विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वॉशिंग्टन, जॉर्ज:- (१७३२ ते १७९९) एक प्रसिध्द अमेरिकन मुत्सद्दी, योद्धा व संयुक्तसंस्थानांचा अध्यक्ष . याचा जन्म व्हर्जीनियांतील ब्रिजेस क्रीक या गांवीं २२ फेब्रूआरी १७३२ रोजीं झाला. याचें घराणें इंग्रज होतें. त्याचें शिक्षण प्राथमिक अवस्थेपुढें गेलें नव्हतें. पण त्याचा गणित हा विषय इतरांच्यापेक्षां चांगला असे. वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे १७४७ सालीं त्यानें शाळा सोडली. पुढें तो भूमापनशास्त्र शिकला व कांहीं वर्षें त्यानें सर्व्हेयर म्हणून काम केलें. नंतर त्याचा लष्करांत प्रवेश झाला. यावेळीं आँग्लो-फ्रेंच भांडण जोरांत होतें व फ्रेंच लोक अमेरिकेंत किल्ले बांधून आपली ठाणेंमजबुती करती होते. वॉशिंग्टनची हुषारी पाहून त्यास एका व्हर्जिनियाच्या तुकडीचा लेफ्टनंटकर्नल करण्यांत आलें. फ्रेंचांशीं झालेल्या झटापटींत त्यानें चांगला टिकाव धरला म्हणून त्याची प्रशंसा करण्यांत आली. १७५९ त त्यानें कार्सस नांवाच्या विधवेशी लग्न लाविलें. १७७४-७५ सालीं व्हर्जिनियानें त्यास काँग्रेसचा प्रतिनिधि निवडलें. तेथें त्यानें पैसा गोळा करण्याकरितां व लष्कर उभारण्यासाठीं बसलेल्या कमेटींत भाग घेतला. १७६५ त इंग्लंडच्या पार्लमेंटांत स्टँप ऍक्ट पास झाला. अमेरिकेनें ह्या जुलमाचा तीव्रतेनें प्रतिकार केला. तेव्हां तो रद्द झाला. तरी पण इंग्लंडनें अमेरिकेवर आपलें स्वामित्व आहे असें दर्शविण्याकरितां फक्त चहाचा कर ठेवून बाकीचे कर माफ केलें. पण अमेरिकनांनीं चहा बंदरांत उतरूंच दिला नाहींच; तेव्हां इंग्लंडनें अमेरिकेशीं युध्द जाहीर करुन बोस्टनला सैन्य पाठविलें. (वॉशिंग्टन रहात होता त्या ठिकाणीं ज्या लढाया झाल्या त्यांत तो पुढारी होता. पुढें १७७४-७५त व्हर्जीनियानें आपल्यातर्फे त्याला काँग्रेसमध्यें पाठविलें. १७७५ त काँग्रेसनें जॉर्ज वॉशिंगटनला अमेरिकन सैन्याचा मुख्य सेनापति निवडिलें. त्यानें सैन्य जमवून शेवटपर्यंत इंग्रज सैन्याचा प्रतिकार केला. अखेर इंग्रज सेनापति कॉर्नवॉलिस याला शरण यावें लागलें (१७८३).पुढें इंग्लंडनें अमेरिकेचें स्वातंत्र्य मान्य केलें. या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास 'इंग्लंड' व 'संयुक्त संस्थानें' या लेखांतून आढळेल. अमेरिकेंत प्रजासत्ताक राज्य स्थापन झाल्यावर त्याचा पहिला अध्यक्ष वॉशिंग्टन झाला (१७८९) यास काँग्रेसनें, तो नको म्हणत असतांहि दोनदां अध्यक्ष निवडलें. तिसर्यांदा तोच उभा राहिला नाहीं. हा महात्मा १७९९ च्या डिसेंबरांत मृत्यु पावला.
वाशिंग्टन फेडरल गव्हर्नमेंटचा चहाता होता. राजकारणामध्यें पक्षभेद नसावेत असें त्याचें मत होतें म्हणून त्यानें पहिल्या प्रधानमंडळांत विरुद्ध बाजूचेहि काहीं लोक घेतले. या त्याच्या प्रयत्नास यश आलें नाहीं. इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्यें झालेल्या युद्धांत त्यानें धरलेला उदासीनपणा व ग्रेटब्रिटनशीं मि. जे यानें केलेल्या तहास त्यानें दिलेला पाठिंबा या दोन गोष्टी पुष्कळांस आवडल्या नाहींत. त्यामुळे लोकांत क्षोभ उत्पन्न झाला. संयुक्त संस्थानाकरितां त्यानें जिवापाड मेहनत केली. तरी सर्व लोकांमध्यें तो लोकप्रिय होता असें नाहीं. काहींनीं त्यास देशाचा सावत्र बाप ही पदवी दिली होती. (बेकर-बिब्लिओथेका वाशिंग्टोनिआना; जॉर्ज मार्शल, डेव्हिड रॅमसे, वाशिंग्टन अयर्व्हिग, लॉज, वुड्रो विल्सन इत्यादि ग्रंथकारांनीं वाशिंग्टनचें चरित्र संपादिलें आहे. त्याचे लेख १४ विभागांत फोर्डनें प्रसिध्द केले आहेत.)