विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वारसा:- हा शब्द अरबी आहे. त्याच अर्थाचा हिंदु धर्माशास्त्रांतील शब्द 'दाय' (पित्रादिधनं दीयते इति दाय:) असून 'पिता वगैरे नातेवाईकांकडून मिळणारें धन' असा त्याचा अर्थ आहे. 'दाय' हा शब्द ॠग्वेदांत 'श्रमाचा मोबदला' या अर्थानें आला आहे. पुढें त्याला पैतृकधन असा अर्थ प्राप्त झाला. हें धन बापाच्या हयातींत किंवा मरणोत्तर पुत्रांमध्यें विभागलें जाई. सामान्यतः असलें धन ही सर्व कुटुंबीयांची मत्ता असें न मानता ती कुटुंबातील कर्त्याची (मॅनेजर बहुधा बाप) मालमत्ता गणली जात असे. तथापि तैत्तिरीय संहितेंत 'मनूनें आपले धन पुत्रांनां वाटून दिलें असें' म्हटलें आहे. आद्य वैदिक काळांत फक्त जंगम मत्ता वांटली जात असे, स्थावर जमीन वगैरे वांटली जात नसे, असें दिसतें. पण पुढें जंगमप्रमाणें स्थावर मिळकत वांटली जाऊं लागली. स्त्रियांनां वाटणीचा किंवा वारसाचा हक्क नसे असें शतपथ ब्राह्मण व निरुक्त या ग्रंथांवरून दिसतें. वारसासंबंधाचे सविस्तर नियम धर्मसूत्रांतून दिलेले आहेत. त्यानंतर मनु, याज्ञवल्क्ये वगैरे स्मृतिकारांनीं 'दायविभाग' उर्फ वारसापध्दति हें प्रकरण पूर्णत्वानें दिलें आहे.
वारसाचे हिदुधर्मशास्त्रांत सरळ (अप्रतिबंध) आणि तेढा (सप्रतिबंध) असे दोन प्रकार असतात. पुत्र, नातू व पणतू यांनां बाप, आजा व पणजा यांच्याकडून जो वारसाहक्क प्राप्त होतो त्याला 'सरळ वारसा' म्हणतात. पुत्रपौत्रांच्या अभावीं बायको, मुलगी वगैरे जे वारस होतात त्यांनां 'तेढे वारस' म्हणतात.
कोणतीहि स्त्री किंवा पुरुष यांची स्वतंत्र मालकीची जी मिळकत असते त्या मिळकतीस वारसाचा कायदा लागतो. कोणत्याहि स्त्रीस किंवा पुरुषास पुरुष वारस झाल्यास त्यास जी इष्टेट मिळते तिचा तो संपूर्ण मालक होतो. मुंबई इलाख्यांत मुलगी, बहीण व अशा सोत्रज सपिंड स्त्रियांस वारस म्हणून जी मिळकत प्राप्त होते तिच्या त्या संपूर्ण मालक होतात. यांच्याशिवाय कुटुंबांतील सगोत्रज सपिंड स्त्रिया विधवा, आई, आजी वगैरे यांनां वारसानें जी मिळकत मिळते त्या मिळकतींत यांनां संपूर्ण मालकीहक्क प्राप्त होत नाहींत. जरुर व योग्य कारणाशिवाय ती मिळकत यास विकतां येत नाहीं. (२६मुं. ४४९). कोणीहि मनुष्य मयत झाल्यास त्याचा सर्वांत नजीकचा नातलग तत्क्षणींच वारस होतो (म्हणजे त्याचा मुलगा त्यास वारस होतो) परंतु गर्भावस्थेत असला तर तो जन्मल्याबरोबर वारस होतो. मयताचा मुलगा, नातू व पणतू यांस एकाच वेळीं वारसा प्राप्त होतो. मयतास एकाच वेळीं समान नात्याचे व दर्जाचे अनेक वारस झाल्यास त्यांचा मयताच्या इष्टेटींत प्रत्येकाचा सारखा हिस्सा असतो. या प्रत्येक वारसास मिळालेली जिनगी त्याच्या पूर्ण मालकीची होते. व तो मयत झाल्यास त्याच्या जिनगीस त्याचे वारस मालक होतात.
