विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वालपापडी:- हा शब्द गुजराथी आहे. तापी, नर्मदा वगैरे गुजराथेंतील महानद्यांस पूर येतात तेव्हां पुराचें पाणी दोन्ही थडीस लांबवर पसरतें व पुराच्या पाण्याचा गाळ वीतवीत, हातहात जाडीचा बसतो. गाळांत रेतीचा भाग बराचसा असतो व अनेक क्षार असतात. अशा जमिनींतील क्षार सुकल्यावर तींत अनेक पिकें करतात; त्यांपैकींच वालपापडी हें एक होय. वालपापडीचे वेल पावटयापेक्षां मोठाले होतात व त्यांस चढविण्याकरितां उंच वाढणार्या एरंडाच्या झाडांचें बीं वालपापडीच्या बिंयाबरोबरच लावितात. थंडी पडण्याच्या सुमारास त्या वेलांस फुलें येऊन मुबलक शेंगा येतात. वालपापडीच्या शेंगा करडया-पांढर्या रंगाच्या असतात. शेंगांचीं सालें घेवडयाप्रमाणें कोंवळेपणीं खातात. जून झाल्यावर तीं वातड होतात. दाणे ओलेपणीं वालाच्या दाण्यापेक्षां गोड व कमी उग्रट असतात. वाळलेले दाणे गोलसर व चणोर्या वालासारखे पण पावटयासारखे पांढरे असतात. घेवडयाप्रमाणें वालपापडीच्या दाण्यास शेंगांतच कीड (अळी) पडते. किडीनें मोडाची जागा पोखरली नसल्यास तो दाणा उगवतो. डाळिंबीस भोंक असलें तरी ती उगवण्यास हरकत पडत नाहीं. बहुतेक गोड जातीच्या घेवडयांच्या दाण्यांस, ते वाळतांच राखेंत वगैरे न ठेविल्यास कीड पडते व म्हणूनच पावटे सबंध न ठेवितां डाळ करुन ठेवितात. डाळीस कीड फारसी लागत नाहीं. वालपापडीचे अनेक पदार्थ करतात. घेवडयासारखी नुसती भाजी करतात, वांग्यांबरोबर मिसळून करतात, सोलाण्याची उसळ व आमटी होते. वाळलेल्या दाण्यांचे भिजाणे करुनहि उसळ होते अथवा वाळलेले दाणे फुटाण्यासारखे भाजून खातात.