प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विमा:- विम्याचे बरेच प्रकार आहेत; उदा. आयुर्विमा, आगविमा इत्यादि.

आयुष्याचा विमा:- ठराविक मुदतीपर्यंत किंवा हयातीपर्यंत दरसाल एक ठराविक रक्कम भरली असतां एक बरीच मोठी रक्कम मृत्यूसमयीं किंवा जगल्यास कांहीं ठराविक मुदतीनंतर मिळावयाची, ह्याचें नांव विमा. विलायतेंतील विमा कंपन्यांनीं मोठ्या प्रमाणावर आंकडेशास्त्राचा उपयोग करून असें सिध्द केलें आहे कीं, अनेक व्यक्तींनीं बनलेल्या समाजांतील जन्ममृत्यु इत्यादि गोष्टी कांहीं नियमित प्रमाणांनीं घडत असतात; व जितका जितका समाज संख्येनें मोठा तितकें तितकें हें नियमित प्रमाण जास्ती स्पष्टपणानें दिसून येतें.

ब्रिटिश ऑफिसेस मेल्स कोष्टकांतील आंकडे.
वय वर्षारंभी
हयात.
एक वर्षात
मृत्यू
मृत्यूचें :
हजारी प्र.
आयुर्मान
सरासरी.
 १०  १०००००  ३३८ ३.३८ ५२-०
 २०  ९६४५३  ३९०  ४.०४  ४३-८
 ३०  ९१९४२  ५४७  ५.९५  ३५-९
 ४०  ८५४६७  ७८२  ९.१५  २७-१०
 ५०  ७६१८५  ११४६  १५.०४  २०-७
 १००  ७  ४  ५७१.४३  १-१
१०२ १०००.०० ०-६

वरील कोष्टकांत मृत्यूचें हजारी प्रमाण दिलें आहे, तें वर्षाच्या सुरवातीला जे लोक हयात असतील त्यांपैकीं त्या वर्षांत जितके इसम मरतील त्यांचें होय. कांहीं इसम १०२ वर्षे पर्यंत जगतात, व कांहीं एका वर्षातच मरतात; परंतु सर्वांची सरासरी काय होते ती शेवटल्या सदरांत दिली आहे, त्याला अपेक्षित आयुष्य (एक्स्पेक्टेशन ऑफ लाईफ) असेंहि नांव देण्यांत येते. हें कोष्टक १८३३ ते १८९३ पर्यंतचे आंकडे घेऊन केलेलें आहे. अर्भकावस्थेंत मृत्यूचें प्रमाण फार असतें तें उतरत उतरत १४ वयाच्या सुमारास पुन्हां अधिक होऊं लागतें. २२ च्या सुमारास तें बरेंच वाढल्यामुळें पुढील पांच चार वर्षांत किंचित कमी होतें पण २४ वयाच्या सुमारास पुन्हां वाढूं लागतें; तें मग वाढतच राहतें. विशीच्या भरांत अविचारामुळें मृत्यूचें प्रमाण थोडें जास्त वाढतें. स्त्रियांचें मृत्युसंख्येचें प्रमाण पुरूषांपेक्षां वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत जास्त असतें तें पुढें कमी होत जातें. बाळंतपणाचा धोका हें एक ह्याचें प्रमुख कारण आहे. या कोष्टकास मृत्यूचें कोष्टक म्हणतात. त्याचा विम्याच्या कामीं उपयोग पुढीलप्रमाणें होतो- समजा, २५ वर्षे वयाचे दहा हजार इसम एकत्र जमले व त्यांनीं विचार केला कीं, आपल्यापैकीं एका वर्षाच्या आंत जे इसम मरतील त्यांच्या वारसास एक हजार रू. मिळावे. कोष्टकाप्रमाणें पाहिलें तर या इसमांपैकीं ६६ किंवा ६७ इसम एक वर्षांत मरतील व त्यांस सरासरीनें ६६३०० रू. द्यावे लागतील. म्हणून प्रत्येक इसमानें ६ रू. १० आणि १ पै दिले म्हणजे झालें. ह्याला नेट प्रिमियम म्हणजे निव्वळ दर म्हणतात. आतां असें होईल कीं, कदाचित ६६ च्या ऐवजीं ७०।७५ इसम सुध्दां त्या सालीं मरतील किंवा ४०।५० हि मरतील. तथापि जास्त मृत्यू झाल्यास अडचण होऊ नये म्हणून वर सांगितलेल्या निव्वळ दरापेक्षा कांहीं तरी जास्त रक्कम देणें इष्ट आहे. त्याचप्रमाणें ही सर्व ७०।८० हजारांची रक्कम वसूल करून तिची विल्हेवाट करण्यासाठीं ऑफिसखर्च लागेल व हें सर्व काम करण्यासाठीं एखादी कंपनी स्थापन झाल्यास तिच्या भागीदारांस फायदा पडला पाहिजे. निव्वळ दरावर ही जी फाजील आकारणी असते तिला लोडिंग उर्फ वोजा म्हणतात. अशा रीतीनें एक वर्षापुरताच विमा उतरतात त्याला 'टर्मपॉलिसी' म्हणतात. एक वर्षाच्या आंत मृत्यु आल्यास आपल्या वारसांची तजवीज नसल्यानें त्यांस कठिण दिवस येण्याचा संभव असतो; त्या बाबतींत निश्चितपणा ह्या गोष्टीनें त्या रकमेची पूर्ण भरपाई होते.

