विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वाळवें, तालुका:- मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक तालुका. शिराळा पेटा धरून याचें क्षेत्रफळ ५४५ चौरस मैल आहे. तालुक्यांत दोन मोठीं गांवें आहेत (उरण-इस्लामपूर व अष्टें). लोकसंख्या सुमारें दीड लाख. वाळवें तालुक्यांतून कृष्णा व मोरणा या दोन नद्या वहातात.
गांव:- हें कृष्णा नदीच्या उजव्या किनार्यावर वसलेलें असून इस्लामपुरापासून ७ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारें ५०००. येथें थोरात देशमुखांचा एक मोठा वाडा आहे. थोरात देशमूख शाहू छत्रपतीपासून उदयाला आले. प्रथमतः १६५९ त शिवाजीनें शिराळयावर हल्ला करुन वाळवें घेतलें. पहिले प्रतिनिधि रामचंद्रपंत अमात्य त्यांनीं १६९० त पुन्हां वाळवें बसविलें. पुढें कोल्हापूरकर संभाजीनें वाळवें कोल्हापूरला जोडिलें व उदाजी चव्हाणानें यावर वारंवार छापे घालून पुंडावा आरंभिला. पंत प्रतिनिधींनीं दोघांवर स्वारी केली. यांत यशवंतराव थोरात ठार मारला गेला. थोरात घराण्यांत हा फार शूर होता. पुढें १८१८ सालीं इंग्रजांनी खालसा करीपर्यंत वाळवें थोरात देशमुखांकडेच मुखत्यारीनें होतें.