव वगैरेंसारख्या देशविघातक वादांचें बीज नाहीसें करणें व (४) परकीय धर्मास तोंड देण्यास समाज सुसंघटित करणें, ही कामगिरी केली आहे.

तात्पर्य कालास अनुसरुन सर्वांचा संग्रह करणारा व परमेश्वरप्राप्तीचा सरळ व सुलभ मार्ग दाखविणारा असा हा पंथ आहे. दिवसेंदिवस याची वाढ खूपच जोरानें होत आहे. व हें श्रीपांडुरंगभक्तीचें श्रीपुंडलिकानें लावलेलें 'इवलेसें रोप' श्रीज्ञानोबा-तुकोबा आदिकरुन संतमंडळींच्या कृपारुप ओलाव्यानें 'गगनावर जाईल' अशीं चिन्हें दिसत आहेत.

हल्ली आषाढशुध्द एकादशीस पंढरपूर येथें निरनिराळया ठिकाणांहून संतांच्या पालख्या येतात त्यांची नांवें पुढीलप्रमाणें आहेत - ज्ञानेश्वरमहाराज (आळंदी); निवृत्तिनाथ (त्र्यंबकेश्वर; तुकाराम महाराज (देहू); एकनाथ (पैठण); सोपानकाका (सासवड); मुक्ताबाई (एदलाबाद); नामदेव (पंढरपूर); मुक्ताबाई (एदलाबाद); नरहरी सोनार (पंढरपूर); नामदेव (खुनेश्वर); जनार्दनस्वामी (औरंगाबाद); जयराम स्वामी (वडगांव); शेकू बोवा (शिरसावडी); घाडगेबोवा (कोळें); तपकिरी बोवा (चिंचगांव); माच्छिंद्रनाथ (माच्छिंद्रगड); रोहिदास (पंढरपूर); संताबाई (पंढरपू); चोखोबा वंका (मेहुणपुरा); चोखोबा (पंढरपूर); दामाजी (मंगळवेढें); रुक्माबाई (कोंडणपूर-उमरावती); शंकरमहाराज (माहुलीउमरावती); गोरखनाथ (शिराळा); इत्यादि.

वारकरी संत
संतनाम काल समाधिस्थान
निवृत्तिनाथ ११९५-१२१९ त्र्यंबकेश्वर
ज्ञानेश्वर महाराज ११९७-१२१८  आळंदी
सोपानदेव ११९९-१२१८ सासवड
मुक्ताबाई १२०१-१२१९ एदलाबाद
विसोबा खेचर ...   १२३१ ....     ...
नामदेव ११९२-१२७२ पंढरपूर
गोराकुंभार ११८९-१२३९ तेर
सावतामाळी ...   १२१७ अरणभेंडी
नरहरी सोनार ...   १२३५ पंढरपूर
चोखामेळा ...   १२६० पंढरपूर
जगमित्र नागा ...    १२५२ परळी (वैजनाथ)
कूर्मदास १२५३  ... लऊळ
जनाबाई ...     ... पंढरपूर
चांगदेव ...   १२२७ पुणतांबें
भानुदास १३७० ... पैठण
एकनाथ १४७०-१५२१ पैठण
राघव चैतन्य ........ ओतूर
केशवचैतन्य ....   १९९३ गुलबर्गा
तुकारामबुवा ...    १५७२ देहू
निळोबाराय ...     ... पिंपळनेर
बोधलेबुवा तुकारामबुवांचे समकालीन
शंकरस्वामी ...  ... शिरूर
मलजप्पा ...  ... आळंदी
मुकुंदराज ...  ... आंबें (जोगाईचें)
कान्होपात्रा ... .... पंढरपूर
जोगापरमानंद ... .... बाशाअ


(लेखन प्रो. शंकर वामन दांडेकर)

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .