विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वालाजापेट, तालुका- मद्रास, अर्काट जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ३९५ चौरस मैल असून १९२१ सालीं लोकसंख्या २२५९६३ होती. तालुक्यांत २४६ खेडीं असून राणीपेठ, शोलिंगगड, व वालाजापेठ, हीं तीन शहरें आहेत. तालुक्याचा पृष्ठभाग सपाट असून उत्तरेचा भाग मात्र डोंगराळ आहे. शोलिंगगड टेंकडी सर्वांत उंच असून तीवर एक देवालय आहे.
गांव:- वालाजापेठ तहसिलींतील एक शहर. हें पालारनदीपासून ३ मैल व मद्रासहून ६८ मैल दूर आहे. लोकसंख्या सुमारें १००००. येथें १८६६ सालीं म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. येथील शहररचना नीट नेटकी असून घरांची बांधणी सुरेख आहे. लोकांचा मुख्य धंदा रेशमी कापड तयार करणें, कापसाला रंग देणें, सतरंज्या गालिचे तयार करणे, तेल गाळणें वगैरे असून येथें साटिन कापड उत्कृष्ट निघतें. कृत्रिम रंग निघाल्याकारणानें सतरंज्या व गालिचे फारसे तयार होत नाहीत.