विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विल्यम राजे:- विल्यम या नांवाचे बरेच राजे व प्रसिध्द पुरूष होऊन गेले. त्यांपैकीं इंग्लंडचा पहिला व तिसरा विल्यम. जर्मनीचा पहिला विल्यम आणि नेदर्लंडचा विल्यम दि सायलेंट हे विशेष प्रसिध्द राजे आहेत.

पहिला विल्यम:- (इंग्लंड, १०२७-१०८०) यास विल्यम दि काँकरर म्हणजे जेता विल्यम असेंहि म्हणतात. हा नार्मंडीचा ड्यूक होता. इंग्लंडच्या एडवर्ड राजानें आपल्यामागून यास कायदेशीर वारस करण्याचें वचन दिलें होतें. १०६५ च्या नाताळांत एडवर्ड वारला. तेव्हां पुढीलसालीं विल्यमनें इंग्लंडवर स्वारी केली व राजा बनला. त्यानें इंग्लंडांतील अव्यवस्था मोडून इंग्लंडेतर यूरोपांतील सरंजामीपध्दति तेथें अमलांत आणली. मात्र फ्रान्समध्यें या पध्दतींत जे दोष होते ते त्यानें काढून टाकले. हा कांहीं बाबतींत जरा जुलमी होता. परंतु याच्या कारकीर्दींत इंग्लंडच्या व्यापार-उद्योधंद्यास चांगलें उत्तेजन मिळालें.

पहिला विल्यम (जर्मनी, १७९७-१८८८):- आधुनिक जर्मनीचा जनक. नेपोलियनबरोबर झालेल्या शेवटच्या युध्दांत त्यानें चांगली कामगिरी बजावली होती. याची बायको कॅथोलिक पंथी असून दरबारांत बिस्मार्कच्या विरूध्द हिचें वजन बरेंच असे. विल्यम उदारमतवादी होता. राजा हा प्रजेचें कल्याण करणारा ईश्वराचा प्रतिनिधि होय असें तो मानी. बिस्मार्कसारखा राजकारणपटु प्रधान त्यास मिळाला व त्यामुळेंच त्याची कारकीर्द यशस्वी झाली. १८७१ सालीं तो जर्मन बादशहा झाला. याच्या कारकीर्दीत ऑस्ट्रियाशी व फ्रान्सशी अशी दोन युध्दें होऊन विल्यम पूर्ण यशस्वी झाला (जर्मनी पहा.) समाजसत्तावाद्यांनीं त्यास दोन वेळां मारण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला.

विल्यम दि सायलेंट (नेदर्लंड, १५३३-८४):- ऑरेंजचा पुत्र. हा पुढें नेदर्लंडचा राजा झाला स्पेनच्या ५ व्या चार्लसचा विश्वासू असल्यामुळें त्यानें यास सेनापति नेमिलें. पुढें फिलिपनें याला मंत्रिमंडळांत घेतलें. तो मुत्सद्दीहि होता. फिलिपनें कॅथोलिक धर्म जेव्हां जबरदस्तीनें नेदंर्लंडवर लादण्यास सुरवात केली तेव्हां त्यानें त्याचा निषेध केला व स्पेन सोडून आपल्या मातृ भूमीस परत गेला. १५७३ त कॅलव्हिन पंथाची यानें दीक्षा घेतली, पण ती केवळ लोकप्रिय होण्याकरितां होती. यास सायलेंट म्हणजे शांत म्हणत पण हें त्याचें स्वभावनिदर्षक वर्णन नव्हे. १५७७ त सर्वांनीं धार्मिक भेदभाव विसरून यास सरकारी जुलमाचा प्रतिकार करण्यास आपला पुढारी नेमलें. फिलिपनें यास मारण्यासाठीं दोनदां बक्षिसें लावलीं, पण हे प्रयत्न फसलें. पण पुढे तो डेफ्ट शहरीं राहण्यास गेला. त्यास १५८४ त एका माणसानें ठार मारलें.

तिसरा विल्यम (इंग्लंड, १६५०-१७०२):- हा प्रथम हॉलंडमधील एक संस्थानिक व योध्दा म्हणून प्रसिध्द होता. याचा बाप लहानपणींच वारल्यानें तो आपल्या शत्रुमंडळांतच वाढला व त्यायोगानें त्याचा स्वभाव हेकेखार, संशयी, हटवादी असा बनला. दुसर्‍या जेम्सची वडील मुलगी मेरी ही यास दिली होती. इंग्लंडच्या दुसर्‍या जेन्मच्या पलायनानंतर इंग्रजांनीं विल्यमास बोलावून मेरी त्याची राणी आणि आणि वुइल्यम असे संयुक्त राज्यकर्ते असल्याबददल पार्लमेंटनें जाहीर केलें. त्याच्या राज्यकारभारांत कांहीं दोष होते. बँक ऑफ इंग्लंडला पाठिंबा देण्याऐवजीं त्यानें लँड बँकला उचलून धरलें. पण ती लवकरच बुडाली. पार्लमेंटमधील पक्षविषयक राज्यपध्दतीविषयीं तो थोडा नाखूश होता. सर्व पक्षांची मंडळी प्रधानमंडळांत असावी म्हणजे एकी होईल असें त्यास वाटे. फ्रान्सबरोबरच्या युध्दांत जरी त्यास पराभव स्वीकारावा लागला तरी १६९७ त रिस्विक येथें इंग्लंडला हितावह असाच तह यानें करून देवविला.