विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विंचू:- हा लहानसा प्राणी आपल्या दंशानें मनुष्यास हैराण करुन सोडतो. विंचू उष्णप्रदेशांत दगडाखालीं, भिंतीच्या भेगांतून राहतात व कीटक मारून खातात. पुढील आंकडयांच्या पंजांत कीटक धरून पाठीवरुन नांगी वळवून आणून त्यांस दंश करतात. पोटाच्या शेवटल्या वलयाला नांगी असून तिच्या शेंवटीं एक वांकडा कांटा व एक छिद्र असतें. छिद्रापासून एक नळी निघून विषपिंडापर्यंत जाते. तोंडाला चिमटयासारखे दोन भाग असतात. पोटाखालीं भोंकें असून त्यांतून चार पिशव्यांत हवा जाते व तेथून नळयांनीं रक्तांत शिरते. ह्याच्या पाठीवरील कवच कठिण असतें. पांढरा, काळसरपिंवळा, इंगळया इत्यादि विंचवाच्या अनेक जाती आहेत. विंचू हे घाणींत व शेणांत अंडीं घालतात, व तीं मादीच्या पोटांत असतात, तेव्हां तिचें पोट मोठें दिसतें. विंचवांनां पाल गिळून टाकते.