प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वास्तुसौंदर्यशास्त्र:- मनांत योजलेल्या कल्पनेप्रमाणें सुंदर व सोईची इमारत बांधण्याचें शास्त्र म्हणजे वास्तुसौंद्रय शास्त्र होय. इमारत बांधण्याला उपयोगी पडणारें सर्व प्रकारचें साहित्य, तिचा नकाशा, निरनिराळया कलाकुसरींचें ज्ञान, चातुर्य वगैरे अनेक बाबींचा समावेश या शास्त्रांत होतो. इतर सर्व शास्त्रांप्रमाणें वास्तुशास्त्रहि मानवी समाजाच्या अगदीं प्रारंभकालीं उत्पन्न झालेलें नसून साध्या व जरुरीपुरत्या रहाण्याच्या जागेपेक्षां शोभिवंत व कलाकुसरीच्या घरांत राहण्याची इच्छा ज्यावेळीं मनुष्यांच्या मनांत उत्पन्न झाली अशा वेळीं म्हणजे (प्रमाणबद्धता व सुंदरपणा यांचें ज्ञान झाल्यानंतर) सुधारणाकालांत या शास्त्राची उत्पत्ति झाली असावी. मजबूतपणा, सोय व सौंदर्य या तीन महत्वाच्या बाबी या शास्त्रांत अवश्य आहेत असें पहिल्या पाश्चात्य व्हिट्रुव्हिअस नांवाच्या प्राचीन लेखकाचें म्हणणें आहे. तिन्हींतहि सौंदर्य ही बाब मुख्य आहे. या तीन बाबींच्या पोटांतच इमारतींचा आकार, प्रमाणबध्दता, सोय, रंग, नकशी वगैरे गोष्टी येतात.

मोठमोठया भव्य इमारती पाहून माणसाच्या मनांत त्या बांधणार्‍याबद्दल एक प्रकारचा आदरयुक्त  साश्चर्य दरारा उद्भवतो; विशाल इमारती पाहिल्यानें माणसाच्या मनावर तात्पुरती विशालतेची छाप पडून तें संकुचित व खुरटें रहात नाहीं. ईजिप्तमधील पिरामीड, कॅरनाकचा बहुस्तंभी दिवाणखाना, रोमचें पँणथिऑन, दक्षिण हिंदुस्थानांतील प्रचंड देवळें वगैरे इमारती या बाबतींतील उदाहरणें होत. ही भव्य व विशालपणाची कल्पना पहिली असावी. त्यानंतर प्रमाणसूत्रबद्धता तिला जोण्यांत आली असेल. गॉथिक वास्तुशास्त्रांत हा प्रकार स्पष्ट दिसून येतो; समभुज त्रिकोणाचा आधार हे लोक बांधकामांत नेहमीं घेत असत.लांबी, रुंदी व उंची अनुक्रमें ३,२,१ या प्रमणांत घेण्याची चाल गॉथिक कलेच्या पूर्वी व सांप्रतहि आढळते; उदाहरणार्थ अलीकडेहि ४५ फूट लांब, ३० फूट रुंद व १५-२० फूट उंच अशी इमारत बांधणें सर्वांनुमतें उत्तम समजलें जातें; कांहींच्या मतें ५,४,३ हें प्रमाणहि लांबी, रुंदी व उंचीच्या बाबतींत चांगलें आहे. प्रमाणबद्धतेनें इमारतीचें आयुष्य वाढून ती बळकट बनते; मात्र ही प्रमाणबद्धता वाजवीपेक्षां फाजील झाल्यास इमारतीचें सौंदर्य नाहींसें होण्याचा संभव असतो.

प्रमाणबद्धतेनंतर कलाकुसर, नक्षीकाम वगैरे बाबी पुढें आल्या. यांनीं इमारतीचें सौंदर्य व नाजूकपणा वाढतो. या बाबींत घडीव (खांब पुतळे, कमानी वगैरे) व खोदीव (जाळया, वेलपत्त्या, छतें वगैरे) असे दोन मुख्य भेद आहेत. या दोन भेदांत कालानुक्रमानें उत्तरोत्तर सुधारणा होत गेल्या आहेत, त्यामुळें त्या सुधारणांचे कालखंडच पडले आहेत. एखादा वास्तुशास्त्रज्ञ नुसत्या नजरेनें निरनिराळया घडीव खांबांचे आकार किंवा दरवाजाच्या गणेशपट्टीवरील निरनिराळया वेलपत्त्या किंवा जाळया पाहून (ते ते खांब व त्या त्या जाळया म्हणजे) त्या त्या इमारती अमुक अमुक कालांत बांधल्या गेल्या असें सहज सांगूं शकतो. कारण त्या त्या कालांत या कलेच्या पद्धती भिन्न भिन्न असत. रंगाचा प्रश्न यापुढील आहे; त्यानें इमारतीच्या सुंदरपणांत भर पडते. कांहींचें म्हणणें असें आहे कीं, ज्या त्या वस्तूला तिचा अंगचाच (नैसर्गिक) रंग द्यावा; तसेंच घराच्या बाहेर फारसा रंग न देतां आंतच द्यावा.

अत्यंत प्राचीनकाळीं माणसें डोंगराच्या गुहेंत रहात असत. त्यानंतर झोंपडी व घरें निर्माण झालीं. मनुष्य शिकारी व भटक्या बनल्यावर तंबू किंवा झोंपडया बांधल्या जाऊं लागल्या व स्थाईक बनल्यावर घरें होऊं लागलीं. हवामानाचा परिणाम व जवळ सांपडणारें बांधकामाचें साहित्या यांवर घरें बांधण्याची मुख्य मदार त्यावेळीं होती, उदा. खल्डिया व ईजिप्त येथें फार उन्हाळा असे व लांकडाचें दुर्भिक्ष असे; मात्र, नद्यांच्या पुरांत वाहून आलेली माती पुष्कळ सांपडे; म्हणून तेथें या  गाळाच्या मातीच्या गोल किंवा लांबट विटा पाडून व त्या उन्हांत वाळवून तशा कच्च्याच विटा घरें बांधण्यांत वापरीत. त्या एखावर एक परंतु आंतल्या बाजूस थोडथोडया पुढें सरकून रचीत व याप्रमणें (त्रिकोणाप्रमाणें) शेवटीं वर एके ठिकाणीं त्यांच्या योगानें दोन्ही भिंती जोडून टाकीत. ही त्रिकोणाकृति छपराची पध्दत होय. यापुढील काळांत ईजिप्तमध्यें त्रिकोणाकृति छपराचीं घरें बांधण्याऐवजीं, दोन चांदयांवर लांकडी ओबड धोबड तुळया टाकून धाब्याचीं घरें बांधूं लागले. हें लांकूड ताड, माड, खजूर वगैरे झाडांचें असे. अजून तिकडे व इतर उष्ण देशांत ही धाब्याच्या घरांची पध्दत प्रचारांत आहे. प्राचीनकाळचा या पद्धतीचा एक नमुना गीझा येथील कोरींव गुहांतील कबरस्थानांत आढळतो. यापुढें भिंतींत सुधारणा झाली. उन्हामुळें व हवेमुळें कच्च्या विटा पुष्कळ दिवसांनीं ठिसूळ बनत. त्यामुळें मजबूतपणासाठीं भिंती तळाशीं रुंद ठेवून वर कमी कमी रुंद ठेवीत असत. अथवा भिंतींनां पडभिंत बांधीत. अशा ढाळ दिलेल्या भिंती व पडभिंती त्यावेळच्या कबरस्थानांत पहावयास सांपडतात. पुढें मजबुतीसाठीं कच्च्या विटांऐवजीं भाजलेल्या विटा व दगड यांची बांधणी होऊं लागली. भिंतींनां व छपराला जास्त बळकटी येण्यासाठीं भिंतींत अथवा भिंतींनां टेंकून उभे खांब बसविण्यांत येऊं लागले. हे खांब प्रथम प्रथम विटांचे व मग दगडांचे आणि नंतर लांकडाचे करीत आणि त्यावर सवडीप्रमाणें नक्षीकामहि कोरीत. असल्या प्रकारचे कांहीं प्राचीन दगडी खांब लंडन येथील ब्रिटिश म्यूझियममध्यें ठेवलेले आहेत. या खांबांच्या माथ्यांत तुळया ठेवण्यासाठीं खोबणी कोरलेल्या आहेत. खाल्डियामधील प्राचीन मनोरे, देवळें व राजवाडे यांतील खांब या प्रकारचे होते, यांचे माथे नक्षीसाठीं चौकटीचे ठेवीत. कांहींच्या खांबांनां मच्छांचा (पुलाचे खांब असतात तसा) आकार देत; तर कांहीं खांब गोल व कांहीं चौकोनीहि असत. यानंतर ग्रीस व आशियामायनरमध्यें घरकामांत लांकडाचा उपयोग जास्त होऊं लागला; कारण या देशांत दगडापेक्षां लांकूड बरेंच स्वस्त मिळे. या प्रकारचें प्राचीन उदाहरण लिसिया येथील गुहांच्या कबरस्थानांत सांपडतें. तेथें खांब तुळया, छप्पर इत्यादि बर्‍याच जागीं लांकूड वापरलें आहे. या वर  सांगितलेल्या सर्व प्राचीन वास्तुकामांत वास्तुसौंदर्य मात्र नसे. तें पुढील काळांत निर्माण होऊं लागलें.

जागतिक वास्तुशास्त्रांत पाश्चात्यांनीं पुढील प्रादेशिक भेद पाडले आहेत - ईजिप्शियन, असूरियन, इराणी, ग्रीक, पर्थियन सस्सानियन, एट्रस्कन, रोमन, प्राचीन, ख्रिस्ती, अर्वाचीन ख्रिस्ती, कॉप्टिक, गॉथिक, मुसुलमानी, भारतीय इत्यादि या देशांच्या प्राचीन आणि अर्वाचीन प्रसिध्द वास्तूंची व वास्तुशास्त्राची, सामान्य माहिती या लेखांत देत आहो. शिवाय ताजमहाल, पिरामिड इत्यादि कांहीं विख्यात वास्तुंची व इराण, असूर वगैरे कांहीं देशांमधील वास्तुशास्त्राची स्वतंत्र माहिती त्यांच्या त्यांच्या नांवाखालीं दिली आहे. त्याप्रमाणेंच हिंदुस्थानांतील माहिती स्वंतत्र दिली आहे. येथें प्रथम प्राचीन काळांतील निरनिराळया देशांच्या वास्तुशास्त्राची माहिती देतों.

ईजिप्त:- या देशांतील वास्तुशास्त्राचे पुढीलप्रमाणें कालखंड पडतात. (१) मेंफाईट राजवंश काल, (२) थीबन राजवंश काल आणि (३) टॉलेमी राजवंशकाल. मेंफाईट कालांतील प्रसिद्ध वास्तु म्हणजे पिरामीड होत (पिरामीड हा लेख पहा). मेंफाईट राजांचीं थडगीं पिरामिडांत आहेत. याखेरीज स्फिन्क्स अथवा मेदमचें एक देऊळ काय तें यांच्या वेळचें शिल्लक उरलें आहे. याचा आकार इंग्रजी 'टी' या अक्षरासारखा असून, त्याचें छत सपाट आणि घडीव दगडी आहे व खांबहि घडीव दगडांचे आहेत. ईजिप्शियन स्फिन्क्सचा आकार, म्हणजे वर माणसाचें, मेंढयाचें अथवा ससाण्याचें डोकें असून खालील शरीर सिंहाचें असे. ग्रीक स्फिन्क्सचा आकार, खालीं सपक्ष सिंहाचा व वर एका तरुण, केंस सोडलेल्या व स्तन असलेल्या तरुणीचें मस्तक असलेला असा असे. थीबनकालांतील दैर-एल-बहरीचें कबरस्थान सर्वांत जुनें आहे. याच्या पायर्‍या, कमानीच्या ओवर्‍या आणि चतुष्कोणी व अष्टकोणी खांब पहाण्यासारखे आहेत. बेनी हसनच्या देवळांत याच वेळचे दगडी गोल खांब पहावयास सांपडतात (ईजिप्शियन वास्तुशिल्प वि. ९, पृ. ११-१४ पहा). कांहीं खांब बहुकोनाकृति असत तर कांहींचे माथे व पायथे कमलाकार असत. या थीबनकालांतील १८ व्या घराण्यांत भिंतीनां ढाळ देण्याची किंवा पडभिंती बांधण्याची पध्दत सुरु झाल्याचें दिसतें. टॉलेमीकालांत देवळाच्या सभामंडपांत जो उजेड घेत तो महाद्वाराच्या वर जाळया ठेवून तेथून घेत; तसें थीबन कालांत नसे. त्यावेळीं सभामंडपाच्या डाव्या उजव्या हातांकडे खिडक्या वगैरे ठेवून व ओवर्‍या बांधून उजेडाची सोय करीत, टॉलेमीच्या वेळचें असलें देऊळ कॅरनाक येथें आहे. पुढें दोन्ही प्रकारच्या उजेडांच्या सोई अंमलांत आल्या. मेडीनेटच्या देवळांत तर आपल्या इकडील चौकांची पध्दत (उजेडासाठीं) उपयोगांत आणली आहे. या देवळांत २ मोठे चौक असून, त्यांच्या बाजूंच्या सर्व ओवर्‍यांवर गच्ची आहे. आणि गाभार्‍यांत एक स्थंडिल आहे. सार्‍या ईजिप्तमध्यें स्थंडिल असलेलें हें एकच देऊळ आहे. टेल-एल-अमर्ना येथील देवळांतील छत, भिंती व तळ यांवर रंगीत चित्रें काढलेलीं आहेत. त्यांतील पशुपक्ष्यांच्या व झाडांच्या चित्रांचा रंग नैसर्गिक आहे. हें देऊळ ख्रि.पू. १३५० तील आहे. एसनाच्या देवळांत खांबांच्या मथळयाचा आकार कमळाच्या कळीसारखा असून त्याच्या आसपास पाण्यांत उगवणार्‍या निरनिराळया वनस्पती कोरल्या आहेत. एडफूच्या देवळांतील (उजेडासाठीं बांधलेल्या) ओवर्‍या २५० फूट रुंद व १५० फूट उंच आहेत आणि आंत निरनिराळया प्रकारचीं चित्रें कोरलेलीं आहेत. मामैसी (ख्रि.पू. २४०) च्या देवळांतील छतावर लांकडी तुळया असून त्यांवर दगडी लाद्यांची गच्ची केली आहे. या काळचीं पुष्कळ देवळें खडकांतहि कोरीत. खांबांचे मथळे, कमळाची कळी, पापीरसचें फूल व ताडाच्या झाडाचा वरचा भाग यांसारखे असत. ईजिप्तमध्यें ख्रि.पू. २६८०-२६६० च्या सुमारचीं घरें आढळलीं आहेत. त्या घरांतील खोल्यांची रुंदी ८१९ फूट असल्यानें भिंतींच्या मजबुतीसाठीं भिंतींनां टेंकून लांकडी अथवा दगडी खांब देऊन व त्यांवर लांकडी तुळया ठेवून धाबें ठेवलेलें असे. यापुढें घरांनां पुष्कळ जाळया व खिडक्या ठेवूं लागले; तसेंच घरांच्या मजल्यांतहि एकापासून तीन (मजल्या) पर्यंत वाढ झाली. तिसर्‍या मजल्याच्या धाब्यावर वायव्येकडे 'धारी' किंवा मोठया जाळया ठेवीत. घरांतील धान्याचीं अंबारें १२ ते १४ फूट रुंदीचीं असत. मेडीनेट अबूची छत्री ही तीन मजली, सर्व दगडी बांधणीची, दगडी धाब्याची व भोंवतीं तट असलेली आहे. ईजिप्तमध्यें देवळांभोंवतीं असल्या तटाची पध्दत त्या काळीं फारच क्वचित होती (ज्ञा.को.वि. ३. प्र.२ पहा).

असूर:- असूर राष्ट्रांत वास्तूंच्या इतिहासांत कसा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला तें, तसेंच त्या वेळचीं घरें, खांब, भिंती, रंग चित्रें, सांडपाण्याची व्यवस्था, भिंतींनां लावण्यांत येणारे सोन्याचे पत्रे, त्यांतील नकशी वगैरे माहिती तिसर्‍या विभागांत चवथ्या प्रकरणांत (असुरी-बाबिलोनी संस्कृति) दिली आहे. या लोकांनीं बाबिलोनी व खाल्डियन लोकांचेंच वास्तुशास्त्र घेऊन त्यांत सुधारणा केली. यांचें सांप्रत आढळलेलें अत्यंत प्राचीन स्थळ म्हणजे निप्पूर (मेसापोटेमिया) येथील अनेक मजली मनोरेवजा देऊळ होय. याची बांधणी ईजिप्तमधील पिरामिडसारखी आहे व सर्व मजल्यांवर आवतीं-भोंवतीं गच्च्यां ठेवल्या आहेत. देश सपाट असल्यानें नद्यांच्या पुरामुळें इमारतींस धक्का लागूं नये म्हणून त्या उंचवटयावर (कोठें कोठें २०० फूट उंचीवर) बांधीत. पण त्यामुळें ३० शतकें होऊन गेलीं, तरी यांपैकीं कांहीं इमारती अद्यापीहि थोडयाशा सुस्थितींत पहावयास सांपडतात.अबु सहरीन, मुघैर, सेंकर, वार्का, तेलो, निप्पूर, बीर्स निमरुड, बाबील, अबु हब्बा, अकरकुफ वगैरे ठिकाणीं असुर लोकांच्या जुन्या इमारती विशेषतः मनोरे पहावयास मिळतात. बीर्सनिमरुडचा मनोरा साधारण आपल्याकडील गोपुरासारखा आङे. त्याचा तळमजला २७२ फूट रुंद व ४५ फूट उंच आहे. त्यास एकंदर ७ मजले असून (सांप्रत ४ आहेत) ते निरनिराळया रंगांचे निरनिराळया सांत ग्रहांसाठीं बांधले आहेत. मनोर्‍याची एकंदर उंची १६० फूट आहे. निप्पूर येथें ख्रि. पू. ४०००  वर्षांपूर्वीच्या सांडपाण्याच्या रुंद तोंडाच्या मोर्‍या (गटारें) आढलल्या आहेत. उरगुरचा (ख्रि.पू. २५००) मनोरा भाजलेल्या विटांचा आहे. निनेव्हा या असुर राजधानींत सेनाचेरिब (ख्रि.पू. ६८०), एसरहडन व असुरबनिपाल या राजांचे राजवाडे आहेत.

इराण:- या देशाच्या वास्तुशास्त्राची बरीचशी माहिती असुर व मीडियन वास्तुशास्त्रांत येते कारण हा देश त्यांच्याच साम्राज्यांत ख्रि.पू. ५६० पर्यंत मोडत होता. उंचवटयावर पाया भरणें, रुंद पायर्‍या करणें, महाद्वाराजवळ दोन्हीं बाजूंस सपक्ष मानवी मस्तकाचे बैल बसविणें वगैरे इराणी वास्तुप्रकार मूळचे असुरी होते, तर राजवाडयांतील बहुस्तंभी मोठमोठे दिवाणखाने व कमानी आणि जाळया हे प्रकार मीडियाचे होते. फरक इतकाच कीं, मीडियन खांब सुरुच्या व गंधतरु देवदाराच्या लांकडाचे असून त्यांवर चांदीचे पत्रे ठोकलेले असत, तर इराणी खांब दगडीच असत. लांकूड बहुतकाळ टिकत नाहीं व चांदीला फार पैका लागतो म्हणून हे दगडी खांब प्रचारांत आले. दरायस व क्सर्क्सीस यांच्या राजवाडयांचे खांब दगडीच आहेत. आतांपर्यंत सांपडलेल्या इराणी राजवाडयांतील सर्वांत जुना व साधा वाडा सायरसनें बांधलेला (पसारगडी) चा आहे. पर्सेपोलीस येथील इमारतींत दगडाची जुडाई चुन्याऐवजीं धातूच्या सांधपट्टयांनीं केली आहे. येथील एकंदर चार (क्सक्सींसचे २ दरायसचा १ व शतस्तंभी १ ) राजवाडयांनीं १६ लक्ष चौरस फूट जागा व्यापिली आहे. या ४ वाडयांपैकीं दरायसनें बांधलेला (ख्रि.पू. ५२१) वाडा सर्वांत जुना आहे. सूसा येथील राजवाडयांत झकझगीत रंग मीनाकाम अद्यापि आढळतें. इराणी प्राचीन थडगीं, जीं दगडांत कोरलेलीं असतात तींहि पाहण्यासारखीं आहेत; त्यापैकीं सर्वांत जुनें सायरसचें होय.

ग्रीस:- सर्व यूरोपीय वास्तुशास्त्रांचा उगम ग्रीस येथील प्रागैतिहासिक वास्तुशास्त्रापासून झालेला आहे; त्यामुळें त्याची माहिती समजल्यास निरनिराळया यूरोपीय वास्तुशास्त्रांची माहिती आपोआप समजेल. पूर्वी अशी कल्पना होती कीं, ग्रीक प्रागौतिहासिक वास्तुशास्त्राचा उद्भव ईजिप्शियन व खाल्डियन वास्तुशास्त्रापासून झाला असावा, परंतु क्रीट व अर्गोलीस येथील नुकत्याच सांपडलेल्या प्राचीन अवशेषांवरुन ही समजूत खोटी ठरूं पाहत आहे. क्रीटमधील क्नॉससच्या राजवाडयाचा पाया व पायावरील ५ फुटांपर्यंतची भिंत चुनकामांत दगडी बांधलेली असून तीवरील भिंत कच्च्या विटांची व आंत लांकडी खांब असलेली होती. या काळीं या बांधणीखेरीज छतावरील तुळवंटें व तक्तपोशी लांकडी करीत. ईजिप्त व खाल्डियामधील भिंती जशा ढाळाच्या पढभिंतींनीं जोर दिलेल्या असत तशा ग्रीक भिंती नसून त्या ओळंब्यांत उभ्या रचीत अथवा राजवाडयांतील सर्व इमारती एकाच छपराखालीं आणणें व त्यांच्यांत जाण्यायेण्याची व्यवस्था सुलभ राखणें हें वैशिष्टय या वेळच्या बांधकामांत आहे. क्नॉससच्या राजवाडयांतील दरबारी दिवाणखाना टेंकडीच्या माथ्यावर असून खालच्या माचीवर राजाराणीच्या खाजगी इमारती व सरकारी अधिकार्‍यांच्या इमारती आणि त्यांच्या कचेर्‍या आहेत. टिरीन्सचा राजवाडा म्हणजे जणूं काय मध्ययुगांतील एक तटबंदीचा किल्लाच होय इतका त्याच्याभोंवती तट, बुरुज वगैरे बांधून बंदोबस्त केला आहे. अगामेम्नानचें थडगें यानंतरच्या काळांतील आहे. तें खडकांत कोरलेलें असून त्यावर एक दगडी बांधणीचा घुमट आहे. ह्या सर्व इमारती प्रागैतिहासिक काळांतील आहेत. यानंतर (ख्रि.पू. ११००) डोरियन वगैरे लोकांनीं ग्रीसमध्यें प्रवेश करुन तेथें व त्याच्या आसपास आपल्या वास्तूंचा प्रसार केला. त्यांपैकीं हिरेयमचें देऊळ प्राचीन (ख्रि.पू. १०००) आहे. दगडी पायावर कच्च्या विटांनीं हें बांधलें असून ओवर्‍या व महाद्वार (आणि कांहींच्या मतें सर्व खांब) या ठिकाणीं लांकूड वापरलें होतें. खांब प्रथम जरी लांकडी असले तरी मागाहून ते दगडी केल्याचें स्पष्ट दिसतें. यापुढें आगीच्या भयासाठीं व प्रचंड वजन सहन करण्यासाठीं या ग्रीक देवळांतून लांकडाऐवजीं दगडांचाच उपयोग जास्त होऊं लागला. कांहीं खांब तर अखंड एकाच दगडाचे करीत. ऑर्टिजिया बेटांतील अपोलोचें, सायराक्यूजचें, कॉरिंथचें (ख्रि.पू. ६५०), सेलिनसचें व अर्थनाचें देऊळ आणि अग्रीजेंटमचीं ६ देवळें यांतील खांब एकसंधी दगडाचे असून इतर ठिकाणींहि प्रचंड दगडांचाच उपयोग केलेला होता. याप्रमाणें डोरिक कलेचीं उदाहरणें जशीं प्रत्यक्ष आढळतात तशीं आयोनिक (यवनी) कलेचीं सांपडत नाहींत. फक्त ईजिप्तमधील नौक्रेटीस येथील अपोलोचें देऊळ व एफिसेस येथील डायनाचें देऊळ हीं काय तीं आयोनिक जातीचीं उदाहरणें होत. हीं दोन्हीं बांधकामें ख्रिस्तपूर्व ५६० च्या वेळचीं आहेत. यांच्या खांबांनां एका ऐवजीं दोन मथळे होते व त्यांवर आणि खालच्या कुंभ्यावर कोरीव काम केलेलं होतें. एका खांबावर, ज्यानें त्या खांबांचा खर्च दिला त्या माणसाचें नांव कोरलेलें आहे. या काळच्या खांबांच्या टिटवी वगैरे उपांगांवरहि कोरीव काम करीत. स्मर्ना, अलीऍटी, इटृरिया, लिशिया वगैरे प्रांतांतील थडगीं या आयोनिक कालांतीलच होत. त्यांपैकीं हार्पी येथील थडगें (ख्रि.पू. ५४७) हल्लीं ब्रिटिश म्युझियममध्यें ठेवलें आहे. ऑलिंपिया येथील हेराच्या देवळांत (ख्रि.पू. १० वें शतक) लांकूड पुष्कळ ठिकाणीं वापरलें होतें व देवदारी छतावर विटाहि होत्या.  याप्रमाणें या शतकाअखेर मुख्य बांधकाम बहुतेक पूर्णावस्थेस गेलें होतें. यानंतरच्या कालांत फक्त त्या वास्तूंस सौंदर्य कोणत्या उपायानें आणतां येईल एवढेंच पहाण्याचें काम राहिलें आणि तेंच म्हणजे कलाकुसरीचें काम यानंतरच्या पार्थेनॉन व एरेक्थिअम कालांत निर्माण झालें. अथेन्सचें पार्थेनॉन (ख्रि.पू. ४३८) हें या प्रकारचें उत्कृष्ट उदाहरण आहे. (पार्थेनॉन म्हणजे कुमारी म्हणजे मेरीचा दिवाणखाना). येथील खांब एकसंधी नसून निरनिराळया दगडांच्या मोठमोठया गोल खंडाचे आहेत; शिवाय त्यांचा निरनिराळा आकार यथादर्शनशास्त्राच्या आधारानें बनविला आहे. त्यांच्या कुंभ्यावर व मथळयावर नक्षी आहे. या कामांत त्या काळीं फीडियस व त्याचे शिष्य प्रख्यात होऊन गेले. ऍक्रॉपोलीसच्या देवडींतील संगमरवरी छत व खांब हें उत्कृष्ट अयोनिक धर्तीचें उदाहरण आहे. या कालांतहि देवळाच्या भोंवतीं स्तंभयुक्त ओवर्‍या काढण्याची पद्धत होतीच. किती खांबांच्या किती ओळी करावयाच्या एवढाच काय तो या व पूर्वीच्या बांधकामांत फरक होता (शिवाय खांब नक्षीदार करीत असत). रोमन कालीं या ओंवर्‍यांच्या पुढील रांगेंतील दोन खांबांच्यामध्यें खिडक्या ठेवूं लागले. अर्काडियांतील अपोलोच्या देवळांत डोरिक व आयोनिक दोन्ही पद्धती दिसतात. तेथील खांब नक्षीदार तर आहेतच पण भिंतीवरहि नक्षीकाम आहे. तसेंच छतावरील परिअन जातीच्या दगडीविटांत धारी ठेवून खालीं उजेड घेण्याची योजना केलेली आहे. याच काळच्या झ्यूसच्या देवळामध्यें गाभाऱ्यांत सज्जा काढलेला असून दगडी भिंतींनां चुन्याचा संदला करुन त्यावर रंग दिलेला आहे. या वेळची गोल बांधणीची अशीं, ऑलिंपियाचें फिलिपोइयन व एपिडोरसचें थोलोस हींच कायतीं दोन देवळें आढळतात. या ग्रीक देवळांत, वेदिगृह, भांडारगृह, पुतळे व लहान समाधी बांधींत. यापैकीं डेलफीच्या भांडारगृहांतील देवडीचे खांब पायघोळ झगा घातलेल्या अप्सरांच्या मूर्तीचे बनविलेले आहेत. खांबाच्या ठिकाणीं अप्सरामूर्ती वसविण्याचें यूरोपमधील हें पहिलेंच उदाहरण आहे. आशियामायनरमधील अति प्रख्यात देऊळ व जगांतील सात चमत्कारातील एक चमत्कार म्हणून ज्याला म्हणतात असें इफेसस येथील डायनाचें (ख्रि.पू. ३५६) शतस्तंभी देऊळ होय. याच्या १०० खांबांपैकीं ३६ खांबांवरील नकसकाम व सर्व खांबांचें शिल्प यावरूनच याची इतकीं प्रख्याति आहे. आशिया मायनरमधील या अयनिक धर्तीचें सर्वांत मोठें देऊळ म्हणजे मिलेटस जवळील आपोलोचें होय. त्याचा गाभारा ७५ फूट रुंदीचा असल्यानें बोडकाच ठेवला गेला. याच प्रदेशांतील हॅलिकार्नेसेस येथील मॉसोलसची छत्री (ख्रि.पू. ३५३) ही सुध्दं तिच्या नाजुक नकसकामावरुन व इमारतीच्या एकंदर सौंदर्यावरुन जगांतील सात चमत्कारांत जाऊन बसली. ग्रीक-कॉरिंथियन धर्तीचं प्रसिध्द देऊळ अथेन्स येथील ज्युपिटरचें होय. हें ख्रि.पू. १७४ त बांधण्यास आरंभ होऊन, इ.स. १७७ त पुरें झालें. हें सबंध पेटेलिक जातीच्या संगमरवरी दगडाचें असून याचे खांब ५६ फूट उंच आहेत. या वेळचीं ग्रीक लोकांचीं राहण्याचीं घरें जीं आढळलीं आहेत. तीं अगदींच सामान्य बांधणीचीं आहेत. ग्रीक लोक नाटकगृहा (किंवा अगड) सांठीं टेंकडीची माची पसंत करीत. सर्वांनां खेळ दिसावा यासाठीं आखाडयाच्या आवती भोंवती शिडीसारख्या ज्या पायर्‍या बांधाव्या लागतात त्या या माचींतच तशा खोदल्यानें बांधकाम वाचे. अथेन्स येथील डायोनिससच्या आखाडयांत पहिल्या रांगेंत ६७ बैठकी पेंटेलिक जातीचया दगडांच्या असून, त्यावर ज्या ज्या जागावर उपाध्याय, आचार्य व सरकारी बडे कामगार बसत त्या त्या जागीं त्यांचीं त्यांचीं नावें खोदलेलीं आहेत. या वेळचा सर्वांत मोठा अखाडा मेग्यालोपोलीसचा असून त्याचा व्यास ४७४ फूट आहे. याखेरीज ग्रीसमधील डोडोना, आशियामायनरमधील पर्गामम व ट्राले व सिसिलींत सायराक्यूज व सेगेस्ता येथील आखाडे पाहण्यासारखे आहेत.

पार्थियन:- या पार्थियन, घराण्यानें ख्रि.पू. २५० ते इ.सं. २२६ पर्यंत मेसापोटेमियांत राज्य केलें. या वेळच्या वास्तूंत असुर व ग्रीक या दोन्ही धर्तीचें मिश्रण झालेलें आढलतें. अशा प्रकारचा एलहद्र येथील राजवाडा होता. व त्याच्या मागेंच एक सूर्याचें देऊळहि होतें. यांच्या भिंती अतिशय रुंद होत्या. ओवर्‍यांच्या कमानींचा माथा अर्धगोल असून भिंतींचे दगड घडीव होते. महाद्वाराच्या दोन्हीं बाजूंस दोन लहान द्वारें असून प्रत्येक द्वाराच्या मध्यें थेट वरपर्यंत गेलेला एक एक अर्धगोल आकाराचा दगडी खांब होता. महाद्वाराच्या कमानींच्या प्रत्येक तिसर्‍या दगडावर देवाची एक एक उर्ध्वांग प्रतिमा बसविलेली होती. डायरब्रेक येथील मशीदीच्या (ख्रि.पू. ७४) ओवर्‍या पर्थियन   धर्तीच्या असून त्यांतील खांबांच्या मथळयांवरील नकशींत भूमितीच्या निरनिराळया आकृती कोरल्या आहेत. दगडांच्या अभावामुळें निप्पूरच्या राजवाडयांतील खांब विटांचे असून त्यांवर चुन्याचा संदला केलेला आहे व त्यांचे माथे तळाच्या पंचमांश ठेवले आहेत. याखेरीज तेलजे येथेंहि अशाच राजवाडयाचे मिळालेले अवशेष लूव्हर (पॅरिश) मध्यें ठेवले आहेत,

सस्सानियन:- यांच्या राजवटींतील सर्वांत जुनी इमारत म्हणजे सर्बिस्तानचा राजवाडा (इ.स. २२६) होय. त्याच्या बांधणीवरुन रोमन वास्तुशास्त्राची छाया त्यावर बरीचशी पडली असें दिसतें. पूर्वीचें संगीन व मोठमोठया घडीव दगडांचें काम मागें पडून यावेळीं खांडक्या वापरण्यांत येऊं लागल्या. त्यांच्या दरजा जाड ठेवून त्या चुन्यानें भरीत आणि भिंतीनां आंतून व बाहेरुन चुन्याचा संदला करीत. कमानींचे माथे सर्वत्र अर्धगोलाऐवजीं अंडाकृति करीत. चौकोनी दिवाणखान्यांवर जे घुमट बांधीत त्यांच्या खालच्या चार कमानी कशा शास्त्रशुध्द बांधाव्या याचें पूर्ण ज्ञान सस्सानियनांनां नव्हतें. त्यामुळें त्यांत चुका राहून जात, पण त्यावेळचा चुना व संदला अति उत्कृष्ट प्रकारचा असल्यानें त्यांच्या आकर्षणानें कमानी अद्यापि जशाच्या तशा उभ्या आहेत. मात्र सभामंडपांत असुर लोकांपेक्षां त्यांनीं जास्त सुधारणा केली आहे. असुर लोक, सभामंडपांतील कमानीचा ताण सहन करण्यास त्याच्या दोन्ही बाजूंस खूप रुंद भिंती बांधीत असत, परंतु सस्सानियन कारागिरांनीं भिंती अरुंद बांधून व मध्यें ठिकठिकाणीं खांब देऊन हा ताण कमी केला; तसेंच दोन खांबांच्यामध्यें लहान व अर्धगोल घुमट बांधले. फिरुझाबादचा राजवाडा (इ.स.४७०) या कमानींच्या व घुमटांच्या बाबतींतील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. याखेरीज इमामझादे, बोस्तान, तग, बेहिस्तान वगैरें गांवीं या राजवटींतील इमारती आहेत.

एट्रुस्कन:- हें वास्तुशास्त्र म्हणजे पौरस्त्य व पाश्चात्य वास्तुशास्त्रांच्यामधील दुवा असल्यानें याचें विशेष महत्व आहे. मात्र गांवकुंसू, गांववेशी व थडगीं एवढींच काय तीं याचीं उदाहरणें म्हणून सांपडतात. यावेळच्या वास्तुशास्त्राचीच वाढ रोमन वास्तुशास्त्रांत झालेली दिसून येते. इटलींतील एट्रुरिया देशांत हे एट्रुस्कन लोक होऊन गेले. ते मूळचे आशियामायनरचे रहिवासी होते, असें स्मर्नाजवळ आढळणार्‍या त्यांच्या प्राचीन थडग्यांच्या वरून ठरतें. तेथून ते ख्रि.पू. १२ व ११ व्या शतकांत यूरोपमध्यें आले. ग्रीस मधील सेरवेट्री व वुस्ली येथील यांचीं थडगीं स्मर्नाकडील  थडग्यांसारखींच आहेत. मात्र स्मर्नाकडील चौकोनी तर हीं गोल आहेत. यांची बांधणी माती व दगडांची आहे. यांच्यांतहि कमानीची चाल होती. मार्टाच्या कालव्यावर बांधलेली ख्रि.पू. ७ व्या शतकांतील कमान ही यांच्यावेळची अत्यंत प्राचीन आहे. यांच्या कबरी जमीनीच्या वर असत आणि त्यांवर बौद्धांच्या स्तूपांच्या आकाराचे मातीचे ढिगारे असत. कांहीं थडगीं खडकांतहि कोरीत. केरवेट्रीच्या थडग्यांत, मृत शिपायाची ढालतलवार, शिरस्त्राण वगैरे वस्तू व त्याच्या बायकोचा आरसा, जडावाचे दागिने व स्वंयपाकाचीं भांडीं इत्यादिही वस्तू चितारल्या आहेत.

रोमन:- आगस्टसनें रोम शहर सुधारण्यास सुरुवात केली. व फॉरच्यून विरिलिसचें देऊळ हें  रोमन कलेंतील प्राचीन (ख्रिस्त पूर्व पहिलें शतक) उदाहरण होय. यापुढील काळांत (ख्रि.पू. ४७) दगडांच्या कडा ओबडधोबड न ठेवतां त्याऐवजीं घडीव करुं लागले; यावेळचा टायबर नदीचा बंधारा, फोरम, कमानी, ओवर्‍या व पॅलेटाईनवरील अनेक राजवाडे वगैरे बांधकामांत ग्रीक वास्तुशास्त्राची छाया दिसून येते. आगस्टस नेहमीं म्हणे कीं, मला विटांनीं बांधलेलें रोम आढळलें पण मीं तें संगमरवरी दगडांनीं बांधून सोडलें. याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच कीं, फक्त भिंतींची दर्शनी बाजू या संगमरवरी दगडांनीं बांधीत व त्याच्यामागें कांक्रीटचा भराव घालीत (फक्त ज्यूलियस सायसरच्या फोरम-चौकामध्यें असलेलें व्हीनसचें देऊळच काय तें सगळें संगमरवरी दगडांनीं बांधलेलें आहे). यापूर्वी भरावांत कच्च्या विटा घालीत असत. यावेळच्या (ख्रि.पू. ३०) बांधकामाचें व त्यांत वापरण्यांत येणार्‍या मालाचें वर्णन व्हिट्रुव्हिअसच्या लेखांत आढळतें.  त्यावेळचें वाखाणण्याजोगें काम म्हणजे संदल्याचें होय. ज्यालामुखी पर्वताची माती व चुना यांचें हें संदल्याचें मिश्रण सिमेंटच्या इतकें मजबूत होई व त्यांत वस्तु ओढून धरण्याचें सामर्थ्य येई. चुन्याऐवजीं या सिमेंटमध्येंहि बांधकाम करीत. एक मजलींऐवजीं दोन किंवा अनेक मजली व्हावयास लागल्या. आपल्या साम्राज्यांतील निरनिराळया देशांत तेथील  स्थानिक परिस्थितीस अनुसरून चौक (फोरम), स्तंभांकित रस्ते, गोल व लंबचतुष्कोणी देवळें, देवळांची आवारें, नाटकगृहें, रंगशाळा, आखाडे, सार्वजनिक स्नानगृहें, ग्रामवेशी, विजय मिळविल्याबद्दल उभारलेल्या वेशी, थडगीं, नदीचे बंधारे, पूल इत्यादि वास्तुकामें बांधलेलीं आढळतात. लोकसत्ताक रोमन साम्राज्यांतील फोरमच्या आसपास मुख्य देवळें, सरकारी कचेर्‍या, दुकानें (ज्यूलिअस सीझरच्या कालापर्यंत दुकानें असत), निरनिराळया खेळ खेळण्याच्या रंगशाला उर्फ आखाडे, नाटकगृहें, मंडई, सराफकट्टे, न्यायकोर्टें, लवाद कोर्टें इत्यादि इमारती असत.

रोमन देवळें एट्रुस्कन धर्तीवर उंच चवथर्‍यावर बांधीत व त्याला बर्‍याच पायर्‍या ठेवीत.देवळांचें  एकंदर स्वरूप धार्मिक न ठेवतां स्मारकवजा ठेवीत. त्यांचें महाद्वार (व द्वारमंडप) साधारण ग्रीकधर्तीचें पण जास्त असे, कारण रोमन लोकांनां लांकडी कैच्यांची कला साधली होती. अशीं जुनीं देवळें खुद्द रोममध्यें, व्हिरीलिस, अल्टर, वरुण, ऍन्टॉनिनस, शनि, काँकॉर्ड इत्यादि देवतांचीं असून पाँपीचीं ज्युपिटर व अपोलो यांचीं, कोराचें बुधदेवतचें, निमेस येथील कारीचें, बालबेक (सीरिया) येथील ज्युपिटरचें, पालीमरा येथील सूर्याचें इत्यादि देवळें सांप्रत उपलब्ध झालीं आहेत. हीं बहुतेक लंबचौकोनीं आहेत. तर रोमचीं पँथिऑन, वेस्टा, माटुटा व टिव्होलीचें वेस्टा, बालवेकचें व्हीनस यांचीं देवळें गोलाकार आहेत. कांही षट्कोनी तर कांही अष्टकोनीहि बांधलेलीं आढळतात. गोल देवळांत पँथिऑनचें देऊळ प्रसिध्द आहे. नाटकगृहाचा उत्कृष्ट नमुना असा फक्त रोम येथील मार्सेलसचें नाटकगृह होय.हें ख्रि.पू. १३ या वर्षी बांधलें आहे असें सांगतात, फ्रान्समधील ऑरेंजच्या नाटकगृहांतील रंगपीठ (स्टेज) २०३ फूट लांब आहे. निरनिराळे खेळ खेळण्याच्या आखाडयांतील सर्वांत मोठा आखाडा कोलोसिअम नांवाचा होय. हा ८ वर्षें बांधीत होते (इ.स. ७२-८०) हा तीन मजली, अंडाकृति (६२० फूट जास्त व्यास व ५१३ फूट कमी व्यास), व ८० दरवाज्यांचा होता (यांतील दोन दरवाजे खास राजासाठीं राखले होते). प्रेक्षक बसण्याच्या खोल जागेंत बैठकींच्या चार ओळी केल्या होत्या. जिने दगडी व कांक्रीटचे होते. तिन्ही मजल्यांत कमानींच्या ओवर्‍या होत्या. तिसर्‍या मजल्यावर एक लहानसा माळा काढून त्यांत खिडक्या ठेवून उजेड घेतला होता साधे हमामखाने तर रोमनसाम्राज्यांत सर्वत्रच होते; परंतु बादशाही हमामखाने (थर्मी स्नानगृहें) मात्र रोममध्येंच आढळतात. लोकांचें व आपलें विशेष संघट्टण घडून यावें या हेतूनें निरनिराळया बादशहांनीं हे बांधलेले आहेत. स्नानाखेरीज यांचा उपयोग पुढील गोष्टींतहि होई; तालीम करणें, मर्दानी खेळ करणें, कवी-तत्वज्ञ-मुत्सद्दी यांचे वादविवाद होणें; वक्तृत्वोत्तेजक समारंभ करणें इत्यादि. गांवच्या वेशींनां तट व दारें असत. विजयस्मारकासाठीं स्तंभहि उभारीत; रोम येथील ट्रोजन व मार्कस यांचे स्तंभ पहाण्यासारखे आहेत. ईजिप्त, इटली व फ्रान्समध्यें या वेळचे असे कांहीं स्तंभ आढलतात. थडगीं बांधण्याची कल्पना रोमन लोकांनीं एट्रुस्कन लोकांपासून उचलली असली तरी एट्रुस्कन थडगीं दगडांत कोरून बांधीत तर रोमन थडगीं उघडयावर बांधीत. सर्वांत जुनें (ख्रि.पू. ५८) थडगें मेटेलाचें होय. रोमन बंधारे व पूल साधे परंतु फार भव्य असत; यांच्या कमानींची रुंदीहि पुष्कळच असे व त्यांस मजलेहि असत. सेगोव्हिया, टरागोना, मेरीडा येथील बंधारे हल्लीं शाबूत आहेत. पूल मात्र क्वचित आढळतात. राजवाडयांपैकीं रोममधील पॅलाटाईन टेंकडीवर बांधलेले कायसरांचे राजवाडे फार प्रेक्षणीय आहेत. त्यांचा विस्तार १० लक्ष चौरस फूट असून त्यांत अनेक मोठमोठे दिवाणखाने, सिंहासनाची जागा, मुदबक शाळा, लवाद व सरकारी कोर्टें, देवळें, वाचनालयें, शाळा, शिपायांच्या बराकी, तालीमखाना, राजपुत्रांचे वाडे, खुषमस्कर्‍यांची घरें वगैरे इमारती असत. श्रीमंत लोक संगमरवरी दगडांचे खांब करीत व भिंतीवर चित्रें काढीत.

बायझंटाईन:-- कान्स्टन्टाईन राजानें आपली राजधानी रोम येथून हालवून बायझन्शिअम येथें  नेल्यानंतर (इ.स. ३२४) जें वास्तुशास्त्र तिकडे अस्तित्वांत आलें त्यास बायझन्टाईन असें सामान्यतः नांव मिळालें. राजानें रोम येथून कारागीर व बांधकामाचें साहित्य विशेषतः एकसंधी दगडी खांब या नवीन राजधानीस आणविलें होतें. या वेळचीं छपरें लांकडी असून बाकीची इमारतबांधणी रोमन धर्तीची होती. या इमारतींपैकीं फक्त दोनच इमारती कान्स्टान्टिनोपल येथें राहिल्या आहेत. पैकीं एक बिंबिरडेरेक नांवाचा हजार खांबांचा हौद आहे. या वेळच्या इकडील (सीरिया व आशियामायनर) कमानी पाहिल्यास पूर्वेकडील लोकांनां कमानींची माहिती असून शिवाय त्यांची कमानींची बांधणीहि पाश्चात्य लोकांच्या बांधणीपेक्षां स्वतंत्र पध्दतीची होती असें स्पष्ट दिसतें. चर्चेसपैकीं जॉन स्टडीयसचें चर्च हें पुराणें (इ.स. ४६३) असून याचीं दगडी बहालें पौरस्त्य पध्दतीचीं आहेत. सालोनिका येथील डेमेट्रिअसच्या चर्चमध्यें तळमजल्यावर बायकांसाठीं एक सज्जा काढलेला होता. व खांबांनां दगडी टिटवी दिली होतीं. ही टिटव्यांची पध्दत पाश्चात्य लोकांनां फारशी माहीत नाहीं. या चर्चचें सर्व छप्पर लांकडी आहे. सभामंडपाच्या ओवर्‍या व सभामंडपाचा बदामाकृति आकार पौरस्त्य पध्दतीचा आहे. जस्टीनियनच्या वेळचें प्रख्यात सेंटसोफियाचें चर्च अद्यापि उभें आहे; तें बायझन्टाईन बांधणीचें एक उत्कृष्ट उदाहरण आहे. याच बांधणीच्या धर्तीवर १५ व्या शतकानंतरची कान्स्टांटिनोपल येथील ग्रीक चर्चें व मुसुलमानी मशिदी या बांधल्या आहेत. ऍथॉस येथें १० व्या पासून १६व्या शतकापर्यंतचीं बरींच चर्चें आहेत, पण त्यांपैकीं बहुतेकांच्या मुसुलमानांनीं मशिदी बनवून टाकल्या आहेत.

आर्मेनियन:- तुर्कस्थानांत आर्मेनियन कारागीरच विशेषतः काम करीत. या बांधकामांत घुमट व छपरें हीं बाहेरुन दगडीं असत; तसेंच घुमट आंतून अर्धगोल ठेवून बाहेरुन साधारण कोनाकृति  करीत. इराणी, बायझन्टाईन व रोमन या कलांची छाप आर्मेनियन बांधकामावर पडली होती. उदा. अनी येथील चर्च. कोन काढलेल्या कमानी हें एक या पध्दतीचें वैशिष्टय होतें. खिडक्यांवरील नागफणीच्या आकाराचीं अंधारीं (छपरें) या लोकांनीं इराणी लोकांपासून उचललीं.

रशिया:- या देशाचें वास्तुशास्त्र म्हणजे बायझन्टाईन वास्तुशास्त्राचेंच रुंपातर होय. सर्वांत जुन्या इमारती म्हणजे कीव्ह व नोव्हगोरोड येथील चर्चें होत (१०१९-१०५४). कीव्हचर्चचा घुमट कांद्याच्या  आकाराचा आहे. या घुमटांची मूळ कल्पना तार्तर लोकांची आहे. मॉस्कोच्या चर्चमध्यें अनेक दिवाणखाने असून त्यांवर लहान कांद्यांच्या आकाराचे घुमट व मधल्या गाभार्याथवर सर्वांत मोठा घुमट असून त्याचा माथा अष्टकोनी आहे. या गांवीं असम्पशन नांवाचें चर्च असून त्यांत रशियाच्या झारांनां राज्याभिषेक होत असे. रशियांत बहुतेक कारागीर तार्तर जातीचे असत. यांचा सर्व भर प्रमाणबद्धतेपेक्षां भपक्यावर जास्त असे. खांब, चौकटी, कमानीचे कोपरे वगैरे वरील नकशीहि त्यांनीं दमास्कसच्या मशिदी, कायरो येथील सुलतान हुसेनची मशीद व  कान्स्टान्टिनोपल येथील सेलूजुक कालांतील नकशीकामांवरून नक्कल केलेली आहे. या देशांत चर्चच्या समोर मनोरा असतोच व त्यांत घंटा बांधितात. या मोठमोठया घंटा तयार करणें, हा त्या वेळीं रशियाचा एक प्रमुख धंदाच होता.

प्राचीन ख्रिस्ती:- यावेळचीं चर्चें तुरळक आढळतात. रोममध्यें श्रीमंत लोकांचीं देवघरें त्यांच्या  वाडयांतच असून त्यांत धार्मिक चर्चा वगैरे होई. यावेळचीं चर्चें साधारण रोमन लवादकोर्टाच्या धर्तीवर बांधलीं जात. रोमन देवळांचें ख्रिस्ती चर्चमध्यें रुपांतर करण्यासाठीं पुष्कळ फेरफार करावे लागत. गाभारा रुंदीपेक्षां लांब करणें, गाभारा व सभामंडप यांत भिंती नसणें, सभामंडपाच्या दोन्ही बाजूंच्या ओंवर्‍यांत व सभामंडपांत मोकळी जागा राखणें इत्यादि हे फेरफार असत. प्राचीन ख्रिस्ती प्रार्थनामंदिर म्हणजे रोमचें ल्याटेरनचें होय. त्यानंतरचें सेंट पीटरचें आहे. याचा विस्तार ७३००० फूट होता. त्याच्या मधोमध एक मोठें कारंजें असून त्याच्या सभोंवतीं कमानींचा रस्ता असे. येथील बैठकी संगमरवरी होत्या. याचे ४० फूट उंचीचे एकसंधी दगडी खांब मूळचे दुसर्‍या जुन्या इमारतीचे होते. सेंटपॉलचें चर्च मूळचें लहान असून पुढें (३८६ त) तें सेंट पीटरच्या धर्तीवर मोठें बांधण्यांत आलें. या काळच्या चर्चमधील कमानी व ओव-या दोन मजली होत्या. ल्याटरन कान्स्टन्टिया यांच्याखेरीज रोममध्यें गोल आकाराचीं चर्चें आढळत नाहींत. या काळचीं बहुतेक चर्चें प्राचीन रोमन देवळें पाडून त्यांच्या सामानानें बांधलेलीं आहेत.

सीरियांतील चर्चची बांधणी पौरस्त्य धर्तीवर आहे त्यांचे दरवाजे बहुधां पश्चिमेस असून त्यांवर द्वारमंडप (पोर्च) असत. ६ व्या शतकांत गोल खांबांऐवजीं चतुष्कोनी खांब व जास्त रुंदीच्या कमानी अस्तित्वांत आल्या आणि माठीव (घडीव) दगडाचें बांधकाम प्रचारांत आलें.

ईजिप्तमधील कॉप्टिक चर्चें:- ईजिप्तमध्यें ख्रिस्ती चर्चांचा प्रसार प्रथम लहानशा मठापासून आणि  उपदेश करावयाच्या कट्टयापासून सुरु झाला. या वेळचे लिबियन टेंकडीच्या पायथ्याजवळील पांढर्‍या व लाल दगडांचे मठ अद्यापि शाबूत आहेत. कॉफ्टिक चर्चची बांधणी रोमन बांधणीसारखीच थोडी फार आहे. पण याचा गाभारा व शेजारच्या दोन ओवर्‍या अर्धगोल अथवा अंडाकृति असत व त्यांची धर्ती बरीचशी पौरस्त्य असे. ओवर्‍यांवर बायकांनां बसण्यासाठीं सज्जा असे. बाप्तिस्मा देण्याची जी मुख्य जागा असे ती, पुढें मुसुलमानांनीं कॉप्ट लोकांचा छळ केल्यामुळें काढून टाकण्यांत आली. बाप्तिस्मा द्यावयाच्या वेळीं पाणी लागतें, त्यासाठीं लहान लहान हौदहि चर्चमध्यें बांधीत. एका चर्चमध्यें तीन सभामंडप असून त्यांवरील छताचे १२ चौकोनी भाग पाडले आहेत व त्यांवर १२ लहान घुमट बांधले आहेत. चर्चमधील पेटीची खोली नेहमीं पूर्वेस असे व वेदीवर घुमट असत; ही पध्दत फक्त ईजिप्तमध्येंच आढळते. वरील लाल दगडांच्या मठांच्या खांबांचे खालचे धिरे अप्सरांच्या मूर्तीचे होते. मुसुलमानांच्या जुलुमापासून रक्षण होण्यासाठीं या चर्चांच्याभोंवतीं उंच उंच तट बांधीत. देवळांतील भिंतींवर पौराणिक चित्रें असत. खोदकामाच्या दगडी जाळया फार सुंदर असत; पुढील मुसुलमानी मशिदींचीं दारें, खिडक्या वगैरेंच्या लांकडी जाळयांत यांचीच नक्कल आढळते.

अर्वाचीन रोमन व गॉथिक:- आठव्यापासून बाराव्या शतकार्यंतच्या यूरोपांतील बांधकामांत रोमन व गॉथिक वास्तुशास्त्राचा पुष्कळच प्रसार झाला. लाँबर्ड, बायझन्टाईन, रोमानिस्क, ऱ्हीनिश, नॉर्मन, सॅक्सन, गॉथिक वगैरे निरनिराळया बांधकामांच्या धर्तीचा समावेश या काळांत रोमन व गॉथिक या नांवाखाली करण्यांत येऊं लागला. इटलींत ९ व्या व १० व्या शतकांत लांबर्डी पद्धत कोमो नांवाच्या कारागीर जातीनें सुरु केली. छपराच्या पुढील व बाजूंच्या पानपट्टयांवर व सज्जांवर नकशी काढण्याची कला यांच्यांत विशेष होती; तसेंच भिंतींचे खण पाडून नकशी, जाळया, वेलपत्ती वगैरेंनीं ते सुशोभित करीत. गाभार्‍यांतील मेघडंबरी घुमट करण्याची कलाहि या लोकांनां चांगलीं साधली होती. मनोरे व घुमट अष्टकोनी बांधणें व गाभार्‍यांतील सज्जांवर नकशी काढणें यांनां विशेष आवडे. खांबांच्य कुंभ्यांनां ते सिंहाचा अथवा इतर पशूंचा आकार देत. यापुढील काळांत अवजड व भव्य इमारतीं ऐवजीं लहान व नकशीकाम मात्र पुष्कळ असलेल्या इमारती बांधण्यांत येऊं लागल्या. पीसा येथील झुकलेला मनोरा (कँपानाईल नांवाचा) ११७४ त बांधण्यास प्रारंभ केला. पायाची जमीन भुसभुशीत लागल्यानें थोडयाच दिवसांनीं तो दक्षिणेकडे झुकला. हें समजून आल्यावर (३५ फूट उंचीच्या नंतर) निरनिराळया वेळीं मनोर्‍यांवर निरनिराळे मजले कमी व्यासाचे बांधून त्याचा झोल आंवरून धरण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लीं मनोर्‍याची एकंदर उंची १७८ फूट असून तो दक्षिण बाजूस १४ फूट झुकलेला आहे; हा रोमानिस्क धर्तीच्या बांधकामाचा नमुना आहे. हें (१४ वें शतक) गॉथिक धर्तीचें उत्तम उदाहरण आहे. नॉर्मन धर्तीचें बांधकाम इटलींतील बारी गांवच्या निकोला चर्चचें आहे; त्याचा घुमट अष्टकोनी आहे. पालेर्मोचें प्यालाटिना हीहि नॉर्मन बांधणीची एक चांगली इमारत (इ.स. ११४०) आहे. याचें लांकडी छप्पर अति उत्कृष्ट व रंगीत असून त्याच्या कांहीं चौकटीवर अरबी लेख खोदलेले आहेत. क्यूबा व झीझा या नार्मन राजवाडयांतील भिंतींवरहि असले कांहीं शिलालेख आहेत. संगमरवरी दगडाचे किंवा कांचेचे तुकडे बसवून केलेलें नकशीकाम (कच्चीकारी) व चित्रकाम या नार्मन बांधणींत बरेंच आढळतें. गॉथिक जातीच्या कमानींत लोखंडी कांबींचा उपयोग करीत. रोमन वास्तुशास्त्रांत निरनिराळया (कांहीं ठिकाणींप्राचीन रानटी) स्थानिक वास्तुकलांची सरभेसळ होऊन पुढें त्याच्या अनेक शाखा झाल्या. शार्लमेन राजाच्या मृत्यूनंतर जर्मनी, फ्रान्स, लांबर्डी, स्पेन, इटली वगैरे निरनिराळया प्रांतांत वर सांगितल्याप्रमाणें अनेक मिश्रवास्तुशास्त्राच्या शाखा निघाल्या. शार्लमेन कालांतील एक्स-ला-चापेला येथील चर्चची इमारत हल्लीं शाबूत आहे. ही अष्टकोनी घुमटाची असून घुमटांत कच्चीकारी केलेली आहे. फ्रान्समधील इसॉयरेचें चर्च हें रोमॅनिक्स बांधणीचें असून पहाण्यासारखें आहे. इ.स. ११००-१५०० मधील काळांत काळया व पांढर्‍या दगडांची मिश्र नकशीकामाची पद्धत रोमॅनिक्स बांधकामांत बरीचशी प्रचारांत होती; तसेंच घुमटावर छप्पर बांधण्याची व आंत खिडक्या ठेवण्याचीहि पद्धत या वेळीं अमलांत आली. पंधराव्या शतकांत यूरोपांत ज्या कलांचा पुनरुद्भव झाला त्यांपैकीं वास्तुकलेला गॉथिक असें नांव इटालियन लेखकांनीं दिलेलें आहे. बाराव्या शतकांत फ्रान्समध्यें वास्तुशास्त्रांत बरीच प्रगति झाली. त्या सुमारास फ्रान्स हें पाश्चात्य सुधारणा घडविणार्याथ राष्ट्रांत अघाडीस होतें; त्यामुळें वास्तुशास्त्रांत ह्यानेंहि स्वतःचें कांहीं वैशिष्टय सुरु केलें. अशा विशिष्ट बांधणीची इमारत म्हणजे पॅरीस येथील नॉट्रे डेम नांवाची होय. ही जगांतील अत्यंत प्रख्यात इमारतींपैकीं एक आहे; हिचे सहा मनोरे अतिशय सुंदर आहेत. त्याप्रमाणेंच चार्टेस येथील चर्च होय. फ्रेंच इमारती इंग्रज इमारतींपेक्षां उंच व मोठया आकाराच्या असतात पण त्यामानानें अरुंद असतात व दर्शनी भागहि फारसा सुंदर नसतो; त्यामुळें त्या केवळ मनोर्‍यासारख्या दिसतात. मात्र आंतील भाग इंग्रज इमारतींपेक्षां फारच सुंदर व भव्य असतो. फ्रेंच लोक उत्तम कारागीर आहेत. सभामंडपाच्या भोंवतालच्या गोल ओवर्‍यांतील निरनिराळया आकारांच्या खणांवरील कमानी व छप्परें तयार करण्याचें काम बिकट असतें, तें फ्रेंच लोकांनीं उत्तम प्रकारें केलेलं आढळतें. इंग्लंडांतील प्रसिध्द इमारत जी वेस्टमिनिस्टर ऍबे व जर्मनींतील प्रसिध्द इमारत कोलोनचें चर्च, या इमारतींतहि वरील फ्रेंच कौशल्य दृष्टीस पडत नाहीं. वेस्टमिनिस्टर ऍबे बांधतांना फ्रेंच कारागिरीचा पुष्कळ परिणाम तिच्यावर झालेला आहे. स्पेनमध्यें मूर लोकांचा अंमल असतांना (७११-१४९२) तेथील वास्तूंवर त्यांच्या अरबी धर्तीची छाप चांगलीच बसली होती. कार्डोव्हाची मशीद, अलहंब्राचें लायन्स कोर्ट, टोलेडोचीं बरीचशीं घरें हीं या प्रकारचीं उदाहरणें होत. स्पेनमधील जुनी (सन ८४८) ख्रिस्ती इमारत म्हणजे ओव्हिडोचें सांता मरायाचें चर्च होय. येथील खांबांची लाट खांबांच्या मथळयांत मळसूत्रानें बसविण्याची योजना केलेली आढळते. खुद्द स्पेन देशाचें खास असें वास्तुशास्त्र ११२ इमारतींखेरीज फारसें आढळून येत नाहीं. घुमटावरील मेघडंबर्याथ बहुकोणाकृति करणें एवढाच काय तो विशेष या खास स्पॅनिश धर्तीत दिसतो. या मेघडंबर्‍या घुमटांच्या मानानें बर्‍याच उंच परंतु सुंदर असत. गोल खिडक्या करुन त्यांत दगडी   जाळी बसविण्याची कलाहि स्पॅनिश बांधणींत पुढें आली. होलेडोचें चर्च तर सार्‍या यूरोपांत पाहण्याजोगें एक ठिकाण आहे. त्यांत मूरिश व फ्रान्स आणि स्पेन येथील बांधकामाच्या धर्तीचे बहुतेक नमुने उमटले आहेत. मूर लोक वीटकामाचें फार भोक्ते असत.

इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड:- नॉर्मन विजयापूर्वीची इंग्लंडची वास्तुशास्त्रविषयक माहिती अत्यंत अपूर्ण आहे. त्या काळीं रोमन, केल्टिक व टयुटानिक या तीन वास्तुशास्त्रांचा प्रसार इंग्लंडमध्यें झालेला होता. ऑगस्टाईन मिशनमुळें रोमन वास्तुशास्त्राचा प्रवेश इकडे झाला (६ वें शतक); स्कॉटिश चर्चमुळें केल्टिक वास्तुकला आली आणि पुढील काळांत टयुटानिक कला पसरली. रोमनकालीन वास्तु इंग्लंडमध्यें आढळत नाहीं. केल्टिक (पुढें यालाच सॅक्सन पध्दत म्हणूं लागले) बांधकामांत चर्चचा गाभारा रुंदीच्या मानानें फार लांब असून वेदीच्या भोंवतालचा चौक लहान व चौकोनी असे. दगडांच्या बांधकामांत एक थर उंच व अरुंद दगडांचा, व दुसरा थर बैठया व रुंद दगडांचा ही पध्दत याच सुमारची होती. एडवर्ड दि कन्फेसरच्या काळीं नार्मन वास्तुशास्त्राचा प्रवेश इंग्लंडमध्यें होऊन रोमन बांधकाम मागें पडलें. रिकमन यानें इंग्लंडांतील वास्तुशास्त्राचे कालखंड पुढीलप्रमाणें पाडले आहेत - नॉर्मन (१०६-११८९), प्राचीन इंग्लिश (११८९-१३०७), कलाकुसरीचा (१३०७-१३७७), उभट धर्तीचा (१३७७-१५४६). नॉर्मन लोकांनीं इंग्लंड जिंकलें तेव्हां नॉर्मन वास्तुशास्त्रावर पश्चिम यूरोपांतील रोमानिस्क शाखेचा बराच पगडा बसलेला होता. नॉर्मन लोकांनीं या वेळीं इंग्लंडांत पाश्चात्य ख्रैस्त्य धर्तीचें चर्च निर्माण केलं व तेथें इंग्लंडच्या बाहेर अस्तित्वांत असलेलें वास्तुशास्त्र प्रचारांत आणलें. नॉर्मन पाद्र्यांनीं व भटांनीं या वास्तुशास्त्राची इतकी वाढ केली कीं, ११ व्या शतकाच्या अखेरीस नॉर्मन वास्तुशास्त्राचें माहेरघर नॉर्मंडी हें सुटून इंग्लंडच बनलें. नॉर्मंडीपेक्षां इंग्लंडमधील चर्चें जास्त विस्तृत व कलाकुसरीचीं असत; त्यांत उजेड व हवा घेण्याच्या सोई जास्त असत. आंत उजेड घेण्यासाठीं चारी बाजूंनीं उघडी असलेली मेघडंबरी घुमटावर बांधीत; खांबाचा आकार गोल किंवा अष्टकोनी असे. गाभार्‍यावर लांकडीं छप्पर असे. बाराव्या शतकानंतर टोंकदार गॉथिक जातीच्या कमानी अस्तित्वांत आल्या.

या गॉथिक पध्दतीबरोबरच सिस्टरशियन धर्तीचें महत्वहि वाढलें. या धर्तीमुळें चर्चमधील गायनशाळा व गाभार्‍याभोंवतालच्या ओवर्‍या यांत पुष्कळ सुधारणा झाल्या; या सुधारणेमुळें मात्र इंग्रजी वास्तुशास्त्राला स्वतंत्र रीतीनें प्रारंभ झाला. रोमानिस्क धर्तीचा खांब जाऊन गॉथिक धर्तीचा व पुर्बेक जातीच्या संगमरवरी दगडाचा आला. तसेंच खांबांच्या माथ्यांतहि फरक पडला आणि भिंतींवरिल चित्रकामहि निराळें झालें. ही गॉथिक बांधकामाची तर्‍हा बहुतेक तत्कालीन उत्तर फ्रान्समधील तर्‍हेप्रमाणेंच होती. बाराव्या व तेराव्या शतकांत बांधकामांतील वजनदारपणा काढूल टाकून त्याऐवजीं हलकेपणा व त्याबरोबर सुरेखपणा आणण्याचा प्रघात पडला.त्यासाठीं मोठमोठे दगडी खांब व दगडी अवजड भिंती काढून त्या ठिकाणीं कमानींचा उपयोग करण्यांत येऊं लागला. तेराव्या शतकांत भाल्याच्या आकृतीसारख्या कमानींच्या खिडक्या बांधू लागले; यांच्या जाळया तत्कालीन फ्रान्सांतील खिडक्यांच्या जाळयापेक्षां भिन्न असत. चौदाव्या शतकांत या जाळयांतील बेलपत्तीच्या नकशींत जास्त सुधारणा झाली, त्यामुळें रंगीत कांचेचे तुकडे खिडक्यांतून बसविणें सोपें झालें. याच वेळीं बांधकाम आडव्या अथवा पसरट धर्तीचें न बांधतां उभंट अथवा चिंचोळया धर्तीचें बांधण्यास सुरुवात झाली. सोळाव्या शतकाच्या मध्यानंतर गॉथिकं बांधकाम नाहींसें झालें. ग्लौसेस्टरचा मठ हा गॉथिक बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इंग्लंडातील निरनिराळया वेळचें बांधकाम व स्कॉटलंडांतील बांधकाम बहुतेक एकसारखेंच आहे; फरक इमारतींच्या लहानमोठेपणावर आहे. रोस्लीनचें चर्च ही स्कॉटिश बांधकामाची उत्तम इमारत आहे. उंच उंच व साध्या भिंती, सुशोभित गोल मनोरे, इमारतीचे निरनिराळे भाग निरनिराळया कोनांनीं एकत्र जोडलेले इत्यादि बाबी स्कॉटिश बांधकामांत विशेष आढळतात. आयर्लंड इंग्लिशांनीं जिंकण्यापूर्वीच्या तेथील प्रख्यात इमारती म्हणजे केल्टिक लोकांनीं बांधलेले किल्ले, घरें तळघरें, तट इत्यादि होत. त्याहि पूर्वीचीं कांहीं घरें सांपडलीं आहेत. त्यांस “मधमाशांचीं पोळीं” म्हणतात. हीं चुन्याविहरित दगडांचीं व भिंतींत दगडी घोडे देऊन त्यावर रचलेल्या दगडी छपरांची असत; यांत मोठमोठया एकसंधीं दगडांचा उपयोग करीत. त्यानंतर रोमानिस्क व मागून नॉर्मनकला आयर्लंडांत उदयास आली. कॅशेल येथील कॉर्मकचें चर्च हें नॉर्मनकालचें उदाहरण आहे. इंग्लंडनें आयर्लंड जिंकल्यानंतर तेथें गॉथिक कला सुरु झाली. इंग्लंडनें बांधविलेल्या या काळच्या इमारतींत आयरिश धर्तीचें चिन्ह किंवा नुसती कल्पना सुद्धा आढळून येत  नाहीं; हें कृत्य मुद्दामच करण्यांत आलें असें म्हणतात. तरी पण आयरिश स्थानिक कला सपशेल न मरतां अद्यापीहि जीव धरुन राहिली आहे.

जर्मनी:- या देशांतील सर्वांत जुनी इमारत म्हणजे शार्लमेननें बांधलेलें एक्स-ला-चापेल येथील थडगें होय. त्याचा १०५ फूट व्यासाचा घुमट आतून अष्टकोनी व बाहेरुन सोळाकोनी आहे. येथील इमारतींचीं छपरें बहुतेक लांकडी असत व गाभार्‍यावरील कमानीचा सज्जा फ्रान्स किंवा इंग्लंड येथील सज्ज्यांपेक्षां निराळया पध्दतीचा ठेवीत. लाच येथील चर्चच्या खांबावरील नकशी म्हणजे उत्तम जर्मन नकशीकामाचा नमुना होय. र्‍हाईन प्रांतांतील चर्चामध्यें छप्पराच्याजवळ सज्जे ठेवलेले आढळतात. गाभारा व त्याच्या भोंवतालच्या ओवर्‍या या एकाच उंचीच्या बांधीत. ही पध्दत जर्मनीशिवाय इतरत्र आढळत नाहीं. या पध्दतींत गाभार्‍यामध्यें उजेड भरपूर न येण्याचा दोष आहे. जर्मनींतील मोठें चर्च कोलोन येथें आहे. त्याची लांबी ४६८ फूट असून गाभारा १५५  फूट उंचीचा आहे, मात्र रुंदी ४१ फूट असल्यानें एकंदरींत इमारत बेढब दिसते. भूमितींतील आकृती जाळयांमध्यें बसविण्याची आवड जर्मन लोकांनां विशेष असे, मात्र त्यांचें खोदकाम उत्कृष्ट नव्हतें. बर्लिनच्या पूर्वपश्चिम प्रांतांत पुष्कळ लांबवर दगडांची अत्यंत उणीव असल्यानें त्या भागांत इमारती बांधण्यास विटाच उपयोगांत आणीत; त्यामुळें विटांच्या सुरेख बांधकामांत हे लोक बरेच पुढें आहे होते; ते इतके कीं, कांहीं चर्चमध्यें १०० फूट उंचीच्या खिडक्या त्यांनीं विटांच्याच बांधल्या आहेत. घरें, तट, नगरभवनें, किल्ले, वेशी वगैरे यावेळचीं बांधकामें जरी विटांनीं बांधलेलीं, तरी तीं उत्तम कारागिरीचीं आहेत.

बेल्जम व हॉलंड:- या देशांत प्राचीन रोमानिस्क बांधकाम आढळत नाहीं; एवढेंच नव्हें तर ११ व्या शतकापूर्वीची, निज्मवेजन येथें शार्लमेननें बांधलेल्या इमारतीखेरीज एकही दुसरी इमारत दिसत नाहीं. बेल्जममध्यें वास्तुशास्त्राचा प्रवेश लांबर्डी प्रांतांतून झाला. तेराव्या शतकांत फ्रान्समधील गाँथिक चळवळीची छाप या देशांत पडल्यानंतर त्या पध्दतीचें बांधकाम सुरु झालें. टूर्ने व मास्ट्रीच्ट येथील चर्चें या बांधकामाचे उत्तम नमुने आहेत. यापुढें जर्मन व फ्रेंच धर्तीचें बांधकाम या देशांत होऊं लागलें. अँटवर्पचें नॉट्रे डेम हें चर्च सर्व बेल्जममध्यें मोठें व महत्त्वाचें असून तें पुरें होण्यास व आजच्या स्वरुपास येण्यास ३०० वर्षें लागलीं. त्यामुळें त्यांत निरनिराळया काळच्या बांधकामांचें स्वरूप दिसून येतें. यिप्रेसचा क्लॉथ हॉल (१२००-१३३४) ही इमारत सर्व यूरोपखंडांतील प्रख्यात इमारतींपैकीं एक आहे. ब्रूसेल्सचें, लोव्हेनचें व घेंटचें नगरभवन या इमारती चांगल्या आहेत. हॉलंडमध्यें यूट्रेच्टचें चर्च व मिडलबर्गचें नगरभवन ह्याच काय त्या चांगल्या इमारती गॉथिक (धर्तीच्या) आढळतात.

पुनरुद्धार काल:- पंधराव्या शतकांत यूरोपमध्यें प्राचीन ग्रीक व लॅटिन विद्या आणि ललितकला यांच्या पुनरुद्धारास किंवा पुनरुज्जीवनास प्रारंभ झाल्यानें त्याच्या पुढील काळास पुनरुद्धारकाल  (रेनॅसन्स) हें नांव मिळालें. या प्राचीन ग्रीको-रोमन (क्लासिक) पध्दतीचा प्रथम पुनरुद्धार इटलींत  झाला व तो चित्रकला आणि पुतळे तयार करण्याची कला यांमध्यें पहिल्यानें दृष्टोत्पत्तीस आला. प्राचीन रोमन लोकांच्या प्रेतांच्या दगडी पेटया आधारास घेऊन वरील कला पुढें आली. त्यानंतर पुढें पुढें गॉथिक व क्लासिक याचें मिश्रण होत चाललें. फ्लॉरेन्सच्या मेडिसीनें या बांधकामास उचलून धरलें. पोपची सत्ताहि पुन्हां चांगली प्रस्थापित झाल्यामुळें या क्लासिक कामास भर येऊं लागला. त्यासाठीं प्राचीन एतच्छास्त्रविषयक हस्तलिखित ग्रंथांचा शोध करण्यांत आला. अशा हस्तलिखितांतील प्रसिध्द ग्रंथ व्हिट्रुव्हिअस या रोमन कारागिराचा (ख्रि.पू. २५) होय ब्रुनेलेशीसारख्या प्रख्यात कारागिरानें १५ वर्षें प्राचीन रोमन कलेचा अभ्यास करून त्यावेळच्या गोष्टी अंमलांत आणण्याचा प्रारंभ केला. रोमच्या पँथिऑनवरील घुमटासारखा घुमट त्यानें १४२० च्या सुमारास एका इमारतीवर बांधून दाखविला; त्यामुळें ह्या प्राचीन बांधकामाचा (योग्य तो फेरफार करुन) प्रसार झपाटयानें होऊं लागला. या सुमारासच (१४५३) छापण्याची कला अस्तित्वांत आल्यानें वास्तुशास्त्रावर तिचा पुष्कळ परिणाम झाला. एका देशांतील वास्तूचा नमुना व त्यांत वापरलेल्या योजना पुस्तकरूपानें छापून दुसर्‍या देशांत नेणें सुलभ झालें वास्तुशास्त्र्याप्रमाणेंच चित्रकार व पुतळे तयार करणारा शिल्पि यांच्या कामाची माहिती छापून निरनिराळया देशांत जाऊं लागली आणि भित्तिचित्रलेप, रंगीत कांचेची नकशी, साधी नकशी इत्यादि अनेक अंगोपांगांची माहितीहि पसरत चालली. इटलीमध्यें या क्लासिक पद्धतीनें गॉथिक पद्धत समुळ हांकलून दिली नाहीं; पण फ्रान्समध्यें मात्र गॉथिक पद्धतीचें समूळ उच्चाटन करण्यांत आलें. इटलींत हा पुनरुद्धार झाल्यानंतर यूरोपांतील इतर देशांत त्याचा प्रसार होण्यास अर्धें शतक लागलें. जुन्या रोमन इमारतींचीं चित्रें व्हिग्नोला व पॅलाडिओ यांच्या ग्रंथांत आढळलीं आणि त्यांच्या नकला देशांत जाऊं लागल्या. त्यांचा परिणाम फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, जर्मनी, नेदर्लंड वगैरे देशांत इतका झाला कीं, तेथील प्रख्यांत इमारती १८ व्या शतकापर्यंत या ग्रंथानुरोधानेंच बांधण्यांत येत, म्हणजे एकप्रकारें रोमन वास्तुशास्त्राचीच छाप त्यावर पडलेली असे. यानंतर इटली व स्पेन या देशांत रोकोको नांवाची एक वास्तुशास्त्राचीच पद्धति सुरु झाली व मग ती जर्मनी, नेदर्लंड इत्यादि देशांत पसरली.या पद्धतींत फ्रान्समध्यें बाहेरील भिंत गडी असून आंत संदल्याची करीत. जर्मनींतील ड्रेसडेनचा झिंगरराजवाडा या धर्तीचा आहे. पुनरुद्धाराच्या क्लासिक पद्धतीस निरनिराळया देशांत निरनिराळीं नांवें आढळतात. उदा. इटालींत सिंक्वेसेंटो, फ्रान्समध्यें फ्रॅन्काइस, स्पेनमध्ये प्लॅटरेस्क व इंग्लंडमध्यें जाकोबाईन (उर्फ एलिझाबेथन). मध्ययुगांत वास्तू कशी करावी याबद्दल योजना आंखून देणार्‍या शिल्प्याच्या मताप्रमाणेंच सर्व वास्तू तयार करीत, शिल्प्याच्या आराखडयाकडे फारसें लक्ष घालीत नसत. ही स्थिति पुनरुद्धारकालानंतर पालटली; त्या काळांत शिल्प्याच्या आंखीव नकाशाप्रमाणें कामें होऊं लागलीं. फ्रान्समध्यें या क्लासिक  पद्धतीच्या पुनरुद्धाराचा प्रसार चार्लस आठवा, लुई बारावा व फ्रान्सिस पहिला यांच्या स्वार्‍यांमुळें व  इटालियन कारागिरांमुळें झाला. फ्रेंच शिल्पी नमुने तयार करुन देत व त्याप्रमाणें इटालियन कारागीर इमारती बांधून देत. सारांश इमारतीचें मुख्य अंग फ्रेंच धर्तीचें व तिच्यांतील कलाकुसर इटालियन धर्तीची असे. व्हर्सेलिस येथील राजवाडे नकशीकामाच्या व भव्यपणाच्या दृष्टीनें पहाण्यासारखे आहेत; एक राजवाडा तर १९०० फूट लांबीचा आहे. १८ व्या शतकांत घडीव लोखंडाचा उपयोग (दारें, कुंपण, जाळया वगैरे) इमारतकामांत होऊ लागला. स्पेनमध्यें फ्रान्सप्रमाणेंच पुनरुद्धारकालांत गॉथिक व मूरीश धर्तीच्या मिश्रणानें बांधकाम होऊं लागलें; त्यांत थोडीशी इटालियन धर्तीची छाया मिसळत असे. स्पेन देश १६ व्या शतकांत खूप श्रीमंत बनल्यानें  इमारती सुशोभित करण्याकडे लोकांचें लक्ष फार होतें; भिंती चुन्याच्या संदल्याच्या करीत व त्यांवर सोनेरी रंगाचीं चित्रें व नकशीकाम काढींत ग्रानाडाच्या चर्चमधील एक कमान ३७॥ फूट रुंद व ९७ फूट उंच आहे.

या काळांतील स्पेनमधील घुमट हलक्या प्रकारचे असत. त्यांवरील उजेडाच्या मेघडंबर्‍या फक्त (अष्टकोनी असून) बर्‍या असत. पाद्र्याचें व्यासपीठ व बायबल ठेवण्याचें छत्रीदार उंच पीठ हीं उत्तम प्रकारच्या लोखंडाचीं करीत. मूरिश अलहम्ब्रेक्स राजवाडयांत ज्या प्रकारची नाजुक व सुंदर नकशी होती तशी या वेळच्या बहुतेक मोठमोठया इमारतींत आढळते व तिला नांवहि अलहम्ब्रेक्स असेंच दिलें होतें. एस्कोरिअल येथील अलहम्ब्रेस्क धर्तीचा राजवाडा सुंदर असून त्याला स्पॅनिश लोक 'स्पेन देशांतील व्हर्सेंलिस' असें म्हणतात. इंग्लंडमध्यें क्लासिकपध्दत प्रथम चर्चें व थडगीं या बांधकामांत प्रचारांत आली, व ती इटालियन कारागिरांनीं आणली. ८ व्या हेनरीनें आपल्या बापाचें थडगें बांधण्यासाठीं प्रथम इटालियन शिल्पी आणले (इ.स. १५१५). त्यांनींच हेनरीचा राजवाडाहि बांधला. याप्रमाणें फ्राम लिंगह्याम, अरुंडेल, विमन्डह्याम वगैरे चर्चांचे कांहीं कांहीं भाग याच लोकांनीं बांधले आहेत. केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजच्या चर्चमधील एक लांकडी जाळी अति उत्तम असून ती यावेळच्या इटालियन कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. विटांचा व टेर्राकोट्टा नांवाच्या लाल मातीचा उपयोग यावेळच्या बांधकामांत विशेष करण्यांत येई. १६ व्या शतकानंतर इंग्लंडांतील या बांधकामावर फ्रेंच, फ्लेमश व जर्मन या धर्तीचा पगडा बसला; तरी पण एलिझाबेथकालांत इंग्रजांनीं आपली जुनी पद्धतच विशेष प्रचारांत आणली आणि तीहि खेडयापाडयांतून. टयूडरकालांत धनुष्याकार कमानी, खिडक्या, अष्टकोनी मनोरे, लांब सज्जे इत्यादि बांधणीचे प्रकार होते; त्यांत फरक पडून क्लासिकलपद्धत हळू हळू पुढें सरसावली. या क्लासिकल पद्धतीची बांधणी ऑक्सफर्ड व केंब्रीज येथील १८ व्या शतकांत बांधलेल्या बर्‍याचशा कॉलेजांच्या इमारतींत आढळून येते. या कालांतील नामांकित इंग्रजी शिल्पी जॉन शूट नांवाचा गृहस्थ होता. त्यानें इटलीमध्यें जाऊन तेथील वास्तुशास्त्राचा अभ्यास केला व इंग्रजी भाषेंत या शास्त्रावर पहिलेंच पुस्तक 'चीफ ग्राउंड्स ऑफ आर्किटेक्चर' या नांवाचें लिहिलें (१५६३). विटा व दगड या दोहोंचाहि उपयोग १६ व्या शतकांतील बांधकामांत करीत व कांहीं ठिकाणी लांकूडहि वापरीत. दारांवरील कोरींव कामाला या काळांत जास्त महत्त्व आलें होतें: उदा. ऑक्सफोर्ड येथील जुन्या शाळांचीं दारें. अठराव्या शतकाच्या सुमारास वेलपत्तीचा रोकोको नांवाचा एकप्रकार यूरोपांत सुरु झाला तो इंग्लंडमध्यें १७ व्या शतकांत आढळतो. लांब सज्जाचें उत्कृष्ट उदाहरण ऍंप्थील येथें असून, त्या सज्जाची लांबी २४५ फूट आहे. जिने प्रथम दगडाचे असतते पुढें पुढें लांकडी बनवूं लागले. ट्रिनिटी कॉलेज, वॅढाम कॉलेज येथल्या जाळया अप्रतिम कोरलेल्या आहेत. या कालांतील क्लासिक पध्दतीचें एक प्रख्यात चर्च लीडस येथील सेंट जॉनचें होय. सातव्या शतकांत सर ख्रिस्तोफर रेन म्हणून प्रसिध्द इंग्रज शिल्पी होऊन गेला. पेंब्रोक कॉलेजची लायब्ररी त्यानेंच बांधली. तो स्वतः जरी इटलीला गेला नव्हता तरी त्याच्या सर्व कामांवर इटालियन धर्तीची छाप पडलेली होती. त्यानें सेंट पॉलच्या चर्चची दुरुस्ती केली व इतर अनेक नामांकित इमारती बांधल्या. सेंट पॉलच्या घुमटांत एकंदर तीन घुमट एकांत एक आहेत. रेनचें सर्वांत नांवाजण्यासारखें काम म्हणजे ग्रीनविच येथील दवाखाना होय. छताला आंतून संदला देण्याची पध्दत अडॅम नांवाच्या कारागिरानें प्रथम काढली. सर विल्यम चेंबर्स हाहि एक प्रख्यात शिल्पी होऊन गेला. त्यानें लंडनमधीलसॉमरेसट हाऊस नांवाची सुंदर इमारत बांधली. त्याचें 'डेकोरेटिव्ह पार्ट ऑफ सिव्हिल अर्किटेक्चर' हें पुस्तक अद्यापीहि इंग्लंडमध्यें वास्तुशास्त्रावर प्रमाणभूत मानतात. जर्मनींत क्लासिक पध्दत १६ व्या शतकाच्या उत्तरार्धांत फ्रान्समधून घेऊन दाखल झाली आणि पुष्कळ वर्षें फ्रेंच बांधणीचीच नक्कलजर्मनींत होत होती. ब्रूजेस येथील पॅलेस डी जस्टिसमधील कौन्सिलचा दिवाणाखाना व लीजचा पॅलेस डी जस्टिस इत्यादि कामांवर स्पॅनिश धर्तीची छाप पडली आहे. रंगीत कांचेच्या नकशीकामाच्या खिडक्या फ्लेमिश कारागिरांच्या हातच्या आहेत.

मुसुलमानी वास्तुशास्त्र:- या वास्तुशास्त्रावर सारे सैनिक वास्तुशास्त्रापेक्षां, मुसुलमानी धर्माचा  परिणाम विशेष झाल्यामुळें मुसुलमानी वास्तुशास्त्र ही पुढें पुढें एक स्वतंत्रच शाखा गणण्यांत येऊं लागली. अगदीं पहिल्या मशिदी म्हणजे मक्का मदीनेच्या होत. परंतु सांप्रत त्या मूळ स्वरूपांत राहिल्या नाहींत. त्यांचें मूळ स्वरूप अत्यंत साधें होतें. कुराणांत वास्तुशास्त्राबद्दल कांही स्पष्ट सूचना आढळत नाहींत आणि फर्ग्युसनच्या म्हणण्याप्रमाणें मुसुलमानी धर्म जर अरबस्तानच्या पलीकडे पसरला नसता तर मुसुलमानी शास्त्रांत फारशी प्रगतीहि झाली नसती. ईजिप्त व सीरिया हे देश ज्यावेळीं प्रथम या लोकांनीं जिंकले तेव्हां त्यांनीं चर्चे व इतर इमारती पाडण्याचा सपाटा लावला, परंतु जेव्हां हे लोक देवळें असलेल्या देशांत गेले, तेव्हां आपल्याहि धर्माची खूण म्हणून कांही दृश्य स्मारकें उभारणें त्यांनां भाग पडलें. त्याप्रमाणें जेरुसलेम येथें  उमर यानें पहिली मशीद बांधली; हल्लीं ती अस्तित्वांत नाहीं. त्यानंतर ६४३ सालीं कायरो येथें अम्रची मशीद बांधला। हल्लीं आणि त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या मशिदी बांधण्यांत आल्या त्या बहुतेक सर्व याच मशिदीच्या नमुन्यावर बांधण्यांत आल्या. अम्रची मशीद चौकोनी असून तिच्या पूर्वेच्या शेवटच्या भिंतींत एक कोनाडा किंवा देवळी आहे व तिचें तोंड पश्चिमेकडे आहे आणि तिच्या समोर प्रार्थना करण्याची जागा आहे. मक्केची दिशा दाखविणें हाच प्रधान हेतु ही देवळी ठेवण्यांत असतो. हिच्या प्रार्थनेच्या जाग्यावर छप्पर आहे व जागेच्या पुढें एक मोठें आंगण असून त्यांत हातपाय धुण्यासाठीं एक कारंजाचा हौद आहे. आंगणाच्या दोन्ही बाजूंस व प्रवेशद्वाराजवळ छपराच्या ओवर्‍या आहेत. हिला लागणारें बांधकामाचें सामान ईजिप्त, रोमन व बायझन्टाईन पद्धतीवर बांधलेल्या जुन्या इमारती मोडून त्यांचें आणलेलें होतें, मात्र बांधणीला अनुरुप असा फरक केलेला होता. कुराणांत नैसर्गिक प्रतिमा चितारण्याचा निषेध आहे; त्याला अनुसरुन, वनस्पती, झाडें, पशुपक्षी व मनुष्य यांचीं चित्रें काढण्यास प्रत्यवाय आला म्हणून टुलूनच्या व इतर प्राचीन मशिदींत असल्या प्रकारचें चित्रकाम आढळत नाहीं. कांहीं अंशीं सिंह या प्राण्याचा समावेश वरील यादींत कडकपणें केलेला नसावा; कारण जेरुसलेम व कायरो येथील वाडयांत असले सिंह कोरलेले आढळतात. कॉप्ट लोकांच्या कारागिरीमुळें थोडेसें नकसकाम पुढील मशिदींतून आढळूं लागतें. त्यानंतर भूमितींतील निरनिराळया सुंदर आकृती संगमरवरी अथवा रंगीत दगडांत किंवा लांकडांत खोदून त्यांच्या जाळया बनविण्यांत येत आणि आजूबाजूंच्या भिंतींत नैसर्गिक वस्तूंचीं चित्रें काढण्याची बंदी असल्यानें परंपरागत समजुतीच्या विशिष्ट प्रकरांचीं त्यांतल्यात्यांत लोलकाकृतीचीं चित्रें हे लोक काढीत; इतकी कीं पूर्वेस बंगालच्या उपसाहारापासून पश्चिमेस स्पेनपर्यंतच्या सर्व देशांतील मशिदींत हीं चित्रें किंवा नकशी आढळते. असल्या प्रकारची पहिली इमारत म्हणजे बगदाद येथील हरुन-अल-रशीदच्या झुबैदी बेगमेचें थडगें होय (८ वें शतक). हें लोलकाकृति नकशीकाम बहुधां विटांचेंच करीत; तें ११ व्या शतकापर्यंत चालू होतें. नंतर विटांऐवजीं दगड उपयोगांत आणूं लागले. कायरो येथील अश्शफीचें थडगें ही या दगडी धर्तीची पहिली इमारत होय (सन १२४०). अलहम्ब्रा येथील इमारतींत लहान लहान चुन्याच्या संदल्याचे तुकडे करुन विटांऐवजीं उपयोगांत आणलेले आहेत. ईजिप्तमध्यें मात्र ७ ते १७ या शतकांच्या दरम्यान मुसुलमानी वास्तुशास्त्रांत जे अनेक फेरफार झाले त्यांचे नमुने असलेल्या अनेक इमारती आढळतात. इराणपेक्षां ईजिप्तमधील बांधकामाची तर्‍हा अनेक दृष्टींनीं नवीन होती. पावसाच्या  दुर्भिक्षतेमुळें अनेक शतकांपूर्वी बांधलेल्या येथील या विटांच्या (व वर संदला केलेल्या) इमारती अद्यापीहि बहुतेक शाबूत आहेत. एल अझअर (म्हणजे भव्य) ही कायरोची मशीद (सन ९७०) मोठी असून तिला ३८० खांब आहेत. कायरो येथील मनोऱ्यांची सर्व सामान्य बांधणी, मुसुलमानांनीं सर्व जगांत बांधलेल्या मशिदींच्या मनोर्‍यांत दृष्टीस पडते; फरक काय तो वरील भागांत आढळतो. तळचा भाग चौकोनी असून मनोर्‍याचा वरचा भाग बहुधां अष्टकोनी असतो. या आठ बाजूंवर निरनिराळया प्रकारचें उठावदार नकसकाम करतात किंवा नकशीचे कोनाडे काढतात. मनोर्‍याचे ३ पासून ७ पर्यंतहि मजले काढून प्रत्येक मजल्याभोंवतीं गोल सज्जे काढलेले असतात. या सज्जांवरून प्रार्थना करण्यासाठीं लोकांनां हांकां मारण्याचे मंत्र म्हणण्यांत येतात. मनोर्‍यावरील घुमटांचा आकार अंडाकृति, अर्धगोल, मेघडंबरी वगैरे प्रकारचा असतो. मधील मुख्य घुमटाचा खालचा २/३ भाग भरगच्च दगडी बांधकामाचा व वरील १/३ भाग जाळीदार झांकणासारखा (दगडीच) करीत, त्यामुळें अजूनहि ईजिप्तमधील हे घुमट शाबूत राहिले आहेत. खुद्द मक्केची मुख्यच मशीद अगदीं निराळया बांधणीची आहे. तिच्या मधोमध काबा (पवित्र दगड) असल्यानें त्याच्या सभोंवार सर्व बाजूंस कमानीच्या ओवर्‍या आहेत. १६२६ मध्यें सर्व मशीद वाहून गेल्यामुळें पुढें ती नवीन बांधली. या काबा दगडाच्याकडेच तोंड करुन जगांतील सर्व मशिदींमधील कोनाडयांचीं तोंडें केलेलीं असतात. कैरवानच्या मशिदींत (सन ६७५) प्रत्येकी ११ खणी तरकार्डोव्हाच्या मशिदींत (७८६) २१ खणी अशा मोठमोठया ओवर्‍या आहेत. अणीदार व एकांत एक कमानींची झालर प्रथम कॉर्डोव्हाच्या मशीदींतच दृष्टीस पडते. खांबापेक्षां छताला अनुरुप अशी जास्त उंची साधण्यास कमानीवर कमान करणें भाग पडतें, तो प्रकार या कमानींच्या झालरींत साधतो. अलहम्ब्राच्या राजवाडयांतील एक कारंजें १२ सिंहांनीं उचलेलेलें आहे. वाडयाचे संगमरवरी खांब उत्तम सोनेरी नकशीचे आहेत. ईजिप्तमधील दगडी नकसकामापेक्षां सीरियांतील लाल मातीचें रंगीत काम हलक्या दर्जाचें आहे. इराणांत ताब्रीझ येथील गझनखानच्या मशिदींतील देवळी अति उंच असून मशिदीच्या भिंती आंतून व बाहेरुन अनेक रंगांच्या व जिल्हईच्या विटांनीं बांधल्या आहेत. एवढेंच नव्हे तर त्या विटांनीं नाना प्रकारच्या नकशीचे नमुने साधले असून, कांहीं ठिकाणी क्युफिक लिपींत शिलालेख लिहिले आहेत. जिल्हई व रंग या बाबतींत इतकी सुंदर इमारत इराणांत दुसरी नाहीं. कायरोपेक्षां तुर्की मशिदींचे मनोरे हलक्या दर्जाच्या कारागिरीचे आहेत. ते फार उंच, अर्धगोल, अरुंद सज्जाचे व वर छप्पर असलेले असतात. उस्मानच्या (१७५०) मशिदींत  प्रथम पाश्चात्य वास्तुशास्त्राचा प्रवेश झाल्याचें आढळतें. रोकोको नकशीकाम कायरो येथील महंमद अल्लीच्या (१८३७) मशीदींतून दृष्टीस पडतें. याखेरीज कारंजीं सुद्धां मुसुलमान लोक उत्तम प्रकारचीं बांधीत असत.

अर्वाचीन वास्तुशास्त्र:- एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभास अर्वाचीन वास्तुशास्त्राचा उदय झाला.  वास्तविक हें वास्तुशास्त्र नवीन नसून पूर्वीच्या वास्तुशास्त्राचा एक प्रकारचा पुनरुद्धारच आहे आणि तोहि १५ व्या शतकांतील पुनरुद्धारापेक्षां जरा निराळया स्वरुपाचा आहे. १५ व्या शतकांतील  पुनरुद्धार जरी प्राचीन कलेचाच होता तरी पण त्यांत तत्कालीन शिल्पज्ञांनीं आपलें डोकें लढवून  नवीन भर बर्‍याच प्रमाणांत घातली होती; परंतु हा १९ व्या शतकांतील पुनरुद्धार मात्र खरोखर   पूर्वींच्या (ग्रीक) कलेचीच बव्हंशीं नक्कल आहे. फक्त फ्रान्समध्यें कांहीं नवीन कल्पना आढळून येतात. या १९ व्या शतकांतील क्लासिकल धर्तीची इंग्लंडांतील पहिली इमारत म्हणजे सोन्सची 'बँक ऑफ इंग्लंड' नांवाची होय. ही एक मजली असून, तिचें एकंदर स्वरूप एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणें आहे. कांहीं कालानंतर इंग्लंडमध्यें ग्रीक पध्दतीची छाप या शास्त्रावर पुन्हां बसली. बँक ऑफ इंग्लंड नांवाच्या इमारतींचें स्वरुप या धर्तीचें आहे. या धर्तीत इमारतीच्या आकाराच्या मानानें खर्चाचें प्रमाण फार भारी असे; कारण बांधकामात जे दगड वापरीत ते एलजिन नांवाचे संगमरवरी जातीचे असत. इंग्लंडात या पद्धतीचा अभ्यास करणारे इनवुड, विल्किन्स, स्मर्क, बर्टन वगैरे शिल्पज्ञ होऊन गेले. विल्किन्स यानें युनिव्हर्सिटी कॉलेजचा नकाशा काढून देऊन त्यापैकीं द्वारमंडप व कांहीं घुमट बांधले होते. ही इमारत मनावर छाप बसविणारी व सुंदर आहे. त्याची दुसरी इमारत म्हणजे नॅशनल ग्यालरी (सन १८३२-३८) नांवाची आहे. ब्रिटिश म्यूझियमचा दर्शनी भाग स्मर्क यानें या सुमारास बांधलेला असून तोहि याच पध्दतीचा आहे. डब्लिनं येथील या पध्दतीची उत्तम इमारत म्हणजे बँक ऑफ आयर्लंड नांवाची (एक मजली) होय. हिची एक भिंत वर्तुलपादाकार आहे; प्रमाणबद्धता व त्याबरोबरच सुंदरपणा या दोन्ही गोष्टी सोन्सच्या बँकेपेक्षां या इमारतींत विशेष साधल्या आहेत. एडिन्बरो येथें या जातीच्या इमारती पुष्कळ असल्यानें त्याला 'अर्वाचीन अथेन्स' असें टोपण नांव पडलें आहे. या एकोणिसाव्या शतकांतील क्लासिकल पुनरुद्धरांत ग्रीक पद्धतीप्रमाणें कांहीं ठिकाणीं गॉथिक पद्धतीचाहि पुनरुद्धार झालेला आढळतो. उदा.  लिव्हरपूलचा सेंट जार्ज हॉल. ग्रीक धर्तीची बांधणी इंग्लंडांतील हवामानास फारशी मानवत नाहीं. असें या गॉथिक पध्दतीच्या पुरस्कर्त्यांचें म्हणणें आहे. जर्मनींत, विशेषतः बर्लिन व म्यूनिच या ठिकाणीं या काळांत ग्रीक पद्धतच पण इंग्लंडपेक्षां जास्त शास्त्रशुध्द दर्जाची अंमलांत आली. या पद्धतीचा उत्पादक कार्ल फ्रेडरिक शिंकेल नांवाचा अत्यंत कल्पक व स्वतंत्र बुद्धीचा शिल्पज्ञ होता, इतका कीं या कालच्या सर्व शिल्पज्ञांचा तो गुरुच बनला. याची प्रख्यात इमारत म्हणजे कोनिग्जवाच (हुजूरपागेची) इमारत नांवाची होय; बर्लिनचें म्यूझियम, रॉयल थिएटर, पॉट्सडयाम येथील निकोलाय किर्चे इत्यादि प्रख्यात इमारती यानें बांधलेल्या आहेत. याच्या पद्धतींत कृत्रिमपणा जास्त आढळतो. ग्रीक व ईजिप्शियन धर्तीचें मिश्रण, क्लेन्झ नांवाच्या शिल्पज्ञानें बांधलेल्या म्यूनिच येथील प्रोपीलाइआ या इमारतींत आढळतें. सेंपर नांवाचा जर्मन शिल्पज्ञ (१८७९) हि प्रख्यात झाला; त्यानें ड्रेसडेन येथें जें नाटकगृह बांधलें आहे, तें अर्वाचीन नाटकगृहांच्या बाबतींत अत्यंत नमुनेदार उदाहरण आहे. फ्रान्समध्यें या पुनरुद्धरकालांत इतर कोणत्याहि वळणांची छाप वास्तुशास्त्रावर बसली नाहीं; कारण फ्रेंच शिल्पज्ञ स्वतंत्र कल्पनेचे होते. रोमन वळणाचीं ११२ उदाहरणें मात्र आढळतात; तीं नेपोलियनच्या वेळचीं होत. स्वंतत्र फ्रेंच वळणाचया इमारतींत मॅडेलिनेची इमारत वाखाणण्याजोगी आहे. व्हिन्सेंट पॉळचें चर्च फ्रेंच वळणाचा पुरस्कर्ता व्हिट्टोर्फ (१८६७) यानें बांधलें आहे. आर्क डी ले इटोइले ही शालग्रीननें बांधलेली इमारत नाजूक, सुंदर व प्रमाणबद्ध असून जगांतील अत्यंत नांवाजलेल्या इमारतींपैकीं एक आहे. इंग्रज शिल्पज्ञांत रेन यांच्यानंतर सर चार्लस बॅरी हा प्रख्यात होऊन गेला. त्यानें    सर्वसामान्य लोकांनां पटणारें असें इटालियन वळण प्रसृत केलें. बॅरीमध्यें मूळ कल्पना फार कमी असे, तो एकंदरींत नक्कल उचलणाराच होता. मात्र सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्रांच्या बाबी तो लक्ष्यांत घेत असे. यावेळच्या इतर नांवाजण्यासारख्या इंग्रजी इमारती म्हणजे व्हाईट हॉल राजवाडा, बाँक्वेटिंग हाऊस, हॅलिफॅक्स नगरभवनाचा मनोरा (यांत गॉथिक वळण विशेष आहे), पार्लमेंटची इमारत इत्यादि होत. पार्लमेंटची इमारत ही बॅरीनें बांधली; इच्यांत टयूडरकालीन गॉथिक वळण आढळतें. ही साधी असून, मधला मोठा अष्टकोणी दिवाणखाना व उत्तर-दक्षिण बाजूचे दोन लहान दिवाणखाने हे पहाण्यासारखे आहेत. याचे दोन मनोरे (एक व्हिक्टोरिया नांवाचा व दुसरा घडयाळाचा) निरनिराळया धर्तीचे व निरनिराळया कलाकुसरींचे आहेत. जगांत कोठेंहि पार्लमेंटची इमारत कशी बांधावी याचा हा उत्कृष्ट नमुना आहे. ब्युडापेस्टचें पार्लमेंटगृह लंडनच्या पार्लमेंटगृहाचीच नक्कल आहे. इंग्लंडांत या शतकांत गॉथिक वळण पसरविणारा प्यूजिन नांवाचा शिल्पज्ञ प्रमुख होऊन गेला. गॉथिक वळणाचा दुसरा भोक्ता म्हणजे सर गिल्बर्ट स्कॉट होय. हा विशेष धूर्त असल्यानें याच्या काळीं चर्चांच्या सुधारणेची लाट उसळली होती, तिचा फायदा घेऊन, त्यानें अनेक चर्चें बांधलीं व त्यांत गॉथिक वळण तो या बाबतींत इतक्या योग्यतेचा झाला कीं, त्याच्या नंतरचीं बहुतेक चर्चें त्याच्या अनेक नमुन्यांपैकीं कोणत्या तरी नमुन्याप्रमाणें बांधण्यांत येऊं लागलीं. हल्लीं मात्र त्यांचें काम लोकांच्या डोळयांत भरेनासें झालें आहे. कमानींनां मजबुती येण्यासाठीं त्यांच्यामध्यें लोखंडी कांबी छुप्या रीतीनें घालण्याची पद्धत यानेंच सुरु केली. स्कॉटचा शिष्य स्ट्रिट यानें इमारतींत भव्य व सुंदरपणा आणण्याची खटपट जास्त केली. लंडन येथील न्यायाचीं कोर्टें याच्याच देखरेखीखालीं बांधलीं गेलीं. ब्रिटिश सरकारनें सरकारी इमारतीच्या पायीं फारसा खर्च करण्याचें रहित केल्यानें सर्व सरकारी इमारती एकाच नमुन्याच्या व एके जागीं (ग्रेट जॉर्ज स्ट्रीटपासून चेअरिंग क्रॉसपर्यंत) पसरलेल्या आहेत. जेम्स ब्रूक्स (१८२५-१९०१) या इंग्रज शिल्पज्ञानें या काळचीं मोठमोठीं चर्चें दगडांऐवजीं विटांनीं बांधण्याचें सुरु केलें. या काळांत गॉथिक ऐवजीं क्वचित् बायझन्टाईन वळण दृष्टीस पडतें, परंतु एकंदरींत फ्रेंच शिल्पज्ञ स्वतंत्र बुद्धीचे आहेत. मार्सेलीसचें चर्च हें हल्लींच्या काळांतील (१८७०) बायझन्टाईन वळणाचें उत्तम उदाहरण आहे. पॅरीस येथील पॅलेस डी जस्टीस, एकोले देस बिऔंक्स आटर्स लूव्हर, ग्रँड ऑपेरो हाऊस या फ्रेंच इमारती १९ व्या व विसाव्या शतकांतील क्लासिकल पद्धतीचे उत्तम नमुने होत. इंग्लंड व अमेरिका या देशांत १९ व्या शतकाच्या अखेरीस वास्तुशास्त्रास नवीनच स्वंतत्र वळण लावण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यांत सोई व बांधकामाचें सामानसुमान लक्षांत घेऊन इमारतींची बांधणी कशी असावी इकडे विशेष लक्ष्य देत. त्यामुळें कोणत्याहि जुन्या विशिष्ट धर्ती पुन्हां प्रचारांत आणण्याच्या धोरणास आळा पडत चालला. सांप्रत चर्चमध्यें सभामंडपाच्या दोन्हीं बाजूंच्या ओवर्‍या, पूर्वीच्या ओवर्‍यांपेक्षां ज्या अरुंद करण्यांत येतात, त्याचें कारण वरील गोष्ट होय. आज समाजाच्या गरजांस व अभिरुचीस अनुसरून इमारती बांधल्या जात आहेत. १८ व्या शतकांत 'क्लीन ऍन' नांवाच्या बांधणीची एक इग्लिश पद्धत इंग्लंडमध्यें प्रचारांत  होती; ती म्हणजे पूर्वीच्या इंग्रजी पुनरुद्धरकालांतील शेवटची पायरी होय. तिच्यांत वास्तुशास्त्रदृष्टया नांवाजण्यासारखी एकहि इमारत बांधली गेली नाहीं. या इमारती साध्या व विटांच्या बांधीत, कारण इंग्लंडचें हवामान विटांच्या इमारतींस फार अनुकूल आहे. अलीकडे १५ वर्षांपासून 'स्वतंत्र क्लासिकल' नांवाची बांधकामाची धाटणी निघाली आहे. तिचा पहिला नमुना म्हणजे लंडन येथील 'न्युझीलंड चेंबर्स' नांवाची इमारत होय. इंपीरियल इन्स्टिटयूट (लंडन) ही इमारत या बांधणीचें उत्तम उदाहरण आहे. या काळांतच इमारत सुशोभित करण्याकडेहि कारागिरांचें लक्ष जास्त वेधलें. खोदकाम, मूर्तिकाम, चित्रकाम, संगमरवरी दगडाचे किंवा कांचेचे तुकडे जमीनींत किंवा भिंतीत बसवून केलेलं जडवाचें उर्फ कच्चीकारीचें काम इत्यादि कलाकौशल्याचीं कामें घराच्या बांधणीबरोबरच होऊं लागलीं. पूर्वी हीं कामें करणारे शिल्पज्ञ, मूर्तिकार, चित्रकार, वगैरे कारागीर, घर बांधणार्‍या शिल्पज्ञांशीं मिळून मिसळून काम करीत नसत व त्यामुळें वरील कामें वास्तुशास्त्रांत समाविष्ट होत नसत. आतां तीं या शास्त्राच्या शाखाच बनलीं आहेत. दगडी खांब, तुळवटें, घुमट, गलथे, धीरे वगैरे पुनरद्धारकालीनप्रकार हळू हळू लोपतं चालले. मात्र त्यांचा समूळ  अभाव झालेला नाहीं. हल्लीं कला या दृष्टीपेक्षां पोट भरण्याचा धंदा या दृष्टीनें कारागीर अथवा शिल्पज्ञ हा वर्ग या शास्त्राकडे पहात आहे आणि त्यामुळें त्यांनीं बांधलेल्या वास्तू पूर्वीच्या (कला हीच केवळएक दृष्टि ठेवणार्‍या) शिल्पज्ञांच्या वास्तूंहून कमी दर्जच्या भासतात. सोय व काटकसर इकडेहि सांप्रत (विशेषतः इंग्रज सरकार व इंग्रज) लोकांचें कलाकौशल्यापेक्षां जास्त लक्ष असतें. अमेरिकेंत सांप्रत वास्तुशास्त्राची स्थिति इंग्लंडच्या उलट आहे. सांप्रत अमेरिकेंत उंच उंच इमारती बांधण्याची प्रवृत्ति फार वाढली आहे. ही धाटणी प्रथम न्यूयॉर्क या शहरीं उत्पन्न झाली. हें शहरद्वीपकल्पवजा बंदराच्या जागीं वसलेलें असल्यानें लांबी-रुंदीपेक्षा (इमारती बांधण्याच्या कामीं) उंचीकडेच जास्त लक्ष द्यावें लागतें. या इमारतींस मनोरेवजा इमारती म्हणतात. त्यांच्या बांधणीमुळें वास्तुशास्त्रांत एक निराळीच धाटणी उत्पन्न झाली. या बांधणींत, पोलादी पत्रे व इतर पोलादी वस्तू यांचा विशेष उपयोग होतो केवळ शोभेसाठीं दगडाचें अथवा टेराकोट्टा (भाजलेल्या) मातीचें काम बाहेरच्या बाजूंनीं केलें जातें. इंग्लंडांत चौकोनी धर्तीच्या शाळेच्या इमारतीची पद्धतवेब नांवाच्या शिल्पज्ञानें प्रथम काढली. नगरभवनाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे एडिंबरो येथील नगरभवन होय. इमारतीच्या निरनिराळया स्वरूपांनां अनुसरून त्या बांधल्या जातात. साध्या शाळा, औद्योगिक शाळा, औद्योगिक शाळा, वाचनालयें, इस्पितळें, नाटकगृहें, अनाथगृहें इत्यादि इमारती निरनिराळया धाटणींच्या व सोयींच्या असतात. त्यांत शोभेपेक्षां साधेपणा व आरोग्य, उजेड, हवा, इत्यादि सोयी यांकडेच जास्त लक्ष दिलें जातें. मुख्य रस्त्यांनां शोभा येईल अशीं घरें त्या रस्त्यांवर बांधण्याची जी रीत नुकतीच जोमांत येत आहे, त्या रीतींत घरांचा दर्शनी भाग पुष्कळ निरनिराळया प्रकारांनीं सुशोभित करतात. अद्यापीहि फ्रान्स देश सर्व जगांत या वास्तुशास्त्राच्या बाबतींत अघाडीस आहे. त्या देशांत या शास्त्रांतील निरनिराळया शाळा असून त्यांनीं हें शास्त्र पूर्णावस्थेस नेण्याचें काम शिस्तवार चालविलें आहे. त्यामुळें जगांतील उत्तम शिल्पी या शाळांतून तयार होत असतात; फ्रेंच सरकारचा सर्व बाजूंनीं या शास्त्रास पाठिंबा आहे. हल्लींचे पॅरीसचे दोन नवे राजवाडे, हॉटेल डी व्हिले आणि सीन नदीवरील पूल फ्रेंच कारागिरीचे सांप्रतचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत.

