विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वा संस्थानें:- ब्रह्मदेशांतील लहान संस्थानांचा समुदाय. यांत बहुधां डोंगराळ पट्टीचा समावेश होत असून यासंबंधी दुसरी अवांतर माहिती फार थोडी मिळते. यांत पुष्कळ जातींचे लोक आहेत. पण त्या सर्वांत ‘वा’ लोक मुख्य होत 'वा' संस्थानांत राज्यकारभार खेडयांतील ग्रामपंचाइती-पध्दतीवर चालत असतो. 'वा' लोकांत जंगली 'वा' हा भेद असून यांनां शहरसुधारणेची कल्पना देखील नसते यांची एकंदर संख्या ५०००० भरेल. यांच्यांत बौद्ध धर्माचा प्रसार थोडाफार होता तरी हिंसा कमी नसे. वा लोक शेतकी करणारे असून अफूची लागवड विशेषेंकरुन करीत. कपडयांची यांनां फारशी जरुर नसून बहुतकरुन कमरेभोंवतीं एक फडकें गुंडाळलें कीं पुरे होई. उन्हाळयांत याचीहि जरुरी नसते. यांची भाषा कांहींशी शान लोकांच्या भाषेशीं जुळते.