विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
विष्णुस्मृति:- विष्णुस्मृति, वैष्णव धर्मशास्त्र, किंवा विष्णुसूत्र हा एक प्राचीन सूत्रांचा संग्रह आहे. या ग्रंथास धर्मसूत्र असें म्हणण्यास हरकत नाहीं. विष्णुसूत्रांत विविध विषयांची चर्चा केली असल्यामुळें त्याचीं जीं कांहीं पांच सहा धर्मसूत्रें आहेत त्यांत प्रामुख्यानें गणना करतां येते. कठशाखा आणि मन्वादिस्मृति यांच्यांशी या सूत्राचा निकट संबंध असल्यामुळें याचें महत्त्व विशेष आहे. या सूत्रांत जे वेदमंत्र किंवा प्रतीकें आलीं आहेत तीं सर्व वेदांतून घेतलेलीं आहेत; आणि कांहीं वेळेला तर अध्यायाचा अध्याय दुसर्या स्मृतींतून घेतलेला सांपडतो. गायत्री, पुरूषसूक्त, अघमर्षण, व्याहती, त्रिसुपर्ण, ज्येष्ठसामन्, बार्हस्पत्य मंत्र इत्यादि वेदमंत्र यांत सांपडतात. असें जरी आहे तरी एकवीस, सदुसष्ट, अडुसष्ट, व चौर्याहत्तर या अध्यायांत जे मंत्र आहेत तें जसेच्या तसेच सूत्रासह काठक गृह्यसूत्रांत व कठसंहितेंत सांपडतात. या दोन ग्रंथांचें तादात्म्य असून जेथें जेथें फरक दृष्टीस पडतो तेथें तेथें तो भाग कोणी दुसर्यानें घुसडून दिला असावा असें दिसतें. तथापि कांहीं कांहीं श्राध्दविधीसारखे मंत्र इतके मूळचे दिसतात कीं, ते विष्णुसूत्राच्या कर्त्यानें काठक गृह्यसूत्रांतून घेतले नसावेत असें वाटतें. दोघांनींहि ते मंत्र एखाद्या निरनिराळ्या ग्रंथांतून घेतले असावेत.
डॉ. ब्यूलरचें असें मत आहे कीं, विष्णुसूत्र हें कृष्णयजुर्वेदाच्या चारायणीय कठशाखेचें प्राचीन धर्मसूत्र होय. या काठक गृह्यसूत्रावर काश्मीरांत देवपालानें एक टीका लिहिली आहे; काश्मीरी दंतकथेवरून ती मुसुलमानांनीं काश्मीर देश जिंकण्यापूर्वी लिहिली गेली असावी. काठक श्रौतसूत्र सध्यां जवळ जवळ अस्तित्वांतच नाहीं म्हटलें तरी चालेल. तरी पण ज्याअर्थी गृह्यसूत्रांत त्याचा वारंवार उल्लेख केलेला आढळतो त्याअर्थी तें एके वेळीं अस्तित्वांत असलें पाहिजे असें सिध्द होतें. देवपालानें आपल्या या ग्रंथास लिहिलेल्या प्रस्तावनेवरून असें दिसतें कीं या गृह्यसूत्राएवढेंच श्रौतसूत्र असलें पाहिजे होतें.
यावरून कोणी असें अनुमान काढील कीं, कठगृह्यसूत्र व विष्णुसूत्र या दोहोंचाहि कर्ता एकच असेल परंतु तें बरोबर होणार नाहीं. कारण असें जर असतें तर दोन्ही सूत्रांत दिलेल्या विषयसंबंधानें पूर्ण ऐकमत्य पाहिजे होतें. उदाहरणार्थ स्नातक विधि, संस्कार यांविषयीं जरी ऐकमत्य आहे तरी कांहीं विषयांसंबंधीं विरोध दिसून येतोच. कित्येक ठिकाणीं शब्दांची योजना व वाक्यरचनाहि पूर्णपणें भिन्न आहे. हे ग्रंथ एकमेकांस साहाय्यभूत आहेत असें म्हणावें तर तेंहि बरोबर होणार नाहीं कारण तेच तेच विषय दोन्हीं ग्रंथांतून आढळतात. कांहीं जरी असलें तरी विष्णुसूत्र हें कठसूत्राइतकेंच प्राचीन असलें पाहिजे. कठशाखेचे वेदग्रंथ आणि कठसूत्र यांचा एकच काल होय.
विष्णुसूत्र आणि काठक गृह्यसूत्र या दोहोंत जे सामान्य भाग आहेत त्यांचा कालनिर्णय झाला. यांत इतर जे कित्येक नियम आहेत तेहि असेच प्राचीन आहेत हें विष्णुसूत्राची इतर सूत्र-स्मृतींशी तुलना केल्यास कळेल. आंतील विषयासंबंधानें लिहावयाचें म्हणजे यांतील विषय मनु, याज्ञवाल्क्य, आपस्तंब आणि गौतम व इतर कित्येक स्मृतितील विषयांशी जुळतो. यावरून विष्णुसूत्राच्या कर्त्यानें ते भाग इतर ग्रंथांतून घेतले असले पाहिजेत असा संशय येतो. किंवा सर्वांनीं मिळून एखाद्या तिसर्याच ग्रंथांतून ते घेतले असावेत. परंतु विष्णुसूत्रांत अशी कित्येक स्थलें आहेत कीं, तीं वाचलीं असतां आपणांस असें आढळून येतें कीं तीं कित्येक स्मृतीस उपकारक झालीं आहेत. बाकीच्या स्मृतिकारांनींच त्यांचा फायदा घेतला असावा असें सहज आढळून येईल. विष्णुसूत्राचें प्राचीनत्व सिध्द करण्याकरितां हें एक तिसरें कारण देतां येईल. विष्णुसूत्रांत अर्वाचीन भागहि पुष्कळ आहे. विशेषत: पहिले आणि शेवटले कांहीं अध्याय दुसर्या कोणी तरी बनवले असावेत हें त्यांच्या रचनेवरून दिसतें. या नव्या भागाचा कर्ता तिसर्या किंवा चवथ्या शतकांत होऊन गेला असला पाहिजे. विष्णुसूत्राचा समग्र मूलग्रंथ नंद पंडितानें लिहिलेल्या वैजयंती नामक टीकेसह सांपडतो. नंद पंडित हा रामपंडित धर्माधिकार्यांचा पुत्र असून त्यानें ही टीका काशीत १६२२ त लिहिली.