विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विनुकोंडा , तालुका:- मद्रास, गंतूर जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ६४४ चौ. मै. लोकसंख्या १९२१ सालीं १००६११ होती. खेंड्यांची संख्या ७१. विनुकोंडा हें तालुक्याचें मुख्य ठिकाण होय. तालुक्यांतील बराच भाग काळ्या भोर जमीनीचा आहे.
शहर:- विनुकोंडा तालुक्याचें मुख्य शहर. लोकसंख्या सुमारें ७०००. हें विनुकोंडा नांवच्या टेंकडीजवळ वसल्याकारणानें याचें तेंच नांव पडलें. गांवाच्या जवळ एक किल्ला व दोन टेंकडी वरचे मिळून तीन किल्ल्यांचा त्रिकोण बनलेला आहे. सन १५१५ त विजयानगरच्या कृष्णदेव रायानें विनुकोंडा शहर घेतलें. पुढें १५७९ त विजयानगरच्या राजापासून गोवळकोंड्यांच्या सुलतानानें तें घेतलें. अखेरीस इंग्रजांनीं मच्छलीपट्टम् घेतलें त्या वेळेस विनुकोंडा अनायासेंच इंग्रज सत्तेखालीं आलें. या वेळेस हें लष्करी ठाणें करण्यांत आलें होतें. पुढें १८०८ मध्यें विनुकोंडा येथून ठाणें उठवून मच्छलीपट्टम् येथें नेल्यामुळें हें गांव फार मोडकळीस आलें.