या दहा हजार इसमांपैकीं कोणी रोगी असल्यास त्यांस मृत्यु येण्याचा संभव अधिक, त्यामुळें वेळेस इतरांचें नुकसान होण्याचा संभव आहे. म्हणून प्रथम सर्वांची डॉक्टरी तपासणी करून, रोगी असलेल्या इसमाकडून जास्त प्रीमियम घेणें जरूर आहे. वर लिहिल्याप्रमाणें २५ वर्षे वयाच्या मनुष्यास फार तर ८।९ रूपये प्रीमियम बसावयाचा; परंतु विमा कंपन्या २५ किंवा अधिकहि रूपये आकारतात तर ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे कीं, शेवटपर्यंत कंपन्या इतकाच प्रीमियम घेतात, वाढत्या वयांत अधिक घेत नाहींत व दरसाल पुन्हां पुन्हां डॉक्टरी तपासणीहि करीत नाहींत. नाहीं तर ६५ वयाला निव्वळ हप्ता दर हजारी ४३ च्या वर येतो, ७५ वयाला ९८ च्या वर येतो व ९५ वयाला ६३७ रूपये येतो. शिवाय प्रकृति ढांसळल्यास १ वर्षाच्या टर्म पॉजिसीलाहि निव्वळ दरापेक्षां पुष्कळ जास्ती दर पडेल, व कदाचित् अशी पॉलिसी रोगीपणामुळें कोणी देणारहि नाहींत. सालोसाल वाढता प्रीमियम घेऊन विमा उतरणार्‍या कांहीं थोड्या कंपन्या विलायतेस क्वचित् आहेत. मात्र त्या दरसाल डॉक्टरी तपासणी करवीत नाहींत. अशा कंपन्यांनां अॅसेसमेंट कंपन्या म्हणतात. अशा कंपन्यांचा साध्या कंपन्यांपुढें टिकाव लागला नाहीं.

प्रीमिअम:- व्याजामुळें लांब मुदतीच्या विम्यांचे दर बरेच कमी देण्यास परवडतात. जमलेल्या हप्त्यांच्या रकमेपैकीं क्लेम्स (मयत इसमांच्या वारसाच्या हक्काच्या मागण्या) देऊन व खर्च भागून बरीच मोठी रक्कम उरते, ती व्याजीं लावली असतां बरेंच उत्पन्न होतें, व हेंच उत्पन्न पुन्हां व्याजी लावले असतां त्यावरहि व्याज येतें. अशा रीतीनें चक्रवाढ व्याजानें रक्कम बरीच फुगत जाते. कोणत्याहि रकमेची तीन टक्के व्याजानें साडेतेवीस वर्षांत दामदुप्पट होते, व पांच टक्के व्याजानें साडेचौदा वर्षांत दामदुप्पट होते. यामुळें प्रीमियम तयार करतांना रक्कम व्याजानें वाढेल ही गोष्ट हिशेबांत घ्यावयाचा तो भावी दर होय. आज आपल्या रकमेवर अमुक दराने व्याज पडत आहे म्हणून पुढें तितका दर पडेलच असें म्हणतां येणार नाहीं. म्हणून हिशोबासाठीं भावी दर, आपली खात्री असेल त्यापेक्षांहि कांहि कमी धरावे लागतात. अशा रीतीनें भावी प्राप्तीची आशा कमी ठेवल्यामुळें प्रीमियमचे दर जरा मोठे येतात. पण अपेक्षित किंचा अधिक व्याज खरोखरच लाभलें असतां प्रीमियमच्या भरलेल्या पैशांपैकीं कांहीं अंश बोनसच्या रूपानें परत मिळतो. त्याचप्रमाणें अपेक्षित प्रमाणापेक्षां कमी प्रमाणांत मृत्यू झाले असतां, म्हणजे ते ज्या वेळेस होतील असें आपणांस वाटलें होतें त्यापेक्षां उशीरा झाल्यास हिशोबांत धरल्यापेक्षां प्रीमियमचे हप्तेहि जास्त मिळतात व विम्याच्या रकमेवरचें व्याज मिळालें नसतें तेंहि मिळतें. अशा रीतीनें होणारा फायदाहि बोनसमधून परत देण्यांत येतो. तसाच सरेंडर्स (रोख रक्कम घेऊन पॉलिसीवरचा हक्क सोडून देणें,) लॉसेस( मुदतींत प्रीमियम न भरल्यामुळें पॉलिसी रद्द होणें) वगैरेंपासून फायदा होतो. बोनसचा मुख्य भाग म्हणजे फायद्यासाठीं म्हणून मुद्दाम जास्ती प्रीमियम आकारतात त्यांतून येतो. पॉलिसी दोन प्रकारच्या असतात: 'विथ प्रॉफिट' नफ्यासह व 'विदाउट प्रॉफिट' बिननफ्याची ; यांपैकीं दुसर्‍या प्रकारच्या पॉलिसीचे प्रीमियम कमी असतात, पण त्यांस बोनस उर्फ नफ्याचा हिस्सा मिळत नाहीं. ह्या दोन्हीं प्रकारांपैकीं ज्याला केवळ कर्जाला' तारण वगैरे निव्वळ व्यापारी कारणाकरतां विमा उतरणें असेल, किंवा शक्य तितके कमी पैसे भरून ठराविक रक्कम मिळाली म्हणजे झालें, बारीक सारीक फायदे पहाण्याची ज्यास जरूर नाहीं, त्यानेंच विदाउट प्रॉफिट पॉलिसी घ्यावी. प्रॉफिट लोडिंग उर्फ फायद्यासाठीं म्हणून जी जास्त रक्कम प्रीमियममध्यें घेण्यांत येते ती प्रीमियमधून वजा केली असतां उरलेला भाग विदाउट प्रॉफिटच्या प्रीमियमपेक्षां कमी पडतो. म्हणजे एकंदरीनें हिशोब केला असतां (कंपनीवर विशेष कांहीं आपत्ति न आल्यास) विथ प्रॉफिट पॉलिसी ही विदाउट प्रॉफिटनेक्षां स्वस्ती पडते.

बोनस:- बोनस देण्याच्या तीन तर्‍हा आहेत:-  (१) कॅश म्हणजे रोख, (२) रिव्हर्शनरी म्हणजे प्रीमियम कायम ठेवून जेवढ्याचा विमा उतरलेला असेल त्यापेक्षां जास्त रक्कम देण्याचें कबूल करणें; ह्या पध्दतीचा फायदा भविष्यकाळीं मिळतो. व (३) रिडयूस्ट प्रीमियम, म्हणजे विम्याची रक्कम कायम ठेवून प्रीमियम कमी करण्याचें कबूल करणें. डिफर्ड बोनस म्हणजे कांहीं ठराविक मुदतीच्या आंत मृत्यु आल्यास मात्र बोनस लागू व्हावयाचें असा एक विम्याचाच प्रकार आहे. ह्या प्रकारांतील पुढें मिळणारा हा फायदा प्रथमपासून लागू झालेल्या साध्या रिव्हर्शनरीपेक्षां जास्ती प्रमाणांत असतो. रिव्हर्शनरी बोनसच्या दोन तर्‍हा आहेत: सिंपल व कांपाउंड. अलीकडील बहुतेक चांगल्या कंपन्या कांपाउंड बोनस देतात. सिंपल म्हणजे प्रथम १००० चा विमा उतरला असल्यास पुढील सर्व बोनस १००० रूपयांवरच आकारावयाचें. कांपाउंड म्हणजे पहिल्या वर्षपंचकाला ७५ रूपये रिव्हर्श्नरी बोनस दिलें म्हणजे १०७५ रूपये विम्याची रक्कम होते तर दुसर्‍या वर्षपंचकाचें बोनस १०७५ रूपयांचा विमा आहे असें समजून आकारावयाचें, म्हणजे ११५५ रू. १० आणे होतात. तेच सिंपल पध्दतीनें ११५० रू. होतात. बोनस नेंहमीं व्हॅल्युएशनच्या वेळेस देतात. कांहीं कंपन्या तीन वर्षांनीं व्हॅल्युएशन करतात, दोन व्हॅल्युएशनच्या मध्यें मृत्यू आल्यास मागील व्हॅल्युएशनच्या धोरणानें इंटरमीजिएट बोनस देतात.

पॉलिसी व्हॅल्युएशन:- याचा अर्थ कंपनींनें दिलेल्या सर्व पॉलिसीची व्हॅल्यु म्हणजे किंमत काय हें काढावयाचें, व तितकी रक्कम (हिला व्हॅल्युएशन रिझर्व म्हणतात) लोकांची देणें आहे असें समजून, हातांत असलेले पैसे उर्फ फंड त्यांतून ते बाजूस काढून ठेवून उरलेला तेवढा नफा म्हणून स्पेशल रिझर्व्ह बोनस इत्यादि त-हांनीं त्याची विल्हेवाट करावयाची. विमा कंपन्यांचें येणें-देणें मोठें चमत्कारिक असतें. प्रत्येक पॉलिसी म्हणजे कांहीं येणें आहे व कांहीं देणें आहे. त्यापुढें अनेक प्रीमियम यावयाचे असतात, पण ते सर्व किंवा त्यांतील कांहीं येणें किंवा न येणें हें तो मनुष्य जितका जगेल त्यावर अवलंबून आहे. हें मार्मिक कोष्टकाच्या आधारानें काढून व ह्याच्याशी त्या प्रीमियमची कटमितीनें आज किंमत काय आहे ह्याचा मेळ घालून पुढील सर्व प्रीमियमरूपी जें येणें आहे, त्याची आज किंमत काढावयाची. तसेंच प्रत्येक पॉलिसीमागें जी विम्याची रक्कम असेल तें देणें असतें. तें केव्हां द्यावें लागेल हें नक्की ठाउक असेल तर त्याची आज किंमत सहज काढतां येईल; पण हेंहि विमेदार जितका जगेल त्यावर अवलंबून आहे. म्हणून या देण्याचीही आज किंमत काढावयाची ती मृत्यूचीं कोष्टकें यांच्या साहाय्यानें काढावी लागते. त्या देण्या व येण्यापैकीं येणेंच नेहमीं जास्त असतें. म्हणून त्यांची वजावट करून जी रक्कम उरेल (पॉलिसीव्हॅल्यु) तितके कंपनी विमेदाराचें देणें लागतें, व तितकी रक्कम कंपनीला हातांतील पैशांतून काढून ठेवावी लागते.

अॅक्चुअरी:- ह्या सर्व येण्यादेण्याचा मृत्यूच्या व व्याजाच्या कोष्टकांच्या आधारें हिशेब करून फायदा काय पडतो व तो कसा वांटावा; रोख घेतल्यास किती द्यावा, प्रीमियम कमी मागितल्यास काय प्रमाणांत कमी करावा वगैरे गोष्टी ठरवावयाचें काम ज्या विमाशास्त्रज्ञाकडे असतें, त्याला अॅक्चुअरी असें म्हणतात. अशा अॅक्चुअरींच्या, लंडनला एक व एडिंबरोला एक अशा दोन संस्था आहेत, त्यांच्यातीलच कायते अॅक्चुअरी ब्रिटिश व हिंदि सरकारच्या कायद्यांत मान्य केले आहेत. प्रीमियम तयार करण्याचें कामहि अॅक्चुअरीकडेच असतें. ज्याप्रमाणें बँकांनीं व इतर रजिस्टर्ड व्यापारी संस्थांनीं दरसाल ऑडिटरकडॅन हिशेब तपासवून व नफा तोट्याचा हिशेब करवून ते प्रसिध्द करण्याबद्दल सरकारी कायदा आहे, त्याप्रमाणेंच विमाकंपन्यांनीं इतकें सगळें करून शिवाय जास्तीत जास्त दर पांच वर्षांनीं अॅक्चुअरीकडून पॉलिसी व्हॅल्युएशन करवून त्याचे आंकडे प्रसिध्द करण्यास सरकारकडे पाठविले पाहिजेत असा कायदा आहे. अॅक्युअरीनें मृत्यूचें कोष्टक कोणतें द्यावें, भावी व्याजाचा दर काय धरावा, इत्यादि संबंधानें कांहीं सरकारी नियम नाहीं. तरी कोष्टक व व्याजाचा दर काय घेतला, इत्यादि बरीच माहिती सरकारकडे पाठवावी लागते व ती सरकारमार्फत प्रसिध्द होत असल्यामुळें अॅक्युअरींनां फार काळजी घ्यावी लागते.
 
वर्षासन:- विमा उतरविण्याशिवाय वर्षासनें देणें हाहि एक महत्त्वाचा व्यवहार विमा कंपन्या करीत असतात. कांहीं ठराविक रक्कम( वयोमानाप्रमाणें) घेऊन जन्मभर (किंवा नियमित मुदतीपर्यंत हयातींत) हें वर्षासन विमाकंपनी देते. ज्यांनां वारस नाहींत, किंवा ज्यांच्या वारसांची इतर व्यवस्था झाली असते, अशांच्याजवळ जर एखादी मोठी रक्कम असेल व तिचा केवळ आपल्या आयुष्यांत भरपूर उपयोग करून घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांस ही पध्दत फार सोईची आहे. विलायतेंत हा प्रघात बराच आहे, आपल्याकडे म्हणण्यासारखा नाहीं. हें वर्षासनहि मध्येंच सोडणें झाल्यास भरलेल्या पैशाचा कांहीं अंश परत मिळूं शकतो.

विमेच्छु माणसानें विमा उतरण्यापूर्वी ज्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्या म्हणजे (१) विम्याचे प्रकार, (२) विमा कंपनीचे गुणदोष (३) विम्याच्या अटी या होत.

(१) विम्याचे प्रकार:- हे तीन आहेत.(अ) लाईफ (मृत्यूनंतर रक्कम मिळणें;) (आ) एंडाउमेंट  (ठराविक मुदतीपर्यंत विमेदार जगला तरच रक्कम मिळणें नाहीं तर नाहीं); (इ) अॅशुअरन्स  (ठराविक मुदतीच्या आंत विमेदार मेला तरच रक्कम मिळणें नाहीं तर नाहीं) होल लाईफ म्हणजे तहाहयात प्रीमियम भरून मृत्यूनंतर वारसास पैसे मिळणें ही योजना अलीकडे फार मागें पडत चालली आहे. ह्याचें कारण, ह्याला जरी प्रीमियम कमी असला तरी मिळकतीचें वय संपल्यावर पैसे भरीत रहाणें हें फार त्रासदायक होतें, व बरीच वर्षे जगल्यावांचल्यास आपण काटकसर करून भरलेल्या पैशांचें चीज आपल्या डोळयांदेखत व्हावें ही विमेदाराची इच्छा सफल होत नाहीं. ह्यापैकीं पहिलें हें एकच कारण असल्यास 'होल लाईफ लिमिटेड पेमेंट' म्हणजे रक्कम मृत्यूनंतर मिळावयाची, परंतु प्रीमियम मात्र कांहीं ठराविक मुदतीपर्यंत (जगल्यास) भरावयाचा ही योजना सोईची आहे. (आ) आणि (इ) ह्या अंगांचा मिलाफ करून 'एंडाउमेंट अॅषुअरन्स' ही योजना होते व बहुतेक विमे ह्याच योजनेप्रमाणें उतरले जातात. ह्या योजनेंत कांहीं विशिष्ट मुदतीपर्यंत जगल्यास किंवा त्याच्या आंत मेल्यास रक्कम मिळते. कारण पुढें बदलून घेण्यास खर्च फार पडतो. (ई) चवथी योजना 'डबल एंडाउमेंट अॅषुअरन्स'. हींत एंडउमेंट (ठराविक मुदतीपर्यंत जगल्यास) रक्कम दुप्पट मिळते, व अॅशुअरन्स (मुदत संपण्याच्या आंत मेल्यास) एकपट मिळते. ह्या योजनेंत मध्यम प्रकृतीचीं (म्हणजे फार वर्षे जगण्याचा संभव नाहीं) अशी माणसें एक्स्ट्रा(जादा) प्रीमियम  घेतल्याशिवाय स्वीरकारण्याची सोय असते. कांहीं कंपन्यांत पहिली पांच वर्षे निम्मा प्रीमियम घेऊन पुढें पूर्ण प्रीमियम अशी एक योजना असते. कांहीं कंपन्या मृत्यूनंतर वारसाला मिळण्याची रक्कम जवळ ठेवून त्यावर कांहीं ठराविक मुदतीपर्यंत ५ टक्के किंवा अशा कांहीं दरानें व्याज देतात, व नंतर रक्कम हवालीं करतात. लवकर मृत्यू आल्यास प्रीमियमचा सर्व किंवा कांही भाग परत करणें, विम्याची रक्कम सालोसाल वाढत जाणें, मुलाला अमुक वयाच्या वेळीं मिळावयाचा हप्ता पालकास आधीं मृत्यु आल्यास बंद होणें, वगैरे अनेक योजनांचे प्रकार आहेत. विलायतेंत विशेष प्रचारांत असलेली एक योजना म्हणजे दोघांच्या नांवाचा विमा उतरून त्यांतील कोणताहि एकजण मेल्यावर दुसर्‍यास रक्कम मिळावयाची ही होय. त्याशिवाय विमेच्छूनें कांहीं योजना सुचविली तर त्या योजनेवरून हिशोब करून अॅक्युअरी प्रीमियम सांगूं शकतात.

(२) विमाकंपनीचें गुणदोष:- कंपन्या दोन तर्‍हेच्या असतात. मालकवारी (प्रोप्रायटरी) व समाईक (म्यूच्युअल.) मालकवारी कंपन्यांच्या व्यवस्थेंत विमेदाराचा कांहीं हात नसतो, परंतु अलीकडे बहुतेक अशा कंपन्या मोठाल्या रकमेच्या विमेदारांस दोन डायरेक्टर निवडण्याची परवानगी देतात. बाकीचे डायरेक्टर हे कंपनीच्या शेअरहोल्डरांनीं (भागीदारांनीं) निवडून दिलेले असतात. अलीकडची वहिवाट म्हणजे झालेल्या निव्वळ फायद्यांतील एकदशांश फायदा भागीदारांस देण्यांत येतो, व नउदशांश विमेदारांस अॅक्चुअरीच्या सांगण्याप्रामणें वांटून देतात. समाईक कंपन्यांत सर्व फायदा विमेदारांसच मिळतो, कारण ह्यांत भागीदार नसतात व कंपनींची मालकी विमेदाराकडेच असते.

(३) विम्याच्या अटी:- कंपनीच्या कांहीं इतर अटीं सवलतीं वगैरे असतात. त्यांतील मुख्य महत्त्वाची सवलत म्हणजे वेळेस प्रीमियमचे पैसे जवळ नसल्यास, सरेंडर व्हॅल्यूंतून पॉलिसीच्या नांवें पैसे कर्जाऊ लिहून पॉलिसी चालू ठेवणे ही होय. प्रीमियम लागू होण्याच्या दिवसानंतर एक महिना प्रीमियम भरण्यास सवलत दिलेली असते. ह्याहि मुदतींत पैसें न भरल्यास पॉलिसीवर बोजा ठेवून ती पॉलिसी चालू ठेवण्यांत येते. सरेंडर व्हॅल्यू देण्यासंबंधानें निरनिराळ्या कंपन्यांचें निरनिराळें नियम आहेत.

यावरून असें दिसून येईल कीं, विमाकंपनींत बहुतकरून भरलेले पैसे परत मिळतात इतकेंच नव्हे, तर थोडेंबहुत व्याजहि पडतें, व लवकर मृत्यू आल्यास इतकी रक्कम मिळते. कीं, सावकारी दृष्टी त्यापुढें कांहींच नाहीं. फार वय झाल्यावर होल लाइफ पॉलिसी घेतली व मनुष्य फार वर्षे जगला तर मात्र कांहीं नुकसान होतें.

गटविमा:- अमेरिकेंत निराळीच एक पध्दत निघाली आहे. तिला ग्रूप इशुअरन्स (गटविमा) असें नांव आहे. ह्या प्रकारांत पॉलिसी एकट्या माणसाच्या नांवानें करावयाची नसून अनेक माणसांच्या एका गटाच्या नांवानें करावयाची असतें. गट कोणत्या तरी एकमुखी व्यवसायांत गुंतलेल्या इसमांचा असावा लागतो. सर्वांस पगार देणारा जो मालक त्यानेंच विमा उतरावयाचा व हप्ताहि त्यानेंच द्यावयाचा. या विम्याचा फायदा नोकरांच्या वारसास मिळावयाचा असतो. कमींत कमी १०० इसम एका गटांत असावे लागतात. ह्याहून कमी असल्यास जास्त प्रीमियम किंवा डॉक्टरी तपासणी वगैरे कडकपणा येतो. एरवीं ह्या विम्याच्या प्रकारांत डॉक्टरी तपासणी नसते. प्रीमियमची रक्कम दर वर्षाला निराळी असते. मालकानें सर्व इसमांची यादी द्यावयाची; तींत वय, पगार, नोकरीची मुदत वगैरे माहिती असावी लागतें. दर हजारीं प्रीमियमचें कोष्टक केवळ वयावर असतें, विम्याची रक्कम वर सांगितलेल्या नियमाप्रमाणेंच कमी अधिक होते, वयें हीं दरसाल बदलतात, कांहीं जुनीं माणसें जातात, कांहीं मरतात, कांहीं नोकरी सोडतात, व त्यांच्या जागीं नवीन माणसें येतात, ह्या कारणामुळें प्रीमियमची रक्कम दरसाल बदलते. प्रीमियमच्या रकमेचा निश्चय करण्यास वेळ नसला तरी विम्याची रक्कम ठरवून घेऊन अंदाजी शेकडा एक ते दीड परिस्थितीप्रमाणें ह्या प्रमाणांत प्रीमियमची रक्कम मिळाली म्हणजे पॉलिसी सुरू होते. उरलेली रक्कम मागाहून दिली-घेतली तरी जाते. पॉलिसी एक वर्षाची व असते परंतु वाटल्यास कांहीं वर्षेपर्यंत ती ह्याच प्रीमियमच्या दरावर पुढें चालू ठेवण्याची शर्त कधीं कधीं घालण्यांत येते. क्वचित विम्याचें स्वरूप एंडाउमेंट अॅशुअरन्स, किंवा लिमिटेड पेमेंट होल लाईफच्या धर्तीवरहि ठेवण्यांत येतें व त्याप्रमाणें प्रीमियम ठरवितात, पण हे प्रकार अपवादात्मक असतात. मुख्य पॉलिसी मालकाच्या नांवाची; त्यांत नोकरांचीं नांवें नसतात, पण प्रत्येक नोकराच्या नांवाचें एक सर्टिफिकेट( एक प्रकारची पॉलिसीच) त्याला देण्यांत येते. मालकास सर्व प्रीमियम भरावयाचे असतात, तरी त्याचा एकंदरींत फायदा होतो. माणसें काम होतां होईतों मध्येंच सोडून जात नाहींत. माणसें टिकलीं म्हणजे कामावर नजर बसतें. तसेंच ह्या विम्याच्या योगानें नोकरांचें मालकावर किंवा कारखान्यावर अथवा ऑफिसच्या कारभारावर ममत्व जडतें. प्रसंगीं विम्यामुळें पगाराचें प्रमाण थोडें कमी ठेवलें तरी भागतें.

