विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विष्णु गोविंद विजापूरकर (१८६३-१९२६):- एक राष्ट्रीय शिक्षणाचे महाराष्ट्रांतील आद्यप्रवर्तक व समर्थविद्यालयाचे संस्थापक. यांचा जन्म कोल्हापुरास व अभ्यास राजाराम हायस्कूल व डेक्कन कॉलेजांत होऊन ते बी. ए. (१८८७) व नंतर एम. ए. झाले. त्यांनां डेक्कन व अहमदाबाद कॉलेजांत फेलो व नंतर राजाराम कॉलेजांत संस्कृत व इंग्रजीचे प्रोफेसर नेमण्यांत आलें. त्यांनीं ग्रंथमाला हें मासिक सुरू केलें तसेंच तें 'समर्थ' साप्ताहिकांत कोल्हापुरच्या राज्यकारभारावर टीकात्मक लेख लिहीत असत. १९०६ सालीं नोकरींतून बडतर्फ करण्यांत आल्यावर त्यांनीं कोल्हापुरास 'समर्थविद्यालय' नांवाचें राष्ट्रीय विद्यालय सुरू केलें व पुढें तें तळेगांव येथें आणलें. यावेळीं त्यांनीं चालविलेल्या विश्ववृत्त मासिकांतील लेखांबद्दल त्यांनां १९०८८ सालीं ३ वर्षांची साध्या कैदेची शिक्षा झाली. तींतून सुटून आल्यावर, १९१० सालीं बंद पडलेलें तळेगांवचें समर्थविद्यालय त्यांनीं पुन्हां १९१८ सालीं 'नूतन समर्थविद्यालय' या नांवानें सुरू केलें; व अखेरपर्यंत त्याच संस्थेचें काम केलें. न्या. रानडे यांच्या 'राईस ऑफ दि मराठा पावर' या इंग्रजी ग्रंथाचें मराठी भाषांतरहि त्यांनीं केलें आहें.