एकत्र हिंदु कुटुंबाच्या समाईक मिळकतीस वारसाचा कायदा लागत नाहीं. त्या मिळकतीस शेषाधिकाराचें तत्त्व (सर्व्हायव्हर्शिप) लागते. परंतु एकत्रकुटुंबात असतांना एखाद्या व्यक्तीनें कांही मिळकत स्वतः संपादन केली किंवा त्यास वेगळीच मिळकत दुसर्या कोठून प्राप्त झाली तर त्या मिळकतीस तिच्यापुरता वारसाचा कायदा लागू होतो. हिंदु एकत्र कुटुंबापैकी सर्वांच्या शेवटीं जो सहभागीदार शिल्लक राहतो तो कुटुंबाच्या सर्व मिळकतीचा एकटा मालक होतो. तो मयत झाला कीं, त्या जिनगीस वारसाचे नियम लागतात. हिंदु कुटुंबांतून विभक्त झालेल्या इसमांची त्याच्या हिश्शास आलेली जिनगी त्याच्या एकटयाच्या मालकीची होते. अशा इष्टेटीस वारसाचे नियम लागतात (५इं.आ. १४९) मनुस्मृतींत योजिलेल्या सपिंड या शब्दाचा अर्थ एकपिंडानें म्हणजे एकरक्तमांसानें निकट असलेल्या सर्वांत जवळचा नातलग असा मिताक्षरानें केला आहे. त्याप्रमाणें सर्वांत जवळचा सपिंड हा सर्वांत आधीं वारस होतो असा नियम घातला आहे. (५मुं. ११०, पृ. ११८-१२०). मयताचें आध्यात्मिक हित किंवा त्याची सद्गति करुन त्याचा उद्धार करण्याची ज्यास जास्त पात्रता आहे तो मयताचा प्रथम वारस होतो असा दायविभागाचा नियम आहे. मिताक्षरा व दायविभाग यांच्या वारसांच्या कायद्यांत हा फार महत्वाचा भेद आहे. मिताक्षराच्या प्रमाणें वारसांच्या कायद्यांत धर्मिक तत्त्वाची गुंतागुंत केलेली नाहीं. केवळ ऐहिक दृष्टीनें मिताक्षरानें वारसाच्या कायद्याचा विचार केला आहे. दायविभागाप्रमाणें श्राद्ध करण्याचा अधिकार, पिंड देण्याचा अधिकार या तत्त्वावर वारसाचा कायदा उभारला आहे. श्राद्ध करण्याचा जास्त अधिकार ज्यास असतो तो मयताचा सर्वांत जास्त नजीकचा वारस असतो. परंतु ही गोष्ट स्त्रियांस लागू पडत नाहीं. यामुळें सगोत्र-सपिंड म्हणून मिताक्षराप्रमाणें ज्या स्त्रिया त्यांच्या नवर्याच्या ठिकाणीं वारस म्हणून येतात तशा त्या जीमूतवाहनाप्रमाणें (दायभाग) येणार नाहींत.
सपिंडामध्यें एकगोत्रज सपिंड व भिन्नगोत्रज सपिंड असे दोन वर्ग केले आहेत. एकगोत्रजसपिंड म्हणजे मयताच्या गोत्रांतील किंवा कुटुंबातील माणसें व भिन्नगोत्रजसपिंड म्हणजे मयताच्या गोत्रांहून भिन्न (अन्य गोत्रांतील किंवा कुटुंबांतील माणसें यांस बंधू असें म्हणतात. एकगोत्रजसपिंडाचे सपिंड आणि समानोदक असे दोन वर्ग केले आहेत.
