विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वालपोल, होरेशिओ (१७१७-१७९७):- एक आंग्ल मुत्सद्दी आणि पंडित. हा रॉबर्ट वालपोलचा मुलगा असून याचें लहानपणाचें शिक्षण एटन् आणि केंब्रिज येथील शाळांतून झालें. १७३९ पासून १७४१ पर्यंत यानें ग्रे कवीबरोबर फ्रान्स, इटली वगैरे देशांतून प्रवास केला. तो कांहीं काळ पार्लमेंटचा सभासद होता. बापाच्या वजनामुळें त्याला दोनतीनदां किफायतशीर बैठया नोकर्याथ मिळाल्या. वॉलपोलला लिहिण्याचा फार नाद असे. 'मिस्टीरिअस् मदर' नांवाचें त्याचें शोकपर्यवसायी नाटक फारच भयानक असून समाजापुढें करुन दाखविण्यायोग्य नाहीं. प्राचीन वस्तुशोधासंबंधीचे त्याचे परिश्रम बरेच महत्वाचे आहेत. त्याच्या टिपणांवरून व पत्रव्यवहारांवरून तत्कालीन अंतर्रराजकीय इतिहासराची माहिती चांगली मिळते. 'कॅटलॉग ऑफ दि रॉयल ऍन्ड नोबल ऑथर्स ऑफ इंग्लंड' (इंग्लंडमधील वरिष्ट दर्जाच्या ग्रंथकारांची सूची), 'ऍनेकडोट्स ऑफ पेन्टिंग इन् इंग्लंड' (इंग्लंडमधील चित्रकलेसंबंधीं आख्यायिका) व कॅटलॉग ऑफ एन्ग्रेव्हर्स बॉऱ्न ऍंड रेसिडेंट इन् इंग्लंड' (१७६३; इंग्लंडमध्यें जन्मलेल्या व राहणार्या शिल्पकारांची सूची) या ग्रंथांवरून त्याच्या आस्थापूर्वक संशोधनाच्या उद्योगाची चांगली कल्पना होते. तो मिजासी व छांदिष्ट असून कधीं कधीं दुसर्याचा हेवाहि करीत असे. परंतु तो तितकाच उदार व मैत्री संपादण्यास योग्य होता. तो शेवटपर्यंत अविवाहित होता.