गटविम्यांत नवीन म्हणजे इतकेंच कीं, डॉक्टरी तपासणी नाहीं. परंतु गटांतील सर्वच इसम विम्यांत यावे लागत असल्यामुळें चांगले निरोगी इसम वगळले जात नाहींत, आणि धोका विभागला जाऊन असा विमा उतरणें शक्य होतें.

आगविमां:- आयुर्विम्याप्रमाणें आगविम्यांतहि कोष्टकें काढण्याचे प्रयत्न झाले. परंतु आयुर्विम्याचीं कोष्टके जशी बहुतांशी विश्वसनीय मानतां येतात तशी हीं मानतां येत नाहींत; कारण आयुष्याचा विमा उतरणाराचें मरण मुद्दाम घडवून आणण्याचा संभव अतिशय थोडा आहे, परंतु आगीचा विमा उतरलेल्या इमारतीस किंवा मालास मुद्दाम आग लावून दिली जाण्याचा संभव फार आहे. दुसरें कारण असें कीं आगविमा हा नेहमीं सर्वस्वी किंवा अशत: नुकसानीचा उतरला जातो, म्हणजे अर्धवट इमारत जळाल्यास जेवढी नुकसानी होईल तेवढीच भरून दिली जाते. आयुर्विम्यांत शरीराला अंशत: मरण आलें व अंशत: रक्कम दिली असें होत नाहीं. आगीचा धोका आंतून असतो तसा पुष्कळ प्रमाणांत बाहेरूनहि असतो. इत्यादि कारणांनीं आगविम्याचा धंदा अधिक कठिण आहे. ह्या बाबतींत चौकशी करण्यामध्यें अतिशय दक्षता ठेवावी लागते व चतुराईहि फार वापरावी लागते. तरी पण ह्या सर्व गोष्टी लक्षांत घेऊन आगविम्याला कांहीं शास्त्रीय पध्दति लावतां येते.

दर्याविमा:- प्रथम हें काम श्रीमंत व्यापारी लोक एकट्याच्या जबाबदारीवर करीत. विम्याच्या लेखाखालीं त्यांची सही असे, त्यामुळें त्यांनां अंडररायटर्स अशी संज्ञा पडली, ती अजूनहि चालू आहे. दर्याविम्याचा प्रसार पुष्कळ झाल्यावर त्यांत भानगडी उप्तन्न होऊ लागल्या. त्यामुळें 'दर्याविम्याचा दलाल' हा धंदा उत्पन्न झाला.

जामीनकीविमा:- पैशाच्या बाबतींत जबाबदारीची नोकरीची जागा असली तर तशी नोकरी मागणार्‍या जवळून जामीन मागतात. अशी जामीनकी पतकरण्यास कांहीं कंपन्या तयार होतात. जो जामीन मागत असेल त्याजवळून पत्रक भरून घेतात, त्यावरून कामाची जबाबदारी किती आहे, त्या नोकरावर देखरेख किती राहील, त्याच्यावर विश्वास किती टाकण्यांत येईल, इत्यादि माहिती मिळते. त्या पत्रकांत जितकी देखरेख राहील म्हणून मालकानें लिहिलें असेल त्याहून कमी देखरेख झाल्यामुळें अफरातफर करण्यास नोकरास सवड सांपडली असेल, तर जामीनास रक्कम देणें भाग पडत नाहीं. या विम्याचा हप्ता साधारणपणें विम्याच्या रकमेवर दरसाल दर शेकडा पाऊण पासून सव्वापर्यंत असतो.

अवयवांचा विमा:- ज्या धंदेवाल्या लोकांची प्राप्ति त्यांच्या अवयवांच्या मजबुतीवर अवलंबून असते, असे लोक आपल्या अवयवांचा विमा उतरतात. एका नाचणारीनें आपला पायांचा विमा दीड लक्ष रूपयांचा उतरला होता. तसेंच एका रूपवतीनें आपल्या डोळ्यांचा तीस हजारांचा, दुसरीनें आपल्या सुंदर केसांचा साठ हजारांचा, एका सुंदर गाणारणीनें आपल्या वक्ष:स्थलाचा तीन लक्षांचा व आवाजाचा सहा लक्षांचा, असे विमे उतरले होते.

चोरी, दरोडा या संबंधीं विमा:- चोरी, घरफोडी, दरवडा, इत्यादींमध्यें ज्याप्रमाणें कांहीं भेद आहेत त्या भेदांप्रमाणें विम्याच्या हप्त्यांतहि भेद करण्यांत येतो. ज्यानें असा विमा उतरला असेल त्याच्या येथें चोरी वगैरेमुळें नुकसान झाल्यास तें त्यास भरून मिळतें. घरांत किती किंमतीचा माल आहे, त्यात मौल्यवान पदार्थ किती आहेत, घराचें संरक्षण कशा प्रकारानें होतें, घराची मजबुती कशी आहे, इत्यादि गोष्टीवर व नोकरचाकर, शेजारी पाजारी, इत्यादींवर हप्ता अवलंबून असतो.

साध्यागाड्या व मोटार कार यांचा विमा:- ह्या गाड्यांची होणारी मोडतोड, त्यापासून मालकाला व नोकरांनां इजा व गाडी हांकतांना दुसर्‍या कोणा इसमास इजा होऊन त्याला भरपाई करावी लागल्यास ती, इतक्या सगळ्यांचा विमा उतरण्यांत येतो.

