विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

विल्हेल्म्स हॅवन:- जर्मनींतील एक शहर. हें जर्मन साम्राज्याचें उत्तरसमुद्रावरील आरमाराचें मुख्य ठिकाण व युध्दोपयोगी बंदर आहे. १९०५ सालीं येथील लोकसंख्या २६०१२ होती. यापैकीं ८२२७ लोक सैन्यांत किंवा आरमारांत कामावर होते. शहराची मांडणी पध्दतशीर आहे. जुनी व नवी अशा दोन बंदरांच्या जागा तयार केल्या आहेत. या नवीन बंदराच्या उत्तरेस जहाजांचे निरनिराळे भाग जोडण्यासाठीं गोदी, व तिच्या पश्चिमेस जहाजें बांधण्याची जोडी आहे. याच्या आणखी पुधे मोठमोठी लढाऊ जहाजें राहूं शकतील अशा नवीन गोद्या १९०६ मध्यें बांधल्या आहेत. नवीन बंदराच्या आग्नेयीस पाणतीरांकरितां एक बंदर आहे. येथील सर्व उद्योधंदे जहाजें बांधण्याच्या कामाशी संबध्द असलेलेच आहेत. याशिवाय येथें तोफखाना व पाणसुरूंग यांकरितां वखारी, हवामानशास्त्राची वेधशाळा, बोटीच्या बावट्याचें स्टेशन, आरमारी पलटण व आरमारी शिक्षणाच्या संस्थाहि आहेत.