विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन
वृंदावन:- संयुक्त प्रांताच्या मथुरा जिल्ह्यांतील हें मथुरेच्या उत्तरेस ९ मैलांवर एक शहर आहे. लोकसंख्या सुमारें १८०००. येथून मथुरेस पक्की सडक व रेल्वे आहे. हिंदूंच्या धार्मिक इतिहासांत या स्थळाला बरेंच महत्त्व आहे. याचें प्राचीन नांव कालियावर्त होतें. भागवत ग्रंथांत वर्णिलेलें श्रीकृष्णाचें बरेंच चरित्र या ठिकाणीं घडून आलें. राधाकृष्णाचें हें आवडतें ठिकाण असल्यामुळें येथें हिंदुस्थानांतील दूरच्या भागांतून यात्रेकरू येत असतात. येथें १००० च्यावर देवालयें असून त्यांत इ.स. १५९० सालीं राजा मानसिंग (अंबर-जयपूर) यानें बांधिलेलें गोविंद देवाचें मंदिर फारच उत्कृष्ट आहे. कृष्णभक्तीच्या निरनिराळ्या संप्रदायांच्या वाढीबरोबर या गांवाची वाढ होत गेली आहे. या स्थानाजवळूनच यमुना नदी वाहात असून तिला मोठमोठे घाट बांधिले आहेत व भोंवतालीं रम्य उपवनांतून अनेक साधूंच्या समाधी आहेत. येथें मोर व वानर फार आहेत. येथें १८६६ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली.