विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विजयानगरचें घराणें:- हे राजे आपणांस सोमवंशीय म्हणवीत असत. उत्तरेकडे मुसुलमानांनीं आपल्या राज्याचा विस्तार चालविला असतां व दक्षिणेंतहि बहामनी राज्य स्थापन होत असतां या हिंदु राजवंशानें आपलें राज्य स्थापन केलें. या राजांनीं बहामनी राज्य व पुढें त्याच्या झालेल्या शाखा यांच्याशीं एकसारखी टक्कर देऊन सव्वा दोनशें वर्षें आपलें राज्य टिकवून दक्षिणेंत हिंदु संस्कृति कायम ठेवली, ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. या साम्राज्याचा विस्तार बेळगांवपासून कन्याकुमारीपर्यंत झाला होता या घराण्याचा इतिहास अनेक दृष्टींनीं मनोरंजक आहे. मुसुलमानांनीं नर्मदा ओलांडून १२९३, १३०६ व १३९८ या सालच्या स्वार्यांत देवगिरीच्या यादवांचा नायनाट केला व १३१० त द्वारसमुद्राचे होयसळ बलजळ आणि १३२६ त वरंगळचे गणपती या राजघराण्यांचा पाडाव केला व दक्षिणेंत मुसुलमान शाही सुरु केली. या १४ व्या शतकाच्या पहिल्या पंचविशींत दक्षिणेंत मुसुलमानांनीं हिंदूंचा फार छळ केला. त्यांचीं पुरातन राज्यें बुडविलीं, त्यंची मोठमोठीं मंदिरें पाडलीं, त्यांनां जुलमानें बाटविलें, दक्षिणेंतील अपार संपत्तीस उत्तरेचा मार्ग दाखविला. अशा संकटावस्थेंत विजयानगरकरांनीं या यावनी लोंढयास जोराचा अडथळा केला व पुन्हां हिंदू साम्राज्य स्थापन केलें. प्राचीन यूरोपियन प्रवाशांनीं या राज्यात नरसिंहरायाचें राज्य व देशास नरसिंह देश म्हटलें आहे. राजधानीचें शहर विजयानगर हें तुंगभद्रेच्या कांठावर वसलेलें होतें व तें दाट वस्तीचें असून तेथें परदेशांतील सर्व मालांची देवघेव होत असे. हें शहर विद्यारण्य (माधवाचार्य) स्वामीनीं हरिहर व बुक्क यांच्या हातून स्थापविलें (१३३५).
वरंगळच्या राजाच्या पदरीं (संगम याचे पुत्र) हरिहर व बुक्क (उर्फ बुक्कण) हे दोघे भाऊ सरदार होते. वरंगळ पडल्यानंतर ते अनागोंदीच्या राजाच्या आश्रयास राहिले; एकजण खजीनदार व दुसरा दिवाण झाला. यावेळीं हरिहरास महामंडलेश्वर ही पदवी होती. परंतु, पुढें (१३२४) महंमद तुघलखानें अनागोंदीहि काबीज केली. तेव्हां या दोघां बंधूंनीं अनागोंदीच्या समोरच्या तुंगभद्रेच्या तीरीं विजयानगर स्थापन केलें व स्वतंत्रता धारण केली. त्यावेळीं अनागोंदीचे व्यापारी, सरदार, शिपाई वगैरे लोक विजयानगरास यांच्या आश्रयास येऊन राहिले. त्यांच्या बळावर या दोघां भावांनीं उत्तरेस व दक्षिणेस पुष्कळ मुलूख जिंकून अनागोंदी, वरंगळ वगैरे ठिकाणच्या