सपिंड या संज्ञेंत मयताच्या सहा पिढयांच्या खालचे पुरुष येतात; म्हणजे मयताचा मुलगा; त्याचा मुलगा व त्याचा मुलगा अनुक्रमें असे सहा पिढयापर्यंतचे पुरुष सपिंड होत. तसेंच मयताच्या वरील पिढीचे सहा पुरुष व वरील पिढीच्या सहा पुरुषांच्या बायका हे सपिंड होत. तसेंच मयताचे भाऊ, भावाचे मुलगे असे सहा पिढयांपर्यंतचे पुरुष व मयताचा चुलता, चुलत्याचा मुलगा त्याचा मुलगा असे अनुक्रमें सहा पिढयांपर्यंत असे सर्व इसम सपिंडांत येतात. मयताची बायको, मुलगी, व मुलीचा मुलगा हे सपिंडांत गणले आहेत. समानोदकांत सातव्या पिढीपुढील ते चवदाव्या पिढीपर्यंतचे पुरुष येतात. श्राद्धाच्या वेळीं ज्या नातलगास उदक देतात ते सर्व समानोदक होत. सम म्हणजे एक व पिंड म्हणजे देह एकच आहे देह ज्यांचा त्यांनां सपिंड म्हणतात. उदाहरणार्थ पुत्राचा पित्याच्या शरीरावयवांशीं संबध असतो. म्हणून त्याचें पित्याशीं सापिंडय असतें. त्याचप्रमाणें पित्याचा पिता; त्याचा पिता इत्यादिकांशीं पित्याच्या द्वारां नातू पणतू इत्यादिकांचा संबंध असल्यामुळें त्यांचे परस्पर सापिंडय ठरतें. याच न्यायानें मातेच्या शरीराच्या अवयवांशीं संबंध असल्यामुळें पुत्राचें मातेशीं सापिंडय व मातेच्या द्वारां तिचा बाप, आई, भाऊ, बहीण इत्यादिकांशीं सापिंडय असतें. काका, आत्या, यांच्याशींहि एकशरीरसंबंधांमुळेंच पुतण्या व भाचा यांची सपिंडता असते. त्याचप्रमाणें पतिपत्नी हीं दोघें पुत्राच्या एका शरीरास निर्माण करणारीं असतात यास्तव त्यांचेंहि सापिंडय असतें. याच न्यायानें जावाजावांचें परस्पर सांपिडय ठरतें. सारांश जेथें जेथें एक शरीर आहे तेथें सापिंडय आहे असें समजावें. मातेच्या संतानांतील पाचव्या पिढीनंतर व पित्याच्या संतानांतील सातव्या पुरुषानंतर सापिंडयनिवृत्ति होते (२ मुं.३८८, ४२४, ८मुंहा.रि. २४४, २६२)
सपिंडामध्यें मयताचे वारस:- (१) मुलगा, (२) नातू, (३) पणतू, (४) विधवा, (५) मुलगी; (मुलींमध्यें अविवाहित मुलगी प्रथम नंतर विवाहितांपैकीं निर्धन, नंतर विवाहित सधन असेल ती वारस होते. वारस म्हणून मुलीस जें बापाचें धन मिळतें तें तिचें स्त्रीधन होतें. त्याची ती पूर्ण मालक आहे. ती मिळकत तिच्या मागें तिच्या वारसास मिळते) (६) मुलीचा मुलगा, (७) आई, (आई या शब्दांत सावत्र आईचाहि समावेश होतो (१९ मुं. ७०७). मुंबई इलाख्यांत सावत्र आईची गणना सगोत्रपिंडांत करतात.) (८) बाप, (९) भाऊ, (१०) भावाचा मुलगा (पुतण्या), (११) पुतण्याचा मुलगा, (१२) आजी (बापाची आई), (१३) आजा, (१४) चुलता, (१५)चुलतभाऊ, (१६) चुलत भावाचा मुलगा, (१७) पणजी, (१८) पणजा, (१९) बापाचा चुलता, (२०) बापाच्या चुलत्याचा मुलगा, (२१) त्याचा मुलगा. यांशिवाय सपिंडांपैकीं जे जास्त नजीकचे असतील ते इतरांपेक्षां आधीं वारस होतात.
सर्व सपिंडानंतर समानोदक वारस होतात. त्यांतील जवळची शाखा प्रथम वारस होते. त्यापेक्षां दूरची शाखा त्यानंतर वारस होते. समानोदक हे मयताच्या पुरुषांकडून सात ते चवदा पिढीपर्यंत वारस होतात. भिन्नगोत्रजसपिंड किंवा बंधु हे स्त्रियांच्या बाजूनें संबंध असलेले नातलग वारस होत हें समानोदकांनंकर वारस होतात. यांत आत्मबंधु, पितृबंधु, व मातृबंधु असे तीन प्रकार आहेत.
आत्मबंधु:- बापाच्या बहिणीचा मुलगा = आतेभाऊ; आईच्या बहिणीचा मुलगा = मावसभाऊ; आईच्या भावाचा मुलगा = मामेभाऊ
पितृबंधु:- आज्याच्या बहिणीचा मुलगा; आजीच्या बहिणीचा मुलगा; आजीच्या भावाचा मुलगा.
मातृबंधु:- आईकडून आज्याच्या बहिणीचा मुलगा; आईकडून आजीच्या बहिणीचा मुलगा; आईकडून आजीच्या भावाच मुलगा. याशिवाय आणखी बंधू आहेत.
नवर्याच्या मागें साध्वी पत्नी वारस होते. नवर्याच्या मरणसमयीं त्याची बायको, जर व्यभिचार कर्म करणारी असली तर ती वारस होत नाहीं. धर्मांतर केलेला इसम व जातिभ्रष्ट झालेला इसम हे वारस होण्यास पात्र आहेत, असें फ्रीडम ऑफ रिलिजन ऍक्ट नं. २१, सन १८५० च्या ऍक्टान्वयें ठरविलें आहे.
वारस होण्यास अपात्र -
क्लीबोथ पतितत्तज्जः पंगुरुन्मत्तको जड:
अंधोऽचिकित्स्यरोगाद्या भर्तव्यास्युर्निरंशका:
औरसा: क्षेत्रजास्त्वेषां निर्दोषा भागहारिणः
सुताश्चैषां प्रभर्तव्या यावद्वैभर्तृसात् कृता:
अपुत्रा योषितश्चैषा गर्तव्या: साधुवृत्तय:
निर्वास्या व्यभिचारिण्य: प्रतिकुलास्तथैवच. (याज्ञ. स्मृति)
जन्मापासून ज्यास एखादा अवयव नाहीं किंवा इंद्रिय नाहीं, जन्मापासून मुका, आंधळा, बहिरा, वेडा, जन्मापासून अगदीं पुरा खुळा, आणि महारोगी - रोग बरा होणारा नाही अस अत्यंत वाईट प्रकारचा, व दुसरे असाध्य रोग असलेला रोगी हे इसम वारस होण्यास लायक नाहींत (यांनां वाटणींत भाग मिळत नाहीं). तसेंच मयताचा खून करणारा इसम त्याचा वारस होण्यास नालायक आहे. वांटणीच्या वेळीं यास हिस्सा मिळत नाहीं. त्यास केवळ अन्नवस्त्र मिळतें. ही नालायकी व्यक्तीपुरतीच आहे. असा इसम अस्तित्वांत नाहीं असें समजून त्याच्यानंतर येणारा इसम वारस होतो. यांचे मुलगे दोषरहित असल्यास वारस म्हणून त्यांस जिनगी (हिस्सा मिळेल)
सन १८५९ चा ऍक्ट नं. १५ यानें स्त्रियांचे पुनर्विवाह कायदेशीर केले आहेत. पण त्या योगें नवर्याच्या मिळकतींतील त्यांचे हक्क नाहींसे होतात म्हणून पुनर्विवाहित स्त्री पहिल्या नवर्याच्या मिळकतीस वारस होत नाहीं. परंतु ज्या जातींत पुनर्विवाह करण्याची रुढीनें परवानगी आहे त्या जातींत पुनर्विवाह केला तरी तिच्या नवर्याचे इष्टेटीतींल हक्क नष्ट होणार नाहीं. (११मुं. ११९; ११ अ. ३३९).
वानप्रस्थ, यति, ब्रह्मचारी यांचे वारस आचार्य, सद्गुणी शिष्य, व धर्मबंधु असे क्रमानें होतात. मठाधिपति महंत हे आपल्या मागे होणार्या चेल्याची नेमणूक आपल्या हयातींत करुन ठेवतात व नंतर ती यांच्या उत्तरक्रियेच्या वेळीं इतर आसपासचे महंत जमून कायम करतात. गोसाव्यानें चेला केलेला नसला तर गुरुबंधूचा चेला वारस होतो.
