विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विनायकी लिपी:- एक सांकेतिक लिपी. कन्नड येथील जुना ग्रंथसंग्रह चाळीत असतां त्यांत वैद्यकावरील कांही ग्रंथ विनायकी लिपींत लिहिलेले रा. गो. का. चांदोरकर यांस आढळले. स्वर व स्वरचिन्हें या लिपींत आपल्या 'बालबोध' देवनागरी लिपीप्रमाणेंच आहेत. परंतु व्यंजनें सांकेतिक आहेत. इतर सांकेतिक लिपींत व या लिपींत असा फरक आहे की, इतरत्र एका वर्णाबद्दल दुसरा वर्ण योजिलेला असतो, परंतु दोन्हींहि वर्ण देवनागरींतीलच असतात. उदाहरणार्थ 'महानुभवांची' सांकेतिक लिपि अथवा 'पेशवार्इंतील एक सांकेतिक पुत्र' याची लिपि भा. इ. सं. मं. अहवाल शके १८३२ पृ. ७६। ७८. तसें या विनायकी लिपीचें नाहीं. हिच्यांत देवनागरींतील एका वर्णाऐवजी निराळेंच एक सूचक चिन्ह गृहित धरलें आहे. यामुळें हिच्यांतील वर्णांत व देवनागरींतील वर्णांत आकृतिसाम्य मुळींच नाहीं.
संयुक्त वर्णाच्या बाबतींत या लिपीचें व पूर्वकालीन अशोक लिपीचें अथवा त्याच अशोक लिपीचा आधुनिक प्रगल्भ तर्जुमा जी मोडी अथवा मौयीं लिपि तिचें अत्यंत साम्य आहे. देवनागरी अथवा बालबोधींत स्वरांवाचून व्यंजनाचा जसा अर्धा-अस्फुट-उच्चार व त्या उच्चारानुरूप जसें त्या वर्णाचें अर्धे रूप तसें अशोक लिपींत नाहीं, मोयीत म्हणजे मोडींत नाहीं, व तसेंच या विनायकी लिपींतहि नाहीं. उदाहरणार्थ 'ख्य' (ख्+य्+अ) हें जोडाक्षर देवनागरींत अथवा आधुनिक बालबोधींत जसें अर्धा ख काढून त्यास य जोडून साधतां येतें. तशी अशोक लिपींत किंवा विनायकी लिपींत अर्धा ख काढण्याची सोय नाहीं. यांत ख्य आणि खयदोन्हीं एकाच स्वरूपाचीं आहेत विनायकी लिपीचा चित्रपट भा. इ. सं. मं. अहवाल शके १८३४ मध्यें आहे.