मुसुलमान सुभेदारांस हांकलून लाविलें. हरिहराचा सेनापति व दिवाण बुक्क होता. याखेरीज त्याला २ भाऊ असून त्यांतील कंपन यानें नेल्लोर व कडाप्पा येथें लहान राज्य स्थापलें होतें. हरिहर १३४४ त वारला; त्यानें हंपी येथें कांहीं देवळें बांधलीं, त्याच्या मागून बुक्कानें ३६ वर्षें राज्य करुन (१३७९) सर्व दक्षिण पादाक्रांत केली व अवशिष्ट हिंदु राजांचें एकीकरण करुन आपलें साम्राज्य स्थापिलें. तेव्हां त्याच्यावर महंमद तुघलखानें हसन गंगू बहामनी या सरदारास पाठविलें. हसनचा व बुक्काचा झगडा बरेच दिवस चालू होता. इतक्यांत महंमदशहा आजारी पडल्यानें हसननें बुक्काच्या आश्रयानें गलबुर्गा-बेदर येथें एक लहानसें राज्य स्थापिलें. पुढें या दोन राज्यांत अनेक युध्दें होऊन त्यांनींच यांचा इतिहास भरला गेला. यानें चीन देशांत आपला वकील पाठविला होता. फेरिस्ता म्हणतो कीं, बहामनी राजांच्या कडवेपणाशिवाय विजयानगरकरांची शक्ति, संपत्ति व राज्यविस्तार श्रेष्ठ दर्जाचा होता. बुक्कानंतर त्याचा पुत्र दुसरा हरिहर यानें २० वर्षें राज्य केलें (१३९९). तो स्वतःस महाराजाधिराज म्हणवी. त्यानें अनेक मंदिरें बांधून त्यांनां नेमणुका करुन दिल्या. यानें कावेरीस पूल बांधला होता. माधवाचार्याचा भाऊ सायणाचार्य हा त्याचा दिवाण होता. मलजंबिका ही त्याची पट्टराणी होती. ही देवगिरीकर रामदेवरायाच्या वंशांतील होती. हरिहर जरी शांकरमताचा होता तरी इतर पंथाचा तो द्वेष करीत नसे. त्यानें विजयानगरच्या जैन मंदिरास देणग्या दिल्या. त्याचा एक सेनापति जैन होता. याचे शिलालेख थेट रामेश्वरापर्यंत आढळतात. यानें मध्यंतरी होसपट्टण ही राजधानी केली होती. याच्यामागें याचा वडील पुत्र दुसरा बुक्क वीरप्रताप (१३९९-१४०६) व त्याच्यानंतर धाकटा पुत्र पहिला देवराय (१४०६-१२) हे गादीवर आले. हा देवराय थोडासा विषयी असल्यानें राज्याचा बंदोबस्त ढिला पडला व बहामनी राजानें त्याच्यावर स्वारी केली पण त्यांचा तह झाला. याच्यामागून त्याचा मुलगा वीरविजय (१४१२-१९) व त्याच्यानंतर त्याचा मुलगा दुसरा देवराय (१४१९-४४) यांनीं राज्य केलें. या देवरायाच्या वेळीं विजयानगर अत्यंत श्रीमान शहर होतें. त्याचा दिवाण नागण्णा यास 'धननायक' असें म्हणत असत. याच्या भावानें खून करण्याचा प्रयत्न केला होता. देवरायानंतर मल्लिकार्जुन विरुपाक्ष (१४७०), राजशेखर (१४७९) व दुसरा विरूपाक्ष (१४८३) या पुरुषांनीं १४४४ पासून १५८७ पर्यंत राज्य केलें. याप्रमाणे या घराण्याकडे १५० वर्षे गादी होती.
