विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विजयानगरम्,जहागीर:- मद्रास इलाख्यांत विजयानगरम् जहागीर मोठी महत्त्वाची समजली जात असून विझगापट्टम् जिल्ह्याचा बराच मोठा भाग तिनें व्यापिला आहे. हिच्यामध्यें विजायगनरम्, विमलीपट्टम् व शृंगवरपुकोट तहशिलीचा समावेश होऊन पालकोंडा, गजपतीनगरम्, चिपरुपल्ली, विझगापट्टम। अंकापल्ली, विरहळळी, गोवळकोंडा, सर्वसिद्धि वगैरे तालुक्यांचा भाग येतो. विझगापट्टम् जिल्ह्यांतील या जहागिरीची जमीन फार सुपीक असून लोकवस्ती दाट आहे. विजयानगर हें मुख्य शहर असून जाहागिरीचें वर्षिक उत्पन्न २० लक्षांचें आहे. जाहागीरदारांचा मूळ पुरुष माधववर्मा नांवाचा असून सन ५९१ सालीं त्यानें कृष्णतटाकीं रजपूत वसाहत केली होती. त्याच्या वंशजांनीं गोवळकोंडयाच्य दरबारांत महत्वाचीं कामें केलीं होतीं. १६३२ सालीं पशुपति माधववर्मा या नांवाच्या पुरुषानें विझगापट्टम् घेऊन उत्तरसरकारमधील बराच प्रदेश हस्तगत केला. त्या वेळेस फ्रेंच सरदार बुशी हा हिंदुस्थानांत असून त्याचा विजयरामराजाशीं फार स्नेह होता. विजयरामराज याचा नातू पेद्दाविजयरामराय म्हणून होता. त्यानें १७१० सालीं राजधानी पोतनूर येथें होती तीं बदलून विजयानगरम् येथें आणिली. १७५७ सालांत विजयरामराज (पेद्दा) व बोविलीचे जमीनदार यांच्यांत फार वैमनस्य उत्पन्न होऊन थोडा वेळापर्यंत जरी पेद्दाविजयरामराजाचा जय झाला तरी अखेरीस कोणीं दुष्टानें पूर्वीचें वैर साधून त्यास ठार मारिलें. त्याचा मुलगा आनंदराज मेल्यावर मागें त्याचा सीताराम नांवाचा मुलगा होता. हा फार कुशाग्र बुद्धीचा असून धाडसी असे. त्यानें चिकाकूलजवळ मराठयांचा पराभव केला व राजमहेंद्रीच्या दक्षिणटोकांपर्यंत मुलूख सर करुन पशुपती, जयपूर व पालकोंडा येथील जमीनदारांवर छाप बसविली. सिताराम हा राजनीतिनिपुण होता. खंडणी वक्तशीर पोहोंचवीत असल्यामुळें कंपनीसरकारजवळ त्याचें अतिशय वजन होतें. १७९३ सालीं तो मद्रासला दरबारी कामाकरितां म्हणून गेला तो पुन्हां विजयनगरला आलाच नाहीं. त्याचा भाऊ विजयरामराज राज्याचा कारभार चालविण्यास अगदी असमर्थ होता. त्यामुळें कंपनीसरकारची खंडणी वेळेवर मिळत नव्हती. तेव्हां कंपनीनें त्याला मच्छलीपट्टम् येथें ठेविलें व जहागीरबंदोबस्त स्वतःकडे घेतला. पुढें विजयरामराज मच्छलीपट्टम् येथें मृत्यु पावला. त्याला नारायणबाबू नांवाचा मुलगा होता, तो अधिकारावर आला. त्यानें कंपनीसरकारची ५ लक्ष खंडणी कबूल केली. सन १८४५ सालीं नारायणबाबू मरण पावला. त्याचा वारस राजपतिराज झाला. आज राजा पशुपति विजयराम गजपतीराज हे गादीवर आहेत.
तहशील:- मद्रास,विझगापट्टम् जिल्हा, एक जमीनदारी. क्षेत्रफळ ३१९ चौरस मैल असून लोकसंख्या १९२१ सालीं १९५८६० होती. तहसिलींत १९१ खेडीं असून काळीचें व इतर मिळून उत्पन्न सुमारें ६१ लाख आहे.
शहर- विजयानगरपोटविभाग व तहसिलीचें मुख्य ठिकाण. ही विजयानगरम् जहागिरीची राजधानी असून हें विझगापट्टम् जिल्ह्यांत दुसरें शहर आहे. येथें व्यापारी पठ, लष्करी छावणी, व म्युनिसिपल कमिटी हे. लोकसंख्या ३९२९. या ठिकाणीं टाऊन, हॉल व बाजार चांगल्या रीतीनें बांधलेला असून किलज्यांत राजाचें राहणें असतें. शहराच्या उत्तरेस एक मोठा तलाव असून त्याच्या जवळच लष्करी छावणी व रेल्वे स्टेशन आहे. हवा निरोगी असते. राजाच्या खर्चानें येथें एक कॉलेज चालतें.