विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वारली:- एक जात, वस्ती मुंबई इलाखा, लोकसंख्या (१९११) १९०२३७. ही जात बहुधां ठाणें जिल्ह्यांत आढळते. ही एक रानटी जात दिसते. हे लोक बहुधां खेडयांत वस्ती करुन राहतात. तरी बरेचसे मजुरीच्या शोधार्थ लांबवर भटकत जातात. ठाकूर, कातकरी व इतर वन्य जातींप्रमाणें वारली लोकांचा एकच कारागिरीचा धंदा अथवा उद्योग नसतो. ते आपला उदरनिर्वाह गवत व लांकडांच्या मोळया विकून अथवा लहान सहान पारध करुन करतात. पावसाळयातं फक्त कांहीं लोक शेतकाम करतात. यांचे पोटभेद आहेत; त्यांत परस्पर रोटीबेटी व्यवहार चालतो. जातीबाहेर लग्न करण्याचा प्रघात आहे. लग्नाकरतां मुहूर्त पहात नाहींत. जातींतील एखाद्या वृद्ध बाईकडून लग्नविधि करुन घेतात त्या बाईस 'दवलेरी' असें म्हणतात. गुजराथ प्रांतांतल्या वारली लोकांत बायको मिळविण्याची अशी चाल आहे कीं, तिच्या आईबापांची सेवा नवर्यानें करावी लागते. पुनर्विवाह, घटस्फोट मान्य व प्रचलित आहेत. गाय, रेडा, व नीलगाई यांखेरीज सर्वांचें मांस हे खातात. दारुवर त्यांची अतोनात भक्ति असते. उच्च जातींतलें उष्टें खाण्यास हरकत नसते. आगरीच्या हातचें अन्न त्यानां चालतें, पण 'भंडारी', वाडवळ, कुणबी याचें अन्न त्यांनां चालता नाहीं. वारलींचें अन्न कोणांसच चालत नाहीं. धर्मानें वारली वन्यहिंदू असून त्यांचा मुख्य देव वाघ्या होय. बहिरोबा-खंडोबाचीहि ते पूजा करतात. अपघातानें मरतात त्यांनां पुरतात व इतर मृतांनां गाणें बजावणें करुन जाळतात. (से.रि.(१९११)मुंबई).