दुसरा विरुपाक्ष दुर्बल असल्यानें व बहामनी राज्यांत महंमद गवान हा शूर माणूस प्रधान झाल्यानें, मुसुलमानांनीं विजयानगरकरांचे चौल, दाभोळ, गोंवा वगैरे प्रांत काबीज केले. विजयानगरकरांच्या दरबारांत बंडाळी होऊन विरूपाक्ष व त्याचे पुत्र मारले गेले. तेव्हां दरबार्यांनीं आपल्यांतील पुढारी व सेनापति इम्मडी वीर नरसिंहराय यास गादीवर बसविलें. हा फार शूर असल्यानें यानें बहामनी राजांनां गप्प बसविलें व साम्राज्याच्या विस्तार पूर्वीइतका केला. याचें घराणें शाल्व उर्फ साळुव (तेलगु शब्द; अर्थ ससाणा) नांवाचें होतें. याच्या नांवावरून या घराण्यास नरसिंह घराणें असें नांव पडलें. या वीर नरसिंह (१४९०-१५०९) नंतर कृष्णदेव (१५०९-३०), अच्युत (१५३०-४२) व सदाशिव (१५४२-६७) हे पुरुष गादीवर बसले. बहामनी राज्याचे तुकडे १४९० च्या सुमारास होऊन त्यांच्यात परस्पर झगडे सुरु झाल्याची संधि साधून नरसिंहानें आपलें राज्य वाढविलें. तो फार शूर असल्यानें विजापूर, गोवळकोंडें, बेदर वगैरे ठिकाणच्या शहांनीं परस्परांविरुध्द त्याची मदत वेळोवेळीं घेतली होती व हीच परंपरा पुढें पुष्कळ वर्षें चालू होती. नरसिंहरायानें रायचूर व मुद्रल हे बळकट किल्ले आदिलशहापासून १४९३ त काबीज केले होते. कृष्णदेवराय हा विजयानगरच्या राजांत अत्यंत प्रसिध्द होऊन गेला. एका पोर्तुगीज माणसानें त्याच्या दरबारीं राहून त्यावेळचा वृत्तांत लिहून ठेवला आहे. कृष्णदेव हा हरएक शारीरिक कलेंत तज्ज्ञ, शूर, उदार, विद्वान, वास्तुकलेचा शोकी असा होता. दक्षिणेंतील सर्व राजे त्याचे मांडलिक होते. प्रसिध्द विद्वान अप्पया दीक्षित त्याच्या पदरीं होता. यानें मुक्तामाला (राजनीतिशास्त्र), रसमंजरी, सकलकथासार वगैरे ग्रंथ केले असें म्हणतात. त्यानें देवळें, पुतळे, कालवे, मनोरे बांधून गांवें वगैरे वसविलीं. याच्या वेळींच पोर्तुगीजांनीं आदिलशहापासून गोवें घेतलें. कृष्णदेवानें १५२० त रायचूर येथें मुसुलमान राजांचा मोठा पराभव केला. त्यामुळें दक्षिणेंतील लहान मोठे मुसुलमान राजे आपसांत एकी करण्याच्या उद्योगास लागले. कृष्णदेवानें आंध्र, ओरिसा, हे देश जिंकले व अनेक किल्ले काबीज केले व नवीन वसाहती करविल्या. या सुमारासच दिल्लीस मोंगल घराण्याची स्थापना झाली. विजयानगरचा नृसिंहाचा १६ फुटी कसंधी दगडी पुतळा यानेंच कोरविला होता. कृष्णदेवानंतरचा अच्युतराय हा दुर्बळ व दुर्वर्तनीं होता. त्यामुळें बहुतेक सत्ता त्याचा प्रधान तिमराज (रंगराय) याच्या हातीं होती व दरबारांत बंडाळी माजली होती. तिमराजाला रामराय, तिरुमल व व्यंकटाद्री असे ३ पुत्र होते. रामरायास व तिरुमलास कृष्णारायाच्या मुली दिल्या होत्या रामराय धूर्त होता; त्यानें स्वतः गादीवर बसण्याची खटपट चालवून तींत आदिलशहाची मदत मागितली. इतक्यांत अच्युतराय वारला, तेव्हां त्याचा पुतण्या सदाशिवराय यास नांवापुरता राजा करून रामरायानें सर्व सत्ता आपल्या हातीं घेतली. अच्युतरायाच्या वेळींच विठ्ठलस्वामीचें मंदिर बांधलें.
रामरायानें राज्यविस्तार चालविल्यानें त्याचें व दक्षिणेंतील पांच मुसुलमान राज्यांचे उत्तरोत्तर फाटत चाललें. त्या राज्यांतहि परस्पर द्वेष असल्यानें निरनिराळयावेळीं त्यांनां मदत करून रामराजा हा आपलें राज्य वाढवी. याच्यावेळीं राज्याचा वसूल वीस कोटी रुपये होता. त्याच्या मदतीशिवाय या मुसुलमानी राजांचें चालत नसे. त्या सर्वांचे वकील याच्या दरबारीं होते. रामराय शूर परंतु मुत्सद्दी नसल्यानें त्याच्या उद्दामपणाच्या कांहीं कृत्यांनीं सर्व मुसुलमान राजे त्याच्या विरुध्द एक बनले आणि त्याच्यावर चालून गेले. रामरायानें त्यांची गांठ तालीकोट जवळील रक्कसगी-तंगडगी (राक्षस तागडी) गांवीं घेतली व तेथेंच घनघोर संग्राम होऊन हिंदूंचें साम्राज्य नष्ट झालें. रामराय या वेळीं बेपर्वा होता. दोनशें वर्षें सतत विजयानगरच्या हिंदु लोकांनीं या मुसुलमान राजांनां खडे चारले होते या भरंवशावर तो गेला, तरी पण त्यानें लढाई शौर्याची मारली. तिरुमलानें तुंगभद्रेचा जो उतार दाबला होता तिकडून न येता मुसुलमानी सैन्यें दुसर्या उतारानें नदी उतरली. तालीकोटची लढाई २३।१।१५६५ रोजीं झाली. जगांतील क्रांतिकारक लढायांपैकीं ही एक असून तिच्या शेवटानें दक्षिणेंत मुसुलमानांचें वर्चस्व १०० वर्षें बसलें. लढाईंत दोन्हीं बाजूंस तोफा होत्या. रामराय ७० वर्षांचा वृध्द असतांहि शौर्यानें लढत होता, पण अखेरीस निजामशहाच्या एका मस्त हत्तीनें त्याच्या घोडयास मारलें व त्या गडबडींत रामराजा मुसुलमानांच्या हातीं लागला. निजामशहानें क्रूरपणें त्याचा शिरच्छेद केला. हें पाहून हिंदु फौजा विस्कळित झाल्या. तिरुमलानें सदाशिवरायास घेऊन व बरोबर ७५० हत्ती संपत्तीनें भरलेले घेऊन दक्षिणेकडे प्रयाण केलें. नंतर मुसुलमानी सैन्यें राजधानींत शिरून त्यांनीं तेथें अनन्वित कृत्यें केली. लोकांची कत्तल करणें, देवळें व वाडे जमीनदोस्त करणें, स्त्रियांची विटंबना करणें व अगणित लूट मिळविणें हे प्रकार ५ महिनेपर्यंत चालू होते. जगाच्या इतिहासांत अशा भयंकर प्रळयाचें उदाहरण क्वचित सांपडेल असें म्हणतात. व्यंकटाद्री हा या लढाईंत मारला गेला. यापुढें विजयानगर शहरानें पु्हां डोकें वर काढलें नाहीं. हल्लीं तेथें हजारों पडक्या इमारती आहेत. विजयानगरचें साम्राज्य मुसुलमान शहांनीं वांटून घेतलें. तिरुमलानें पेनकोंडयास कांहीं दिवस राज्य केलें, तेंहि मुसुलमानांनीं घेतल्यावर त्यानें चंद्रगिरीस गादी स्थापिली. त्यानें विजयानगरच्या निरनिराळया सरदारांनां व मांडलिकांनां एकत्र करण्याचा व पुन्हां साम्राज्य उभारण्याचा प्रयत्न केला पण तो साधला नाहीं. मांडलिक स्वतंत्र बनूं लागले तेव्हां तिरुमलानेंहि सदाशिवरायाचा खून केला. याप्रमाणें नरसिंह घराणें नष्ट झालें. तिरुमलाचा वंश सांप्रत चंद्रगीरीस नांदत आहे; व दुसरा वंश अनागोंदीस (निजामाचा मांडलिक म्हणून) नांदत आहे.
या राज्यांत झालेल्या अनेक (प्रधान, सेनापति, आचार्य वगैरे) व्यक्तीचीं नांवें प्रसिध्द आहेत; पण त्यांची खुलासेवार माहिती आढळत नाहीं. उदा. बसवय्या धननायक, मलजप्पा वडियार, कंपनमंत्री, गुंडदंडाधिपति, मल्लीनाथ इ. विद्यारण्य व सायण यांची मात्र थोडी माहिती सांपडते. सनातनधर्माचा जो उच्छेद मुसुलमानांनीं केला होता, त्याच्या पुनरुज्जीवनासाठीं व त्याच्या रक्षणासाठीं एका ब्राह्मणानें (माधवाचार्य) हें राज्य स्थापिलें होतें आणि पुढें त्यानें या राज्यास धार्मिक पीठा (शृंगेरी) कडून पूर्णपणें पाठिंबाहि मिळवून दिला होता. पण पुढील काळांत हा धर्माचा व राजकारणाचा परस्पर संबंध सुटला आणि त्यामुळें राज्य मोडकळीस आलें. कर्तव्यापेक्षां चैनीकडे व राष्ट्रहिताऐवजीं स्वहिताकडे राजांचें व विद्वानांचें लक्ष्य जाऊं लागल्याचा परिणाम राज्य नष्ट होण्यांत झाला. या राज्यांत हिर्यांच्या खाणी पुष्कळ असून त्यांत निघणार्या हिर्यांसारखे हिरे (त्याकाळीं) सार्यां पृथ्वींत कोणत्याहि खाणींतून निघत नसत. २५ कॅरटपेक्षां जास्त वजनाचे हिरे राजाचे असत, कर्नूळ, अनंतपूर, वज्राकडूर येथील खाणी प्रसिध्द होत्या. या खाणी, पूर्वकिनार्यावरील मोत्यांचे कारखाने, पश्चिम किनार्यावरील बंदरांतील परदेशांशीं चालणारा व्यापार इत्यादिकांनीं हें राज्यच फार श्रीमंत बनलें होतें. सन १४४० च्या सुमारास विजयानगर शहराचा घेर ३० कोसांचा होता; याला ७ तट होते. राजवाडयाच्या चारहि बाजूंस बाजार होते शहरांत सांडपाण्यांचीं गटारें होतीं. सोन्याचीं नाणीं पुष्कळ प्रचारांत होतीं. सैन्य ९६ हजार होतें. इमारती दगडी होत्या; शहरांत पण्याचे कालवे आणून उंसाचे मळे केलेले होते; तांदूळ फार पिके,. हे कालवे व बागा अद्यापीहि मोडक्या स्थितींत आढळतात. समर्कंदच्या शहानें आपला वकील अब्दुल रझाक हा १४४३ त विजयानगरास पाठविला होता. तो म्हणतो, विजयानगरकरांची एखंदर फौज ११ लाख होती. व मंगलोर येथें त्यांचें मुख्य आरमार असे. यांच्या फौजेंत मुसुलमान शिपाई असत. कालीकतचा झामोरिन हा विजययानगरकरांस भिऊन वागे. येथील महानवमीचा उत्सव मोठया थाटाचा होई. (फेरिस्तान इतिहास; अब्दुल रझाक व निकोलो कोंटी यांचीं प्रवासवृत्ते; सिवेल फर्गाटन एपायर; सूर्यनारायणराव नेव्हर टु बी फर्गाटन एंपायर; चिंगलपट डिस्ट्रिक्ट म्यानुएल; डिनॅस्टीज ऑफ सदर्न इंडिया; एशियाटिक रिसर्चेस. २०.१०; म्हैसूर इन्क्रिप्शन्स; अय्यंगार-सोर्सेस ऑफ विजयानगर हिस्टरी; रॅव्हनशॉ-ट्रयाडिशन्स; इंडि. ऑंटि. ३४.१९ अर्किआलॉजिकल सर्व्हे साऊथ इंडिया. भा.१; माबेल डफ.)