इतर विमे, गारांची वृष्टि:- ह्यामुळें शेतास नुकसान होण्याचा संभव असतो. घोडे व गुरें:- ह्यांचा मरणामुळें नुकसान होण्याचा संभव असतो. महत्त्वाच्या किल्ल्या व सीझन तिकीटें, हरवल्यामुळें नुकसान होण्याचा संभव असतो; गहाण मिळकत, खतें, इष्टेटीवरील हक्क इत्यादि गोष्टी आज किती भक्कम तारणाच्या असल्या तरी त्यांची किंमत उतरून नुकसान होण्याचा संभव असतो; कांचेचा, चिनी मातीचा इत्यादि माल उंची किंमतीचा असल्यास फुटून वगैरे नुकसान होण्याचा संभव असतो; भारी किंमतीची चित्रें खराब होऊन त्यांची किंमत उतरण्याचा संभव असतो; तेव्हां ह्या सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई करण्याबद्दल विमा उतरण्यांत येतो. परंतु हें होणारें नुकसान खरें असलें पाहिजे. नाहीं तर विमा बेकायदेशीर ठरतो. [ब्रिटानिकांतील इन्शुअरन्स लेखाच्या शेवटीं उपयुक्त संदर्भग्रंथ सांपडतील. शिवाय 'इंशुअरन्स वर्ल्ड' व ग. स. मराठे - आयुष्याचा विमा; चित्रमयजगत मासिकाच्या १९१६ व १९१७ सालच्या जानेवारीचे अंक व १९२६ सालचा फेब्रुवारीचा अंक; पहा.]

   

खंड २० : व-हाड - सांचिन  

 

 

 

  वलवनाड
  वल संस्थान
  वल्लभाचार्य
  वल्लभीचा मैत्रकवंश
  वल्लभ्
  वसई
  वसिष्ठ
  वसु
  वसुदेव
  वहना
  वहाबी
  वक्षनिदान
  वाई
  वाकाटक राजे
  वांकानेर संस्थान
  वांगारा
  वांग
  वाग्भट्ट
  वाघ
  वाघरी
  वाघांटी
  वाघेल राजे
  वाघोलीकर, मोरो बापूजी
  वाघ्या
  वाघ्रा
  वाचनालयें
  वाचस्पतिमिश्र
  वाचाभंग
  वांटप
  वाटल
  वाटाणा
  वाडाइ
  वाडें
  वाणी
  वात
  वात्स्यायन
  वांदिवाश
  वाद्यें
  वांद्रें
  वांबोरी
  वामदेव
  वामन
  वामन पंडित
  वामनस्थळी
  वायनाड
  वायलपाद
  वायव्य सरहद्द प्रांत
  वायुपुराण
  वायुभारमापक
  वायूचे रोग
  वारकरी पंथ
  वारली
  वारसा
  वार्सा शहर
  वालखिल्य
  वालपापडी
  वालपोल, होरेशिओ
  वालरस
  वालाजापेट
  वाली
  वाल्मिकि
  वाल्हें
  वाशिंग्टन
  वॉशिंग्टन, जॉर्ज
  वॉशिंग्टन, बुकर टी
  वाशिम
  वासवा
  वा संस्थानें
  वासुकि
  वासुदेव
  वासोटा
  वास्तुसौंदर्यशास्त्र
  वाहीक
  वाळवें
  वाळा
  विकर्ण
  विक्रमपूर
  विक्रमसंवत् व विक्रमादित्य
  विंचावड
  विचित्रवीर्य
  विंचू
  विंचूर
  विंचेस्टर
  विजयगच्छ
  विजयदुर्ग
  विजयादशमी
  विजयानगर
  विजयानगरचें घराणें
  विजयानगरम्
  विजापूर
  विझगापट्टम्
  विटेनबर्ग
  विठ्ठल कवी
  विठ्ठल शिवदेव विंचूरकर
  विठ्ठल सुंदर परशरामी
  विंडबर्ड बेटे
  विंडसर
  विणकाम अथवा विणणें
  वित्तेश्वर
  विदुर
  विदुला
  विदेह
  विद्याधर
  विद्यापीठें
  विद्युत्
  विंध्यपर्वत
  विनायकी लिपी
  विनुकोंडा
  विमा
  विमान
  विरपुर
  विरमगांव
  विरवन्नलूर
  विराट
  विल्यम राजे
  विल्यम्स, सर मोनीयर
  विल्लुपुरसम्
  विल्यन वुड्रो
  विल्सन, होरेस हेमन
  विल्हेल्म्स हॅवन
  विवस्वान्
  विवाह
  विवेकानंद
  विशाळगड किल्ला
  विशाळगड संस्थान
  विशिष्टाद्वैत
  विश्वकर्मा
  विश्वनाथ
  विश्वब्राह्मण
  विश्वसंस्था
  विश्वामित्र
  विश्वासराव पेशवे
  विश्वेदेव
  विश्वोत्पत्ति
  विश्वोत्पत्ति
  विषें व विषबाधा
  विष्णु
  विष्णु गोविंद विजापूरकर
  विष्णुदास नामा
  विष्णुपुराण
  विष्णुस्मृति
  विसनगर
  विसोबाखेचर
  विज्ञानशास्त्र
  विज्ञानेश्वर
  वीरपूर
  वीरवल्ली
  वीरशैव उर्फ लिंगायत
  वीरावळ
  वूलर सरोवर
  वूलवरहॅस्टन
  वूलिच
  वृत्तपत्रें
  वृत्तें
  वृत्र
  वृन्दसंगीत
  वृंदावन
  वृद्धाचलम्
  वृक्षसंवर्धन
  वेंगी देश
  वेंगुर्लें
  वेणूबाई
  वेत
  वेद
  वेदांत
  वेदारण्यम्
  वेद्द
  वेधशास्त्र
  वेरुळ
  वेलदोडे
  वेलन
  वेलबोंडी
  वेलस्टी रिचर्ड कॉली, मार्किंस
  वेलिंग्टन
  वेलिंग्टन, आर्थंर वेलस्ली
  वेल्लाळ
  वेल्लोर
  वेल्स
  वेश्याव्यवसाय
  वेस्टइंडिज बेटें
  वेस्ले, जॉन
  वैतरणी
  वैदु
  वैराट
  वैवस्वत मनु
  वैशंपायन
  वैशाली-विशाल
  वैशेषिक
  वैश्य
  वैष्णव संप्रदाय
  व्यंकटगिरी
  व्यंकटाध्वरी
  व्यंकोजी
  व्यापार
  व्यायाम
  व्रत
  व्हर्जिन बेटें
  व्हर्जिल
  व्हल्कन
  व्हिएन्ना
  व्हिक्टोरिया
  व्हिक्टोरिया निआंझा
  व्हिक्टोरिया फॉल
  व्हिलिंजस्
  व्हेनिस्
  व्हेनेझुएला
  व्हेपिन
  व्हेसुव्हियस
  व्होल्टा अल्सान्ड्रो
  व्होल्टेअर
 
