विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विध्यपर्वत:- विंध्यपर्वताचा आरंभ गुजराथेंत होतो. पुढें मध्यप्रांताच्या सागर व दमोह जिल्ह्यांच्या उत्तरेकडून तो वाघेलखंड व रेवा संस्थानांतून शिरतो व बहारमध्यें संपतो. विंध्य व सातपुड्याचा मिलाफ नर्मदेच्या उगमाजवळ अमरकंटक येथें झालेला असून या डोंगराळ प्रदेशाचा व नर्मदा नदीचा देखावा कित्येक ठिकाणीं आल्हादकारक तर कित्येक ठिकाणीं अतिशय भयप्रद आहे. कित्येक ठिकाणीं नर्मदा जोरानें वाहात विध्यंपर्वत पोखरीत पुढें धिटाईनें गर्जना करीत चालली आहे तर कित्येक स्थळीं ती सौम्य स्वरूप धारण करून विध्यंराजाच्या बाजूनें वळसें घेत घेत शांतपणानें आवाज न करतां वाहात आहे. विध्यंपर्वताचा उत्तरेकडील भाग झांशी, बांडा, अलाहाबाद व मिर्झापूर जिल्ह्यांतून जातो याची उंची समुद्रसपाटीपासून २००० फुटांहून जास्त कोठेंहि नाहीं.
विध्यं शब्दाचा अर्थ संस्कृतांत पारध असा असून या प्रदेशाचा विस्तार पौराणिक मतानुसार मध्यदेशापर्यंत झाला आहे. संस्कृत ग्रंथांतून विध्यंपर्वताला खुनशी राजाची उपमा दिली आहे. हिमालय आपल्यापेक्षां उंच आहे ही गोष्ट त्याला डांवत होती, म्हणून हिमालय व मेरू या दोघांनां उंचींत मागें टाकण्यास त्यानें आरंभ केला. तेव्हां देवादिक सर्व भयभीत होऊन विंध्यपर्वताचा गुरू अगस्ति याच्याकडे जाऊन त्याची प्रार्थना करूं लागले. तेव्हां अगस्ति विध्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. हें पाहून आपले गुरू आलेले आहेत म्हणून त्यानें त्यांनां वांकून नमस्कार केला. तेव्हां अगस्तीनें तूं असाच नम्र रहा, वर डोकें करूं नको म्हणून सांगितल्यावरून तो तेव्हांपासून आज आहे तसाच राहिला. विंध्यपर्वताची एकंदर लांबी ७०० मैल आहे.