विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विक्रम संवत् व विक्रमादित्य:- याची बहुतेक माहिती पांचव्या विभागांत ११०-११२ पृष्टांवर दिलेली आहे. विक्रम नांवाचा राजा खरोखरच होऊन गेला कीं नाहीं, याबद्दल अद्यापि विद्वानांत ऐकमत्य नाहीं. कांहींच्या मतें दुसरा चंद्रगुप्त हाच विक्रम होय तर कांहींचं म्हणणें ज्या मालव लोकांनीं उज्जनी देश जिंकून पुढें त्या देशाला मालव देश (माळवा) असें नांव दिलें त्यांचा पुढारी विक्रम नांवाचा पुरुष होय. जुन्या दंतकथा या दुसर्‍या विक्रमाला आधारदायक आहेत. हालाच्या गाथासप्तशतींत आलेला विक्रम यानेंच विक्रम संवत सुरु केला असें रा. देवदत्त भांडारकर यांस वाटत नाहीं. डॉक्टर रामकृष्णपंत भांडारकरांच्या मतें दुसरा चंद्रगुप्त याला व प्रो. पाठकांच्या मतें त्याचा नातु स्कंदगुप्त यालाच विक्रमादित्य पदवी होती. पदवी या अर्थीच हा शब्द पुष्कळ राजांनीं स्वतःस लावलेला आहे. वि.सं. १०५० या सालीं लिहिल्या गेलेल्या सुभाषितरत्नसंग्रहावरून एका विक्रमादित्याच्या निधनकालाचें स्मारक म्हणून हा संवत सुरु झाला असें दिसतें. पूर्वीचें मालववर्ष व कृतवर्ष म्हणजेच पुढील विक्रम संवत होय असें कांहीचें म्हणणें आहे. विक्रम संवताचा प्रारंभ धाता संवत्सरापासून धरतात, त्याला अनुसरून कोणत्याहि वि.सं. चा संवत्सर काढावयाचा असेल तर चालू वर्षसंख्येस ६० नीं भागून बाकी राहिलेल्या वर्षांपर्यंत धाता संवत्सरापासून वर्षें मोजावी.

विक्रमादित्यास कलियुगांतील सहा शककर्त्यांपैकी दुसरा मानतात. युधिष्ठिर (अथवा कलिवर्षाच्या) ३०४५ व्या वर्षाच्या रक्ताक्षी संवत्सर कार्तिक शुध्द प्रतिपदेपासून याचा शक चालू झाला. याच्याबद्दलची दंतकथा अशी आहे कीं, वीरसेन नामक गंधर्वापासून, सुशीला राजकन्येस झालेल्या चार मुलांपैकीं हा दुसरा होता. भर्तृहरि हा याचा वडील भाऊ असून, मैनावती आणि सुभटवीर्य हे याच्याहून धाकटे भाऊ होते. हा मोठा पराक्रमी असे. यानें भरतखंडांतील सर्व राजे पादाक्रांत केल्यावर शक जातीच्या कोण्या यवन राजावर स्वारी केली व त्यास उज्जनीस धरून आणून त्याची शहरभर धिंड काढल्यावर सोडून दिलें. आणि यवनांनां हिंदुस्थानांतून हांकलून दिलें. ज्योतिर्विदाभरण ग्रंथांत ही यवनाची गोष्ट आहे. विक्रमानें केलेल्या नेक परोपकारी कृत्यांचें वर्णन सिंहासनबत्तिशी, वेताळपंचविशी, नाथलीलामृत इत्यादि, ग्रंथात आलेलें आहे हा भर्तृहरीच्या खालोखाल विद्वान असून याच्या सभेंत नऊ पंडित होते. त्यांस नवरत्नें म्हणत. ह्यांचीं नांवें व त्या पंडितांकडे असलेलीं कामें पुढील प्रमाणे:- धन्वंतरीकडे राजवैद्यकाचें व क्षपणकाकडे राजफलज्योतिषाचें काम होतें. शब्दकोश इत्यादि ग्रंथ अमरसिंहानें तयार करावेत; तळीं, देवालयें,इमारती इत्यादि स्थापत्यशास्त्राचा अधिकार शंकूकडे होता. वेतालभट्ट मांत्रिक क्रियेंत निपुण असल्यामुळें तो राजाचें देहरक्षणकार्य करी. घटकर्पर हा भूमिगत गुप्तद्रव्यें साधण्याचे उपाय योजी. कालिदासानें नाटकें व काव्यें लिहावीत. वराहमिहीर हा ज्योतिषशास्त्रज्ञ होता व वररुचि व्याकरणवेत्ता होता. यांपैकी क्षपणक आणि अमरसिंह, हे दोघे जैनधर्मी होते. या नवरत्नांची गोष्ट माळव्याच्या भोजराजाबद्दलहि सांगतात. हे नऊजण वास्तविक समकालीन नसून भिन्नभिन्न कालीन होते. विक्रमानें राज्यावर बसल्यावर आपला संवत सुरु केला. त्यानें ३ वर्षें राज्य केल्यावर त्याचा वडील भाऊ भर्तृहरि यानें बारा वर्षें केलें. तो राज्य सोडून गेल्यावर, विक्रम पुन्हां राज्य करुं लागला. यापुढें ६ वर्षें राज्य करुन हा मरण पावला. याच्या मागें याचा पुत्र जैत्रपाळ राज्य करूं लागला. त्याच्या कारकीर्दीच्या ५८ व्या वर्षीं बहुधान्य संवत्सरीं शालिवाहनाचें व याचें मोठें युध्द होऊन त्यांत जैत्रपाळ मागें हटून नर्मदेच्या उत्तरतीरावर गेला. शालिवाहनाचें सैन्य नर्मदा उतरतांना बरेंच बुडून मेल्यामुळें त्यानें जैत्रपाळाशीं तह केला. तेव्हांपासून दक्षिणेकडे शालिवाहन शक चालू होऊन, उत्तरेकडे विक्रमसंवत् चालूं राहिला. विक्रमादित्याचा पुतळा उज्जनीस होता तो दिल्लीच्या अल्तमष् बादशहानें फोडून नाहींसा केला असें म्हणतात.