  शक
  शंकराचार्य
  शंकुतला
  शकुनि
  शक्तिसंस्थान
  शंतनु
  शत्रुघ्न
  शनि
  शब्दवाहक
  शरीरसंवर्धन
  शर्मिष्ठा
  शल्य
  शस्त्रवैद्यक
  शहाजहान
  शहाजी
  शहामृग
  शाई
  शांघाय
  शांतीपूर
  शान
  शारीर व इंद्रियविज्ञानशास्त्र
  शारीरांत्र गूहकसंघ
  शार्लमन चार्लस दि ग्रेट
  शालिवाहन राजे
  शालिवाहन शक
  शासनशास्त्र
  शाहू थोरला
  शिकॅगो
  शिखंडी
  शिंगाडा
  शिगात्झे
  शिंदे घराणें
  शिंपी
  शिबि
  शिरपुर
  शिर:शोणित मूर्च्छा
  शिराझ
  शिरूर
  शिरोंचा
  शिलर, जोहान ख्रिस्तोप
  शिलाजित
  शिलाहार राजे
  शिल्पकला
  शिव
  शिवगंगा
  शिवगिरि
  शिवदीनबावा
  शिवाजी
  शिशुपाल
  शिसें
  शिक्षणशास्त्र
  शीख
  शुक
  शुक्र
  शुंग घराणें
  शुजा
  शुन:शेप
  शुंभ निशुंभ
  शुश्रूषा
  शूर्पणखा
  शूलगव
  शृंगवरप्पुकोटा
  शृंगेरी
  शेक्सपिअर विल्यम्
  शेख
  शेखमहंमद
  शेख सादी
  शेगांव
  शेडबाळ
  शेफिल्ड
  शेले, पर्सी बायशे
  शेष
  शेळ्यामेंढ्या
  शैवसंप्रदाय
  शोण अथवा शोणभद्रा
  शोपेनहार
  श्रवणबेळगोळ
  श्रीधरस्वामी
  श्रीनगर
  श्रीरंगम्
  श्रीविल्लीपुत्तूर
  श्रीवैकुंठम्
  श्रीशैलम्
  श्लीपदरोग
  श्लेगेल
  श्वासनलिकादाह
  श्वेतांबर जैन
  श्वेताश्वतरोपनिषद
 
 
  संकटकतनु
  संकरनाइनार्कोयिल
  संकेश्वर
  सक्कर
  सखारामबापू
  संख्यामीमांसा
  संग
  संगड
  संगमनेर
  संगमेश्वर
  सगर
  संगीतशास्त्र
  संग्रहणी
  संघड
  संघसत्तावाद
  सच्छिद्रसंघ
  संजय
  संजारी
  सतलज
  संताळ परगणे
  सती
  सत्नामी
  सत्पंथ
  सत्यभामा
  सत्यवान
  संत्री-मोसंबी
  सदानंद
  सदाशिव माणकेश्वर
  सदाशिवरावभाऊ पेशवे
  संदिला
  संदोवे
  संद्वीप
  संधिपाद
  संधिवातरोग
  सॅन फ्रान्सिको
  सन्निपातज्वर
  संपगांव
  संपथर
  संपात
  संपातचलन
  सपृष्ठवंश
  सप्तशृंगी
  सफीपूर
  संबलपूर
  संभळ
  संभाजी
  संभाजी आंगरे
  समरकंद
  समशेर बहादूर
  समाजशास्त्र
  समाजसत्तावाद
  समीकरणमीमांसा
  समुंद्री
  सम्पत्ति
  सम्राला
  सयाम
  संयुक्त संस्थानें
  सय्यद
  सरकेशियन लोक
  सरगोधा
  सरधन
  सरस्वती
  सरहिंद
  सरक्षक जकातपद्धति
  सरैकेला
  सर्प
  सर्वसिद्धि
  सर्वेश्वरवाद
  सर्व्हिया
  सॅलोनिका
  सवर
  संशयवाद
  ससराम
  ससा
  संस्कार
  संस्कृति
  सस्तनप्राणी
  सहकारी संस्था
  सहदेव
  सहवासी ब्राह्मण
  सहसवन
  सहारा
  सह्याद्रि
  साऊथ वेस्ट आफ्रिका
  साकारिन
  साकोली
  साक्रेटीस
  साखर
  सांख्य
  साग
  सांगला
  सांगली संस्थान
  सागैंग, जिल्हा
  सांगोलें
  साघलीन
  सांचिन

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .