विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विश्वामित्र:- एक वैदिक ऋषि. वेदांत हा सुदाराचा पुरोहित व ऋग्वेदाच्या तिसर्या मंडलाचा द्रष्टा म्हणून प्रसिध्द आहे (बुध्दपूर्व जग, दाशराज्ञ युध्द प्रकरण व पृ. ८३ पहा.) हा कुशिकाचा पुत्र होता. पुराणांतून हा सोमवंशी गाधी राजाचा पुत्र असून तप:प्रभावानें क्षत्रियाचा पुढें ब्रह्मर्षि झाला अशाबद्दल कथा आहेत. अनेक वर्षे तप केल्यानंतर इंद्रादी देव त्यास ब्रह्मर्षि म्हणूं लागले, परंतु वसिष्ठ म्हणेना. तेव्हां विश्वामित्र वसिष्ठाचा द्वेश करूं लागला. त्याकरितां हरिश्चंद्राचें त्यानें सत्त्व पाहिलें. वशिष्ठाचे १०० पुत्र कल्माशपाद राजाकडून भक्षण करविलें. शेवटीं सर्व करून थकल्यावर याचा राग शांत झाला तेव्हां वसिष्ठहि त्यास ब्रह्मर्षि म्हणूं लागला. मेनका अप्सरेनें याची तपश्चर्या भंगिली होती. तिच्या पोटी त्याला शकुंतला नांवाची कन्या झाली. त्रिशंकूला यानें सदेह स्वर्गी चढण्याकरितां प्रतिसृष्टी निर्माण केली. रामायण, महाभारत व इतर पुराणें यांतून विश्वामित्रासंबंधीं निरनिराळ्या कथा आहेत.