देशांतरास गेलेला इसम तिकडेच वारला तर त्याचे वारस त्याचे पुत्र, बंधु वगैरे होतात. ते नसले तर त्याच्या ज्ञातीचे लोक, त्याच्याबरोबर असलेला सोबती, व हे कोणीच नसले तर त्याचें द्रव्य राजा घेतो. अविभाज्य मोठमोठया इष्टेटींनां रुढीप्रमाणें वारस होतो. सर्वांत वडील शाखेचा वडील मुलगा असा क्रम चालतो. (३२ इं.आ. २६१; २८ म. ५०८)
इतर देशांतील वारसापद्धति
प्राथमिक अवस्था:- प्राथमिक अवस्थेंतील लोकांत धार्मिक समजुती व समाजरचना हीं दोन्हीं मयताच्या आत्पांनां वारसापध्दतीनें इस्टेट मिळण्याला प्रतिकूल असत. विशेषतः मयताची जंगम मिळकत म्हणजे त्याचीं शस्त्रें, हत्यारें, शरीरभूषणें व भांडींकुंडीं हीं त्याच्या मृत्यूबरोबर त्याच्या थडग्यांत पुरीत किंवा जाळून अथवा फोडून टाकीत. पुरण्यांत त्यांची समजूत अशी असे कीं, तीं त्याला त्याच्या पुढील जन्मामध्यें उपयोगीं पडतील; कांहीं वस्तू मयताच्या संसर्गामुळें प्राप्त झालेल्या दूषितपणामुळें निरुपयोगी मानल्या जात. मयताची झोंपडी याच कारणास्तव जाळून किंवा पाडून टाकीत असत. पुढें वारसाहक्काचें तत्त्व अस्तित्वांत आलें तरी मयताबरोबर कांहीं विशिष्ट वस्तू पुरण्याची किंवा जाळण्याची चाल चालू असे. इतकेंच नव्हें तर मयताच्या बायका व दासी यानांहि मयताबरोबर जिवंत पुरीत किंवा जाळीत. हळू हळू उपयुक्त वस्तूंचा असा नाश न करण्याकडे प्रवृत्ति होऊन प्रत्यक्ष वस्तूऐवजीं त्यांच्या प्रतिमा मयतांनां अर्पण करण्याची चाल रुढ झाली व जंगम इस्टेट वारसांनां मिळूं लागली. स्थावरमत्ता म्हणजे जमीन तसेंच धंदा व हुद्दा हीं वारसाला न मिळतां मयताच्या टोळीला उर्फ समाजाला मिळत असे. प्रथमावस्थेंत जमीनीवर सामुदायिक मालकी असे, वैयक्तिक नसे.
प्राचीन राष्ट्रें:- असुरी-बाबीलोनी लोकांतील वारसापध्दतीची माहिती खमुरब्बी कोडांत मिळते. मयताची इस्टेट त्याच्या अपत्यांत सारख्या प्रमाणांत वांटली जात असे अनौरस संतति दत्तकपध्दतीनें मान्य केल्यास अशा संततीस मयताच्या औरस संततीच्या बरोबरीनें हिस्सा मिळे. मिसरी लोकांसंबधीं माहिती, थडगीं व देवालयें यांवरील खोदलेखांवरुन आणि पापीरी लेखांवरुन मिळते. मिसरी कायद्यान्वयें मयताची खासगी मिळकत त्याच्या मुली व मुलगे यांनां सारख्याच प्रमाणांत मिळत असे. मुलींची इष्टेट त्यांच्या लग्नानंतरहि पृथक् राहून नंतर त्यांच्या मुलांमुलींनां सारखीं वांटून मिळत असे. यामुळें प्रत्येक अपत्याला आईची व बापाची अशी दोन्हीकडून इष्टेट मिळे. शिवाय वुईल करुन इष्टेट कोणाहि इसमांस देऊन टाकण्याचा अधिकार असे. अशा तर्हेची
वुईलपत्रें सरकारांत रजिस्टर केलेलीं आज उपलब्ध झालेलीं आहेत. ग्रीक कायद्यांत मयतांच्या पुत्रांनां सर्व इष्टेट मिळत असे, मुलींनां आपल्या बापाच्या मिळकतींत वारसाहक्क नसे. शिवाय तेथें ज्येष्ठवारसापद्धति (प्रायमोंजेनिचर) नसून सर्व इष्टेट सगळया मुलांनां सारखी वांटून मिळे. रोमन कायद्यांत वुईलनें मिळकतीची विल्हेवाट करण्याचें तत्त्व फार पूर्वीपासून अमलांत असल्याचें दिसतें.
सांप्रतचा इंग्रजी वारसाचा कायदा:- १८३३ चा इन्हेरिटन्स ऍक्ट व १८५९ चा लॉ ऑफ प्रॉपर्टी अमेंडमेंट ऍक्ट या दोहोंत हा कायदा प्रथित आहे. यांतिल मुख्य तत्वे:- (१) मयताची इष्टेट त्याच्या औरस संततीला मिळते. (२) औरस संततीमध्यें पुरुषसंतति असल्यास स्त्रीसंततीला वारसा मिळत नाही. (३) पुरुष संततीपैकीं सगळयांत वडील मुलगा एकटाच वारस होतो. (४) पुरुषसंतति नसल्यास स्त्रीसंततीला म्हणजे मुलींनां मिळकत सारख्या प्रमाणांत वांटून मिळते. (५) वडील शाखेकडे वारसा चालू राहतो, म्हणजे मयताचा वडील मुलगा पूर्वीच मृत असून वडील मुलाला संतति असल्यास त्या संततीला वारसा मिळतो, मयताच्या इतर मुलांमुलींनां मिळत नाहीं. (६) औरस संतति मुळींच नसल्यास मयताच्या इतर नजीकच्या नातलगांस वारसा मिळतो. (७) सख्खा नातलग नसल्यास सावत्र नातलगास वारसा मिळतो. (८) कोणीच वारस नसल्यास मयताचा पूर्वीचा इष्टेटीचा मालक व त्याचे नातलग यांनां वारसा मिळतो. (९) कोणत्याहि प्रकारचा वारस नसल्यास इष्टेट राजाला मिळते.
पारशांकरितां कायदा:- हिंदुस्थानांत 'पार्शी इन्टेस्टेट सक्सेशन ऍक्ट' नांवाचा कायदा आहे त्यांतील कलमें - (१) पुरुष मयताची इष्टेट त्याची विधवा व अपत्यें यांत अशी विभागावी कीं प्रत्येक मुलाला आईच्या हिश्शाच्या दुप्पट हिस्सा आणि प्रत्येक मुलीला आईच्या निम्मे हिस्सा मिळावा. (२) मयत स्त्रीची इष्टेट तिचा नवरा व मुलें यांत अशी विभागावी कीं, प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या दुप्पट हिस्सा बापास मिळावा. (३) मयत पुरुषाची बायको हयात नसून फक्त मुलें असल्यास प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीच्या चौपट इष्टेट मिळावी. (४) मयत स्त्रीची इष्टेट नवरा हयात नसेल तर मुलामुलींनां सारख्या प्रमाणांत मिळावी. (५) नजीकचे वारस नसल्यास दूरच्या वारसासंबधीं दोन याद्या सदरहू कायद्यास जोडलेल्या आहेत.
हिंदुस्थानांतील ख्रिस्ती:- या लोकांकरितां वारसाचे नियम 'इंडियन सक्सेशन ऍक्ट' मध्यें दिले आहेत. त्यांतील कलमें - (१) मयताची विधवा व मुलें असल्यास विधवेला एकतृतीयांश इष्टेट मिळावी आणि दोनतृतीयांस इष्टेट मुलगे व मुली यांच्यामध्यें समसमान विभागली जावी. (२) मयताची औरस संतति मुलगे व मुली नसून नातू, पणतू वगैरे असतील तर शाखापध्दतीनें (पर स्टिपस) विभागणी व्हावी. (३) मयताला औरस संतति म्हणजे मुलगे नातू, पणतू वगैरे कोणी नसल्यास त्याची निम्मी इष्टेट विधवेला मिळावी आणि निम्मी मयताच्या बापाला मिळावी (४) बाप हयात नसल्यास मयताची विधवा आई व भाऊ किंवा बहिणी असतील त्यांनां समसमान वांटणी मिळावी. (५) मयताला औरस संतति किंवा आईबाप किंवा बहिणभाऊ नसतील तर मिळकत सर्वांत अधिक नजीकच्या नातलगांनां मिळावी.
मुसुलमानी:- यांच्या वारसासंबंधाचा कायदा महंमद पैगंबरानें कुराणांत सांगून ठेवला असून तोच अद्याप चालू आहे. त्यांतील मुख्य नियमः (१) मयताची इष्टेट मुलगे व मुली यांत अशी विभागावी कीं, प्रत्येक मुलाचा हिस्सा प्रत्येक मुलीच्या हिश्याच्या दुप्पट असावा. (२) मयताच्या नातलगांचे हिस्से पुढीलप्रमाणें आहेत. बाप १/६; बापाचा बाप १/६; मयत स्त्रीचा नवरा १/४; मयताची विधवा १/८; आई १/६; बापाची आई १/६; मुलगी १/२; मुलाची मुलगी १/२;, मातृसावत्र (कॉन्सँग्वाईन) बहीण १/२; सख्खी बहीण १/२; पितृसावत्र (यूटिराइन) बहीण १/६; वगैरे प्रमाणांत हिस्से मिळतात.