विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वॉशिंग्टन, बुकर टी:- (१८५८-१९१५) अमेरिकान नीग्रो लोकांचा एक पुढारी. हा स्वतःच ख्रिस्ती नीग्रो होता. हा व्हर्जीनियांतील हेल्स्फर्ड गांवीं जन्मला. लहानपणीं मिठाच्या कारखान्यांत व कोळशाच्या खाणींत त्यानें काम केलें. नंतर त्यानें हॅम्पटनच्या शाळेंत कष्टानें प्रवेश करुन घेऊन औद्योगिक शिक्षण मिळविलें. १८७५ मध्यें तो पदवीर झाला. १८८१ सालीं टस्केजी येथें त्यास नीग्रो शाळेवर अध्यापक नेमलें. तेथें त्यानें अतोनात श्रम करुन ती शाळा नांवारूपास आणली. हल्ली तेथें ४० वर कलांचें व धंद्यांचें शिक्षण दिलें जातें. काळागोरा भेद नाहींसा होण्याकरितां संबंध देशभर त्यानें व्याख्यानें दिलीं व नीग्रोंचा दर्जा वा१९०ढविण्याकरितां व त्यांची खरी सुधारणा करण्याकरितां त्यानें अतोनात काळजी घेतली. १८९६ त हारवर्ड विद्यापीठाने त्यास एम्. ए.ची व १९०१ मध्यें डरमाऊथनें एल्एल्.डी.ची पदवी दिली. १९१५ त त्याचा अंत झाला.