भारतीय:- भारतीय वास्तुसौंदर्यशास्त्र दोन पद्धतींनीं लिहितां येईल : (१) वास्तुशास्त्रावरील  भारतीय ग्रंथ आणि त्यांत वर्णिलेलें वास्तुशास्त्र यांवरून लिहिणें ही एक पध्दत व (२) दुसरी म्हटली म्हणजे वास्तुसौंदर्यशास्त्र वस्तूंच्या अवलोकनावरुन लिहिणें, पहिल्या प्रकारें लिहावयाचें वास्तुसौंदर्य शास्त्र, शिल्पशास्त्रें या लेखांत वर्णिलें जाईल. येथें सध्यांचे अवशेष अवलोकन करुन त्यावरून प्राचीन कालांपासून सौंदर्य कल्पना, आकार, यांचा कसकसा विकास होत गेला हें देण्याचें ठरविलें आहे. भारतीय सौंदर्यकल्पनेच्या इतिहासाला कारण परमर्थिक संप्रदाय, राजवंश हीं आहेत त्याप्रमाणेंच देशांतील साहित्यहि कारण झालें आहे. तेव्हां सौंदर्यशास्त्राच्या इतिहासांत या प्रत्येक कारणांचा इतिहास शोधावयाचा हें महत्त्वाचें विचारक्षेत्र होय.

भारतीय शिल्पांत विशेष गोष्टी कोणत्या हें सांगणें प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.

ज्याप्रमाणें आज चीन, जपान आणि ब्रह्मदेश यांतून शिल्पांत बहुतेक लांकडाचाच उपयोग करतात तद्वत प्राचीन भारतीय शिल्पांत केवळ लांकूडच वापरीत असत. ख्रि.पू. ३ र्‍या शतकाच्या सुमारास महत्त्वाच्या बांधकामांत दगड पुष्कळसा दिसूं लागला; व जर भारतीय कदाचित यापूर्वी दगड किंवा विटा वापरीत असतील तर ते फक्त पाये व बांधकाम या कामींच असेल. ख्रि.पू. ४ थ्या शतकाच्या अखेरीस देशील मेगॅस्थेनीसला पाटलीपुत्र लांकडी कोटानें परिवेष्टिलेलें असें आढळलें. जर पाटलीपुत्रासारखें राजधानीचें शहर अशा काष्टभित्तीनें संरक्षिलें जात होतें जर त्यावेळेचें सर्व शिल्पकर्म लांकडांत असेल, असें अनुमानण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. सांचीच्या दरवाज्यावर विटांच्या भिंती आहेत. पण त्या शिल्पकामांत धरितां येत नाहींत. दगड उपयोगांत केव्हां कां आणिला असेना, इतकें खरें कीं, भारतीयांनीं मूळ प्राचीन वस्तूंचा पुढें उपयोग करुन एकजात एकसारखीं कामें केलीं व आपली धाटणी कायम राखिली. तेव्हां पुढील कामावरून पाहतां मागें लांकडाचा सार्वत्रिक उपयोग केला जाई असें सिद्ध होतें. याप्रमाणें, लांकडाचें दगडांत रुपांतर होऊन शेवटीं पुढील शिल्पप्रकारांत त्याचें मूळहि गडप झालें असा आपणांस शोध लावितां येतो.

ख्रि.पू. ४ थ्या शतकांत सिंकदरानें हिंदुस्थानावर स्वारी केली त्यापूर्वीचा इतिहास किंवा शिल्पकर्मांतलें स्मारक मुळींच आढळत नाही. सुदैवानें यापुढील कालांतील कांहीं थोडया लेखांकित गोष्टी सांपडल्या असून त्यांचे काल त्यावरील लेखांवरून उघड होतात. बाकीच्यांचे काल कांहीं ठराविक शास्त्रीय सिद्धांत लावून काढतां येतात, व अशा रीतीनें भारतांतील सर्व स्मारकें आपणांला ओळीनें एकापुढें एक अशीं कालानुक्रमें मांडितां येतात हें विशेष आहे.

शिकंदराची स्वारी व बौद्धधर्माचा पश्चिमेकडे प्रसार या योगानें भारताचा इराणशीं संबध आला. त्यावेळीं इराणमध्यें ऍकिप्रेनियन राजांनीं डोंगरांतून समाध्या कोरल्या होत्या व दगडी चबुतरे, दरवाजे आणि खांब व त्यांमध्यें विटांच्या भिंती असलेले राजवाडे बांधिले होते. त्यांकडे भारतांतून तिकडे गेलेल्या प्रवाश्यांचें लक्ष वेधून त्यांनीं या भव्य मनोवेधक गोष्टींची हकीकत लिहून ठेविली; ती वाचून तिचें भारतांत अनुकरण होऊं लागलें असें म्हणण्यास हरकत नाहीं.

ख्रि.पू. ३ र्‍या शतकाच्या मध्यांत अशोकाचें त्याच्या समकालीन सीरिया, ईजिप्त, मॅसिडोनिया, एपायरस आणि सॅरेने येथील राजांशी दळणवळण असलेलें आढळतें. याच्याच कारकीर्दीत इराणी धर्तीचे शिरोभाग असलेले मोठ-मोठे दगडी स्तंभ उभारण्यांत आले. अशोक स्वतः बौद्धधर्मी असल्यामुळें त्यानें त्या धर्माच्या प्रसारार्थ सर्व देशभर जिकडे तिकडे स्तूप, मठ वगैरे बांधविले.

अशोकाच्या लाटांवरील मथळयाच्या पर्सेपॉलिटन रुपाखेरीज त्यांवरील पानें, वेलबुट्टी हीं प्राचीन इराणी कोरीव कामांतली दिसतात; व पुढें खुद्द भारतांत हीं टिकलीं नाहींत. तरी इ.स. नंतर कांहीं शतकें अफगाणिस्तानांत उपयोगांत होतीं. यावरून असें दिसतें कीं लांकडी शिल्पाच्या जागीं दगडी शिल्प येणयास कारणीभूत झालेल्या कल्पनांबरोबरच या घाटणी प्रथम इराणांतून इकडे आल्या.

बुद्ध किंवा त्याचे पट्टशिष्य यांच्या शवावशेषांवर उभारलेल्या समाधी, किंवा त्यांच्या आयुष्यांतील संस्मरणीय प्रसंगांचे द्योतक म्हणूक हे स्तूप बांधीत. या स्तूपांनां सिंहलद्वीपांत दागब (पाली-धातुगभ्म; संस्कृत-धातुगर्भ), नेपाळांत चैत्य व उत्तर हिंदुस्थानांत टोप या नांवांनीं ओळखतात. खालीं वाटोळया नगार्‍याचा आकार व त्यावर कमी व्यासाचा एक घुमट असें स्तूपांचें वर्णन देतां येईल. घुमटाच्या सभोंवतीं नगार्‍यावर (घुमटाचा व्यास थोडा कमी असल्यामुळें) कांहीं थोडया फूट रुंदीची जागा रहाते. खालीं नगार्‍यासभोंवती प्रदक्षिणेकरतां उघडी वाट असून, या सर्वाला परिवेष्टन म्हणून चारी दिशांनां चार उंच दरवाजे असलेला एक मोठा भक्कम दगडी कठडा असतो. हे कठडे व दरवाजे यांवर मुख्यतः शिल्पकाम केलेलें असतें. लांकडी कठडयाप्रमाणें हे दगडी कठडे अगदीं जवळजवळ दांडयाचे असतात (उदा. सांची व बुद्धगया येथील स्तूप). कठडयांच्या उभ्या व आडव्या दांडयावर पुष्कळ वेळां निरनिराळया प्रसंगांचीं चित्रें कोरलेलीं असतात, व तीं, शिल्पकला आणि शिल्पाच्या चालीरीती उत्तम तर्‍हेनें दिग्दर्शित करतात.

सांची येथील भव्य स्तूप सर्व स्तूपांत अभंग व पूर्णांग असा आहे. दरवाजे - त्यांनां 'तोरणें ' असें म्हणतात. हें स्तूपांतील प्रधानांग असून ते बहुतेक लांकडी असतात. सांची स्तूपाचीं तोरणें शिल्लक आहेत. त्यांचें वरील बांधकाम निवळ लांकडी असून, वीस शतकेंपर्यंत तें अबाधित कसें राहिलें याचें आपणांस राहून राहून आश्चर्य वाटतें. आज जपान व चीनमध्यें 'तोरी-इ' (जपानी नांव), 'पाइ-लस् किंवा 'पाइ-फंगस्' (चिनी नांव) या नांवांनीं तेथें ओळखिलीं जाणारीं हीं तोरणें दृष्टीस पडतात. यांचा आंतील व बाहेरील पृष्ठभाग फारच सुबक असा मोठया परिश्रमानें कोरलेला असतो. सांचीच्या पूर्वतोरणाचा उठाव साऊथ केनिंग्स्टन, एडिंबरो, डब्लिन, पॅरिस आणि बर्लिन येथील पदार्थसंग्रहालयांत ठेविलेला आहे. दक्षिण तोरणावर जो लेख आहे त्यावरून त्याचा काल ख्रि.पू. सुमारें १२० वर्षांचा असावा असें दिसतें.

प्राचीन लेण्यांतील देवालयें स्तूपांइतकींच जुनीं आहेत; बिहारमधील कांहीं लेण्यांवर अशोकाचे शिलालेख आहेत. पश्चिम हिंदुस्थानांतील प्राचीन लेण्यांच्या दर्शनी भागांवरुन त्यांची बांधणी व धाटणी एकच असल्याचें दिसून येतें. हीं बौद्ध लेणीं दोन प्रकारचीं असतात. एक चैत्य व दुसरे विहार. चैत्याला बरेंच उंच असें कमानदार छप्पर असून जुन्याचा पुढील भाग लांकडी, व अलिकडच्याला आडोशाचीं भिंत असते; या दोन्ही तर्‍हांत दरवाज्यावर मोठ्ठया नालाच्या आकाराची खिडकी असते. आंतील बाजूस बहुधा एक नाभि (सभामंडपाच्यामध्यें) व बाजूंस दालनें असून नाभि व दालनें यांमध्यें खांब असतात. नाभीच्या शेवटीं वर्तुलाकार कडेला चैत्य देवालयांच्या दर्शनी भागांवर सुंदर शिल्प असून पाऊस, वारा यापासून त्यांचे रक्षण करण्याकरतां दर्शनी भागांपुढें एक आडोसा ठेविलेला असतो; त्याला वरच्या बाजूस उजेडाकरितां एक मोठी खिडकी पाडलेली असते. आंत उजेड घेण्याकरतां ही केलेली युक्ति अतिशय उत्तम असून याला मागें सारतां येण्याजोगी दुसरी कोणतीहि तोड आजपर्यंत कोठेंच निघाली नाहीं. यामुळें सर्वांचें लक्ष या शिल्पाकडे ओढलें गेलें आहे. लेण्यांचा दुसरा प्रकार म्हणजे भिक्षु, यति वगैरेंनां राहण्याकरितां बांधिलेले विहार होत. यांत सामान्यतः एक दालन असून भोंवतालीं अनेक गुहा असतात. जुन्या गुहांत दगडी बिछाने दिसतात. मागाहून बांधिलेल्या विहारांत पाठीमागच्या भिंतीच्या मध्यभागीं एका देव्हार्‍यांत बुद्धमूर्ति ठेविलेली असते. कटकजवळच्या ओरिसा लेण्यांतील पुष्कळसें कोरीव काम वरील पद्धतीस अनुसरून नाहीं. तें ख्रि.पू. दुसर्‍या शतकाइतकें प्राचीन आहे, पण तें बौद्ध पंथाचें नसून तितक्याच पुरातन अशा जैन पंथाचें आहे.

हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर स्वात व युसफझई जिल्ह्याच्या आसपास म्हणजे ज्याला गंधार असें प्राचीन नांव होतें त्या प्रदेशांत एका विशिष्ट वर्गाचे अवशेष सांपडले आहेत. हे बरेच छिन्नविछिन्न आहेत तथापि बौद्धधर्मीय पाषाणशिल्प त्यांत अतिशयच आढळतें. यांतच बुद्ध व बौद्धधर्मांतील दुसर्‍या कित्येक व्यक्ती प्रतिमारुपांत आढळतात. या मूर्तीतील कलेवरून त्या पाश्चात्य धर्तीवर केलेल्या आहेत हें स्पष्ट दिसतें ती कला ग्रीकांनीं तरी इकडे आणिली असेल किंवा बौद्ध प्रचारक त्या देशांतून घेऊन आले असतील. येथील शिल्पांत दाखविलेल्या दर्शनी भागांतील खांब उघडपणें कॉरिन्थियन मथळे बसवून तयार केले दिसतात. या प्रतिमांचा काल ख्रि. पू. कांहीं वर्षांपासून इ.स. ४ थ्या शतकापर्यंतचा आहे याबद्दल संशय नाहीं. इ.स. ४७ चा एक अंकित लेख गाँडोफेरनीज राजाचा आहे. ईश्वरप्रेषित थॉमसच्या कथेंत या राजाचा उल्लेख येतो.

इ. स. ३२० ते ५०० काळांतील गुप्त वंशाच्या अमदानींत शिल्पकला वृद्धिंगत होत जाऊन तींत निरनिराळे प्रकार व अलंकारांची समृध्दि दिसूं लागली. खांबांनां पूर्वीपेक्षां उंच चौकोनी बैठकी व कधीं कधीं कंगणीदार बैठकी देण्यांत आल्या. खांबांच्या मथळयावर वेलबुट्टी काढून त्यांचा पूर्वीचा वाटोळा आकार घालवून चौकोनी आणू लागले. पुष्कळ वेळा बैठकीवर वेलबुट्टी काढण्यांत येई. अशा रीतीनें खांबांचें पर्सेपॉलिटन स्वरुप जाऊन नवीन आलें. खांबांचे मधले दांडे वाटोळे किंवा सोळा किंवा जास्त कोनाचे असत. त्यांवर चौधारी खांबांची नक्षी काढीत. देवळाचीं शिखरें बाहेरुन साधीं व वर निमुळतीं होत गेलेलीं असून, शेवटीं मोठीं वाटोळी खांचणीची तबकडी व तीवर चंबूच्या आकाराचा कळस चढविलेला असे. शिखराच्या पृष्ठभागावर नालाच्या आकाराची एकजात नक्षी असे. ही घाटणी सर्व हिंदुस्थानभर मुसुलमानी अमलापावेतों देशकाळानुसार कमी जास्त फरकानें उपयोगांत असे.

काश्मीरमध्यें निदान १० व्या शतकापासून मुसुलमानी अमदानीपर्यंत एक विशिष्ट शिल्पाचा नमुना दृष्टीस पडतो. या काश्मिरी पध्दती वा नमुना पाहावयाचा झाल्यास इस्लामाबादपासून ३ मैलांवर असलेलें मार्तंडाचें देऊळ पहावें. २२० फूट लांब व १४२ फूट रुंद अशा आवारांत हें असून भोंवतालीं सुमारें ८० लहान पडक्या गुंफा आहेत. पूर्व टोंकाला मोठा दरवाजा आहे. खुद्द देऊळ ६० फूट लांब, व ३८ फूट रुंद, दोहो बाजूंनीं दोन पाखीं, एक नाभि व एक गाभा अशा तर्‍हेचें आहे. देवळाच्या व गुंफांच्या दरवाज्यांवर त्रिदळी कमान जी दृष्टीस पडते, ती या धाटणीचें एक मोठें वैशिष्टय असून, बौद्ध चैत्याच्या भागापासून ती उच्दृत केली असावी. ही केवळ मंडपार्थ काढिली असते. देऊळ व प्रवेशमंडप यांतील खांब रोमन डोरिक पध्दतीच्या पुढील काळांतील कांहीं स्वरूपाशीं अगदीं तंतोतंत जुळतात. बहुधां सोळा उथळ खांचण्या, व त्याचप्रमाणें मथळा आणि बैठक आणि यांवरहि अनेक कंगण्या वगैरे आहेत. दरवाजाचा वरील भाग त्रिकोणी व चांदईच्या शेवटास दुहेरी उतरतीं छपरें दाखविलीं आहेत. हें देऊळ सूर्याचें असून सुमारें ८ व्या शतकांतलें असावें. बुनियार, अवंतिपुर, वानगथ, पयेर आणि पांड्रेथन या गांवीं काश्मिरी पद्धतीचीं पुष्कळ मनोरंजक उदाहरणें आढळतात.

हिमालयामध्यें अद्यापीहि पुष्कळसं लांकडी शिल्प असून तें फारच प्रेक्षणीय असें आहे. नेपाळ खोर्‍यात अर्धगोलाकार चैत्य किंवा स्तूप आढळतात. यांच्या बैठकी ठेंगण्या, शिखरें विटांचीं व उंच असतात. कांहीं अतिशय प्राचीन, तर कांहीं उत्तर हिंदुस्थानांतील अर्वाचीन हिंदु पद्धतीचीं आहेत. देवळें तीन चार मजलीं असून, एक मजला व दुसरा मजला यांमध्यें उतरतें छप्पर असतें.

दक्षिण कानडामध्यें, विशेषतः मूडबिदरे (मूडिबेद्रि) येथें दुहेरी आणि तिहेरी उतरतीं छपरें असलेलीं जैन देवस्थानें आणि समाधी आहेत. ही पद्धत या जिल्ह्यांतील केंबळी घरांवरून पडलेली आहे. हीं देवळें आंतून उत्तम कोरलेलीं असून त्यांतील भव्य स्तंभ, हस्तिदंत किंवा मौल्यवान धातू यांवर ज्याप्रमाणें नक्षी काढतात त्याप्रमाणें नक्षी काढलेले असतात. या व दुसर्‍या देवळांचे अखंड दगडी स्तंभ चौरस बैठकीवर बसविलेले असून मधला भाग सुंदर नक्षीदार व वरील भाग पसरट असा असतो. हे स्तंभ प्राचीन बौद्ध लाटांऐवजीं असून ज्या संप्रदायाचे ते असतात त्या संप्रदायाचीं चिन्हें धारण करतात.

हिंदुस्थांनच्या दक्षिण भागांत द्रविड लोक आहेत तेव्हां या भागांतील शिल्पपद्धतीला द्राविडी शिल्प हें नांव दिलें आहे. हें शिल्प एकाच जातीचें असून दुसर्‍या भागांतील शिल्पपद्धतींहून अगदीं वेगळें आहे, या पद्धतींतील प्रसिद्ध अशा स्मारकसंघांपैकीं एक म्हणजे मद्रासच्या दक्षिणेस समुद्रकिनार्‍यावर असलेले मामल्लपुरम् रथ होत. हे रथ ग्रॅनाईटच्या दगडी डोंगरांत खोदले असून यांची ठेवण देवळांच्या नमुन्यावर आहे. द्राविडी शिल्पाचे हे अतिप्राचीन नमुने ७ व्या शतकांतले असून कांजीवरम्च्या कैलासनाथ देवळाचे समकालीन आहेत. पुढील शतकांत मुंबई इलाख्याच्या दक्षिणेंतील कांहीं देवळें व वेरुळचें अखंड दगडी कैलास देऊळ तयार झालें.

द्राविडी पद्धतीच्या इमारतींची संख्या स्थलविस्ताराच्या मानानें पाहतां फारच मोठी भरेल. देवळांनां बहुधां चौथरा असून बाहेरुन भिंतींत बारीक व उंच स्तंभ घातलेले असतात. देवळांत एक गाभा असून त्यांत मूर्ति ठेविलेली असते.  यापुढें एक किंवा दोन सभामंडप असतात. देवावार निमुळतें व मजलेदार शिखर असून, त्यावर वर्तुळाकार किंवा बहुकोनी घुमट असतो. छतपट्टी इतर पद्धतींतल्याप्रमाणें सरळ उतरती नसून बांकदार असते. या पद्धतींतील दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे गोपुर. देवळाच्या प्राकाराला प्रवेशद्वारीं कधीं कधीं चारहि बाजूंस अशीं गोपुरें बांधिलेलीं असतात. सामान्यतः हीं गोपुरें देवळावरील शिखराप्रमाणेंच असतात. फक्त त्यांची रुंदी उंचीपेक्षां दुप्पट असून खुद्द देवळांपेक्षां गोपुरेंच जास्त उठावदार दिसतात. ही शिल्प पध्दत उघडपणें लांकडी उगम असेलली दिसून येते; याला पुरावा म्हणजे बाहेरच्या भिंतीवरील अगदीं बारीक खांब व बारीक छेदाचे (सेक्शन) चौरस खांब होत. हिच्या समकालीन उत्तरेकडील पद्धतींत उभ्या रेषा दृष्टीस पडतात, तर या द्राविडी पद्धतींत आडवी घडण व प्रतिबिंबें आणि मजलेदार शिखरें व गोपुरें आढळून येतात. मोठया महत्वाच्या देवळांनां भोंवतीं प्राकरा असून, त्याच्या आंत मोठया सर्व बाजूंनीं ओवर्‍या सभामंडपादि असतात.

या पध्दतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे तंजावरचें मोठें देवालय होय. तिरुवल्लूरच्या देवालयाप्रमाणें एखाद्या लहान देवळाचा जसजसा पैसा मिळत गेला तसतसा विस्तार व प्रसिद्धी होत गेली अशी तंजावरच्या देवळाची स्थिति नसावी; कांहीं विशिष्ट योजना पूर्वी ठरवून त्याबरहुकूम याची बांधणी सुरु झाली असावी. तंजावरच्या देवळाचा मुख्य भाग दुमजली असून त्याची उंची पक्की ८० फूट आहे; शिखर अकरा मजली उंच आहे. गोपुरापेक्षांहि तें वर गेलेलें आहे. प्राकार दोन असून पहिला देवळाभोंवतीं व दुसरा पहिल्याच्या पुढें (देवळासभोंवतीं नव्हे) आहे. गोपुरें पहिल्या (देवळाजवळच्या) द्वारांवर आहेत. मध्यमंदिर (गाभारा) सुमारें इ.स. १०२५ मध्यें बांधिलें असावे.

त्रिचनापल्ली येथील श्रीरंगमचे देवालय सर्व हिंदुस्थानांत अतिशय मोठें असून त्याचें शिल्प वरील देवालयाच्या शिल्पाच्या अगदीं उलट आहे. अर्वाचीन शिल्पांपैकीं हें एक असून, याचा पांचवा प्राकार १८ व्या शतकाच्या मध्यांत अर्धवट तसाच राहिला. मध्यमंदिर अगदीं लहान दिसतें; त्याच्या सोनेरी घुमटावरून कायतें तें ओळखितां येतें. या मंदिरापासून बाहेर येतांनां प्रत्येक प्राकाराचीं एकापेक्षां एक मोठीं व जास्त शोभिवंत अशीं गोपुरें लागतात. या देवालयाला एकामागून एक स्वतंत्र जोड देत गेल्याकारणानें, विचारपूर्वक केलेल्या योजनेला किंवा अवयवांच्या नेटक्या मांडणीला बाध आलेला दिसतो.

सहाव्या शतकापासून बहुतेक दक्षिण प्रांतावर चालुक्य घराण्याची सत्ता होती, तेव्हां तुंगभद्रा आणि कृष्णा नदीपासून तापी आणि महानदीपर्यंतच्या या क्षेत्रांतील शिल्पपद्धतीला चालुक्य पद्धत म्हणावें. यापद्धतीचीं अति प्राचीन देवालयें द्राविडी व उत्तरेकडील पद्धतींहून फारशीं वेगळीं असलेलीं  दिसून येत नाहींत. कांहीनां उत्तरेकडल्याप्रमाणें शिखरें असतात तर कांहीं दक्षिणेकडील पद्धतीशीं अगदीं समरुप झालेलीं दिसतात; पुढें हळू हळू या चालुक्य पद्धतींत तुटकपणा येऊं लागला व त्याचीं विशिष्ट चिन्हें नजरेस येत गेलीं. नंतर एक काळ असा आला कीं, त्या काळचीं देवळें व शिखरें द्राविडी विमानांहून अगदीं निराळया आकाराचीं बनून, इतर तपशील ध्यानांत न घेतांहि या पद्धतीची चटकन् खूण पटत असे.

चालुक्य देवळांचें नेहेमीचें स्वरुप म्हणजे एक मधलें दालन व त्याभोंवतीं तीन देव्हारे. या दालनांचीं छप्परें द्राविडी पद्धतीप्रमाणें बहुतेक नेहेमीं चार किंवा चाराच्या गुणाकारांइतक्या खांबांवर उभारलेलीं असतात व त्यामुळें मोठाले घुमट करण्याचे प्रयत्नच होत नसत असें दिसतें. या पद्धतींत गभा इतर पद्धतींतल्याप्रमाणें चौरस नसून नक्षत्राकार असतो; त्याचे सर्व कंगोरे एका वर्तुळांत असतात. शिखरें मजलेदार नसून पायर्‍यांचीं असतात.

या पद्धतींतील कांहीं गोष्टी फार परिश्रमपूर्वक केलेल्या आढळतात. पुष्कळशीं सुंदर देवळें शिल्प विभूषणांनीं भरगच्च असतात. स्तंभ तर प्राचीन द्राविडी आकाराचे मुळींच नसून, ते मोठे विशाल, नक्षीदार, बहुधां वाटोळे व उत्कृष्ट जिल्हई दिलेले असे असतात. त्यांचें शीर्ष पुढारलेलें असून त्याखालीं अनेक वाटोळया आकृती असतात; याखालचा भाग चौरस असून, दांडयाच्या मधल्या बाजूवर नक्षीकाम केलेलें असतें. एका नमुन्याचे दोन दोन स्तंभ असल्याकारणानें, एकंदर देखावा विचित्र व शोभिवंत दिसतो.

हळेळबीड येथील मोठें देवालय सुमारें इ.स. १२५० मध्यें बांधण्यास सुरुवात झाली असावी व तें इ.स. १३१० मध्यें मुसुलमानांनीं हा प्रदेश काबीज केल्यावर तसेंच अर्धवट राहिलें. हें जोड देवालय १६० फूट   १२२ फूट इतक्या मापाचें असून, वर अति आश्चर्यकारक असें उत्कृष्ट शिल्प आढळतें. मंदिरावर कधींच कळस चढविले नाहींत. बलगाम्वीचें केदारेश्वर देवालय म्हैसूरमधील या पद्धतीचें एक अति प्राचीन देवालय म्हणतां येईल; या तर्‍हेचीं दुसरीं उदाहरणादाखल देवळें म्हणजे कुबत्तूर, हर्नहळळी, अर्सीकेरे, हरिहर, कोरवंगल आणि इतर ठिकाणचीं होत; पण तीं अगदीं वेगवेगळया नमुन्यांची आहेत.

आतां उत्तर हिंदुस्थानाकडे वळल्यास, आपणांस असें आढळून येईल कीं, येथें हिंदु शिल्पपद्धत दक्षिणेंतल्यापेक्षां जास्त विस्तारलेली व बहुरंगी आहे. तरी पण तिच्यांत पृथक्त्व कमी आहे. अगदीं दक्षिणेकडे चालुकग्य क्षेत्रांत सुद्धां या जातीचीं उदाहरणें सांपडतात. हिचें वैशिष्टया जें प्रथम आपल्या नजरेला दिसतें तें हें कीं, देवळांचीं शिखरें वक्ररेषानिर्मित असून, दक्षिणेंतील मोठाल्या चालुक्य देवळांमधून आढळणारी शिल्पसमृद्धि या ठिकाणीं मुळींच दिसून येत नाहीं. पुष्कळ वेळां जैन देवालयांतल्याप्रमाणें, बारा खांबावर, माथे अष्टकोनी करून घेऊन घुमट चढविलेला असतो. यामुळें मध्यें दालनांत चांगली मोकळी जागा सांपडते. देव्हारे चौरस असून, कोठें भिंतींनां थोडीफार जोड देऊन कांहीं फरक केलेला आढळतो इतकेंच. कांहीं एक उंचीचे घडीव चबुतरे बांधून त्यांवर भिंती उभारतात; चबुतरा व तळसरी मिळून अर्धी भिंत होते. यावरील भागावर खणाखणांतून मूर्तिशिल्प काढतात. दाक्षिणात्य पद्धतींतल्याप्रमाणें बारीक पण उंच असे भिंतींतले खांब या ठिकाणीं दिसत नाहींत. त्यानंतर छतपट्टी व तीवर छत आणि शिखर चढविलें असतें. भिंतीवरील उभ्या रेषांनुसार शिखर वर चढत गेलें असून पायर्‍या किंवा मजले यासारख्या विभागणार्‍या गोष्टी यांत मुळींच आढळून येत नाहींत; पण कालानुसार यांच्यांत इतर नवीन नवीन प्रकार येत गेले आहेत.

याच उत्तरेकडील पद्धतीच्या एका प्रकाराला पश्चिम हिंदुस्थान आणि राजपुताना यांमध्यें जैनधाटणी म्हणून ओळखतात. जैन व हिंदु यांनीं ही धाटणी सारखीच उचलली आहे तरी, अबुपहाड व इतर स्थळें यांतील जैनांच्या प्रसिध्द देवळांतून फारच अलंकारित स्वरूपांत हिचा जैनांनीं उपयोग केलेला दिसतो. या पद्धतींतील विशेष डोळयांत भरणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या सज्जावरील छतें व दालनें आणि देवडी यांवरील घुमट फारच सुंदर रीतीनें नक्षी केलेले असतात. या छतघुमटावरील शिल्प नाजुकपणा व परिश्रम या बाबतींत कोणत्याच शिल्पाला हार जाणार नाहीं. त्यांचे आधारस्तंभहि व्यवस्थित मांडलेले व उत्तम नक्षी केलेले असे असल्यानें तेथील सौंदर्य आणि सारखेपणा प्रेक्षकांच्या अंतःकरणाला अत्याल्हाद दिल्यावांचून राहात नाहीं.

१२ व्या शतकापूर्वी गुजराथ उत्कृष्ट देवळांनीं सुसमृद्ध असलें पाहिजे, पण मुसुलमानांनीं त्यावर एकसारख्या स्वार्‍या करुन सर्व सौंदर्यवान् गोष्टींचा नाश केला. नाहीं म्हणावयास मुधेर येथील सूर्याचें देवस्थान मात्र ११ व्या शतकाच्या प्रारंभीचें शिल्पवैभव व रचना थोडीफार प्रत्ययास आणून देण्यास अवशेष स्वरूपांत शिल्लक राहिलें आहे. बुंदेलखंडांत खजुराहो येथें या पध्दतीप्रमाणें बांधलेलीं तीस चाळीस देवळें आढळतात. तीं हिंदु व जैन या दोन्ही संप्रदायांचीं असून, सुमारें १०  व्या आणि ११ व्या शतकापासूनचीं असावींत., हीं देवळें आंतून बाहेरुन उत्तम नक्षीचीं असून संबंध उत्तर हिंदुस्थानांत यांच्यासारखीं सुरेख व अप्रतिम देवालयें सांपडणें कठिण. हीं व ओरिसामधील भुवनेश्वर येथलीं देवालयें या पध्दतीचे उत्कृष्ट नमुने होत. भुवनेश्वरच्या देवळांचीं शिखरें खालीं सरळ असून, वर कळसाजवळ आंतील बाजूस निमुळतीं आहेत. ही शिखराची धाटणी जुनी आहे. कोनारकाचें देऊळ इतकें नकशीदार व सुशोभित आहे कीं, त्यासारखें घडणकाम सर्व जगांत दुसरें कोठें सांपडणार नाहीं. तें पडून इतक्या उत्कृष्ट कलेचा नाश होऊं नये म्हणून पुराण वस्तुसंरक्षकखात्यानें हल्लीं तें दगड वाळूनें भरून टाकिलें आहे.

या पद्धतीच्या पुढील काळांतील नमुन्यांत, शिखरें पूर्ववत् चौरस वक्रीय मनोर्‍यासारखी असून, त्यांसारखीं दुसरीं लहान लहान शिखरें बाजूंनां असतात. कित्येक देवळांत या लहान शिखरांची संख्या मोठी असलेली दिसून येते.

मुसुलमानी शिल्पकला, ज्याला भारतीय- सॅरॅसेनिक असेंहि म्हणतात - ती हिंदुस्थानांत १३ व्या शतकापासून सुरु होऊन, निरनिराळया काळीं निरनिराळया अमलाखालीं तिच्यांत बराच बदल होत गेला. पहिलीं तीन शतकें दिल्लीचे राजकर्ते पठाण होते. त्यानंतर इ.स. १५२६ त बाबरनें मोंगल घराणें स्थापिलें. पहिल्या पठाण बादशहांच्या कारकीर्दीतल्या इमारती फार मोठया पण अतिशय सुशोभित असत; त्यंतील बारीकसारीक भागसुद्धां सौंदर्यपूर्ण असत. या पद्धतीच्या नमुन्यांतील एक दिल्ली येथील कुतुबमिनार नांवाचा जगांतील एक सर्वोत्कृष्ट स्तंभ होय. १३ व्या शतकाच्या पहिल्या चरणांत हा बांधला गेला. हा अद्याप २४० फूट उंच असून पुढें आलेले सज्जे व त्यांमधील उत्तम नकशी केलेले पट्टे यांनीं अलंकृत आहे; याचे खालचे तीन मजले पुढें आलेल्या उभ्या कंगण्यांनीं विभागले गेल्यामुळें याच्या शोभेंत विशेष भर पडली आहे. याच्या शेजारची अल्तमषची मशीद सर्वत्र शिल्पांकित व फारच सौंदर्यपूर्ण अशी आहे. अल्लाउद्दिन खिलजीची कबर, अलाइ दरवाझा वगैरे या पद्धतीचीं दुसरीं उदाहरणें आहेत. सुमारें १३२० च्या नंतरच्या पठाणी शिल्पकलेंत एक प्रकारचा अगदीं साधेपणा, गंभीर औदासिन्य आणि नग्नता विशेष आढळून येत असल्या कारणानें मागील काळांतील आत्यांतिक विभूषण समृद्धीशीं याचा फारच विरोध भासतो. उतरत्या भिंती व मोठा भरींवपणा जींत विशेष दृष्टीस पडतो ती नव्या दिल्लींतील ग्यासुद्दिन तुघलकची मशीद, व १३८६ मध्यें पुरी झालेली दिल्लीची कलान मशीद हीं या काळची नमुनेदार उदाहरणें होत.

१५ व्या शतकाच्या प्रारंभीं नवीन लाट उसळून पुन्हां अलंकारिक पध्दतीकडे ओघ उलटला, मशीदीचे दर्शनी भाग जास्त सुशोभित, व संगमरवरी दगडांनीं बनविलेले व उत्तम नकशी केलेले दिसूं लागले. मागील काळांतील कलाविषयक परिश्रम प्रत्येक तपशिलांत स्थळ व कार्य यांनां साजेल असे खर्ची पडूं लागले. व अशा रीतीनें जगांतील एक सर्वसंपूर्ण शिल्पपद्धत नजरेस आणून दिली.

१५ व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक लहान घराणीं उदयास येऊन प्रत्येकानें स्वतःची अशी शिल्पपद्धत उपयोगांत आणिली. जौनपूरच्या शर्की घराण्याच्या फक्त तीन मोठया मशीदी व कांहीं कबरी त्या ठिकाणीं हल्लीं दिसतात. मशीदींच्या आंतील उघडया पटांगणाभोंवतालचे सोपे व आंतले सज्जे हिंदु पद्धतीप्रमाणें बांधिलेले आहेत; म्हणजे त्यांचे खांब ठेंगणें व चौरस असून, वरची बाजू आंकडेदार आहे. वर छत सपाट चिपांचें आहे. पण मशीदींचे दरवाजे व मुख्य भाग कमानदार आहेत. मशीदीला शोभा आणण्याकरितां केलेलें काम नाजुक नसलें तरी डोळयांत भरण्यासारखें आहे. मिहराब (महिरप) किंवा किबल अतिशय साधे असून मोंगल अमदानींत झालेल्या कलाविकासाचा एक दुवा म्हणतां येईल. सामर्थ्य व त्याबरोबर इतर पद्धतींत क्वचित आढळून येणारीअशी बरीचशी संस्कृतता या इमारतीत दृष्टीस पडते. काशी, कनोज आणि जौनपुर राज्यांतील कांहीं स्थळें या पद्धतीच्या नमुन्याविषयीं प्रसिध्द आहेत.

सन १४०१ सालीं दिलावरखान माळव्यांत स्वतंत्र झाला. त्याची राजधानी मांडु येथें असून, दिलावरचा मुलगा होशंग यानें त्याठिकाणीं चांगल्या मोठया इमारती बांधल्या. या इमारती १४ व्या शतकाच्या पठाणी पद्धतीवर, त्यांत कांहीं फेरबदल करुन वठविल्या होत्या. जामी मशीद, हिंदोला महाल, जहाजमहाल, रुपमती आणि बहादुर यांचे वाडे इत्यादि इमारतींमध्यें जामीमशीद सर्वोत्कृष्ट असून पहिल्या महमुदशहानें १४५४ त तीं बांधिली. पूर्वपश्चिम २९० फूट व दक्षिणोत्तर २७५ फूट इतकी चौरस जागा हिनें व्यापिली आहे. मध्यें चौरस पटांगण असून त्याभोंवती कमानी आहेत. या कमानींचे खांब तांबडया वाळूच्या दगडाचे केलेले असून चौकोनी व दहा फूट उंचीचे आहेत. यांच्या पाठीमागें दक्षिणेस व उत्तरेस तीन कमानी वाटा, पूर्वेस दोन वाटा आणि पश्चिमेस मशीद आहे. मशीदीच्या पश्चिम बाजूला तीन मोठाले घुमट आहेत. अतिशय साधें वैभव आणि सामर्थ्याविर्भाव यांच्या बाबतींत हें पटांगण संबंध हिंदुस्थानांत या पद्धतीच्या सर्वश्रेष्ठ नमुन्यापैकीं एक म्हणतां येईल. इतर ठिकाणांप्रमाणें मांडु येथेंहि या कबरी, राजवाडे बांधण्याच्या बाबतींत तेथें उपलब्ध असणार्‍या साधनांचा शिल्पकलेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो; तांबडे रेतीचे दगड, पांढरे व रंगीत संगमरवरी दगड हे खांब व भिंती यांकरितां योजलेले आहेत. येथील शिल्पपद्धत निवळ कमानदार असून, जौनपूर आणि अहमदाबाद या ठिकाणांच्याप्रमाणें देश्य (हिंदू) लोकांची धाटणी हींत मुळींच आलेली नाहीं. मांडु येथील कारागिरांनीं अणकोंचीदार कमानी करण्याचें मुळींच टाकिलें नाहीं.

९ व्या शतकापासून गौर हें बंगालमधील राजधानीचें शहर बनलें होतें. हा प्रदेश खडकाळ नसल्यानें येथील हिंदु इमारती मुख्यतः विटांच्या असत; तरी खांब, मूर्ति इत्यादि कठिण खापरी दगडांच्या किंवा एका जातीच्या खनिज पदार्थाच्या करीत. मुसुलमानांनीं पुढें हींच साधनें वापरलीं.विटांच्या मोठया इमारतींनां दगडांच्या इमारतींपेक्षां कमानीकरतां जड खांब व जाड भिंती लागत. तेव्हां अशा भिंती व खांब बाहेरुन गुळगुळीत घडीव कौलें बसविलीं असतांहि जड दिसत; कधीं कधीं कौलांच्या जागीं जाळीदार दगड वापरीत. तेव्हां दगड बसविलेले ठेंगणे व जड खांब देऊन त्यांवर कोंचदारविटांच्या कमानी किंवा घुमट बसविण्याचीहि पद्धत निवळ स्थानिक आहे. विटांच्या उपयोगामुळें कारागिरांनां आपली स्वतःची, कमानी व छतें करण्याची पद्धत प्रचारांत आणावी लागली. इमारतींच्या कोंपर्‍यांवरील वळचणींनां वक्र स्वरूप देण्याची त्यांची पद्धत पुढें पंजाबपर्यंत सर्व हिंदुस्थानांत पसरली.

एकदां राजधानी गौरच्या उत्तरेस पंडवा येथें नेण्यांत आली आणि त्या ठिकाणीं (१३५८-१३६८) प्रसिद्ध आदिन मशीद बांधण्यांत आली. ही ५०० फूट लांब व २८५ फूट रुंद असून हिच्या मध्यें एक मोठें पटांगण आहे व त्याभोंवतीं एक जाड विटांची भिंत बांधलेली आहे. छताला २६६ दगडीखांब आहेत व त्यांवर एकजात ३७८ घुमट केलेले आहेत. अशा घाटणींत शिल्प फार थोडें असून आकार व वैभव हींच या ठिकाणीं अभ्यासावयाचीं असतात. बंगालच्या मुसुलमानी राज्यकर्त्यांच्या बहुतेक कृतींत हेंच लक्षण दिसून येतें.

१३४७ मध्यें स्थापन झालेल्या बहामनी घराण्याची राजधानी १४२८ पर्यंत गुलबर्ग्याला होती. तेथून ती बेदरला नेण्यांत आली. या काळांत गुलबर्गा येथें बर्‍याच महत्त्वाच्या इमारती बांधण्यांत आल्या; त्यांपैकीं विशेष संस्मरणीय म्हणजे सध्यां असलेली तेथील मोठी मशीद होय. पूर्व-पश्चिम २१६ फूट व दक्षिणोत्तर १७६ फूट इतकी जागा हिनें व्यापिली आहे. हिंदुस्थानांतील सर्व मोठया मशीदींहून ही निराळी दिसते; कारण हींत मध्यक्षेत्र (पटांगण) इतर मशीदींतल्याप्रमाणें उघडें नसून झांकलेलें आहे त्यावर ६३ लहान घुमट आहेत. पश्चिम खेरीजकरुन सर्व बाजूंच्या भिंतींत मोठया कमानी असून त्यांतून उजेड आंतल्या भागास मिळतो. ही पद्धत साधी व समृद्ध असून कमी अलंकारिक आहे. राजांच्या कबरी म्हणजे मोठया चौकोनी घुमटाच्या इमारती असून त्यांच्या बाहेरच्या भिंतींवर दगडांत फार सुंदर वेलबुट्टी काढलेली असते व आंतल्या भागाला फार मेहनतीनें जिल्हई दिलेली दिसते. बेदर येथेंहि मशीदी, राजवाडे व कबरी बांधल्या होत्या; पण त्या बहुतेक नाश पावल्या असून किल्ल्यातील मोठी मशीद काय ती चांगल्या स्थितींत आहे. शहरापासून ५ मैलांवर असणार्‍या, मागाहूनच्या बहामनी राजांच्या दहा कबरी गुलबर्ग्यांतल्याप्रमाणेंच असून बर्‍याच वैभवशाली दिसतात. त्या फारशा अलंकृत नाहींत पण त्यांचें बांधकाम उत्तम व उठावदार आहे.

मुसुलमानी शिल्पकलेच्या निरनिराळया स्वरूपांमध्यें अहमदाबाद येथील स्वरूप सर्वोत्कृष्ट म्हणतां यईल. दुसरें कोणतेंहि इतकें अस्सल भारतीय नाहीं. मुसुलमानीं अमदानींत कामावर नेमलेल्या हिंदु कारागिरांनीं आपल्या कसबांत मंडनाचा जास्त भाग ओतून, पूर्वीच्या राजांनां माहीत असलेल्या किंवा त्यांच्या नवीन कल्पनेंत येणार्‍या धाटणीपेक्षां सौर्दयाच्या बाबतींत श्रेष्ठ अशा धाटणी प्रचारांत आणिल्या; व अशा रीतीनें पूर्वीच्या देश्य कलेंतील सर्व सौंदर्य व संस्कृतता यांचा उच्च कल्पनेशीं मिलाफ होऊन एक नवीन शिल्प पद्धत निर्माण झाली. पूर्वीच्या देशी कामांत या कल्पनेचा अभाव होता. मशिदी नेहमीं मुद्दाम अशा रीतीनें उभारल्या असतात कीं, त्यांची रचना एकदम लक्षांत यावी व बाह्य स्वरूपांत एकच एक कंटाळवाणी तर्‍हा असूं नये. दर्शनी बाजूच्या मध्यभागावर एक मजला चढवून त्याच्यापुढें मनोरे जोडीत. हा वरचा मजला मध्य घुमटाखालीं सज्जासारखा दिसे. प्रथम प्रथम दर्शनी बाजू कमानदार वाटांनीं विभागल्या जात, पण पुढें खांबांचा आडोसा करण्याची पद्धत पडून पुढीलबाजू मोकळी झाली; मनोरे कोंपर्‍यावर जाऊन शिल्पविभूषणाच्या कामींच फक्त त्यांचा उपयोग होऊं लागला.

कबरींकरितां निरनिराळया मापांचे खांबी डेरे करुन थडग्यावरील मध्यभागावर बारा खांबांचा घुमट बांधीत. हे खांब नकशीदार दगडी जाळयांनीं जोडण्यांत येत. याभोंवतीं कधीं कधीं पडवी असे. या पडवीचे खांब वेडेवांकडे बसविलेले दृष्टीस पडत; कारण मधील बारा खांबांवर अष्टकोनी मथळा व त्यावर घुमट येण्याकरितां भोंवतालच्या भागांची कशी तरी रचना करावी लागे.

विजापूरचें आदिलशाही घराणें (१४९२-१६८६) हें अगदीं परकीय बीजाचें असून, त्याचा धर्म इराणांतील मुसुलमानी (शिया पंथी) असे. त्याच्या पदरचे अधिकारी इराणी असल्यानें, त्याच्या शिल्पकलेवर याचा बहुधां परिणाम होऊन ती दिल्ली, आग्रा येथील इमारतींवरील कलेपेक्षां उघडपणें अगदी निराळी दिसूं लागली. या कलेंत प्रमाणाची स्थूलता व वैभवशीलता हे नवे गुण असून, कल्पकता व कार्यकुशलता हेहि गुण कमी नाहींत. हिंदु नमुन्यांचा तींत मागमूसहि नाहीं. त्यांची (विजापूरकरांची) पद्धत त्यांनीं स्वतः कल्पिली असून ती मोठया धिटाईनें यशस्वी करुन दाखविली. महंमद आदिलशहाच्या कबरींतील अवाढव्य घुमटांत (गोल घुमटांत) बाह्य प्रतिक्षेपणांनां विरोध करण्याकरितां म्हणून जे आंत लंबक (पेंडेव्हिज) योजले आहेत ते पाहून पाश्चात्य कारागिरांनीं सुद्धां तोंडांत बोटें घातलीं. हा घुमट जमीनीपासून १७५ फूट उंचीवर असून १३० फूटांच्या वर्गाइतक्या क्षेत्रावर त्याचें आच्छादन आहे; म्हणजे रोमच्या पॅन्थियनपेक्षां २५००० चौरस फूट हें क्षेत्र मोठें आहे. अली आदिलशहानें १५६७ सालीं बांधावयास आरंभिलेली जामी (जुम)  मशीद हिंदुस्थानांतील सर्वोत्कृष्ट मशीदींपैकीं एक आहे. मुख्य मशीदीचें मध्यक्षेत्र, मोठया घुमटानें आच्छादिलेलें असून महंमदशहाच्या कबरीच्या घुमटाला जसा आधार दिला आहे तसाच हिलाहि आहे. इतर प्राचीन घुमटांप्रमाणें हाहि बाहेरुन उंच केलेला नाहीं. 'इब्राहिम रोझा' कबरींत घुमट जास्त उंच केलेला असून सर्व बांधकामांत फारच सुंदर नकशी केलेली आढळते. खिडक्या जाळीदार असून छतपट्टयांनां अति मौल्यवान अशा आंकडयांचे आधार दिले आहेत. कबरीची खोली ४० चौरस फूट असून तिला अगदीं एका पातळींत असलेलें दगडी छत आहे. ही मशीद १३२६ च्या सुमारास बांधली असावी.

मोंगल घराण्याची भारतीय सॅरॅसेनिक पद्धत १५२६ त बाबरच्या कारकीर्दीत सुरु झाली; पण हल्लीं शिल्लक असणारें या पद्धतीचें पहिलें व विशिष्ट उदाहरण म्हणजे दिल्लीजवळील शीरशहाची मशीद होय; दुसरीं कांहीं रोहटासला आहेत. हीं पूर्वीचीं बांधकामें या शिल्पपद्धतीचीं प्राथमिक स्वरुपें म्हणून मोठीं मनोरंजक वाटतील. अकबरानें अनेक मशीदी व इमारती बांधल्या; त्याच्या कारकीर्दीत या पद्धतीची इतकी जोमानें वाढ झाली कीं, त्याच्या अनेक इमारतींचीं वैशिष्टयें सांगणें फार कठिण होईल. इतर पद्धतींतल्याप्रमाणें याहि पद्धतींत हिंदुमुसुलमान लक्षणांचें मिश्रण आहे पण तें पूर्णपणें एकजीव झालेलें दिसत नाहीं. त्याच्या पूर्वी होऊन गेलेल्या पठाणांप्रमाणें मोंगल हीहि एक मशीदी बांधणारी जात असून या जातीच्या लोकांनीं पठाणांपेक्षां जास्त सुंदर व अलंकृत मशीदी बांधल्या आहेत. हुमायूनची शोभिवंत मशीद आणि फत्तेपूर शिक्री येथील अनेक इमारती या अकबराच्या पद्धतीची चांगली साक्ष देतील; तेथील प्रसिद्ध मशीद सौष्ठव व शिल्पप्रभाव या बाबतींत कोणासहि हार जाणार नाहीं. तिचा दक्षिण दरवाजा विख्यात असून आकार व बांधणींत हिंदुस्थानांत त्याच्या तोडीचा दुसरा दरवाजा सांपडणार नाहीं. आग्र्याजवळ सिकंद्रा येथें असलेली त्याची स्वतःची कबर अद्वितीय व सर्वोत्कृष्ट अशी आहे.

जहांगीर बादशहाच्या अमदानींत या पद्धतींतील हिंदु लक्षणें पार गेली; लाहोर येथील त्याची मशीद इराणी पद्धतीवर बांधलेली असून तीला कांचमिन्यांची (एनॅमल्ड) कौलें घातलीं आहेत. जहांगिरला ज्यांत पुरलें ती याजवळच असणारी त्याची कबर शीखांनीं उध्वस्त करून तिचें सामान अमृतसरच्या देवळाकरितां वापरलें. १६२८ त आग्रा येथें बांधून पुरी झालेली इतिमद-उद्दौलाची कबर सबंध पांढर्‍या संगमरवरी दगडाची असून तींत चित्रविचित्र जडावाचें काम केलेलें आहे. अशा जड़ावाच्या कामांपैकीं हें एक प्राचीन उदाहरण असून, मोंगल बादशहांच्या पदरच्या इटालियन कारागिरांच्या हातचें तें असावें असा कांहींचा तर्क आहे.

शहाजहानच्या कारकीर्दीत या शिल्पपद्धतींतील आवेश व नावीन्य जाऊन त्या जागीं नाजुक लावण्या व तपशिलांतील संस्कृतता आली; याचा नमुना त्याच्या कारकीर्दीत बांधलेल्या आग्रा व दिल्ली येथील राजवाडयांत दृष्टीस पडतो. दिल्लीतील राजवाडे संबंध हिंदुस्थानांत सौंर्दयाच्या बाबतींत श्रेष्ठ आहेत यांत संशय नाहीं. जगप्रसिध्द ताजमहालाविषयीं सर्वांनां माहिती आहेच. इतर सर्व मुसुलमानी कबरींप्रमाणें याच्या भोंवतींहि एक बगीचा आहे. याचें अत्यंत सौकुमार्य, साधनसंपदा आणि उत्कृष्ट योजनेचें संमिश्रण सर्व देशांच्या लेखकांनीं प्रशंसिलें आहे; याच्याच तोडीची आग्रा किल्ल्यांतील मोती मशीद ही सर्व पांढर्‍या संमरवरी दगडाची बांधलेली आहे. या शिल्पपद्धतींतील हीं रत्नें होत. दिल्लीची जामा मशीद मोठी भव्य असून तिचें स्थल व शिल्प फारच विचारपूर्वक योजलेलें असल्यानें, विभागांचा प्रमाणशीरपणा व विशाल सौंदर्य चांगलें नजरेंत भरतें व मनाला आल्हाद वाटतो. हिंदुस्थानांतल्या राजांत शहाजहाननें अशा इमारती बांधून अति महान शिल्पकार असें नांव मिळविलें आहे.

अवरंगझेबाच्या कारकीर्दींत चौरस दगड व संगमरवरी दगड जाऊन त्या जागीं विटा, खांडकी आणि गिलाव्याचें नकशीकाम येऊन, शिल्पाची आवड जात चालली.

अलीकडच्या काळांतील भारतीय वास्तुशिल्प म्हणजे मुसुलमानी किंवा पाश्चात्य शिल्पाचं अनुकरण होय. कधीं कधीं अनेक शिल्पपध्दतींचें मिश्रण करुन एक नवीनच पंचमेळ शिल्प तयार केलेलें  दृष्टीस पडतें.

सारांश हल्लींचें एकंदर वास्तुशास्त्र हें पूर्वीच्या कालापेक्षां विश्वबंधुत्वाच्या दृष्टीनें जास्त सर्वसंग्राहक बनलें आहे. त्यांत, आतां अमुक एक देशाची अमुकच एक ठराविक पध्दत यापुढें राहणें अशक्य आहे. सोईस्कर वाहतुकीच्या अनेक साधनांनीं निरनिराळया देशांतील लोकांचा परस्परांशीं संबंध येत चालल्यानें वास्तुशास्त्रांत सर्वसाधारण सर्वदेशीय अशी एक नवीनच पध्दत रुढ होत चालली आहे. हवामानाप्रमाणें व बांधकामास लागणार्‍या साधनांप्रमाणें या पद्धतींत थोडा फार फरक काय पडेल तेवढाच. यापुढें पोषाख व चालीरीतींच्या प्रमाणें ही कलाहि हळू हळू विश्वबंधुत्वाच्या सार्वदेशीय पद्धतीवर जाईल; आणि या पद्धतींत पुनरुद्धारकालीन व क्लासिकल या घाटणी मात्र पाया या दृष्टीनें कायम राहतील. तसेंच शिल्पज्ञ व यंत्रज्ञ (इंजिनियर) यांच्यांत जास्त संघट्टण होईल. शिल्पज्ञाला यांत्रिक कलेचें विशिष्ट ज्ञान अवश्य लागेल; याखेरीज इमारत सुशोभित बनविण्यासाठीं तदनुषंगिक खोदकाम, नकसकाम, मूर्तिशास्त्र, रंगकला आणि चित्रकला या इतर कलांचीहि माहिती त्याला पूर्णपणें असावी लागेल.

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .